मार्गारेट (भाग १)

Submitted by Priyadarshi Dravid on 22 October, 2021 - 19:44

मित्रांनो

जीवनाच्या प्रवासात आपल्याला खूप लोक भेटतात, पण फक्त काही जण आपल्या मनातल्या आतल्या कप्प्यात घर करून तेथे वसतात. त्यांची आठवण मंदिरात जळणाऱ्या पणती सारखी सतत सोबत असते. अश्याच एक व्यक्ती, मार्गारेट माझ्या ऑस्ट्रेलियन "अम्मा" होत्या.

मार्गारेटचे विलक्षण व्यक्तिचित्र सादर करतो आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

मार्गारेट
मी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या दोन्ही देशांचा नागरिक असल्यामुळे मला दोन्ही देशात कुठंही नोकरी करून रहायचे स्वातंत्र्य मिळाले ते बरे झाले. माझे आई वडील दोघेही न्यूझीलँडमध्ये ऑकलंड शहरात विजू, माझ्या लहान भावासोबत राहत होते. मला त्यांना वाटेल तेव्हा भेटता आले होते. पण वडील फार आजारी पडू लागले आहेत, हे ऐकल्यानंतर मी २००८ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया सोडून ऑकलंडला राहायला गेलो. मग आई आणि नंतर वडील वारले आणि २०१३ ला मी ऑस्ट्रेलियाला परत आलो. सहा महिने मित्रांसोबत फिरत राहिलो. एक दोन कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्याच्यावर काम केले. नंतर साऊथ ऑस्ट्रेलियातल्या अडेलेड शहरात सेटल व्हायचे ठरवले.
वेगवेगळ्या रिअल इस्टेट एजन्ट आणि सरकारी संस्थांद्वारे बरीचशी घरं पाहिली, पण नाही पसंत पडली. घराच्या मागेपुढे असणारी बाग करायला थोडी मोठी जागा हवी होती. तसेच शांत परिसर असणारी, मेन रोड, ट्रेन स्टेशनही फार दूर नको, अशी आखूड शिंगी, भरपूर दूध देणारी, शकुनवाली गाय घेणं जितकं अवघड, तितकंच मनासारखं घर प्रत्यक्ष मिळणं कठीण असतं. शेवटी एका टुमदार वसाहतीत, सुंदर काटकोनातील रस्ते, शांतता असलेल्या वयस्कर वयाच्या लोकांसाठी बनलेल्या एका वस्तीतल्या घरात मी राहू लागलो. तत्पूर्वी मला एक कोपऱ्यावरचे घर फार आवडले होते, पण इस्टेट एजंट म्हणाला की, सहा महिन्यांपूर्वी त्याने हे घर ज्या कुटुंबाला विकले होते, ते त्याने आठदहा दिवसांपूर्वी विकूनही टाकले होते. कारण काय तर त्या शेजारच्या बंगल्यातील वृद्ध स्त्री जी एकटी राहत होती, ती रात्री बेरात्री पियानो वाजवायची, कधी गिटार वाजवत जुने गाणे गायची, कधी आपली जुनी बीएमडब्ल्यू गाडीचे काम करताना फार बडबड करताना दिसायची. थोडक्यात, ती फार विक्षिप्त अशी बाई होती. कोणी नातलग नाहीत की मित्रपरिवार नाही. “एकटेपणा फार खातो हो ह्या वयात, मोकळा - ढाकळा स्वभाव तिचा, नाही कोणाला आवडत. थोडी वाचाळ होती. बोलण्यासाठी शेजाऱ्यांइतके कोण जवळचे असणार? एकदा हिची बोलण्याची टकळी सुरू झाली की तिला थांबवणे जरा कठीणच होते, नॅचरली कंटाळतात हो लोक, नाही का? ते जाऊ देत, तुम्हाला मी स्वतंत्र, निवांत अशी दुसरी जागा जागा दाखवतो. तुम्ही निवडणार ते घर उत्तम असेलच,” एजन्ट आपल्या तंद्रीत बोलत गेला आणि मी ऐकत गेलो आणि काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
अशारितीने मी घर घेतले त्याच लेनमध्ये त्या बाईच्या घरापासून साताठ घरे सोडून दूर. यथावकाश माझे घर नीट लागले गेले, सोबतीला एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू पण आणले, अमेरिकन बुलडॉग! पण बेटा फार ऍक्टिव्ह होता. सहा महिन्यात एक गोंडस पिल्लू ३०-४० किलो वजनाचा, पुष्ट आणि ताकतवान प्राणी बनला. त्याला सकाळ - संध्याकाळ फिरायला नेताना तोच मला फिरवून अगदी दमवून टाकायचा. त्याच्या पळण्याने मी वेळोवेळी धापा घेत थोडा वेळ थांबत असे.
अशाच एका शुभ संध्याकाळी माझी अन् त्यांची भेट झाली. त्या घरासमोरच्या हिबिस्कस झाडाच्या सुकलेल्या फांद्या कापत होत्या. मला येताना पाहताच त्या समोर गेटपाशी आल्या. असतील सत्तरच्या वर पण वाटत होत्या त्यापेक्षा लहानच. चालताना त्यांचा पाठीचा कणा ताठ होता. वयानुसार थोडा स्थूलपणा असेल. पण एकूण उत्साही चपळ वाटल्या. म्हातारपणाचा कुठे लवलेशही नव्हता. नाही म्हणायला वार्धक्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर विसावल्या होत्या, चेहऱ्यावरील सुरकुत्या अन् डोक्यावरील सोनेरी ब्राऊनिश रेशीम लडी! एव्हढीच काय ती उतारवयाची पावती! त्या माझ्या कडे पाहून गोड हसल्या. एक स्नेहल, प्रसन्न, चटकन दुसऱ्याला आपलंसं करणारं निर्मळ हास्य त्यांच्या ओठांतून अगदी घरंगळत गेलं होतं. गोरा वर्ण, निळेशार डोळे! मी पाहतच राहिलो. कदाचित मी अशी प्रसन्न हास्याची संध्याकाळ इतक्या वर्षांत प्रथमच पाहिली जणू! मी तर त्यांना प्रतिवादन करण्याचे हास्य विसरून त्यांच्या डोळ्यांकडे पाहतच राहिलो. एकदम पॅसिफिक महासागरासारखे डार्क ब्ल्यू. त्यातून सांडणारे वात्सल्य, ममता आणि त्यांचा पूर्ण चेहराच एकदम बोलका झाला. जणू शब्दांची गरजच नसावी त्यांना.
“मी मार्गारेट,” त्या म्हणाल्या, “पलीकडच्या घरात आलेले तुम्हीच ना?” “होय,” मी म्हणालो आणि हात पुढे करून म्हटले, “यु कॅन कॉल मी डेविड." मी शेकहॅण्ड केला.
“तुम्ही ओरिजिनली कुठले?”
“मी न्यूझीलंडमधून इथे शिफ्ट झालो, पण मुळात मी इंडियन.”
“ओहो! रविंद्रनाथ टॅगोरच्या देशातले म्हणायचे!” मार्गारेटची ती पहिली बहुश्रुततेची पावती मी आनंदाने स्वीकारली.
मग दवात भिजलेलं वाळलेलं गवतही हिरवंगार होतं आणि अल्पावधीत रंगीत गवतफुलेही सर्वत्र दिसू लागतात, तशी आमची मैत्री कधी आणि केव्हा समृद्ध झाली हे कळलेच नाही. वय, धर्म, देश, स्त्रीपुरुषभेद सर्वकाही विसरला गेला आणि उरले फक्त एक नाते-वत्सल माता आणि तिचा एकटा मुलगा.
पहिल्या भेटीतच त्या मला इम्प्रेस करून गेल्या. त्यांनी गीतांजलीतून आपले आवडणाऱ्या चार ओळी म्हणून दाखविल्या. त्यांना विवेकानंद, कृष्णमूर्तीपासून दीपक चोप्रा आदींची नावे तिला ठाऊक होती.
सुरवातीला मी थोडा अबोल, स्वयंकेंद्रीत असल्याने त्यांच्या चौकस प्रश्नांची थोडीफार उत्तरे देऊ शकत होतो. पण मला कित्येक नवी नावं प्रथमच त्यांच्या कडून समजली. मला मॅडम ब्लावातस्की, लेडबिटर आदींची नावं आणि थिऑसॉफिकल सोसायटीची भारतात स्थापना कशी झाली याचीही माहिती नव्हती.
मार्गारेटचा स्वभाव इतका मनमिळावू, मायाळू, दुसऱ्यांना सहज आपलंसं करणारा होता की माझ्या कुटुंबातली एक झाल्या. आणि त्यावेळी मी अम्मांना फार मिस करत होतो आणि त्या जवळपास अम्मांच्या वयाच्या होत्या. एक दिवस त्या माझ्या घरासमोरून जाताना दिसल्या. मी झाडांना पाणी घालत होतो त्यामुळे मी त्यांना दिसलो नाही. मी आवाज देऊन त्यांना घरात बोलाविले आणि त्यामुळे आईवडील आणि सारी भावंडे मिळून असा ग्रुप फोटो दाखविला. “तुझ्या आईचा चेहरा एकदम हसरा आहे,” त्या म्हणाल्या. मी हसून पावती दिली, “अगदी तुमच्यासारखा.”
मग मी तिला भारतीय प्रथेप्रमाणे माझी अम्मा मानू लागलो. ते तिने आनंदाने स्वीकारले. माझ्या अम्माप्रमाणे या नव्या अम्मातही मला विलक्षण सारखेपणा आढळून आला. ज्ञानाची तीव्र ओढ, सदैव नाविन्यात रमणारी, प्रत्येक गोष्ट हरहुन्नरीने करणारी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत जिज्ञासा जागृत ठेवणारी होती. तिला तसे काहीच वर्ज्य नसे. स्वयंपाकगृहात निगुतीने केकचे विविध प्रकार करणे, रोजच्या जेवणासाठी ब्रेड बनविणे, बागेतील टोमॅटो, मुळा, गाजरं, कोथिंबीर यांचे सलाड बनविणे, नॉन व्हेजच्या बऱ्याच तिच्या आवडीच्या डिशेस बनविणे ह्या तर तिच्या नित्य क्रमातील गोष्टी. पण गार्डनिंग करणे, रोपे लावणे, झाडांची प्रेमाने देखभाल करणे खेरीज अफाट वाचन, विरंगुळा म्हणून पियानो, गिटारवर वेगवेगळ्या गाण्यांचे तुकडे वाजवणे इत्यादी इत्यादी. एव्हढे सर्व एखादी स्त्री स्वयंभू प्रचंड ऊर्जेचा स्रोत असल्याखेरीज करू शकणार नाही.
तेथील चालीरीतीप्रमाणे मोठ्या मॉल्समध्ये जाऊन खरेदी करण्याचा तिचा उत्साह औरच असे. लहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट्स, कुकीज पण ती आवर्जून खरेदी करत असे आणि लहान मुलांना देत असताना तिच्या चेहऱ्यावर ओतप्रोत भरलेले समाधान, आनंद पाहिला की मला तिच्यामुळे घरी जायला उशीर होतोय, घरातली महत्त्वाची कामे माझी वाट पाहत आहेत, हे आठवले की होणारी मनाची चिडचिड मी आपसूक विसरून जात होतो. तसे पाहिले तर मीच तिला मॉलमध्ये नेण्या - आणण्याचे काम स्वेच्छेनेच स्वीकारले नव्हते का?
एकदा माझ्या बागेतील पॅशन फ्रुटच्या वेलाला फळे धरू लागली तर तिलाच खूप समाधान वाटले होते. अगदी साध्या साध्या गोष्टीतही तिला फार रस वाटायचा. मी नॉनव्हेज खात नाही, सांबर भात, रसम भात खातो म्हटल्यावर तिने पण नॉनव्हेज खायचे सोडले आणि माझ्याकडून आंबट वरण, वांग्याची भाजी वगैरे मोठ्या उत्सुकतेने शिकून शाकाहारी जेवण बनवू लागली. मात्र आयुष्यभराच्या काही सवयी मात्र तिने सोडल्या नाहीत हे ही तेव्हढेच खरे! तिला ड्रिंक्स घ्यायला फार आवडत असे आणि इतकी वर्षे परदेशात राहिल्याने मला काही ते खटकलेही नाही. जे ड्रिंक ती घ्यायची त्याला सुद्धा वैशिष्टपूर्ण अशी झालर होती. बेनेडिक्टिन नावाची ती विस्की मधासारखी गोड आणि सोनेरी होती आणि त्याला लहानश्या शॉटग्लास मध्ये घ्यायचे असते. “१५१० मध्ये, बेनेडिकटाईन भिक्षू डॉन बर्नार्डो व्हिन्स्लीने या फ्रेंच लिकरची रेसिपी तयार केली, ज्यामध्ये सत्तावीस वनस्पती आणि मसाले वापरले गेले. आणि असे म्हटले जाते की फक्त तीन लोक आहेत ज्यांना ही विस्की बनविण्याची संपूर्ण कृती माहीत होती,” मार्गारेट आईनी पूर्ण माहिती दिली सोबत एका शॉट ग्लासमध्ये ते मला दिले. पाच मिनिटात त्या सोनेरी गोड लिकोरने माझा पूर्ण ताबा घेतला आणि मला हवेत तरंगत असल्यासारखे वाटले. “मला जरा पत्ता द्या त्या बेनेडिकटाईन भिक्षूचा, मी सुद्धा अनुयायी बनतो,” मी सांगितले आणि मार्गारेटची हसून मुरकुंडी वळली.
मुळात मार्गारेट ब्रिटिश वंशाच्या होत्या. तेथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला होता. त्या एक उत्कृष्ट पायलटही होत्या. ब्रिटिश एअरफोर्समध्ये त्यांनी काम केले होते. नाविन्याची, प्रवासाची ओढ त्यांना ब्रिटनपासून दूर ओढत होती. आणि त्यांची नेमणूक ऑस्ट्रेलियातील युरोपियन कार्स नावाच्या कंपनीत झालेली असतांना त्यांनी वेगवेगळ्या युरोप मधून आलेल्या कित्येक गाड्यांची मरम्मत केली होती. नंतर त्या मित्सुबिशी मोटर कंपनीत मेकॅनिक पासून सुपरवायझर झाल्या! त्यांना कार आणि मोटारसायकल रेसिंगमध्ये खूप रस वाटत होता. त्यांच्याजवळ जॅग्युआर रेसिंग गाडी पण होती. अर्थात त्यांना गाड्यांबद्दल खूप रस वाटणे साहजिकच होते. त्यांनी आपला मायदेशही सोडला आणि या अफाट विस्तीर्ण जगात ती साहसी स्त्री एकटेपणाने नवे जगणे सुरू करते, ही त्या म्हणजे जवळ जवळ पन्नास, साठ वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हटले तर तसे अवघडच होते. इथेच त्यांची झुंजार वृत्ती लक्षात यायला हवीय. इंग्लड ते ऑस्ट्रेलिया या जहाजाच्या प्रवासात त्यांना त्यांचा जीवनसाथी रिचर्डही मिळाला. आणि त्यांचा संसार सुरू झाला. नव्या मातीत त्यांनी इवल्याशा रोपट्याप्रमाणे तग धरला आणि त्यांची पाळंमुळं ऑस्ट्रेलियन जमिनीत कायमची स्थिर झाली.
