सोनल - भाग ५

Submitted by Kavita Datar on 14 November, 2021 - 06:41

तिच्याशी बोलताना त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यांत फक्त तिच्याबद्दलचं प्रेम काठोकाठ भरलेलं दिसत होतं. त्याच्या मनातलं आज ओठांवर आलं होतं. त्याच्या भावना जाणून सोनलचं मन सुद्धा त्याच्या बद्दलच्या प्रेमाने आणि आदराने भरून आलं.

भावनावेगाने त्याने तिचे दोन्ही हात हातांत घेतले आणि तिच्या नजरेत नजर मिसळून तिला जवळ ओढले. त्याच्या स्पर्शाने संमोहित झाल्यासारखी ती त्याच्याकडे खेचली गेली. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्याभोवती वेढले गेले आणि ती त्याच्या मिठीत सामावली.

बहकती श्याम आई है ।
तुझे लेकर के बाहो मे ।।
तुझे छू लू.... की रखू मै ।
छूपा कर के निगाहो मे ।।

तिचं आवडतं गीत तिच्या मनात झंकारत होतं.

*****
अर्जुन घरी आला तेव्हा त्याचा उजळलेला, प्रफुल्लित चेहरा पाहून त्याच्या अक्काने म्हणजे अदितीने विचारलं,
"काय रे ! आज काही विशेष? खुशीत दिसतोयस ??"

खरोखरीच आज तो विशेष खुशीत होता. सोनलने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. गेल्या बारा वर्षांत त्याने कित्येक रात्री तिच्या विरहात तळमळत काढल्या होत्या. अम्मा, अक्का सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरला, तरी त्याचं मन सोनल सोडून कोणाचाही विचार करायला तयार झालं नव्हतं. आज मात्र विश्वासाने तिने तिचा हात त्याच्या हातांत देऊन जन्मभर साथ देण्याची तयारी दाखवली होती. जणू काही अर्जुन ची तपश्चर्या फळाला आली होती.

पण त्या दोघांच्या प्रेमाचा मार्ग अडचणींच्या काट्यांनी  भरलेला होता. अम्मा या लग्नाला तयार होईल याची खात्री त्याला वाटत नव्हती. अजय पासून घटस्फोट मिळण्यासाठी सोनल ला कमीत कमी वर्ष - दीड वर्ष वाट पहावी लागणार होती.

रात्रीचं जेवण झाल्यावर अर्जुन ने घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलावले.
" अम्मा, अक्का, अथिन्बर (मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचे तमिळ भाषेतील आदरार्थी संबोधन) मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय"
सगळे प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पहात होते.

"तुम्हाला मी सोनल बद्दल सांगितलं होतं ना..."
"हो...तुझी मैत्रीण आणि कलीग होती. आता नवऱ्याला सोडून मुंबईत आली आहे. तू परवाच बोलला होतास." अदिती म्हणाली.
"हो... तीच सोनल... माझं तिच्यावर पूर्वीपासून खूप प्रेम आहे. म्हणूनच मी इतर कोणाशी आजवर लग्नाला तयार झालो नाही. मला... मला तिच्याशी लग्न करायचंय."

हॉलमध्ये शांतता पसरली.
"ती तयार आहे या लग्नाला ?"
अदिती च्या नवऱ्याने, नारायण ने विचारलं.
"हो... पण अजून तिचा डिव्होर्स झाला नाहीये. त्याला वर्षभर तरी लागेल."
"तिला मुलं आहेत ना ?"
अदितीने विचारलं.
"हो...तिच्या मुलांसह मी तिला स्वीकारायचं ठरवलंय. मला तुमची संमती हवी आहे."
"तू तिच्यासोबत सुखी होणार असशील तर आमची काही हरकत नाही अर्जुन..."
नारायण म्हणाले.
"हो... आज काल अशी बरीच लग्नं होतात. तू लग्नाला तयार झालास हेच आमच्या साठी महत्त्वाचं आहे."
अदितीने त्यांना दुजोरा दिला.

"माझी हरकत आहे... मला हे मान्य नाही..."
अम्माच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
"नवऱ्याला सोडून आलेल्या, दोन मुलं असलेल्या बाईशी तू लग्न करणार ? त्यात ती आपल्या जाती बाहेरची... पहिल्या नवऱ्याशी तिला जमवून घेता आलं नाही, ती तुझ्या सोबत काय संसार करेल ? लोक काय म्हणतील ?? याचा विचार केला आहेस का ???"
"अम्मा ! लोकांची मी पर्वा करत नाही. सोनल वर माझं जीवापाड प्रेम आहे. तू एकदा तिला भेट. मग तुझी तिच्याबद्दलची मतं नक्कीच बदलतील. तुलाही ती खूप आवडेल. तिच्या नवऱ्याने तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यानेच नाईलाजाने ती त्याला सोडून आली आहे."

अर्जुन अम्माला हर तऱ्हेने समजावत होता.
"ती चांगली आहे. तुझं तिच्यावर प्रेम आहे. सगळं ठीक आहे. ती आपल्या समाजातली नाही, हे देखील मी एक वेळ चालवून घेतलं असतं. पण घटस्फोटित, दोन मुलं असलेली माझी सून ??? मला कल्पना करवत नाहीये..."

नारायण आणि अदितीने देखील अम्मा ला समजवायचे आटोकाट प्रयत्न केले. पण त्या काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. एवढेच काय ? अर्जुन वरच्या नाराजी पोटी त्याच्या सोबत त्या दुबईला यायला सुद्धा तयार नव्हत्या. काय करावं म्हणजे अम्मा ची समजूत पटेल ? हे अर्जुनला समजत नव्हतं. खूप विनवणी करूनही त्या अर्जुन सोबत गेल्या नाहीत. त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं,
"सोनल चा विचार मनातून कायमचा काढून टाक, मगच मी तुझ्यासोबत येईन."
मात्र आता कुठल्याही परिस्थितीत अर्जुन सोनल ला अंतर देणार नव्हता. त्याला समजत नव्हतं, त्याच्यावर एवढं प्रेम करणारी त्याची अम्मा या बाबतीत त्याच्या सुखाचा विचार का करत नव्हती??

या सगळ्या घडामोडीं पासून अनभिज्ञ सोनल लवकरात लवकर अजय पासून घटस्फोट मिळवण्याच्या तयारीत होती. शरदने सुचवलेल्या वकिलामार्फत कोर्टात पिटीशन फाईल करून अजयला नोटीस पोहोचली होती. आश्‍चर्याची बाब म्हणजे तो घटस्फोट द्यायला तयार झाला होता.
'मुलांचं संगोपन सोनलने करावं, त्यांच्या खर्चासाठी योग्य तेवढी रक्कम पोटगी म्हणून द्यायला तो तयार आहे.'
असं त्याने नोटीस ला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं.  सोनल ला त्याचा हा निर्णय अनपेक्षित असा होता. कारण काही का असेना?? नको असलेल्या बंधनातून आपण कायमचे मुक्त होऊ, या सुटकेच्या भावनेने सोनल आश्वस्त झाली. दोघांच्या सहमतीने होणारा घटस्फोट साधारणतः एक ते दीड वर्षात होतो असे तिच्या वकिलाने तिला सांगितलं होतं.

खरं तर सुरुवातीला अजयने 'सोनलला सहजासहजी डिवोर्स द्यायचा नाही.' असं ठरवलं होतं. पण सोनल परत न येण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने आणि मुलांना ही त्याच्याजवळ अजिबात राहायची इच्छा नसल्याचे समजून आल्याने त्याने त्याचा विचार बदलला होता. त्यात कामाचा व्याप आणि दिवसेंदिवस ढासळत जाणारी तब्येत, यामुळे अजय परेशान होता. म्हणूनच विनातक्रार घटस्फोट द्यायला तो तयार झाला होता.

म्युच्युअल कंसेंटने डिवोर्स होणार असल्याने सोनलचा बराच त्रास वाचला होता. तशी तिच्या भावाने, सोहमने वकिलाची फी भरण्यासाठी आणि इतरही गोष्टींसाठी तिला आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली होती. तिची बाजू भक्कम असावी, म्हणून मुंबईतील त्यांच्या आई-वडिलांचा सध्या ती रहात असलेला फ्लॅट देखील तो पूर्णपणे तिच्या नावावर करून द्यायला तयार होता. पण सध्या तरी तिला या दोन्ही गोष्टींची गरज नव्हती.

अर्जुन दुबईत पोहोचल्यावर त्याने तिला कॉल केला.
"तू आणि अम्मा सुखरूप पोहोचलात ना ?"
तिनं फोनवर विचारलं.
"अडीच तीन तासांचा तर प्रवास... त्यात काय एवढं?"
अम्मा त्याच्यासोबत आली नसल्याचं मुद्दामच त्यानं तिला सांगितलं नाही.
"तू तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांगितलंस का ?"
"हो... सांगितलं ना... माझ्या बहिण आणि मेव्हण्यांना माझा निर्णय मान्य आहे."
"आणि... अम्माला ??"
"ती सुद्धा तयार होईल..."
"म्हणजे अजून तयार नाहीयेत... असंच ना ?"
"होईल ग ! ती थोडी जुन्या मतांची आहे. तू नको काळजी करूस. तन्वी, नील कसे आहेत ?"
त्याने विषयांतर केलं.

सोनल ला काय ते कळून चुकलं. अर्जून शी बोलून तिने फोन बंद केला. ती विचार करत राहिली.
'अर्जुन च्या अम्मा ला त्याचा हा निर्णय न पटणं साहजिक आहे.  नवऱ्याला सोडून आलेली, दोन मुलांची आई, त्यांना सून म्हणून कशी आवडणार ? मी फार मोठी स्वप्नं तर पाहत नाहीये ना?'
असं तिला वाटून गेलं.

ती अशी विचार करत बसलेली असतानाच फोन वाजला. अपरिचित नंबर दिसत होता. आधी तिने दुर्लक्ष केलं. पण नंतर कॉल घेतला.
"हॅलो... हो... मीच सोनल देशमुख... बोला."
फोन वरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. कधी भीती तर कधी चिंता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती.

(क्रमशः)
©कविता दातार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त !!
अम्माने फोन केला कि काय Wink