नरकातल्या गोष्टी - भाग ३ - निर्माता!!! (उत्तरार्ध)

Submitted by अज्ञातवासी on 23 October, 2021 - 04:46

याधीचा भाग - https://www.maayboli.com/node/80376

काळ थांबला होता...
मनू आणि चित्रू एकमेकांकडे बघत होते...
... अणि म्हातारा मस्त गिटार वाजवत दोघांच्या समोरून निघून गेला.
"डॅडी!" चित्रू ओरडलाच.
"इट्स शोटाईम बेटा. एन्जॉय!!!"
"एल्डर गॉड!" डूडसने भक्तीभावाने हात जोडले...
म्हाताऱ्याने हात उंचावून त्यांचे अभिवादन स्वीकारले.
"मनू, सांभाळून सगळं कर. अजूनही तुझ्या शक्ती खूप कमी आहेत. एकावेळी तीन लोकांवर ताबा मिळवणं, त्यांच्या मनात अनेक भावना निर्माण होणं, खचितच सोपं नाही. पण तू करू शकशील असा मला विश्वास आहे."
"ब्रह्मदेव माझ्यासोबत असताना मला कशाला घाबरण्याची गरज?" मनू कडवटपणे म्हणाला...
ब्रह्मदेव हसले.
"यशस्वी व्हा बाळांनो. आता हा काळ सुरू होईल, मी चाललो."
ते अदृश्य झाले.
...अणि एका क्षणात काळ पुन्हा सुरू झाला.
मनूने आलटून पालटून तिघांकडे बघायला सुरुवात केली.
त्याच्या चेहऱ्यावर निरनिराळे भाव प्रगट होऊ लागले.
"काय करतोय मनू," चित्रू ओरडला.
"मनाच्या देवाने जे काम करायला हवं ते."
इकडे वीरू पुष्पाकडे बघतच राहिला.
"पुष्पा," वीरू आश्चर्याने म्हणाला...
"नाही नाही, अजून आश्चर्य..." मनू ओरडला.
"पुष्पा..." वीरू अचंबित झाला.
क्षणार्धात त्याच्या मनात बालपणीच्या आठवणी उफाळून आल्या.
"परफेक्ट... अजून प्रेम..." मनू ओरडला.
"पुष्पा," तो भावनारीतेकाने ओरडला.
इकडे पुष्पाचीही अवस्था वेगळी नव्हती.
मनू याच संधीची वाट बघत होता.
क्षणार्धात पुष्पाच्या मनात प्रेमातिरेक उफाळून आला.
"मनू..."
"चित्र्या डिस्टर्ब करू नको."
"अरे हे प्रकरण फास्ट होतंय खूप, जरा दमाने घे. फिल्म नाहीये ही, तीन तासात संपायला."
"फिल्म नाही, शॉर्ट फिल्म आहे. पुढच्या अर्ध्या तासात संपेन..."
इकडे पानवाला आधी आश्चर्यचकित झाला.
'त्याला राग यायला हवा,' मनू स्वतःशीच म्हणाला.'
त्याने पुष्पाकडे बघितले.
... पुष्पाने न राहवून विरुला मिठी मारली...
हे बघून पानवाल्याची तळपायाची आग मस्तकात गेली.
"परफेक्ट..." मनू ओरडला.
अत्यंत संतापाने पानवाल्याने पुष्पाला मारण्यासाठी सुरा उगारला.
...आणि विरूने तो वरच्यावर झेलला...
"परफेक्ट..." मनूच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.
...तोपर्यंत विरुच्या काही साथीदारांनी येऊन पानटपरीवाल्याला पकडलं आणि त्याची यथेच्छ धुलाई सुरू केली.
इकडे वीरूच्या मनात अनेक संमिश्र भावना निर्माण झाल्या.
तीच अवस्था पुष्पाची होती.
"अरे स्टॉप..." मनू म्हणाला
त्याक्षणी विरुला अचानक भोवळ आली.
"पुष्पा, माझ्या सोबत रहा," तो एव्हढंच म्हणू शकला.
"हो.. वीरू.."
कुणीतरी त्याला गाडीत बसवले. पुष्पा त्याच्या शेजारी बसली.
गाडी क्षणात दूर निघून गेली.
... इकडे त्याचक्षणी मनू खाली कोसळला...
*****
बऱ्याच दिवसांनी आज सटू बाहेर बसलेली होती.
कधीचा तिने लिहायचा टाक हातात घेतला नव्हता.
"सूर्यदाक्षिणी," मागून आवाज आला.
"मनू..." तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. "तुला तर देवलोकातून बाहेर काढलंय ना? मग तू इथे कसा."
"एक देव जर बेशुद्ध झाला, तर त्याला उपचारासाठी देवलोकातच आणलं जातं. भलेही तो निष्कासितही का असेना."
"का काय झालं?"
"अग ते जाऊदे. तू लिहीत नाहीस असं ऐकलं?"
"माझी भविष्यवाणी चुकली मनू."
"हे त्रिकालबाधित असत्य आहे. ती माफियाचीच गोष्ट ना?"
"हो."
"कमाल आहे, तिकडे तो चित्रू तोंड उतरवून बसला आहे, की तुझी भविष्यवाणी सत्य झाली म्हणून, आणि तू इकडे म्हणतेय की तू चुकलीस म्हणून..."
"म्हणजे?"
"त्या माफियाचं कालच त्याच्या बालमैत्रिणीशी लग्न झालं, आणि त्या पानवाल्याने पुन्हा पळून जाऊन त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं."
"खरं?" तिने आश्चर्याने विचारले.
"हो... जाऊन बघ चित्रूकडे..."
"येस..." ती आनंदाने ओरडली.
*****
काही कालावधीनंतर माफिया मरण पावला.
धर्मराजांनी त्याची रवानगी स्वर्गात केली.
हा निर्णय बघून चित्रूच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं...
*****
इकडे स्वर्गात धर्मराज आणि ब्रह्मदेव गप्पा मारत बसले होते.
"ब्रह्मा, मानलं तुमच्या मुलाला. एका निष्कासित देवाकडून मदत मिळवणं खायची गोष्ट नाही."
ब्रह्मदेव प्रसन्न हसले...
"पण अशी चूक झालीच कशी तुमच्याकडून? गाठी बांधण्यात चूक म्हणजे चार जिवांशी खेळ..."
"म्हातारा झालोय मी, होते कधीकधी चूक."
"अहो पण या चुकीने सर्व पृथ्वीचं संतुलन बिघडलं असतं, त्याचं काय?"
"...केलं ना सगळं नीट. बघ आता दोन्ही गाठी क्लिअर बांधल्या आहेत..."
"तुम्ही क्लिअर केलं? त्या मनूने आणि चित्रूने केलं."
ब्रह्मदेव हसले.
तेवढ्यात चित्रूचा असिस्टंट त्यांच्यासमोर आला.
"तू इथे कसा?" धर्मराजाच्या चेहऱ्यावर आश्चर्य ओसंडून वाहत होतं.
"बक्षीस घ्यायला." ब्रह्मदेव उत्तरले, आणि एक कमळफूल काढून त्याच्या हातात दिलं.
"शाबास बाळा. अतिशय वेळेवर तू चित्रू आणि सटूला माफियाची गोष्ट सांगितली. हे घे तुझं बक्षीस."
तो कमळफूल घेऊन हसत निघून गेला.
"म्हणजे हे सगळं तुम्ही घडवून आणलं?" धर्मराज अजूनही आश्चर्यात होते.
"अर्थातच. मीच या सगळ्याचा निर्माता आहे."
ब्रह्मदेव हसले आणि ब्रह्मलोकात निघून गेले.
समोर दोन गाठी वाऱ्यावर मंदपणे झुलत होत्या.
...एक पुष्पा आणि वीरूची...
दुसरी पानवाला आणि त्याच्या प्रेयसीची...

समाप्त.

(माझ्या आगामी The gods must be crazy या पुस्तकातून साभार Lol )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

मस्त