लाडिलप्पा – कुट्टीची गोष्ट - 6

Submitted by SharmilaR on 11 November, 2021 - 04:23

लाडिलप्पा – कुट्टीची गोष्ट - 6

"लारा लप्पा, लारा लप्पा, लाई रखदा ........
लारा लप्पा, लारा लप्पा, लाई रखदा ........"

काल संध्याकाळपासून कुट्टी हेच गाणं गुणगुणत होती. काल शेजारचा पप्पू त्याचा लाडिलप्पा घेऊन आला होता खेळायला. खरंतर तिला पण तो खेळायला हवा होता. कुट्टीने खूपदा मागितला तेव्हा त्याने फक्त एकदाच तिच्या हातात दिला. ते पण अगदी दोन मिनिटांकरता. किती मस्त वाटत होतं लाडीलप्प्याचे टप्पे घेतांना. त्या बॉल मध्ये पाणी असेल का? आणि कित्ती मज्जा, बॉल आपल्याला सोडून लांब जात नाही.....

कुट्टी गाणं गुणगुणतच आज सकाळी शाळेत आली तर निशा पण वर्गासमोर लाडिलप्पाच खेळत होती. आज हिने पण आणला लाडिलप्पा शाळेत खेळायला? मज्जा आहे बाबा तिची. घरी मागितलं कि लगेच मिळत काही पण. निशाचा लाडिलप्पा पप्पूच्या लाडीलप्प्या पेक्षा लहान आहे. पण जास्तच छान आहे. बॉल जास्त लांब जातोय आणि टप्पे जास्त फास्ट पडताहेत.

निशाला मागण्यात तर काहीच अर्थ नाही. म्हणजे मागूच शकत नाही. एकतर ती खूपच खडूस आहे. आणि सारखी भांडत असते. वर्गात निशा कुट्टीच्या पुढच्या बाकावर बसायची. कुट्टीला पाय पुढे लांब करून बसायला आवडायचं तर निशा पाय मागे मुडपुन बसायची. मग कुट्टीचे पाय तिला लागले की निशा तिच्या पावलांवर बुटाने ढोसायची. कुट्टीला जास्तच लागलं तर ती निशाला पेनाने टोचायची. मग भांडण व्हायचं.

पण आता कुट्टीला तो लाडिलप्पा हवा होता. कसा मिळवावा बरं ? प्रार्थनेची घंटा झाली, तसं निशाने दफ्तरात लाडिलप्पा कोंबला आणि सगळ्याच ग्राउंड कडे पळाल्या. प्रार्थनेत कुट्टीचं अजिबात लक्ष नव्हतं. तसं तिथे नाही लक्ष दिलं तरी चालतं म्हणा. नुसते ओठ हलवायचे. कुणाला कळतंय? मागच्या मुलींकडे कुणीच बघत पण नाही. छान प्रार्थना म्हणणाऱ्या मुली पुढे पायऱ्यांवर उभ्या असतात. सगळ्यांचं लक्ष तिकडेच असतं, नाही तर मग खूप उशिरा येणाऱ्या मुलींकडे.

प्रार्थना संपल्यावर सगळ्या रांगेत वर्गात गेल्या. वर्गात गेल्यावर नेहमीप्रमाणेच गोंधळ सुरु झाला. बोलता बोलताच सगळ्याजणी पहिल्या पिरियडची वह्या - पुस्तक दफ्तरातून बाहेर काढत होत्या. इंग्लिशचा पिरियड सगळा अट्टेण्डन्स मध्ये अन बाईंनी बोर्ड वर लिहून दिलेलं वहीत उतरवण्यातच गेला. पिरियड संपवून बाई बाहेर गेल्यावर निशाने लाडिलप्पा बाहेर काढला, हळूच. तिच्या शेजारच्या स्मिताला दाखवायला. कुट्टीने थोडं पुढे डोकावून बघितलं. आज कुट्टीने पाय मागेच ठेवले होते त्यामुळे अजून भांडण नव्हतं झालं.

बापरे! आज दुसरा पिरियड भूगोलाचा. म्हणजे महाबोअर. कुट्टी वैतागली. आधीच डोक्यात लाडिलप्पा. त्यात भूगोल. ते खरीप आणि रब्बी पिकं. कुट्टीला कध्धीच लक्षात नाही राहायच कोणतं पीक केव्हा येतं ते...... आणि ते वारे पण कसले वेगवेगळ्या नावाचे ...... जमिनीवरून समुद्राकडे अन समुदावरून जमिनीकडे .....सगळाच गोंधळ.

बाई पृथ्वीचा गोल घेऊन वर्गात आल्या. एरवी तो गोल बघितला कि नेहमीच कुट्टीच्या मनात विचार यायचा, आपण पृथ्वीच्या पाठीवर राहतो, तर घसरून खाली कसं पडत नाही? बाईंना विचाराची तर तिची हिंमत नव्हती. मग दरवेळी हा प्रश्न पडायचाच. मग असंही वाटायचं, कि विमान आकाशात गेलं, कि पुढे कशाला जातं? एकाच ठिकाणी विमानानं थांबायचं आणि पृथ्वी फिरते तेव्हा आपलं ठिकाण आलं, कि पटकन खाली यायचं. अर्थात हे पण बाईंना विचारलंच नाही कधी. आज तर ते नेहमीचे प्रश्न पण डोक्यात आलेच नाहीत. पूर्ण वेळ डोळ्यासमोर लाडिलप्पा नाचत होता.

काहीही करून लाडिलप्पा हातात मिळायला हवा खेळायला. थोडा वेळ तरी. पुढच्या पिरियड च्या इतिहासाच्या बाई नेहमीप्रमाणे हातात विणायच्या सुया आणि लोकरीचा गुंडा घेऊन वर्गात आल्या .

"मुलींनो, चौथा धडा उघडा. वीणा, वाचायला सुरवात कर." एक साथ नमस्ते झाल्यावर त्यांनी खुर्चीत बसता बसता सांगितलं, आणि त्या त्यांच्या विणकामाला लागल्या.

वीणा उभी राहून मोठ्यानं वाचायला लागली. बाकी सगळ्याजणी आपापल्या पुस्तकात डोकं खुपसून बसल्या. सगळ्यांच्या हातात पेन्सिल होती. शब्दांवर लक्ष ठेवायला लागत होतं. मधेच बाई कुठल्या ओळींवर खुणा करायला सांगायच्या. मधेच वाचणारीला थांबवून पुढच्या कुणालाही वाचायला सांगायच्या. कधी कधी तर त्या एखादीला वाक्य पण पूर्ण करू द्यायच्या नाहीत अन दुसऱ्या कुणाला उठवायच्या.

"कुट्टी....कुट्टी....." शेजारची अनु कुट्टीला पेन्सिलीने टोचत हळूच आवाज देत होती.
कुट्टी भानावर आली. वर्गात शांतता पसरली होती. बाई कुट्टीकडे रागाने बघत होत्या. कुट्टीने पुस्तकात बघितलं. काय चालू होतं ? कोण वाचत होतं ? कुट्टीला कळेचना.
"बहिरी आहेस का तू?" बाई रागाने म्हणाल्या. भांबावलेल्या कुट्टीला तेहि ऐकू आलं नाही. तिने होकारार्थी मान हलवली. सगळ्या मुली हसायला लागल्या. अनुने कुट्टीच्या पुस्तकात ओळींवर बोट ठेवलं. उभं राहून कुट्टीने वाचायला सुरवात केली. पिरियड संपला तरी कुट्टी आपल्याच नादात होती.

मधल्या सुट्टीची घंटा झाली तशा सगळ्या मुली वर्गाबाहेर पळाल्या खेळायला. गणिताच्या वह्या बाकावर ठेऊन. कारण पुढचा पिरियड गणिताचा होता. सर वर्गात यायच्या आधी मॉनिटर्सच काम असायचं आपल्या रांगेतल्या मुलींचं होमवर्क तपासण्याचं. आणि ज्यांनी नसेल केलं त्यांची नावं सरांकडे लिहून द्यायची. मग शनिवारी गेम्स पिरियड ला त्या मुलींना वर्गात बसून सगळं होमवर्क पूर्ण करायला लागायचं. त्यामुळे जवळपास सगळ्या मुली रोज गणिताचं तरी होमवर्क करायच्याच. फक्त कधी कधी कुणाची चुकायची गणितं. त्यांची पण नाव सरांना द्यायला लागायची. गणिताच्या तीन मॉनिटर्स होत्या तीन रांगाकरता. कुट्टी तिच्या रांगेची मॉनिटर होती. हा एकमेव विषय कुट्टीला आवडायचा. सरांचं शिकवण पटकन कळायचं. आणि शाळा संपायच्या आधीच तिचं गणिताचं होमवर्क पण झालेलं असायचं. म्हणून सरांनी तिला तिच्या रांगेची मॉनिटर केली होती.

थोड्याशाच मुली डब्बा आणायच्या मधल्या सुट्टीत खायला. बाकी सगळ्या नुसतंच खेळायच्या. निशा अन स्मिता डब्बा आणायच्या. आज कुट्टीचं खेळण्यात पण लक्ष नव्हतं. मग सुट्टी संपता संपता धावतच ती वर्गात शिरली. वर्गात कुणीच नव्हतं. सर यायच्या आत वह्या बघायच्या होत्या. सर तसे पाच मिनिट उशिराच येतात वर्गात, मॉनिटर्स ना वेळ मिळावा म्हणून. बाकीच्या मुलींना तोवर पाढे म्हणायला लागतात.

जागेवर जाता जाताच तिला दिसला तो निशाच्या बाकाजवळ पडलेला लाडिलप्पा. कुट्टीने पटकन उचलून तो हातात घेतला. आत्ता खेळायला वेळ नव्हता. सगळ्या मुली वर्गात यायला लागल्या होत्या. कुट्टीने पटकन लाडिलप्पा स्वतःच्या दफ्तरात टाकला. आता पुढचे दोन पिरियड लागोपाठ गणिताचे मग लगेच पि.टी. ला ग्राउंडवर जायचं. तिथे लवकर नाही गेलं तर पी.टी. चे सर ग्राउंडभोवती चार फेऱ्या मारायला लावतात. ‘आता निशाच्या लक्षात पण नाही येणार लाडिलप्पा हरवल्याचं’, कुट्टीने विचार केला. ती वह्या तपासायला लागली. आज निशाची पाच पैकी दोन गणितं चुकली होती. तिनं निशाचं नावं रफ बुक मध्ये लिहून घेतलं.

सर शिकवायला लागले तेव्हा कुट्टीचं जरा कमीच लक्ष होतं आज. म्हणजे प्रश्न विचारला तर तिने यांत्रिकपणे उत्तरं दिली, पण स्वतःहून हात वर नाही केला एकदाही.

घरी गेल्यावर लाडीलप्पा खेळता येणार होता. तिला हवा तेवढा वेळ. घरी कुणी विचारलं तर काय सांगायचं? मैत्रिणींनी खेळायला दिला म्हणून? पण तिनं कुठं दिला? आपण घेतला..... म्हणजे खोटं बोलायचं? मग लाडिलप्पा आला कुठून ? मी चोरी केली? पण मी तिच्या दफ्तरातून कुठे घेतला? खाली पडलेला घेतला......फक्त निशाला सांगितलं नाही. त्याला चोरी कुठे म्हणतात? मला सापडला म्हणजे तो माझा झाला......म्हणजे पूर्ण नाही......उद्या देऊन टाकीन परत तिला.....सापडला म्हणून..... असा विचार केल्यावर कुट्टीला जरा बरं वाटलं. तिने गणिताकडे पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न केला.

पण जरा वेळाने परत तोच विचार सुरु झाला. माझी वस्तू दुसऱ्याकडे सापडली तर मला कसं वाटेल? म्हणजे मला न सांगता कुणी घेतली तर मी चोरीच म्हणेन नं ? मग मी काय केलं? .......मी चोर आहे?.....

पिरिअड संपवून सर जायला निघाले, मुली उठून उभ्या राहिल्या सामान आवरायला....तसा कुट्टीनं पटकन लाडिलप्पा हातात घेतला.
"निशा हा घे तुझा लाडीलप्पा. मगाशी बाकाखाली पडला होता." निशाच्या हातात लाडीलप्पा कोंबून कुट्टी पळत सरांच्या मागे धावली, आजची गणिताच्या मुलींची नावं सरांना द्यायला. पळतांना ती गुणगुणत होती......

"लारा लप्पा, लारा लप्पा, लाई रखदा ........
लारा लप्पा, लारा लप्पा, लाई रखदा ........"

*********************

Group content visibility: 
Use group defaults

बहुतेक दोरी बांधलेला बॉल. आम्ही असं इलॅस्टीक च्या दोऱ्या असलेले बॉल ने खेळायचो, त्याला योयो म्हणायचो. नंतर योयो म्हणजे रिळासारखं चाक आणि त्याला गुंडाळलेली दोरी असं झालं.

कुट्टी ची गोष्ट आवडली.

धन्यवाद गोंगा, धनुडी, भरत.
हे लाडीलप्पा काय असतं? बॉल सारखं काही?>> लाडीलप्पा म्हणजे इलॅस्टीक च्या दोऱ्या असलेले बॉल बरोबर आहे.

कुट्टी मोठी झाली>> ह्या गोष्टीत ती मोठी आहे. पण लिहितांना खूप क्रम नाही पाळल्या गेला. कदाचित आणखी पुढे तिच्या लहानपणाची पण गोष्ट येईल.

गोड आहे कुट्टी.
लाडीलप्पा म्हणजे पाणी भरलेला ईलॅस्टीक दोरीवाला बाॅल का?
आधी जत्रेत मिळायचा.

गोड आहे कुट्टी.
लाडीलप्पा म्हणजे पाणी भरलेला ईलॅस्टीक दोरीवाला बाॅल का?
आधी जत्रेत मिळायचा.