नको ती आखणी केली

Submitted by निशिकांत on 9 November, 2021 - 09:32

फुका दुर्लक्षिले दु:खास अन् हेटाळणी केली
सुखाशी नाळ जोडाया नको ती आखणी केली

किती होते प्रवाही प्रेम निस्पृह आपुले सखये!
अपेक्षा ना कुणा होती, न कोणी मागणी केली

नकोसा जाहला गजरा तुला, हा दोषही माझा
वसंताची तुझ्या मी भोवताली पेरणी केली

न झाली वाढ माझी नीट मी गर्दीत असताना
पिकाला रक्षिण्यासाठी तनाची काढणी केली

कुणाला त्रास ना देता, जगावे ठरवुनी जगलो
नगण्यांच्या तरी कळपात माझी नोंदणी केली

मनाला काळजी, मेल्यावरी नर्कात जाण्याची
म्हणूनी आजच्या नगदी सुखांची कापणी केली

नको देऊस कांहीही मला बाजेवरी देवा
स्वकष्टांच्या किनारीने, उदासी देखणी केली

हिशोबी या जगी भावात दोन्ही सहमती होता
पिता अन् माय दोघांची कशी ही वाटणी केली?

उडाया लागला "निशिकांत" जेंव्हा ऊंच आकशी
अथक केल्या प्रयत्नांची मनोमन उजळणी केली

निशिकांत देश्पांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users