सोनल - भाग ३

Submitted by Kavita Datar on 3 November, 2021 - 23:28

त्यांचा निघण्याचा दिवस उजाडला. अजय ड्युटीवर गेला असताना सोनलने भराभर बॅग्स भरल्या. अजय साठी पत्र लिहून त्याला दिसेल अशा ठिकाणी ठेवले. मोबाईल वर टॅक्सी बुक केली. त्या घराला एकवार शेवटचं पाहून, डोळ्यातलं पाणी आवरत दार बंद करून ती खाली उतरली.

*****

सोनल, तन्वी आणि नील मुंबईतील दादरमधल्या त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा संध्याकाळ झाली होती. घर सोडल्यापासून बस पुण्याहून निघेपर्यंत सोनलच्या मनात धाकधूक होती. अजयला समजायचा अवकाश, की त्याने त्या तिघांना जाऊ देणं तर दूरच, पण नक्कीच घरात डांबून ठेवलं असतं. मग मात्र त्यांना घर सोडणं अवघड होऊन बसलं असतं. आता मात्र ती तिघं सुरक्षित जागी येऊन पोहचली होती.

सोनलने शेजाऱ्यांकडून चावी घेतली आणि लॉक उघडून ते घरात आले. घरात आल्याबरोबर आई पप्पांच्या आठवणीने तिला भरून आलं. या घरात लग्नाआधीची काही वर्षे तिने घालवली होती. त्या सुंदर दिवसांच्या आठवणी तिथं भरून राहिल्या होत्या. पप्पांनी बनवून घेतलेलं फर्निचर अजूनही चांगल्या स्थितीत होतं. दादाच्या मेव्हण्याने घर व्यवस्थित ठेवलेलं दिसत होतं. सगळा सरंजाम असल्याने तिला उद्या मार्केटला जाऊन किराणा, स्वयंपाकाची काही भांडी, पडदे, चादरी अशी खरेदी तेवढी करावी लागणार होती.

रात्रीच्या जेवणासाठी आता काही बनवणं शक्य नसल्याने तिने मोबाईल ॲप वरून पिझ्झा ऑर्डर केला. दोघही मुलं उत्साहाने गॅलरीत उभे राहुन आजुबाजुचा परिसर न्याहाळत होती.

ड्यूटीवरुन घरी येण्याआधी बऱ्याचदा अजय बार मधून तीन चार पेग रिचवून यायचा, त्या प्रमाणे आजही आला होता. डोअरबेल वर बोट दाबून धरत त्याची बडबड चालू होती. "कुठे उलथलेत सगळेच्या सगळे xxx"
बराच वेळ झाला तरी दार उघडलं गेलं नाही, म्हणून चाचपडत खिशातली चावी काढून लॉक उघडून तो आत आला.

"सोनल...ए..सोनल..." आत येत तो ओरडला. एरवी त्याच्या एका हाकेसरशी सोनल त्याला सामोरं जायची. आज मात्र घरात निरव शांतता होती. त्याला आश्चर्य वाटलं. प्रत्येक खोलीत जाऊन त्यांनं मोठ्याने आवाज दिले.
"सोनल... तन्वी..."
तेवढ्यात त्याची नजर हॉलच्या सेंटर टेबलवर ठेवलेल्या पत्राकडे गेली. घाईने ते पत्र उचलून तो वाचू लागला.
"अजय,
मी, तन्वी आणि नील हे घर आणि हे शहर
कायमचं सोडून जात आहोत. का? हे तुला
माहीतच आहे. कुठे ?? ते ही कळेलच.
पण... लक्षात ठेव, आम्हाला कुठलाही
शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्याचा
प्रयत्न जरी केलास, तर घरगुती हिंसेचा
आरोप ठेवून मी तुझी तक्रार पोलिसांत
देईन. तुझ्या वरिष्ठांनाही याबद्दल सांगेन.
माझ्या फोन मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ
च्या स्वरूपात मी पुरावे जमा करून ठेवले
आहेत. डीव्होर्स ची नोटीस काही दिवसांत
तुला मिळेल. आणि हो.. अजून एक...
मला कॉल करायचा प्रयत्न व्यर्थ आहे,
कारण मी सिमकार्ड बदललेलं आहे.
सोनल"

पत्र वाचून अजयची नशा पूर्ण उतरली. त्याच्या घशाला कोरड पडली. त्याला पूर्णपणे अनपेक्षित असा निर्णय सोनलने घेतला होता. रागाने आणि उद्वेगाने त्याने त्या पत्राचे तुकडे करून भिरकावले. इतस्ततः पसरलेल्या त्या कागदाच्या तुकड्यांकडे पहात तो डोकं धरुन मटकन खाली बसला. पुढच्या क्षणी मुठी आवळत रागाने ओरडला.
"तुझी हिम्मत कशी झाली मला सोडून जायची? वर मला धमकी देतेस?? दुसरीकडे कुठे?? तू मुंबईतच असणार... माहितीये मला... आज ना उद्या माझ्या तावडीत सापडशीलच."

कितीही त्रागा केला तरी मनातून अजय हादरून गेला होता. तीने नंबर बदललाय हे माहीत असूनही त्याने सोनल ला फोन लावायचा प्रयत्न केला, अपेक्षेप्रमाणे तिचा फोन नॉट रीचेबल होता. रागाने त्याने त्याचा सेलफोन समोरच्या भिंतीवर आपटला आणि तसाच उपाशीपोटी तो सोफ्यावर आडवा झाला.

मार्केट मधली खरेदी आटोपून सोनल तिच्या अपार्टमेंट पाशी टॅक्सीने उतरली. खरेदी केलेलं सामान बरंच असल्याने ते लिफ्ट मध्ये ठेवून वर तिच्या फ्लॅटमध्ये घेऊन जाण्यासाठी ती वॉचमन कुठे दिसतो का ? ते बघू लागली. त्याचं केबिन सोडून नेमका तो कुठे तरी गेला होता. तेवढ्यात तिच्या समोरच्या फ्लॅटमधल्या देसाईंचा मुलगा, बंटी बाईक वरून कुठून तरी आला.

"दीदी ! मी सामान वर नेऊन देतो."
असं म्हणून त्यानं सामान वर न्यायला तिला मदत केली. बंटीचे आभार मानून तिने त्याला आग्रहाने आत बोलावून कॉफी पाजली.

तन्वी, नील ला सोसायटी मधले त्यांच्या वयाचे मित्र-मैत्रिणी मिळाल्याने ते दोघे लवकरच तिथे रमले. या दिवाळीत त्यांनी मित्र-मैत्रिणींसोबत धमाल केली.

दिवाळी संपून शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. सोनल आणि तन्वी, नीलचं नवं रुटीन व्यवस्थित सुरू झालं होतं.

रविवारचा दिवस असल्याने त्या तिघांना सुट्टी होती. सोनल किचन मध्ये मुलांसाठी पास्ता बनवत होती. तेवढ्यात बेल वाजली. गॅस बंद करून ती बाहेर आली. तिनं आयहोल मधून पाहिलं. बाहेर अजय उभा होता. तिच्या छातीत धस्स झालं. स्वतःवर नियंत्रण ठेवून तिनं दार उघडलं. आजारी असल्यासारखा, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आलेल्या अजयला पाहून तिला आश्चर्य वाटलं. त्याच्या डोळ्यांतली गुर्मी कुठल्या कुठे पळाली होती.
"आत ये..."
तिनं त्याला घरात घेतलं. त्याला पाहून कॅरम खेळण्यात रमलेले तन्वी, नील घाबरुन उभे राहीले.
"कसे आहात रे पोरांनो ?"
उत्तरादाखल तन्वी ने फक्त मान हलवली. नील घाबरून सोनलला बिलगला.
"येथे का आला आहेस अजय ?"
सोनलने करड्या स्वरात विचारलं.
"तुम्हाला परत न्यायला..."
"ते आता शक्य नाही..."
"तू असं मुलांना घेऊन इथं यायला नको होतं. मला कल्पना तरी दिली असतीस"
"तू घरातून बाहेर पडू दीलं असतं का आम्हाला ?"
"अजूनही वेळ गेलेली नाहीये... माझ्यासोबत घरी चला.." "का ? परत तुझे अत्याचार सहन करायला ??"
"अगं... ड्युटीवर इतकी टेन्शन्स झेलावी लागतात, तो स्ट्रेस घालवण्यासाठी कधीतरी ड्रींक्स घेतो, मग मला कसली शुद्ध राहत नाही. त्या आवेशात कधी तरी तुझ्यावर हात उठतो..." "कमाल आहे अजय तुझी ? तुझ्या चुकीच्या वागण्याचं चक्क समर्थन करतोयंस ?? तुला काही कल्पना आहे का गेली बारा वर्षे मी काय आणि किती सहन केलंय ते ??? माझं एकवेळ सोड... मुलांना तरी बापाचं प्रेम दिलंस तू कधी ? नेहमी ती दोघं तुला घाबरून असतात. इथे आल्यावर मी त्यांना कितीतरी दिवसांनी हसताना, खेळताना पाहिलं. नाही...परत मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही...तु जा इथून..."
"सोनल... मी कधीही तुला आणि मुलांना पैशांची कमी जाणवू दिली नाही. कपडेलत्ते, खाणं पिणं सगळ व्यवस्थित मिळत होतं तुम्हाला... या जुन्या फ्लॅटमध्ये, तुझ्या तुटपुंज्या पगारात कसे राहणार आहात तुम्ही ? म्हणून सांगतो माझ्यासोबत चल.. मी यापुढे स्वतःला आवरेन. तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाही."

सोनल ला माहित होतं, अजय सारख्या बेदरकार माणसाचं असं सहजासहजी हृदय परिवर्तन होऊ शकत नाही. ती त्याच्या जवळ नसल्याने त्याची खाण्या-पिण्याची आबाळ होत असणार, घर सांभाळताना त्रेधातिरपीट उडत असणार आणि....आणि...मुख्य म्हणजे हक्काची बायको जवळ नसल्याने कुचंबणा होत असणार, म्हणून तो तिघांना परत येण्याचा आग्रह करत होता. एकदा ती परत आली की पहिले पाढे पंचावन्न सुरू होणार...

तिला पुन्हा त्या नरक यातना नको होत्या. ती निग्रहाने बोलली,
"मी आणि मुलं यापुढे कधीही तुझ्या सोबत राहू शकणार नाही... कितीही त्रास झाला तरीही चालेल, पण आम्ही पुन्हा तिथे येणार नाही... तु जाऊ शकतोस.."
"ठीक आहे... डीव्होर्स साठी जेव्हा कोर्टात जाशील तेव्हा सिद्ध होईलच, की तू मुलांचं शिक्षण, संगोपन करण्यास समर्थ नाही. मुलांची कस्टडी मलाच मिळेल, तेव्हा आपोआपच परत येशील."
असं म्हणून ताडकन उठून तो दारा बाहेर पडला.

संथ वाहणाऱ्या पाण्यात कोणीतरी मोठा दगड टाकल्यावर ते जसं ढवळून निघतं, तसं त्या तिघांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यामध्ये अजयच्या येण्याने झालं.

"मम्मा ! परत पप्पा कडे जावं लागेल का ?"
तो निघून गेल्यावर बारीक चेहरा करून नील ने विचारलं. तन्वी तिला येऊन बिलगली.
"नाही रे बाळा ! आता आपण इथून कुठेही जाणार नाही. चला... मी तुमच्यासाठी मस्त व्हाईट पास्ता बनवलाय, खूप सारं चीज टाकून..."

संध्याकाळ झाली होती. सोसायटीच्या आवारात फेरफटका मारून सोनल मुलांसोबत घरी आली. हात पाय धुवून तिने देव्हाऱ्यात दिवा लावला. देवापुढे हात जोडून उभी असताना तिचा फोन वाजला. अर्जुन चा कॉल होता.

"हॅलो अर्जुन ! हाऊ आर यू ?"
"हॅलो सोनल ! Ask...where am I ?"
"Where ??"
"I am in Mumbai and right now at your doorstep..."
"What ?"
आनंदाने ती दार उघडायला धावली. दारात अर्जुन हसत उभा होता.
"What a pleasant surprise ? आत ये ना.."

अर्जुन मध्ये बारा वर्षांत फारसा बदल झाला नव्हता. तसाच हसरा चेहरा, बोलके डोळे... नाही म्हणायला रंग थोडा उजळला होता.
"तू तशीच दिसतेस सोनल.. तुझ्यात फार बदल नाही झाला." सोफ्यावर बसत तो म्हणाला.
"अरे पाच सहा किलो वजन वाढलंय माझं गेल्या बारा वर्षात.."
त्याचा आवाज ऐकून तन्वी आणि नील त्यांच्या खोलीतून बाहेर आले होते.

"हॅलो अर्जुन अंकल !!"
"हॅलो किड्स !! This is for you..."
त्यांच्याकडे बघत हसत तो बोलला आणि दोघांच्या हातात त्याने गिफ्ट आणि चॉकलेट चे बॉक्स दिले.
"थॅंक्यु अंकल ..."
दोघेही एकासुरात बोलले आणि पुन्हा खेळण्यात रमले.

सोनल आणि अर्जुन खूप वर्षांनी एकमेकांना भेटल्याने दोघांच्या गप्पा रंगल्या. सोनलने व्हेज पुलाव आणि सूप बनवून अर्जुन ला आग्रहाने जेवायला लावले. पूर्वीसारखे आजही त्याच्या डोळ्यांतले तिच्याबद्दलच्या निरपेक्ष, निरातिशय प्रेमाचे भाव कायम होते.

अजयच्या येण्याने दाटून आलेलं मळभ, अर्जुनच्या येण्याने लख्ख धुतलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सोनल आणि मुलांना डिनरला बाहेर न्यायचं अर्जुन ने ठरवलं. ती आनंदाने तयार झाली. मुंबईत आल्यापासून मुलांना घेऊन शाळे व्यतिरिक्त ती कुठेही बाहेर पडली नव्हती.

(क्रमशः)
©कविता दातार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults