अगम्य - २

Submitted by सोहनी सोहनी on 23 October, 2021 - 02:39

अगम्य - २

मी काहीतरी कारण सांगून वेळ मारून घेतली, ते दोघे आत गेले तसा मी धावत बाहेर गेलो आणि जवळ जवळ एक हंडाभर पाणी संपवून खसखसून हात धुवून घेतले, हातावर जे काही चिकट मातकट रंगाचं जे काही लागलं होतं ते पाहून मी अतिशय घाबरलो होतो, मला ते रक्त वाटत होतं, काय होतं नक्की ते??
माझ्या अंगावर शहरे आले होते. स्वतःच्या जीवाला धोका जाणवत नाही तोपर्यंत जमेल तितका शोध घ्यायचा विचार मी पक्का केला, काही धोका जाणवला तर सगळं सोडून जायचं.

मी नेहमी सारखी कामं करत राहिलो, पण चौफेर लक्ष ठेऊन आणि कोणालाही काही संशय न येऊ देता. घरात काहीतरी शिजत होतं, आणि माझी इच्छा नसताना देखील संशय डॉक्टर आणि आईसाहेबांवर येत होता. मी दोघांवर बारीक लक्ष ठेऊन होतो.
आई तर घरातून कुठे जात नसायच्या, आपलं घर आणि काम ह्यातच गुंग दिसायच्या, पण मी जेव्हा डॉक्टरांवर लक्ष ठेवलं तेव्हा मला बरंच काही संशयास्पद दिसलं,
एका रात्री डॉक्टर साहेब रात्रीचे बारा वाजून गेले तरीही आले नव्हते म्हणून मी त्यांची वाट पाहत राहिलो, ते सव्वा दोन च्या आस पास आले. मी माझ्या खोलीच्या दाराच्या फटीतून त्यांना पाहत होतो. हातात पिकाव जे ओलसर मातीने माखलं होतं, डॉक्टरांचे पाय देखील मातीने भरले होते आणि हातात पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं काहीतरी होतं, माझ्या हाताला जे चिकट काही लागलं होतं तसेच डाग त्या शुभ्र कापडावर होते,
डॉक्टरसाहेब बराच वेळ जिन्यावर काहीतरी विचारात गुंतलेले बसले होते, मी फक्त त्यांचं निरीक्षण करत होतो, काय झालं काय माहित पण ते एकाएकी उठले आणि धावत बाईसाहेबांच्या बाजूच्या खोलीत शिरले आणि धाड करून जोरात दरवाजा लावून घेतला.
बाहेर येऊ कि नको ह्या विचारात मी जवळ जवळ अर्धा तास खोलीत घुटमळत राहिलो, झोप तर येत नव्हती, मी वाट पाहायचं ठरवलं, थोड्याच वेळाने जोरात दार उघडून ते धावतच बाहेर गेले, मी हि चोरट्या पावलांनी मागे गेलो, ते खूप पुढे गेले होते,amby त्यांच्या हातातल्या उजेडामुळे मला कळलं कि ते विहिरीपाशी उभे होते, मी त्यांच्या पासून खूप लांब पण ते अंधुक असे दिसतील असा आंब्याच्या झाडामागे लपून राहिलो, त्यांनी विहिरीचं झाकण उघडलं आणि काहीतरी त्यात टाकलं आणि लगेचच झाकण घट्ट लावून कडी लावून झपाझप पाऊले टाकत घराच्या दिशेने गेले.

