स्टेटस

Submitted by SharmilaR on 25 October, 2021 - 00:20

स्टेटस

दुपारर्पयंत खोळंबून ती अगदी आंबून गेली होती. सकाळचा उत्साह, आत्मविशास तर केव्हाच डळमळीत झाला होता. आता तर तिच्या इथल्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्हं निर्माण झालं होतं. रखवालदाराच्या केबिन बाहेर बसून ती अगदी आसुसून त्या इमारतीकडे बघत होती. लंचटाईम तर केव्हाच होऊन गेला होता. बरोबर आणलेल्या डब्यातली पोळी - भाजी पण तिला खावीशी वाटेना. सगळी भूकच मरून गेली होती.

काही दिवसांपूर्वी ती इथं काम मिळवायला आली होती, तेव्हा किती वेगळं वाटत होतं. आणि काम मिळाल्यावर तर कसं धन्य-धन्य वाटलं होतं. एवढ्या मोठ्या ठिकाणी आणि अगदी चकचकीत वातावरणात दिवसाचे आठ तास घालवायला मिळणार.....अगदी आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं तिला.

इथलं काम मिळण्याआधी ती एका छोट्या स्टेशनरीच्या दुकानात कामाला होती. सकाळी आठच्या आत जाऊन सगळं दुकान झाडून पुसून लख्ख करायला लागायचं. मग दुकान उघडल्यावर गिऱ्हाईकांची वर्दळ सुरु व्हायची. लागेल ते सामान द्यायचं , पैसे नीट घ्यायचे असं तिचं काम सुरु व्हायचं. नऊ - साडेनऊ पर्यंत मालक पण यायचे. कॉलेजसमोरच दुकान असल्यानं सतत कुणीतरी येतच असायचं. दोन वर्षांपूर्वी मालकानं धोरणीपणानं एक फोटोकॉपी मशीन पण घेतलं. सुरवातीला मशिनकडे मालक स्वतःच बघायचे. मग हळूहळू त्यांनी तिला पण मशीन वापरायला शिकवलं. तिनं पण पटकन शिकून घेतलं. पगार फारसा नाही पण काम मात्र वाढत होत.

तिला तिथे दुकानात नौकरी मिळाली हेच खूप वाटायचं. फक्त आठवी पासला असं कोणतं वेगळं काम मिळणार? परत खेड्यातून आलेली. आठवीची परीक्षा संपली तेव्हाच आईबापांनी लग्न लावून दिलं. शहरातला पोरगा, कारखान्यात हेल्पर म्हणून कामाला, घरी फक्त सासू. आणखीन काय पाहिजे? विशीच्या आत दोन पोरांची आई पण झाली. तिनं शहरातल्या बायका बघितल्या तसं तिला पण कामाला बाहेर पडावंसं वाटायला लागलं. घरी सासू होतीच पोरं सांभाळायला. तशी सासूची काही कुरकुरही नव्हती. घरात खाणारी तोंडं वाढली म्हंटल्यावर नवऱ्याचाही काही प्रश्न नव्हता. वस्तीतल्या सगळ्याच बायका कामं करायच्या. तिच्या बरोबरीच्या मुली-बायका तर धुणं - भांडीचं करायच्या लोकांकडे. घरोघरी जाऊन काम करणं तिला आवडत नव्हतं. त्यात काही स्टेटस नव्हतं. त्यापेक्षा दुकानातलं काम बरं होतं. समोर काचेचं काउंटर अन बसायला स्टूल. जरा तरी स्टेटस होतं. दहा घरी फिरणं नको. दुकानातलं सगळं आवरून घरी जायला उशीर व्हायचा पण त्याला इलाज नव्हता. दुकानाची वेळच तशी होती. मालक चांगला होता, घरची काही अडचण असली तर एक - दोन तास सुट्टी पण द्यायचा. शिवाय रविवारी दुकान बंद असल्यामुळे हक्काची सुट्टी पण मिळायची. तसं बरंच चाललं होतं सगळं.

मालक नसतांना पण ती दुकान सांभाळायची. नेहमी दुकानात येणाऱ्या माणसांची तोंड ओळख व्हायला लागली होती. फोटोकॉपी काढता काढता जरा चार वाक्य बोलणं व्हायच. तिचा कामातला चटपटीत पणा बघून असंच एकानं या नवीन जागी काम मिळेल असं सांगितलं. इथल्या साहेबांना फोन पण केला तिच्याकरता. सांगितलेल्या वेळी ती साहेबांना भेटायला गेली. ऑफिस चा व्याप वाढता होता. वरकाम करायला कुणीतरी हवंच होतं. तिला फोटोकॉपी मशीन पण वापरता येतं म्हंटल्यावर त्यांना बरंच वाटलं. ते काम करणारा मुलगा जरा बाहेरच्या कामांकरता वापरता येईल.

