सोनल - भाग ४

Submitted by Kavita Datar on 10 November, 2021 - 03:03

अजयच्या येण्याने दाटून आलेलं मळभ, अर्जुनच्या येण्याने लख्ख धुतलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सोनल आणि मुलांना डिनरला बाहेर न्यायचं अर्जुन ने ठरवलं. ती आनंदाने तयार झाली. मुंबईत आल्यापासून मुलांना घेऊन शाळे व्यतिरिक्त ती कुठेही बाहेर पडली नव्हती.

*****

तन्वी आणि नील ला सोबत घेऊन सोनल टॅक्सीने अर्जुनने ठरवलेल्या गार्डन रेस्टॉरंट ला येऊन पोहोचली. रात्रीचा झगमगाट, तिथं वाजत असलेलं कर्णमधुर संगीत, सुरेख आकारात कापलेल्या झाडांवर केलेली लाइटिंग, गार्डनच्या हिरवळीवर आकर्षक पद्धतीने मांडलेली टेबल्स त्यामधून वेटरस् ची चाललेली लगबग यामुळे तेथील वातावरण उल्हसित भासत होतं.

त्यांच्या आधीच तिथं आलेल्या अर्जुन ने तिघांना सामोरं जाऊन बुक केलेल्या टेबलापाशी नेलं. तन्वी आणि नील उत्साहाने तिथला स्विमिंग पूल पाहायला पळाले.

समोर बसलेल्या सोनल कडे अर्जुन एकटक पाहत होता. तिला बघून खुललेला त्याचा चेहरा, भावपूर्ण डोळे त्याच्या मनातील तिच्याबद्दलचे भाव उघड करत होते. सोनल ची नजर खाली झुकली.
"खूप सुंदर दिसतेस ..."
न राहवून तो बोलला.
"थँक्स..."
सोनेरी काठांची जांभळी साडी नेसलेली सोनल आज विशेष सुंदर दिसत होती. त्यावर मॅचिंग जांभळे पांढरे खडे असलेले गळ्यातले पेंडंट आणि कानातले टॉप्स विशेष खुलून दिसत होते.

अर्जुन सोबत असताना वेळेला जणू पंख फुटले. मुलांनीही खूप एन्जॉय केलं. तिथून निघायला साडेअकरा वाजले. परत येताना अर्जुन त्या तिघांना घरापर्यंत सोडून पुढे त्याच्या मुक्कामी गेला.

त्यानंतर दोन दिवसांनंतर ची गोष्ट... शाळेतून आल्यावर जेवून, थोडा वेळ अभ्यास करून मुलं खाली खेळायला गेली होती. ती एकटीच घरात वाचत पडली होती. 'आज जमलं तर येइन' असं अर्जुन म्हणाला होता. बेल वाजली. तिला वाटलं अर्जुन आहे, म्हणून आयहोल मधून न बघता, तिने दार उघडलं.

समोरच्या फ्लॅटमधला बंटी दारात उभा होता. आज काल तिला त्याची लक्षणं बरी दिसत नव्हती. तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान असलेला बंटी जातायेता तिला न्याहाळत राहायचा. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं की अर्थपूर्ण हसायचा. ती मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायची.
"काय हवंय ?"
तिनं विचारलं.
"सहज आलो होतो... काही काम असेल माझ्या लायक तर जरूर सांग..."
तो अर्थपूर्ण हसत म्हणाला. तीच न्याहाळणारी लंपट नजर... सोनलला शिसारी आली.
"काही काम नाहीये... आणि तुलाही इथे यायची गरज नाहीये..."

तिला कळायच्या आत बंटी आत आला आणि तिचा हात धरून म्हणाला.
"त्या दिवशी तर गोड गोड बोलून कॉफी पाजली. आज काय झालं तुला... अं ? मलाही चान्स दे ना...तुझ्या त्या मित्राला देतेस तसा..."
भीती सोबत प्रचंड चीड त्याच्या बद्दल तिच्या मनात उठली. हात सोडवून घेत आतल्या खोलीत पळत जाऊन खोलीचं दार लावण्याचा ती प्रयत्न करु लागली. त्याआधीच बंटी जोर लावून दार लोटून खोलीत आला आणि त्याने तिचे दोन्ही दंड घट्ट धरले. ती सुटण्याची धडपड करु लागली.
"बंटी प्लीज सोड मला... मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे.."

काही समजायच्या आत बंटीला आत आलेल्या अर्जुन ने दोन्ही हाताने धरुन मागे ओढलं आणि मुस्कटात जोरदार ठेवून दिल्या.
"हिम्मत कशी झाली तुझी घरात घुसायची ??? चल निघ... नाही तर पोलिसांना फोन लावतो..."
गाल चोळत बंटी दारा बाहेर पडला. असहाय्य पणे रडणाऱ्या सोनल जवळ येऊन अर्जुन ने तिचे डोळे पुसले. झालेल्या प्रसंगाने विचलित झालेली सोनल रडत अर्जुनला बिलगली. तिला जवळ घेऊन, ती थोडी शांत झाल्यावर त्याने तिला बसवले आणि किचनमधून तिच्यासाठी प्यायला पाणी घेऊन आला.

"सोनल... Henceforth...take care of yourself... कोणीही आल्यावर आयहोल मधून बघून, सेफ्टी लॉक लावल्याशिवाय दार उघडायचं नाही."
"हो रे चुकलंच माझं...मला वाटलं, तूच आला आहेस... तू वेळेवर आला नसतास तर..."
सोनल च्या अंगावर काटा आला. तिचे डोळे परत भरून आले. अर्जुन तिला समजावत राहिला.

कालच्या प्रसंगाने सोनल सुन्न झाली होती. तिला कळून चुकलं होतं, एकट्या राहणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजातील बहुतेक लोकांचा दृष्टीकोन दूषित असतो. लोकांचा फार विचार करणाऱ्यांतली ती नव्हती. पण यापुढे सजग राहण्याचं तिनं मनोमन ठरवलं. स्व-संरक्षणासाठी तिने तीन-चार पेपर स्प्रे आणून हाताला लागतील अशा ठिकाणी घरात ठेवून दिले. गरज पडल्यास 1091 हा women's हेल्पलाइन नंबर वापरायचा असं तिनं ठरवलं.

आज बऱ्याच दिवसांनी स्वप्ना आणि शरद तिच्याकडे आले होते.
"डिव्होर्स बद्दल काय विचार केलायस सोनल ?"
स्वप्नाने तिला विचारलं.
"खरं सांगू... अजून काहीच विचार केला नाहीये."
"अगं का पण??"
"स्वप्ना... वकिलाची फी, या प्रोसिजर साठी लागणारा वेळ, त्यात अजय म्हणतो तशी मुलांची कस्टडी त्याला मिळाली तर... हे सगळं नकोसं वाटतं..मी नाही राहु शकत गं मुलांशिवाय..."
सोनल काकुळतीने म्हणाली.
त्यावर शरद ने तिला समजावलं,
"डिव्होर्स प्रोसिजर ला वेळ तर लागणारच. पहिले सहा महिने कौन्सिलिंग चालतं. ते तर कोणीही टाळू शकत नाही. पण मुलांचं संगोपन तू चांगलं करू शकतेस हे कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. मुलांना कोणाजवळ राहायची इच्छा आहे, याचा निर्णय बहुतेक केसेसमध्ये कोर्टात मुलांवर सोडला जातो. त्यामुळे त्याची भीती तू बाळगू नकोस. आपण उद्या माझ्या एका वकील मित्राकडे जाऊ. अजयला लवकरात लवकर नोटीस तर पाठवून दे."
"ठीक आहे... उद्या जाऊ या नक्की..."
सोनल डिव्होर्स साठी तयार झाल्याचं पाहून स्वप्ना आणि शरद ला समाधान वाटलं.

सोनल कडून आलेली डिव्होर्स ची नोटीस पाहून अजय वैतागला होता. त्याला वाटलं होतं, थोडे दिवस राहील सोनल घर सोडून... राग शांत झाला की परत येईल. पण या नोटीसमुळे तिच्या परत येण्याचा मार्ग त्याला दिसत नव्हता. ड्युटी वरच्या टेन्शन्समुळे, एकटेपणामुळे त्याचं दारू पिण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं होतं. खाण्यापिण्याची आबाळ होत होती.घरच्या सुग्रास अन्नाला तो मुकला होता. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळत होती. खऱ्या अर्थाने सोनल आणि मुलांची कमतरता त्याच्या आयुष्यात, त्याला जाणवू लागली होती. पण आता वेळ निघून गेली होती.

अर्जुनचा, अम्माला घेऊन दुबईला परत जाण्याचा दिवस ठरला. त्याच्या मनाला रुखरुख लागून राहिली होती. अजूनही त्याला त्याच्या मनातलं सोनलला सांगता आलं नव्हतं.

जाण्याच्या आदल्या दिवशी तो तिच्या कडे आला होता. "सोनल... मी उद्या परत जातोय दुबईला..."
"इतक्या लवकर ? तन्वी, नील ला तुझी खुप आठवण येईल रे..."
बारीकसा चेहरा करून सोनल बोलली.
"तुला नाही येणार ? माझी आठवण ??"
"मला ? मला..."
"बोल ना सोनल..."
उत्तरादाखल तिने फक्त मान हलवली.
"अजूनही माझ्या मनात तुझ्या बद्दल पूर्वीच्याच भावना कायम आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सोनल...अजय पासून लवकरात लवकर डिव्होर्स घे... मी तन्वी नील सह तुला स्वीकारीन. त्यांना बापाची कमी कधीही जाणवू देणार नाही."

तिच्याशी बोलताना त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यांत फक्त तिच्याबद्दलचं प्रेम काठोकाठ भरलेलं दिसत होतं. त्याच्या मनातलं आज ओठांवर आलं होतं. त्याच्या भावना जाणून सोनलचं मन सुद्धा त्याच्या बद्दलच्या प्रेमाने आणि आदराने भरून आलं.

भावनावेगाने त्याने तिचे दोन्ही हात हातांत घेतले आणि तिच्या नजरेत नजर मिसळून तिला जवळ ओढले. त्याच्या स्पर्शाने संमोहित झाल्यासारखी ती त्याच्याकडे खेचली गेली. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्याभोवती वेढले गेले आणि ती त्याच्या मिठीत सामावली.

बहकती श्याम आई है ।
तुझे लेकर के बाहो मे ।।
तुझे छू लू.... की रखू मै ।
छूपा कर के निगाहो मे ।।

तिचं आवडतं गीत तिच्या मनात झंकारत होतं.

(क्रमशः)
©कविता दातार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults