एक नॉस्टॅल्जिक युरोप सहल -सन २०००... भाग १..~ऑस्ट्रिया

Submitted by रेव्यु on 16 November, 2021 - 01:59

vienna-to-salzburg-day-trip-guide-view-4.jpgएक आल्हाददायक नॉस्टाल्जिया (गतकालविव्हलता)-21 वर्षापूर्वीची आमची युरोप यात्रा
हे वर्णन मी 2000 साली आमच्या युरोपच्या सहलीनंतर लिहिले. सहलीच्या प्रारंभास आज बरोबर 21 वर्षे झाली. शरीरे बदलली तरी मन त्या आठवणीत रंगते आणि मन:पटलावर स्मृतींचे इंद्रधनुष्य साद घालते- आपल्या सप्तरंगात रंगून जाण्यासाठी.
6 जून 2000 च्या मध्यरात्री अनेक वर्षांपासून जुळवत असलेल्या स्वप्नवत प्रवासास दिल्लीच्या विमानतळावरून सुरुवात झाली. पहिल्यापासूनच कोणत्याही प्रवासाचे अन माणसांना जवळून पाहण्याचे खूळ असलेला मी... मला अगदी नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, चंदीगड-दिल्ली अन नाशिक-सटाणा असे प्रवास देखील आवडायचे. वाटेतील लहानमोठे बसचे थांबे, तिथले खाद्य, बस कंडक्टर अन ड्रायव्हरच्या लकबी, आयांबरोबरील मुलांचे हट्ट अन त्यांच्या लहरी- अशा अनेक छटा मला मोहवायच्या.

या आधीच्या 3-4 वेळेच्या व्यावसायिक अन दुबईच्या एका वैयक्तिक सहलीने आम्ही (सौ अन मी) हरखून गेलो होतो. अन जगात काहीही सुंदर, स्वच्छ, नीटनेटके अन सर्वात म्हणजे संकुचितपणाचा, आपपरभावाचा यत्किंचितही लवलेश नसलेले अन प्रेमाचे, आपुलकीने भरलेले, सत्यं शिवं सुंदरम् ची प्रचिती देणारे, संस्कृतीमूल्यांनी समृध्द, इतिहासाने श्रीमंत असे काही पाहिले की स्वाती(पत्नी) ला हे दाखवलेच पाहिजे हे आवर्जून वाटायचे. तसे पाहू गेल्यास एका मध्यम वर्गीय माझ्यासारख्यास, या इच्छा अनेक वर्षांपूर्वी मृगजळ होत्या. परंतु भारतातील मध्यम वर्गाच्या समृध्दीबरोबरच मी देखील त्या मृगजळास प्राप्त करण्याच्या पाठलागात सामिल झालो आणि ही स्वप्ने मग साकारतील असे वाटू लागले. आणि या इच्छेबरोबरच यू कॅन इफ यू थिंक यू कॅन यासारखी वचने मला प्रोत्साहन देऊ लागली. पुढे आर्थिक स्थैर्य मिळाले, आत्मविश्वास वाढला आणि अशी स्वप्ने प्राप्य आहेत असेही वाटले.
अर्थात, आजच्या पिढीला आमच्या पिढीला, तेव्हा परदेश प्रवास खूप कौतुकाची गोष्ट होती तसा राहिला नाही. मला तर आठवते की मी काम करत असलेल्या जर्मन कंपनीत लोक केव्हा जर्मनीला काही काळासाठी प्रशिक्षणासाठी जात तेव्हा स्थानिक गावकरी किंवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये सुद्धा एक छोटीशी जाहिरात येत असे- अमुक अमुक यांचा परदेशी प्रवास, त्यांना शुभेच्छा.

आमच्या प्रवासातला पहिला टप्पा ऑस्ट्रिया.साऊन्ड ऑफ म्युझिकने ख्याती प्राप्त झालेले ट्रॅप फॅमिली सिंगर्स. हिटलरच्या विघातक साम्राज्याला त्याने संगितमय आव्हान दिले, अख्या पाश्चात्त्य देशांना मोझार्ट ची देणगी दिलेले हे चिमुकले राष्ट्र. राष्ट्र हा शब्द देखील तसा अतिशयोक्तीच म्हणा ना! कारण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हा देश साडे चार तासात पार करता येईल.

सात मे रोजी सकाळी सहा वाजता व्हिएन्नाच्या विमानतळावर पोहोचलो. पहाट असल्यामुळे विमानतळावर अगदी मोजकीच मंडळी होती. सामान वेळेवर आले. बहुतेक पाट्या जर्मन मध्ये. अखेर खाणाखुणांनी विचारपूस झाली. भाषेची उणिव गौरांगींच्या स्मितहास्याने भरून निघाली. बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्याने बाजूसच उभ्या असलेल्या व्हिएन्ना स्टेशनला जाणाऱ्या बस कडे निर्देश केला. आम्ही उगीचच एअरपोर्ट ते स्टेशनचे टॅक्सीचे भाडे विचारले. ते होते साधारण एक हजार रुपये तर बसने तेच काम 100 रुपयात होत होते.

ड्रायव्हरने बस मध्ये सामान चढवले. सोबतच दिल्लीहून आलेल्या एक ऑस्ट्रियन आजीबाई होत्या. युरोपात सहयात्री टूरिस्ट मंडळी कटाक्षाने 65 वरच. पण उत्साह उत्साह अन जोम मात्र विशीचा. आजीना नाथ आग्रा जयपुर आणि काठमांडू खूपच आवडले होते. जाता जाता काहीसा दिलगिरी वजा सल्ला त्यांनी दिला की ऑस्ट्रियन लोकांच्या काहीसे वरकरणी तुसडे अन त्यांच्या आदरातिथ्यहीनतेने हिरमुसून जाऊ नका कारण स्वभावाने खरोखर ते तसे नाहीत.
स्वच्छ लख्ख पहाट. थोडीशी थंडी. दूरवर दिसणारे बर्फाच्छादित आल्प्स आणि अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती झाल्याचा सुप्त आनंद याचे समाधान मनात होते. त्यात ऑस्ट्रिया हा कुतूहलाचा प्रदेश. वाचनातून थोडासा परिचय व पुढे जाता जाता एका भव्य क्षितिजावर निसर्गदत्त सौंदर्याचा खेळ सुरू झाला. सूर्योदय तर कुठेही पाहिला तरीही देऊन जातो.

वाटेत व्हिएन्ना या राजधानीचा दिमाख कुठे दिसतो का हे शोधू लागलो. अतिशय नीटनेटके शहर. युरोपमध्ये कुठल्याही शहरात असतात ती सुबक घरे, लहान कार्स, काही गल्ल्या आणि जुनी चर्चेस. स्टेशन आले आणि तिकीट एअरपोर्ट वरच खरेदी केल्यामुळे आम्ही लगेच व्हियेन्ना ते झुरिक व्हाया साल्झबर्ग या ट्रेनमध्ये चढलो. आश्चर्य आहे.... गाडीत गर्दी होती आणि रिकाम्या जागा मिळता मिळता दमछाक झाली. शेवटी कंडक्टरने दया येऊन एक बॅग मदत म्हणून हातात घेतली. प्रवास सुरू झाला. अत्यंत आरामशीर चेअर कार आणि मैलोगणती धावणारी हिरवळ. टुमदार खेडी. मांडलेल्या आराशी सारखी घरे. घराबाहेर माणसे अप्रूपच. मधेच सायकलवर किंवा पायी पायी शाळेत जाणारी मुले. मध्येच लहान-लहान स्टेशन्स. आणि सर्व सुपरफास्ट गाड्यांसारखी आमची देखील दिमाखात पडणारे गाडी. स्टेशन वर अजूनही स्टेशन मास्तर बाबा हिरवी झेंडी घेऊन गाडीला निरोप देत होते. अगदी आपल्या मळवली किंवा बार्शि-टाकळी सारखी ही लहान स्टेशने. मधेच एखादे उद्योगप्रधान गाव, मग तिथे करवतीच्या आकाराचीच छते, पार्क केलेल्या काही गाड्या, माल आणणारे किंवा नेणारे ट्रक्स.

ऊन लख्ख असल्यामुळे अनेक घराबाहेर कपडे वाळत टाकले होते. का कुणास ठाऊक हे दृश्य मला तु खूप आवडते कारण ते राहते, बागडत्या मुलांचे, मायलेकींचे घर असते.
ही स्टेशन ते बघताना दुसऱ्या महायुद्धावरील इंग्रजी सिनेमांची आठवण आली. ऑस्ट्रीया देश दुसऱ्या महायुद्धात तावून सुलाखून निघाला होता. खूप वाताहत सहन करावी लागली होती. कॉलेजात असताना पाहिलेल्या चित्रपट शृंखलांची आठवण झाली. ही स्टेशन्स या संघर्षाची द्योतक होती. प्रत्येक देशाचा मनाच्या पटलावर एक संदर्भ असतो. ऑस्ट्रियाचा असा... होता... संगीत... महायुध्द..... मोझ्झार्ट.....

एव्हाना स्थिरस्थावर झालो होतो. आम्ही आणलेला नाष्टा केला. गाडीतील पॅन्ट्री मधूनच कॉफी घेतली. आमच्या सीटच्या बरोबर समोर एक स्थूलशी मध्यमवर्गीय, काहीशी घरगुती, आपल्याकडील मावशी, काकू किंवा आत्या असा मायाळू भाव असणारी एक महिला आणि तिची दहा ते बारा वर्षाची अगदी भावली सारखी दिसणारे मुलगी बसली होती. पहिला तासभर आम्ही दोघेही रात्रभराच्या प्रवासाने शिणलो होतो. अधून मधून डुलकी येत होती. तासाभराने बरेच ताजेतवाने झालो. एकमेकांच्या स्मितहास्याने परिचयाची नांदी झाली. अपरिचयाची कोंडी तोडायला ईश्वराने दिलेले हे किती साधे सुंदर अन सोपे वरदान आहे. खाणाखुणांनी द्वारे मी संभाषण सुरु झाले. बाईसाहेब झुरीकला चालल्या होत्या त्या स्वतः इंटिरियर डेकोरेटर होत्या. त्यांना दोन मुली. थोरली झुरीकला कॉलेजात शिकत होती. त्यामानाने दोघेही मध्ये अंतर खूप आहे- इती सौ-- आणखी कोण असणार?

थोरलीला इंग्रजी उत्तम येते. धाकटीला म्हणजे हिला शाळेत इंग्रजी आहे पण मुळीच ऐकत नाही आणि लक्षही नाही.... इति मावशी वजा काकू बाई... धाकटी अगदी मिश्किलपणे निळ्या डोळ्यात निरागस भाव आणून ऐकत होती. आम्ही तिला उगीचच काही इंग्रजी शब्दांचा अनुवाद विचारला- ती नुसतीच खांदे उडवत गोड हसली. सगळ्या आयांप्रमाणे या बाईने सुद्धा प्रवासात लागणारे सगळे खाणे बरोबर आणले होते. हे पाहून मात्र खूपच छान वाटले. खाणाखुणांनी गप्पा मारत वेळ छान गेला.

साल्झबर्ग ला पोहोचलो. स्टेशन वरच हॉटेल बुक केलं. कसली ही फसवाफसवी नाही ना लुटण्याचा प्रयत्न. दुपारचे बारा वाजले होते. हॉटेलात पोचलो. सदा प्रसन्न, सदा सुमुख अशी महिला रिसेप्शन वर होती. काही खोल्या हॉटेलात परिवर्तित केले ते घर होते. “थकलेले दिसताय, लांबचा प्रवास केला असेल. समोरच रेस्टॉरंट आहे. चार घास खाऊन घ्या. स्नानगृहात 24 तास गरम पाणी आहे. शॉवर खाली अंग शेकून घ्या आणि थोडावेळ वामकुक्षी करा” असा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला. वर खोलीत पोहोचलो.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिताय सर,
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

लेखात कुठे कुठे अनावश्यक शब्द आले आहेत असे वाटले.
-का कुणास ठाऊक हे दृश्य मला तु खूप आवडते कारण ते राहते, बागडत्या मुलांचे, मायलेकींचे घर असते.
-खाणाखुणांनी हा द्वारे मी संभाषण सुरु झाले.
त्यामुळे जरा लिंक तुटली वाचताना.

सुरेख वर्णन.

नक्की कोणत्या महिन्यात गेलात? प्रवासाची सुरुवात दिल्ली एअरपोर्टवर लिहिलंय तिथे जून तर व्हियेन्नाला 7 मे ला पोहोचलात असं लिहिलंय.

मामी.... आम्ही जूनमध्ये गेले होतो.... २१ वर्षापूर्वीच्या आठवणीत थोडी गल्लत झाली ... क्षमस्व