मी बसल्या बसल्या विचारांत हरवलो, डॉक्टर म्हणाले होते कि बा' विहिरीत पडून गेला, पण विचार करण्याची गोष्ट म्हणजे मी इथे आल्यापासून ह्या विहिरीचं पाणी कशासाठीच वापरलं जात नाहीये हे नक्की, कारण सगळं पाणी बोरिंगचं वापरलं जातंय, पिण्या पासून ते प्राण्यांसाठी, मोरीत, वैगेरे हेच पाणी वापरलं जातं मग बा' त्या नेहमी बंद असणाऱ्या विहिरीत पडायला कसा गेला असेल???
बा' स्वतः जीव देणार नाही मग विहिरीत काही काम नसताना तो इथे कशासाठी आला असेल???
कि माझ्यासारखंच त्याला ते भास झाले असतील?? पण असे भास होण्यामागचं कारण काय? बा' सोबत नक्की काय झालं ???
माझं डोकं दुखायला लागलं, मी बराच वेळ विचारांत हरवून तिथेच टेकून बसलो, अचानक मनात विचार उचंबळू लागले कि "पाहायचं का? त्या विहिरीत काय आहे नक्की???"
उजाडायला अजून एक दोन तास होते, तोपर्यंत माझं कुणी इथे फिरकणार नाही, मी स्वतःशीच ठरवून जागेवरून उठलो आणि धावतच विहिरीजवळ आलो.
मी कसलाही विचार न करता ते झाकण उघडायला लागलो, ते खूप जड होतं, म्हणजे असं विहिरींना झाकण वैगेरे मी ह्या आधी कधी पाहिलं नव्हतंच, पण ह्या विहिरीचा परीघ इतकाही काही मोठा नव्हता तरीही झाकण मजबूत आणि जड होतं, मी कसं तरी ते उघडलं, मला धाप लागली मी दम खाऊन आत डोकावलो...
सकाळचे साडेतीन चार वाजायला आले असतील, मी जसा आत डोकावलो तसं मला कुणीतरी आत खेचू लागलं, एक ना अनेक हात मला आत खेचत होते, मी त्यांच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करू लागलो पण मला ते जमत नव्हतं.
त्यांचा जोर इतका होता कि माझं कमरेपासून वरचं शरीर पूर्ण आत खेचलं गेलं होतं आणि माझे बाहेर असलेले पाय उंचावत होते, कोणत्याही क्षणी मी त्या विहिरीत पडणार होतो,
जिवाच्या भीतीने माझं हृदय बाहेर यायचं बाकी होतं, त्या धडपडीत एक क्षण असा आला कि माझी प्रतिकार करण्याची शक्ती संपली आणि मी . . .
विहिरीत आत, खूप आत पडत गेलो, जसं उंच टोकावरून खोल दरीत पडतोय, पडता पडता मी खाली पाहिलं, खाली एक एक करत पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं काहीतरी दिसायला लागलं, ते एक एक करत वाढत गेले, मी त्यांच्या दिशेने खाली जात होते आणि ते माझ्या दिशेने वर वर वाढत चालले होते, मी काहीच क्षणांत त्यांच्यात पडणार होतो, तो चिकट पदार्थाचा स्पर्श पूर्ण शरीराला होणार, ती जाणीव माझे गात्र व्यापात चालली, मी इतका घाबरलो कि मी श्वास घ्यायचा च थांबलो,
मी धीर सोडलाच होता आणि मला कुणीतरी वर खेचलं, त्या हातांनी वर खेचलं, बंद डोळ्यांनीच त्या शरीराला बिलगलो, तो स्पर्श, ती हृदयाची धडधड मला ओळखीची वाटली, मी त्याला अजून घट्ट बिलगलो, त्याने माझ्या केसांतून हात फिरवून मला खाली झोपवलं, मी झटक्यात डोळे उघडले, मी विहिरीच्या बाहेरच होतो, इतके तिकडे भांबावून पाहू लागलो, डोळ्यांत पाणी घेऊन बा'ची धूसर छाया विहिरीत विलीन होत चालली होती, मी उठून त्याला हात द्यायचा प्रयत्न केला पण नको अशी मान हलवत ते दिसेनासे झाले.

मी जड पावलांनी खोलीत आलो, घर जागं व्हायला अजून अवकाश होता, मी शांत विचार करत जागीच बसलो.
आता जे घडलं ते काय होतं? काय आहे त्या विहिरीत?? ते पांढऱ्या कपड्याचा नक्की काय संबंध आहे?? त्या विहिरीत काही तरी गूढ आहे जे सोडवायला हवं.
कदाचित त्या गूढ शक्तीमुळेच बा'ने जीव गमावला असेल, कारण मला कुणीतरी आत नक्कीच खेचलं होतं, ते शक्तिशाली होतं, जे आहे तिथे त्याला डॉक्टर साहेब कारणीभूत असावेत??
काय चाललंय नक्की ह्या घरात?? डॉक्टरीच्या नावाखाली ते काहीतरी अगम्य, गूढ कदाचित क्रूर कृत्य करत आहेत??
कदाचित?? कारण सध्यातरी मी त्यांनाच संशयित म्हणून पाहिलं आहे, पण जोपर्यंत खरं काळात नाही तोपर्यंत त्यांच्यावर आरोप करणंदेखील माझ्या मनाला पटत नव्हतं. .. .

मी डोकं गच्च पकडून गुढग्यावर टेकून डोळे बंद करून राहिलो, बा'चा तो स्पर्श, संकटातून मला वर खेचणारे ते हात, मी त्याला अनाहूतपणे बिलगल्याची जाणीव, तो केसांतून फिरवलेला मायेचा हात, तो तिथे असल्याची जाणीव, तो अनुभव ते सगळं आठवून मी रडून घेतलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults