सोनल - भाग २

Submitted by Kavita Datar on 30 October, 2021 - 02:12

दोन शाळांमधून तिला अपेक्षित प्रतिसाद आला. इंटरव्यू साठी तिला मुंबईला जावं लागणार होतं. अजयला काही समजू न देता, कसलाही सुगावा न लागू देता, मुंबईला कसं जावं ? हा तिच्या समोरचा मोठा प्रश्न होता. त्याला जराही संशय आला, तर सगळंच अवघड होऊन बसणार होतं. यावरही तिने तोडगा शोधून काढला.

सोनलने तिच्या दादाला कॉल केला.
"हॅलो दादा !अरे मला मुंबईतल्या दोन शाळांमधून इंटरव्ह्यू कॉल आलाय."
"अरे वा ! काँग्रॅच्युलेशन्स... केव्हा जाते आहेस ?"
"माझं जाणं इतकं सहज नाहीये...अजयला कुठलाही संशय यायला नकोय. मी काय म्हणते ते ऐक ना..."
असं म्हणून तिने दादाला तिचा प्लॅन समजावून सांगितला. "एवढंच ना... मी सांगतो अजयला फोन करून..."

ठरल्याप्रमाणे त्याचा रात्री अजयला फोन आला.
"हॅलो अजय...सोहम बोलतोय..."
"हॅलो सोहम दादा! आज कशी आठवण झाली ?"
"मी परवा मुंबईत येतोय. पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी आम्ही सगळी मावस आणि मामे भावंडं मुंबईत बऱ्याच वर्षांनी भेटणार आहोत. सोनल येतेय ना मुलांना घेऊन ?" "सोनल काही बोलली नाही मला या गेट-टुगेदर बद्दल ? आणि तुम्ही विकेंड सोडून गुरुवारी गेट-टुगेदर का ठेवलं ?" अजयने संशयाने विचारलं.
"वीकेण्डला मुंबईत कुठेही बाहेर गेलं तर गर्दी असते, म्हणून हे दिवस ठरवले. असं करूया...विकेंडला पुण्याला ठेवूया का ? तु फक्त दहा-पंधरा लोकांची एखाद्या मस्त हॉटेलमध्ये व्यवस्था करून ठेव."
"नको.. पुण्यात नको... ठीक आहे. येईल सोनल...मुंबई एअरपोर्ट वरच्या ड्यूटी फ्री शॉप मधून तेवढ्या दोन स्कॉच घेऊन ये माझ्यासाठी...हँ..हँ..हँ..." निर्लज्जपणे हसत अजय म्हणाला.
"बघतो जमलं तर..."
एवढं बोलून सोहमने फोन बंद केला.
"काय ग...ए... नवऱ्याची परमिशन घ्यायची काही पद्धत असते का नाही? तुम्हां भावा बहिणींचं गेट-टुगेदर आहे आणि तुला जायचंय हे मला का नाही बोललीस ?"
"नक्की नव्हतं... म्हणून तुला काही सांगितलं नाही."
"आणि... तुझा तो कंजूस भाऊ... भरपूर डॉलर कमवतो... तरी दोन खम्बे आणायला त्याला जड होतं का ?"
सोनल च्या अंगाचा तिळपापड झाला.
'तुझ्या दारुवर उडवायला डॉलर कमावत नाही माझा भाऊ...'
ओठांवर आलेले शब्द तिने मोठ्या प्रयासाने परतवले.

अजय सोबत वाद म्हणजे त्याची आरडाओरड, अंगावर हात उचलणं आणि... आणि... स्वतःचा राग, वासना शमवायला जाणून-बुजून रात्री होणारा बलात्कार... हे सगळं आता तिला टाळायला हवं होतं. मोठ्या मुश्किलीने तिचं मुंबईला जाणं ठरलं होतं. त्याचा तिला विचका करायचा नव्हता.

तिची भावंडांच्या गेट-टुगेदर ची थाप, दादाने फोन केल्याने अजयला खरी वाटली होती. खरं तर मुलांना सोबत नेण्याची गरज नव्हती. पण ती घरात नसताना अजय मुलांचाही छळ करायला मागेपुढे बघणार नाही, हे तिला माहीत होतं.

सात वर्षांचा नील तर बापासमोर यायला देखील घाबरायचा. ज्या दिवशी अजय घरात आरडाओरड करायचा, त्यादिवशी नील हमखास रात्री झोपेत गादी ओली करायचा. दहा वर्षांची तन्वी मात्र समंजस होती. अजय चा आवाज चढला, की लगेच ती छोट्या भावाला तिच्या खोलीत नेऊन त्याचं मन रमवायचा प्रयत्न करायची. आपल्या मुलांसाठी सोनल शक्यतो अजय समोर शांत राहण्याचा प्रयत्न करायची, नमतं घ्यायची. याच गोष्टीचा तो फायदा उचलत असे.

मुलांना घेऊन सोनल मुंबईत आली. हातातली बॅग खाली ठेवून तिने स्वप्नाच्या फ्लॅटची डोअर बेल दाबली. स्वप्ना, सोनलची कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड. स्वप्नाचा नवरा शरद दादरमधील नावाजलेला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट होता. ती गुरुवारी मुलांना घेऊन येतेय, एव्हढंच सोनलने स्वप्ना ला सांगितलं होतं.

ती येण्याची वाट पाहात असल्याप्रमाणे स्वप्नाने दार उघडलं. "हाय सोनल... खूप दिवसांनी भेटतेहेस ग..."
सोनल ला जवळ घेत स्वप्ना म्हणाली. तन्वी आणि नील स्वप्नाच्या तेजस सोबत खेळण्यात रमले.

स्वप्ना आणि शरद ला सोनलने तिच्या परिस्थितीची सगळी कल्पना दिली. त्या दोघांना तिच्यासाठी खूप वाईट वाटलं आणि तिला जमेल तशी मदत करण्याचं दोघांनी ठरवलं. सोनलच्या एक गोष्ट लक्षात आली होती, आपली दुःख, त्रास कोणा पासून लपवून ठेवत उगाच सुखी असल्याचा आव आणण्यात काहीही अर्थ नसतो. उलट खरी परिस्थिती योग्य लोकांसमोर ठेवल्यास आपल्या अडचणीतून मार्ग निघू शकतो.

गुरुवार आणि शुक्रवार लागोपाठ दोन्ही शाळांचे इंटरव्यू होते. दोन्ही इंटरव्यू अपेक्षेपेक्षा चांगले झाले. दोन्ही शाळा दादर मध्येच होत्या. दादर ईस्ट मधील शाळेचा पे स्केल जास्त चांगला होता. पण सोनलच्या आई पप्पांचा फ्लॅट दादर वेस्ट ला असल्याने, दुसरी शाळा तिला जास्त सोयीची असणार होती. म्हणून थोडा कमी पगार असला तरी त्या शाळेतच नोकरी घ्यायचं तिने ठरवलं. दिवाळीनंतर शाळेत रुजू व्हायचं होतं. तन्वी आणि नील च्या एडमिशन साठी सुद्धा तिने त्या शाळेच्या व्यवस्थापनाशी बोलून ठेवलं होतं. तिथे नोकरी घेतली तर त्या दोघांनाही फी मध्ये सवलत मिळणार होती. शरद च्या सल्ल्याने, तिने तिच्या पप्पांनी तिच्यासाठी ठेवलेले पैसे जास्त परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवले.

महत्वाची काम संपवून ती तिघं पुण्यात परत आली. एका दुपारी शाळेतून आल्यावर सगळी कामं आटोपून मुलांचा अभ्यास घेत असताना, अचानक तन्वी म्हणाली,
"मम्मा, तुला एक विचारू ?"
"काय ग तनू ? विचार ना..."
"तू पप्पाला सोडून री-मॅरेज करणार आहेस का ?"
तिला जवळ घेऊन थोपटत सोनल म्हणाली.
"री-मॅरेज नाही बाळा...पण पप्पाला सोडून आपण तिघे दिवाळीनंतर मुंबईत शिफ्ट होणार आहोत."
"Wow मम्मा ! खरंच ?"
आनंदाने नील चे डोळे चमकले.
"मला पप्पाची खू...प भीती वाटते ग मम्मा... आपण लवकर जाऊ या इथून."

तन्वी आणि नील दोघंही तिच्या निर्णयाने खुश झालेली पाहून तिला बरं वाटलं. पण त्याच वेळेस बापाच्या मायेला पारखी झालेल्या आपल्या लेकरां कडे पाहून तिचे डोळे भरून आले. दोन्ही मुलांना तिने हृदयाशी कवटाळले.

दिवाळी पंधरा दिवसांवर आली होती. मुलांच्या सहामाही परीक्षा सुरू होत्या. गेल्या महिन्यात सोनल शाळेच्या प्रिन्सिपल ना भेटली होती. तिने मुंबईत शिफ्ट होत असल्याने नोकरी सोडण्याबद्दल आणि मुलांच्या ऍडमिशन काढून घेण्याबद्दल त्यांना सांगितलं होतं. हे शैक्षणिक वर्ष पूर्ण करून शाळा सोडण्याचा त्यांनी तिला सल्ला दिला. मात्र नाईलाजास्तव तिला आत्ताच पुणे सोडून जावं लागत आहे, हे तिने त्यांना समजावल्यावर त्या तयार झाल्या.

या काही दिवसांत, गडबडीत असल्याने सोनलचं अर्जुन सोबत फारसं बोलणं झालं नव्हतं. नाही म्हणायला, तीन-चारदा कॉल करून अर्जुनने तिची विचारपूस केली होती. त्या दिवशी दुपारी तिने त्याला कॉल केला.
"हॅलो सोनल...हाऊ आर यू ?"
"मी ठीक आहे. तू कसा आहेस ?"
"I am good, as usual..."
"मी दिवाळीनंतर मुंबईत शिफ्ट होतेय. ज्या शाळेत मी जॉईन होणार आहे, तिथेच तन्वी आणि नीलची ऍडमिशन घेईन. दादाने फ्लॅट रिकामा करून साफसफाई करवून घेतलीय." "दॅट्स ग्रेट ! मी मुंबईत येतोय पुढच्या महिन्यात अम्मा ला न्यायला... तेव्हा भेटूच. तुझी मुलं कशी आहेत? मला एकदा दोघांशी व्हिडिओ कॉल वर बोलायचय."
"अरे आत्ताच तुझं त्यांच्याशी बोलणं करून देते. पण व्हिडिओ कॉल नको. आपण गुगल मीटवर बोलूया."

फोन बंद करून तिने लॅपटॉप चालू केला. तन्वी, नील ला बोलावलं. गुगल मीट ओपन करून ते तिघेही अर्जुनशी बोलण्यात गुंतले.
"हाय तन्वी !
हाय नील !!
Glad to see you.."
"Hi Arjun Uncle ! तुम्ही पाठवलेली चॉकलेट्स खूप टेस्टी होती... थँक्स फॉर दॅट.."
तन्वी म्हणाली.
"You Welcome ..सोनल, your kids are too cute..."

ते तिघेही असे अर्जुनची बोलण्यात मग्न असताना अजय स्वतः जवळच्या चावीने लॉक उघडून केव्हा घरात येऊन त्यांच्यामागे उभा राहिला, हे तिघांनाही कळलं नाही.
"सोनल !!!"
संतापून तो तारस्वरात ओरडला. दचकून सोनलने गुगल मीट डिस्कनेक्ट करून लॅपटॉप बंद केला. दोघेही मुलं घाबरून उभी राहिली. तन्वी पटकन नीलचा हात धरून खोलीबाहेर पडली.
"मी घरात नसताना तुझ्या यारांशी अशा ऑनलाइन गप्पा चालतात काय ?? साली..."
"शी ..अजय...काहीतरी बोलू नकोस..अर्जुन माझा मित्र आहे."
"मित्र म्हणे ? केव्हापासून ??"
उपरोधाने त्याने विचारलं.
"अर्जुन माझा कलीग होता. खूप वर्षांपासून मी त्याला ओळखते."
"हे लपवून ठेवलंस माझ्यापासून ?? हरामखोर..."
"शिव्या देऊ नकोस...मागे कुठल्या केसच्या तपासासाठी दिल्लीला गेला होतास, तेव्हा आल्यावर तुझी बॅग आवरताना कॉन्डोम ची पाकिटं मिळाली होती मला. तेव्हा मी विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरं दिली होतीस. तमाशा नको म्हणून मी चूप राहिले. आता तर माझा काही दोष नसताना विनाकारण मला शिव्या देतोयस."
"साली, रां× वर तोंड करून बोलतेस ? मी पुरुष आहे आणि तेही भरपूर कमावणारा...मला वाटेल ते मी करीन... तू अशी नाही ऐकणार..."
असं चढ्या आवाजात बोलून अजयने कमरेचा बेल्ट काढून हातात घेतला.
"अजय मारू नकोस प्लीज..."
तिच्या विनवणी कडे दुर्लक्ष करत त्याने पूर्ण शक्तीनिशी तिच्या पाठीवर बेल्टचा एक जोरदार फटका लगावला.
"आई..आई ग.."
ती कळवळली
"पप्पा... प्लीज मारू नकोस ना मम्माला..."
तन्वीने धावत येऊन त्याच्या दोन्ही पायांना घट्ट वेढा देत रडत म्हटलं. हातातला बेल्ट जोरात जमिनीवर आपटून अजय तिथून निघून गेला. वेदनेने आणि दुःखाने सोनल रात्रभर रडत राहिली.

मुलांच्या परीक्षा झाल्यावर सोनलने त्यांची लिव्हिंग सर्टिफिकेटस् शाळेतून घेतली. रीझाईन करून शाळेकडून वर्क एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट मिळवले. आता ती कपडे, दागिने, महत्त्वाची डॉक्युमेंट्स अशा सगळ्या सोबत न्यायच्या वस्तूंची जुळवाजुळव करू लागली. अजय पासून लपवून हे सगळं करताना तिची दमछाक होत होती. त्याला संशय येऊ नाही म्हणून बॅगा मात्र ती निघायच्या दिवशी भरणार होती.

त्यांचा निघण्याचा दिवस उजाडला. अजय ड्युटीवर गेला असताना सोनलने भराभर बॅग्स भरल्या. अजय साठी पत्र लिहून त्याला दिसेल अशा ठिकाणी ठेवले. मोबाईल वर टॅक्सी बुक केली. त्या घराला एकवार शेवटचं पाहून, डोळ्यातलं पाणी आवरत दार बंद करून ती खाली उतरली.

(क्रमशः)

©कविता दातार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान सुरु आहे. भारी पॉईंटवर येऊन थांबलीय. खाली उतरल्यावर अजय समोरच असायचा नाहीतर...

पण पुढेही सर्व चांगलंच होऊदे.
नाहीतर अजय काहीतरी भयानक करायचा. Sad

आपली दुःख, त्रास कोणा पासून लपवून ठेवत उगाच सुखी असल्याचा आव आणण्यात काहीही अर्थ नसतो. उलट खरी परिस्थिती योग्य लोकांसमोर ठेवल्यास आपल्या अडचणीतून मार्ग निघू शकतो.>> खरंय अगदी.