"कधीपासून यायला जमेल तुला?" त्यांनी विचारलं.
"उद्यापासून." तिला काम जाऊ द्यायचं नव्हतं.
"अगं , तुला आधीच्या कामावर सांगायला लागेल नं ?असं त्यानां नं सांगता नको सोडूस. असं कर, सोमवारपासून ये. " सांगितलं.

ती तर या इमारतीच्या , इथल्या वातावरणाच्या प्रेमातच पडली अगदी. आधीपेक्षा पगार जास्त होता. शिवाय कामाचे ठरलेले तास. आणि सगळीकडे चकाचक. ती तर एकदम हरखूनच गेली. स्टेटस ची एक पायरी चढल्यासारखं वाटलं. एक वर्ष टेम्पररी , मग पर्मनंट व्हायची शक्यता. तिनं कसेबसे चार दिवस जुन्या कामावर काढले, मालकाला सांगितलं नवीन कामाबद्दल अन इथे यायला सुरवात केली. नेमून दिलेल्या कामात लगेच रुळली.

ती रोज तिच्या मजल्यावरच्या सगळ्यांपेक्षा थोडं आधीच यायची. सगळे बसायचे त्या मोठ्या हॉल मधेच कोपऱ्यात एक पार्टीशन टाकून तिथे फोटोकॉपी मशीन ठेवलं होतं. आत इंटरकॉम,एक फाईल आणि पेपर्स साठी कपाट आणि टेबल खुर्ची होती. बाकी हॉलमध्ये अर्ध्या उंचीच्या पार्टीशन टाकलेल्या केबिनस होत्या. छोट्याशा मशीन रुमला फक्त कुलूप असायचं. रोज साहेबांच्या पीए कडून किल्ली घ्यायची. ते उघडून तिथली साफसफाई तिला करायला लागायची. सगळे यायच्या आधीच ती ते करून टाकायची. नंतर दिवसभर मशीनवर येईल तसं काम. कुणालाही फोटोकॉपीज हव्या असतील तर ते तिला फोन करून बोलावून घ्यायचे. इथलं मशीन जरा अवघड होतं वापरायला. बरेच जास्त फंकशन्स होते त्यात. पण त्यावर आधी काम करणाऱ्या मुलानं आठ दिवसात तिला ते नीट शिकवून दिलं. आता त्याला ऑफिस च्या कामांकरता बाहेर फिरायला लागत होतं . तिच्या रोजच्या कामात, मध्ये-मध्ये दिवसातून दोन - तीनदा ऑफिस कँटीन मधून सगळ्यांकरता चहा आणणं, कुणी सांगेल तसं फाइल्स खालच्या - वरच्या मजल्यावर पोचवणं, सगळ्यांचे टिफिन खाणं झाले की टेबल आवरणं.......... असं काहीतरी चाललेलं असायचं.

ऑफिसमध्ये बायका जास्त होत्या. अधून - मधून गप्पा - टप्पा चालायच्याच. त्या ऐकतांना तिलाही गंमत वाटायची. सगळ्यांचं बघून तिची राहणी आणखीनच टापटिपीची झाली होती. चालण्या - बोलण्यातही फरक पडला होता. स्टेटस ची पुढची पायरी चढली होती. फोटोकॉपीचं काम शक्य तितकं पटपट आटोपून ती बायकांच्या जवळपास जास्त वावरायला लागली. कधीमधी त्यांच्या टिफिन खाण्याच्या वेळेत ती जवळपास असली कि तिलाही कुणीतरी आवाज द्यायचं. सगळे तिला नावानेच बोलवायचे. हळूहळू तिची भीड चेपली. काही दिवसांनी तर तिनं एकटीनं तिच्या रूम मध्ये डबा खाणं बंदच केलं. हक्काने ती सगळ्यांबरोबर खुर्ची घेऊन बसायला लागली. नंतर सगळ्यांकरता चहा आणायला जायची.

एखाद्या दिवशी तिचं काम जास्त असलं तर कँटीन मधला मुलगा चहा घेऊन यायचा. अशावेळी तिलापण तिच्या जागेवर चहा मिळायचा. तिला ते खूपच भारी वाटायंच. काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं, ठरलेल्या वेळी आपण कँटीन मध्ये नाही गेलो, तर कँटीनचा पोरगा येतो चहा घेऊन. मग ते काम ती हळू हळू टाळायला लागली. चहाची वेळ झाली कि काहीतरी निमित्त काढून ती एखाद्या टेबल जवळ काही विचारायला, बोलायला जायची मग तिथेच उभ्या उभ्या गप्पा मारत आलेला चहा घ्यायचा अन आरामात आपल्या जागेवर येऊन बसायचं. टेबल वगैरे पुसणं तर तिनं केव्हा बंद केलं हे कुणाच्या लक्षातही आलं नाही. इथे लागल्यानंतर चार महिन्यातच तिने थोडे साठवलेले पैसे अन थोडं कर्ज काढून एक टू-व्हीलर घेतली होती. पार्किंग मधे सगळ्यांच्या बरोबरीने आपली पण चकचकीत गाडी बघून तिला अभिमान वाटायचा. स्टेटस आता आणखीनच वाढल्यासारखं वाटलं होतं . आता कुणीतरी हाक मारून आपल्याला काही काम सांगतंय, हे तिला आवडेनासं झालं होतं.

कुणाचं काही काम असलं कि ते तिला फोन करायचे, पण शक्य असेल तेव्हा, आणि पुढे - पुढे नेहमीच ती काहीतरी कारणं सांगून, फोटोकॉपी शिवायचं काम टाळायची. शनिवारी मात्र ते शक्य नसायचं. आठवड्याभरातल्या कुणाचीही वाढदिवसाची पार्टी, नाहीतर एखादी मिटिंग वैगेरे शनिवारीच असायची. त्या दिवशी सगळ्यांना चहा - खाणं देणं , नंतरचा पसारा आवरणं हे ती आणि तिच्याबरोबर आणखी एक मुलगा करायचे. तिला तिचं स्टेटस त्या दिवशी कमी झाल्यासारखं वाटायचं. एरवीचं तिचं कामं टाळणं सगळ्यांच्या लक्षात येत होतं, पण कुणी बोलून दाखवलं नाही. पण शेवटी नं राहवून कँटीन हेड ने कंप्लेंट केलीच. कारण चहाचं काम तिनं बंदच करून टाकलं होतं. दिवसातून दोन - तीनदा त्याला त्याच्या दुसऱ्या कामाचा मुलगा पाठवायला लागायचा. साहेबांनी बाकीच्यांकडे तिच्याबद्दल जरा चौकशी केली, तेव्हा त्यांना कळलं, तिच्या खोलिबाहेरचं कुठलंच काम ती करत नाहीय. त्यांनी तिला बोलावून नीट समजावलं.

दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेलीच नाही. काही निरोप पण दिला नाही. पुढचे चार दिवसही गेली नाही. "कळू दे त्यांना माझी किंमत. ते मशीन वापरणं एवढं सोप्पं नाही. मी एकटीच तर हँडल करते. काम साचून राहील तेव्हा कळेल त्यांना." तिच्या मनात आलं.

चार दिवसांनी नेहमीपेक्षा जरा उशिराच ती ऑफिसमध्ये पोचली. 'आता त्यानां कळलं असेल मी नसली कि किती काम अडत ते. आज सोक्षमोक्ष लावायचाच.' आज पार्किंग आधीच भरलं होतं. जरा कडेलाच तिनं तिची टू-व्हीलर लावली. मनाशी उजळणी करत साहेबांची पीए, गीता समोर उभी राहिली.

"किल्ली घ्यायला आलीस?"
"नाई . किल्ली नंतर घेणार. आधी साहेबांना माझ्या कंडिशन सांगनार . "
"कंडिशन्स?" गीतानं आश्चर्यानं विचारलं. किल्लीचा विषय परस्पर मार्गी लागल्यानं बरंही वाटलं. तिला किल्ल्या नं देण्याची सूचना साहेबांकडून आली होती.
"हो." तिनं जरा गुर्मितच उत्तर दिलं .
"आत्ता साहेब मिटिंग मधे आहेत. थांबावं लागेल तुला. कंडिशनस तरी काय आहेत तुझ्या?"
सांगावं का हिला? सांगून टाकू नं .... कळू दे सगळ्यांनाच........
"मी फक्त मशीनवरच काम करणार. दुसरं काम नाही करणार."
"बरं ?"
"पेपर सगळ्यांनी माझ्या टेबल वर पाठवायचे. मी घ्यायला जाणार नाही."
"अजून काही?" आता गीताला गंमत वाटायला लागली होती.
"चहा मला पण टेबल वर आला पाहिजे. आणि मला कोणी नावाने बोलवायचं नाही. सगळ्यांनी मॅडम म्हणायचं." तिनं उत्साहानं पुढच्या "कंडिशन्स" सांगितल्या.
"असं कर, तू बस . साहेब फ्री असतील तेव्हा मी देईन तुझा निरोप."

भिंतीशी चार - सहा खुर्च्या ठेवलेल्या होत्या. ती तिथं बसली. मनातलं बाहेर पडल्यावर जरा बरं वाटत होतं .

असा बराच वेळ गेला. लोकं आत - बाहेर करत होते. मध्ये गीताही दोन - चारदा आत जाऊन आली होती. ही दरवेळी उत्सुकतेनं बघायची. पण अजून आत बोलावलं नव्हतं. ओळखीचे लोकं तिथून ये-जा करत होते. कुणी तिची फारशी दाखल घेतली नाही. गीता तिच्या कामात गढली होती. कंटाळा यायला लागला होता. जरा वेळांनं गीताचं तिला म्हणाली ,

"तुला पाय मोकळे करायचे असतील तर जा. मी तुला मोबाईल वर कॉल करीन, साहेबांना वेळ मिळाला की ."

ती खाली गेली. जरावेळ मोकळ्या जागी बसली. आज किती वेळ लागतोय. काम बघायला आली तेव्हा कसं पटकन आत बोलावलं होतं ...... ती रखवालदाराच्या केबिन जवळ गेली. जरा वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. मग तिथेच बसली. जरा आडोसा होता.

संध्याकाळ व्हायला आली. लोकं एकटे... ग्रुप नी खाली उतरत होते. ती आणखीच आडोशाला सरकली. पार्किंग हळू-हळू रिकामं होत होतं. साहेब उतरतांना दिसले तशी ती झटकन पुढे गेली.

"अरे तू इथेच आहे अजून? गीतानं सांगितलं होतं पण कामाच्या गडबडीत मी विसरूनच गेलो.
"उद्या येऊ मी?" तिनं आशेनं विचारलं.
"गीताने सांगितल्या मला तुझ्या अटी. त्या आम्हाला झेपणार नाही. फक्त एकच काम करणारा माणूस नाही ठेवत आम्ही. उद्या अकाउंटस मध्ये जाऊन तुझा हिशोब करून घे."
आता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते फक्त भुकेमुळे नव्हतं.
"पुढे जिथे कुठे कामाला जाशील तिथे मनापासून नीट पडेल ते काम कर. आणि अशा न सांगता दांड्या नसतात मारायच्या. काही वर्षांनी आणखी काम वाढलं असतं तेव्हा तुला एकच काम राहिलं असतं . अति घाईलाही जरा वेळ द्यावा लागतो. " ते जाता - जाता बोलले.
अगदी कोपऱ्यात तिची एकटीचीच टूव्हीलर केविलवाणी उभी होती.

******************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बेफिकीर यांची एक कथा आहे
ही वाचून तीच आठवली...
अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत त्यामुळे एकदम रिलेट झालं

प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस, रूपाली, धनवंती, मृणाली, अनिष्का.
बेफिकीर यांची एक कथा आहे
ही वाचून तीच आठवली...>>
शोधून नक्की वाचेन.

अरे मस्त आहे कथा. फार आवडली. डोळ्यात अंजन टाकणारी. ऑफिस स्टाफलाच नाही तर कुठल्याही पोस्टच्या माणसाला लागू होईल..

काय मस्त कथा आहे. हे कुणालाही लागू होईल अगदी Happy
आमच्या ऑफिसला ही १ अ‍ॅडमीन आहे, फरक इतकाच की ती पहिल्या पासून च अशी आहे.. एक्स्ट्रा एक ही काम न करणे, ईवन तिच्या जॉब स्कोप चे काम इंजीनियर्स वर लादणे, न्यू इयर डेकोर/सफाई माझ्या अखत्यारीत नाही असे बाणेदार पणे Wink सांगणे.. काम नसेल तर सरळ वीणकाम करत बसणे वगैरे.
काश तिला ही कथा वाचायला दिली असती तर...