एखाद्या माणसाच्या सहवासात राहिले की गतकाळचे दुःख आपण पूर्णपणे विसरून जातो. त्या व्यक्तिमत्त्वाची इतकी जादू असते की त्याच्या सहजगत्या लाभलेल्या सहवासात नव्या नव्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या एकेक पैलूंची आपणास प्रचिती येऊ लागते. एकदा मी “आनंद” मधील गाणी यु ट्यूब वर ऐकत होतो. अम्मा आल्या. त्यांनी ते गाणे पूर्ण ऐकले आणि गीतातील अर्थ विचारला. मी जमेल तसा इंग्रजीतून सांगितला. आनंद सिनेमाची गोष्टही सांगितली. मग आम्ही दोघांनी सब टायटल असलेला आनंद सिनेमा एकत्र पाहिला. त्यांनी मला त्या गाण्यांची सीडी सबटायटलसह मागितली. मी ती आणून दिली. त्यांना “जिंदगी कैसी है पहेली हाय ए । कभी ये हसाए कभी ये रुलाए.” राजेश खन्ना फुगे घेतो, मुलांना देतो. मग उरलेले आकाशात सोडून देतो. हे गाणं त्यांच्या हृदयाला फार भिडलं. नंतर केव्हातरी एक दिवस आम्ही सुपरमार्केट समोर चाललेल्या प्रदर्शनात गेलो, त्यावेळी मार्गारेटने खूप फुगे खरेदी खरेदी केले. काही लहान मुलांना दिले आणि उरलेल्या फुग्यांचे धागे
माझ्या हातात दिले.
“हे फुगे घेऊन मी काय करू?” माझा बावळट प्रश्न.
“दे ना आकाशात सोडून, तुमचा राजेश खन्ना करतो तसे,” आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. पण त्या हसण्यात मला थोडीशी उदासी सुद्धा दिसली होती. त्यांनी त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव हृषीकेश मुखर्जी हे पण त्यांनी लक्षात ठेवले होते. तसेच त्यांना, “कही दूर जब दिन ढल जाये, सांझकी दुलहन बदन चुराये, चुपकेसे आये,” हे गाणे पण फार आवडत असे. थोडी प्रॅक्टिस करून मार्गारेट दोन्ही गाणी पियानोवर वाजवू लागल्या आणि पंधरा वीस दिवसात त्यांना दोन्ही गाणी पाठ झाली आणि त्या गिटारवर ती गाणी गाऊ शकल्या. एकूण त्यांना ‘आनंद’, ‘राजेश खन्ना' आणि त्या सिनेमातील फिलॉसॉफी फार आवडली होती. आनंद तर सर्व भारतीयांना आवडतच होता, पण एक ऑस्ट्रेलियन स्त्रीला ते इतके अपील व्हावे, ह्याचे मला फार अप्रूप वाटले. आणि कदाचित पुढे त्यांना होणाऱ्या कॅन्सरसाठी त्यांचे मन या फिलॉसॉफीमुळे तयार झाले असावे. कारण शेवटी शेवटी त्यांना कॅन्सरचा त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या, त्यावेळी सुद्धा त्या सदैव आनंदी, उत्साहीचं राहिल्या त्यांनी कधीच तब्येतीची, दुखण्याची कुरकुर केली नाही. अगदी व्हीलचेअरवर एकदोन वर्षे त्यांना काढावी लागली होती तरी. एव्हढी एखाद्या गाण्यात, एखाद्याच्या अभिनयात प्रचंड ताकद असते की दूरस्थ अनोळखी बाईला खंबीर बनवते.
तसे माझ्या दिवसातील कार्यक्रम फिक्स असायचे. नवी ग्राउंड वॉटरची ड्रिलींगची कंत्राटे, घराच्या पुढील मागील मोकळ्या जागेत छान छान झाडे, भाजीपाला लावणे, देखभाल करणे, पाणी घालणे, पाळीव प्राण्यांना खाणेपिणे करणे, मेल तपासणं, उत्तरं लिहिणं, मूड असेल तर पेंटींग्ज काढणे, हार्मोनिका, बासरी वाजवणं, घरस्वच्छता करणे, सकाळ -संध्याकाळचा स्वैपाक, गाणी ऐकणं, वाचन करणं, नव्या ओळखी. असे असंख्य कार्यक्रम रोजचे. इतक्या बिझी आयुष्यात मलाच दिवसातले तास कमी पडायचे. पण सकाळी किंवा संध्याकाळी वॉकला जाताना या नव्या अम्मांचा हसरा चेहरा आणि गप्पा मला संजीवनीसारख्या भासत असे आणि त्या एलिक्झिरमुळे अख्खा दिवस न थकता मी कामात रमत होतो.
मधून मधून त्या मला जेवायला बोलवत. मार्गारेटला माझे बनविलेले जेवण फार आवडायचे. मी सुद्धा शाकाहारी जेवण बनवून त्यांच्याकडे नेई मग आम्ही एकत्र बसून जेवत असू. त्यांना पोळी, भाजी, वरण भात जेवण फार आवडे आणि मी त्यांना एक कुकर भेट दिला होता. त्यांनी एक दोन महिन्यात नॉनव्हेज खाणे सोडून दिले होते. त्यांना सांबार भात सर्वात जास्त आवडू लागला होता. ब्रिटिश असल्याने त्या वेस्टर्न पदार्थही छान बनवत असत. लहान मुलाप्रमाणेच उत्सुकता आणि जाणत्या माणसाप्रमाणे चिकित्सक वृत्ती असे आगळेवेगळे मिश्रण त्यांच्यात सामावले होते. आणि माझ्या हे लक्षात आले तेव्हा त्या मला जास्तच जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्यात काहीतरी स्पार्क आहे, हे वेळोवेळी माझ्या प्रत्ययास येत होते.
त्यांची बीएमडब्लू गाडी बरेच दिवसापासून गॅरेजमध्ये बंद होती. त्यांच्या दुखण्याचे किंवा जास्त वय झाल्याचे कारण झाले. बऱ्याच वेळा त्या कॅब मागवून घेत व खरेदीस जात असत. पण त्यात परस्वाधीनता अधिक होती म्हणून त्या मला म्हणाल्या, “डेव्हिड, माझा जुना ड्रायव्हिंग लायसेन्स बाद झालाय, तर नवा काढायचाय.” आता त्यांना पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार होती. कारण एका वयाच्या पलीकडे जर ड्रायव्हिंग लायसेन्स घेतला, अन् तुम्हाला दुर्दैवाने काही अपघात वगैरे झाला तर सरकार बाँड लिहून घेतात आणि वेगवेगळी अटी लावतात जसे रात्री ड्रायविंगची बंदी. मग मी त्यांना आपली गाडी विकायला सांगितले आणि त्यांचे शॉपिंग आणि हॉस्पिटलचे काम मी स्वेच्छेने करत होतो. पण त्या नेहमी मला विचारायच्या “इस इट गुड डेविड?" कारण त्यांना कोणावरही अवलंबून राहणे जीवावर आले होते. जन्मभर स्वतंत्र विचाराने, स्वतंत्र वृत्तीने जगल्यावर वृद्धपकाळी परावलंबित्व माणसाला नको हवे असते. हा त्यांचा गुण प्रकर्षाने उठून दिसला. कदाचित त्यांच्या अनेक प्रभावी गुणांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव पडला होता.
बऱ्याच दिवसानंतर एकदा त्यांना मी हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी नेत होतो. बाहेर ४८ डिग्रीचे ऊन आणि गाडी अचानक गरम होणे सुरु झाले आणि इंजिन लाईट लागला. गाडी बंद पडली. त्यांनी केवळ त्या थडथड होणाऱ्या आवाजावरून सांगितले की, रेडीएटरमधील पाणी संपले असेल. त्या मला म्हणाल्या, “तुझी गाडी आता जुनी झालीय, एक नवीन गाडी घेऊन टाक.”
मी म्हणालो, “अजून माझी टोयोटा गाडी चांगली आहे, अधूनमधून बंद पडायचीच की”.
“तरी पण गाडी आठ दहा वर्षे जुनी झाली आहे."
“तुम्हाला कोणी सांगितले की माझी गाडी आठ दहा वर्षे जुनी आहे?” मी जोमाने विचारले.
“अरे डेविड, मला बहुतेक सर्व गाड्यांची मॉडेल्स माहीत आहे रे.” त्या हसत म्हणाल्या. मी गप्पच बसलो.
“तर तुला पुढे दूसरी गाडी घ्यावीच लागेल. बर मला सांग तुला कोणती गाडी चालवायला आवडेल?"
“अम्मा, तुम्ही विनाकारण गाडीबद्दल बोलता आहात. मी काही ऑटोमोबाईल इंजिनिअर नाही.”
“डेविड, तुझ्या भावांकडे कोणत्या गाड्या आहेत?”
मला मोटर गाडी बद्दल चर्चा बिलकुल नको होती आणि मी फटकळपणे म्हणालो, “माझे भाऊ खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे ऑडी, बीएमडब्ल्यू, अशा खूप महागड्या गाड्या आहेत.”
“तुला कोणती गाडी स्वतःच्या मालकीची हवीशी वाटते?”
इथं मी क्लिनबोल्ड झालो होतो. नकळत नको असलेले संवाद बंद करावे म्हणून थोडे वैतागून म्हटले, ‘ऑडी.’
नंतर मी तो प्रसंगही विसरून गेलो होतो. ती घटना त्या जाण्याच्या बारा तेरा महिन्यापूर्वी घडली होती. मधून मधून माझी कामे शहराबाहेर असत. पण मी फोन करून त्यांच्याशी संपर्क ठेवत असे. कधी कधी मोबाईल सिग्नलची रेंज नसायची तर कधी कामंही किचकट, कटकटीची असत. नंतर घरी आल्यावर झालेल्या भेटीत झालेल्या दिवसांची उजळणी होई, जसे शाळकरी मुलाने शाळेतून आल्यावर दिवसभरात घडलेले सर्व आपल्या शब्दात सांगावे तसे. मग रात्रीच्या गप्पा, ड्रिंक्स, कधी मधी स्मोकिंग, त्यांनी बनवलेले शाकाहारी जेवण!
त्यांच्या सहवासातून घरी आल्यावर मला खूप काही नव्याने शिकून आल्यासारखे फ्रेश वाटे. आणि आपल्या ज्ञानात खूप सारी भर पडलीय असे वाटत राही. जसजसा माझा त्यांच्यासोबत सहवास वाढू लागला, तसतसे त्यांचे अंगभूत गुण माझ्या लक्षांत यायला लागले. त्या किती बुद्धिमान, व्यवहारकुशल होत्या, त्यांची ज्ञानलालसा अफाट होती, त्यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास होता. एखाद्या मधमाशी सारख्या एकेक कणाने ज्ञान गोळा करीत होत्या, नकळत, स्वाभाविकपणे. त्याला कारण त्यांची कुतूहलजनक दृष्टी! उदा. त्यांच्या वेचक, चिकित्सक दृष्टीने त्यांनी लावलेली बाग! अर्थात शेवटी शेवटी त्यांना बागेकडे लक्ष देणे शक्यच नव्हते. मीच त्यांच्या बागेत त्यांनी न सांगता कामे करून टाकत होतो. आणि त्यांना त्याचे फार कौतुक होते. मग त्या आवर्जून माझ्यासाठी पायनपल अपसाईड डाऊन केक करीत किंवा माझा आवडता चॉकलेट केक करीत होत्या. यु ट्युब वरील किंवा काही इंडियन डिशेस पण. अर्थात त्या आईच्या भूमिकेत होत्या तरी इंडियन आईप्रमाणे मला आग्रह करकरून घालणाऱ्या नव्हत्या. मूळ ब्रिटिश असल्याने फॉर्मलिटीज पण फार पाळायच्या.
त्यांना डायरी लिहिण्याची फार सवय होती. जुन्या इंग्लिश स्टाईलने त्या लिहीत. सुंदर अक्षर, जणू कॅलिग्राफीक लिखाणच. एव्हढे वय झाले तरी त्यांची समरणशक्ती स्वच्छ आणि स्पष्ट होती. जसे उत्तम व्यक्तिमत्व, सौंदर्य, बुद्धिमत्ता, ठणठणीत प्रकृती, आयुष्यातील नियमितपणा, स्मोकिंग, ड्रिंकिंग होते तरी त्याचे रूपांतर व्यसनात झाले नाही. मला वाटते, आयुष्यातील काटेकोरपणा आणि जुन्या ब्रिटिश लोकांप्रमाणे शिस्तबद्ध जगणे, यामुळेच तर त्या दीर्घायुषी झाल्या नसाव्यात? शेवटी जन्मभर नॉनव्हेज खाल्ल्याने की काय, पण त्यांना आतड्याचा कॅन्सर झाला. ते जीवघेणे दुखणे त्या अगदी हसतमुखाने सहन करीत होत्या. त्यामुळे मला त्या पहिल्या चार वर्षांत त्यांचे दुखणे माहीतच नव्हते किंवा हसत कबुल केले. पण शेवटच्या वर्षात त्यांच्या दुखण्याचे अक्राळविक्राळ स्वरूप लख्खकन पुढ्यात आले आणि मीच फार हक्काबक्का एकदम हबकून गेलो. मी जास्तीतजास्त माझा वेळ त्यांच्याबरोबर घालवू लागलो
आपल्या भारतात, विशेषतः महाराष्ट्राच्या कोंकणात फणसाची झाडे मुबलक संख्येने आहेत. त्या झाडाचे खूप उपयोगही आहेत. त्यांची फळे झाडाच्या खोडांवर लटकतात. वरून दिसायला काटेरी, खडबडीत पण हिरवीकंच आणि आतून गोड रसाळ गऱ्यांनी भरलेली. फार काय पण त्याच्या बिया उकडून, भाजून भाजी पण करून खायच्या. पण अशा बहुगुणी झाडाचे लोकांना “जेथे पिकते, तेथे विकत नाही,” ह्या म्हणीप्रमाणे फारसे कौतुक नसते. काही फणस तर झाडावरच पिकून जमिनीवर गळून पडतात. आणि त्याच्या बिया जमिनीत रुजून नवी झाडे उगवतात. तसेच मार्गारेट आईबद्दल झाले. तेथील स्थानिक लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि काही विशेष आस्थाही नव्हती. फक्त त्या वाचाळ होत्या, एव्हढीच ख्याती. त्यामुळे लोकांच्या अलिप्त वागण्याने त्यांचे गुण आणि थोरपणा लोकांना कधी कळलाच नाही. बरे मार्गारेट आईला पण आलतूफालतू, उथळ गप्पा मारणारे आणि अशी मैत्री करणारे, बोलताना जरा शिवराळ- फकिंग फकिंग म्हणणारी माणसे आवडत नसत. त्या चक्क त्यांना टाळत असत. मग त्यांना मित्रमैत्रिणी कशा मिळतील? कारण त्यांच्या बौद्धिक लेव्हलपर्यंत जाणारी माणसे फार कमी त्यांना भेटली.
खुद्द त्यांची एकुलती एक मुलगी डॉक्टर झाली आणि मिडल ईस्ट - येमेन मध्ये रेड क्रॉस या संस्थेसाठी काम करावयाला गेली तेथे नेहमी अशांतता, युद्ध, चकमकी, बॉम्बिंग, कुपोषण यामुळे तेथील हॉस्पिटल नेहमी भरले असत. अर्थात डॉक्टर्स, नर्सेसना खूप डिमांड. नंतर ती अफगाणिस्तान मध्ये गेली आणि ती तेथेच रमली. आईच्या एकटेपणाऐवजी जनसेवेला तिने जास्त प्राधान्य दिले असावे. मग नातवंडांची स्त्रीसुलभ ओढ मार्गरेट आईने मॉलमध्ये येणाऱ्या बालकांकडे वळविली, त्यांना बिस्किट्स, चॉकलेट्स देऊन त्यांचेवर आपल्या वात्सल्याच वर्षाव करीत असत. अर्थात ती मधून मधून आपल्या आईशी फोनवर बोलत असे. पण कुणाच्याही लक्षांत यावे यात माया, आपुलकीपेक्षा जास्त व्यवहारही असावा. आमच्यात चर्चा, विचारांचे आदानप्रदान होई, त्यांत त्या रमून जात. मला तर वाटते की मी कामानिमित्त शहराबाहेर काही दिवस जात होतो आणि परत आल्यावर त्यांना फारफार आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होता. अशा त्यांच्या अकृत्रिम प्रेमामुळे मी त्यांच्याशी कायम बांधला गेलो.
माणसाला खरी आई एकच असते, मावशी अगदी सख्ख्या आई इतकी माया करते. म्हणून माय मरो पण मावशी जगो असे म्हणतात. माझी आई गेल्यानंतर पाचेक वर्षांनी त्या माझ्या शेजारीण झाल्या आणि नकळत माझ्या आईच बनून गेल्या. रक्ताच्या नात्याने नाही पण नियतीने एक अदृश्य, अतूट नात्याच्या धाग्याने आम्हांला जोडले होते. प्रत्येक स्त्रीच्या मनात दुधावरच्या सायीची आस असते. मॉल, सुपर मार्केटमध्ये गेल्यावर लहान मुलांना पाहून त्यांचे वात्सल्य उफाळून येत होते, मग त्या खूप सारी बिस्किटे चॉकलेट्स घेऊन तेथील लहान मुलांना देत असत आणि मुले पण ह्या हसतमुख ग्रँडमाकडून आनंदाने स्वीकारत असत. खुद्द मलाही एखादे छोटे मूल समजून त्यांनी अनेकदा मला खूप चॉकलेट्स दिली आहेत. म्हणून की काय, त्यांनी मला या सात वर्षांत त्यांच्या वात्सल्याने, आईच्या मायेने अखंड न्हाऊ घातले. त्यांनी काही वाचले किंवा मी काही नवीन वाचले की आमच्यात त्याबद्दल थोडीफार चर्चा होत होती. पुनर्जन्मावरील माझ्या वडिलांच्या लेखाबद्दल आणि टिप्पणांबद्दल त्यांना मी बरेच सांगितले. तशा त्या काही केवळ तार्किक किंवा तात्त्विक विचारांवर अवलंबून नव्हत्या. काही ठोस पुरावे किंवा गीता उपनिषदे ग्रंथात किंवा भगवान गौतम बुद्धांच्या अनेक जन्मकथा, जातककथा त्यांनी वाचल्या होत्या. त्यांची आणि माझी भेट झाल्यावर त्या गोष्टींना उजाळा मिळून ते तर्क आता विश्वासात बदलले गेले होते.
“आत्मा जीवाच्या अंतरंगात वास्तव्य करत असतो. काही काळानंतर किंवा रोग जर्जरतेने, शरीर जीर्ण होते किंवा वार्धक्यांची सीमा संपते, त्यावेळी त्या आत्म्याला दुसरे शरीर हवे असते. ते त्याला मिळते मातेच्या गर्भातल्या भ्रूणमध्ये. तो तेथे राहतो. पूर्ण दिवस भरले की, नऊ महिने, नऊ दिवसांनन्तर तो बाहेर येतो, स्वतंत्रपणे श्वास घेऊ लागतो. गर्भात असताना मातेच्या रक्तावर, अन्नावर पोसला जातो. पण कर्मातच काही काळ व्यतीत करतो. त्याला अंशतः नरकच म्हणावे. तेथे मातेच्या विचारांचे ग्रहण करत, मातेच्याच पंचेंद्रिय ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. पण बाहेर आल्यावर वाचा आणि शरीर दुर्बळ असल्याने त्याचे विचार त्याला व्यक्त करता येत नाहीत. बहुतेकवेळा मोठं होईतो ते सारे ज्ञान लुप्तही होते. पण काही पवित्र किंवा नशीबवान आत्म्यांना गुरू भेटतात. काही ग्रंथवाचन करतात, त्यामुळे ज्ञान परिपूर्ण होऊन ते ज्ञानी बनतात. आमच्या कडचे संत ज्ञानेश्वर महाराज काय किंवा तुमच्याकडे जॉन ऑफ आर्क काय, अशी काही समृद्ध, सशक्त आत्म्याचीच रूपे आहेत. म्हणून थोर गुरू आद्य शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे, ‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्’ अवस्था पार कराव्या लागतात.”
मार्गारेट यांना संस्कृत यावेसे फार वाटे. त्यात सारा अध्यात्मिक खजिना भरलेला आहे असे वाटे. त्यामुळे त्यांना गीता किंवा अश्या उद्धृतांना फार ऐकावेसे वाटायचे. फार काय, त्यांनी गायत्री मंत्राचे महत्त्व समजून घेऊन एकेक शब्द लक्षांत ठेवून अक्षरशः पाठ करूनच सर्व गायत्री मंत्र मी पंधरा दिवसांच्या टूरवरून आल्यावर मला म्हणून दाखवला. सर्व उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट होते. मला तर फार नवल वाटले की वयाच्या ऐंशी पंच्याऐंशीव्या वर्षीही ह्या बाईंची ज्ञानपिपासा एखाद्या लहान मुलाप्रमाणे जागृत होती. आणि गोष्टीचे नवे ज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती फारच उल्लेखनीय अशी होती. आणि त्यांनी योगसाधना शिकून घेतली होती आणि नियमित प्राणायाम, मेडिटेशन – ध्यानधारणा करत असत. मला वाटते त्यांच्या दीर्घायुषी, आरोग्यसंपन्न, उत्साही जीवनाचे हेच रहस्य असावे. त्यांच्याकडे पाहिले की, माझ्या लक्षांत आले की, स्त्रीचे सौंदर्य केवळ बाह्यतः नसतेच मुळी, ते अंतरंगातून फुलून बाहेर पडते. तेच स्त्रीचे तेज असते. माणसं सुद्धा म्हणून अशा स्त्रियांचा खूप आदर करतात. मग माझे वडील म्हणायचे तसे, “यत्र नार्याम् पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता जेथे स्त्रियांचा आदरसत्कार केला जातो, मान दिला जातो, तेथे देवता निवास करतात. हे सारे मार्गारेट आईजवळ होते, म्हणूनच त्या इतक्या तेजस्वी, वृद्ध असूनही एखाद्या तरुणीप्रमाणे सुंदर, तरतरीत, तल्लख वृत्तीच्या, सुदृढ प्रकृतीच्या दिसायच्या.
त्यांची केवळ आध्यात्मिक बाजूंकडे ओढ किंवा गती नव्हती, तर त्यांना सायन्स मध्ये प्राविण्य होते. पेशाने त्या इंजिनियर होत्या. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरचा डिप्लोमा त्यांनी घेतला होता. स्वतःची गाडी त्या स्वतःच दुरुस्त करत असत. गाडीच्या आवाजावरून त्यातील डिफेक्ट त्या चटकन सांगत असत. उगाच नाही त्या मित्सुबिशी मोटर कंपनीत उच्च पदस्थ झाल्या! त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना साध्या साध्या गोष्टीत दुसऱ्यांवर अवलंबून राहणे आवडत नसे. नळाचे प्लम्बिंग वर्क असो, वेस्ट वॉटर पाईप चोकप होवो, छोटी मोठी इलेक्ट्रिकल उपकरणे असोत, गाडी बिघडली की गॅरेजच्या मेकॅनिककडे न जाता स्वतःच दुरुस्त करणे यात तर त्या कुशलच होत्या, बागेसाठी गार्डनर न लावता बागकामात रमत होत्या. आणि गंमत म्हणजे या सर्व कामांसाठी वेगवेगळी उपकरणे, हत्यारे लागत. त्यासाठी त्यांची हत्यारांची मोठी पेटी सज्ज होती. त्या पेटीला चाके लावली होती, जेणेकरून सर्व हत्यारे बाहेर काढायला मदत व्हायची. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही होते. त्या तशा सामाजिक सेवा वगैरे करण्यास जात नव्हत्या. पण मला वाटते त्या जेव्हा रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात होत्या, तेव्हा चॅरिटी फंडासाठी बरीच रक्कम देत असत. हे मला त्यांच्या मृत्यूनंतर चर्चचे फादर आणि इतर सेवेकरी यांच्या बोलण्यावरून समजून आले. मार्गारेटच्या उदारता, दानत यांचा गाजावाजा कधी केला नव्हता.
आणखी एक गोष्ट प्रशंसनीय म्हणजे त्यांची समृद्ध लायब्ररी! त्यात एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका सोबत इंग्रजी साहित्य, विज्ञान, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, आणि अध्यात्म - भारतीय तसेच बौद्ध. मी एक सायंटिस्ट आहे हे कळल्यावर त्यांना जे थोडेफार क्वांटम थिअरीबद्दल माहीत होते, त्याबद्दल सांगितले होते. पण माझ्याकडून आणखी माहिती ग्रहण करता यावी म्हणून त्या मला सविस्तर सांगण्यासाठी बोलत. मी जमेल तितक्या सोप्या भाषेत जे मला समजले ते सांगत असे. क्वांटम थिअरी, थिअरी ऑफ अन्सर्टंटी, आणि वेगवेगळ्या नोबेल प्राईझ मिळालेल्या सायण्टिस्ट बद्दल सांगे. त्या शास्त्रज्ञात एक अफलातून असे प्रोफेसर रिचर्ड फायनमन बद्दल सांगितले. त्या महाशयांची ख्याती इतकी की त्यांनी किती तरी पुस्तके फार सोप्या भाषेत लिहिलेली होती आणि त्यामुळे ते फार प्रसिदध झाले. मार्गारेटने फायनमनची पाच पुस्तके ऍमेझॉन मधून खरेदी केली होती आणि अगदी त्यातली एकेक ओळ वाचून त्यांनी मला प्रत्येक पुस्तकाचे सार सांगितले होते.
“त्या इतक्या हुशार नोबेल प्राईझ मिळालेल्या फाइनमनचा देवावर विश्वास नव्हता हे समजले आणि मग मला त्याच्या पुस्तकाचा मोह निघून गेला,” त्या एकदा मला विषादाने म्हणाल्या आणि मी एकदम चकित झालो. "तुम्हाला फाइनमनचा फोन आला होता कि तो देवाला मानीत नाही?" मी जोराने हसत म्हणालो. मग त्यांनी मला फाइनमनच्या शेवटच्याकाळी तो कॅन्सरने कसा तडफ़डला त्या वेळी कुठेतरी केलेल्या एका वक्तव्याबद्दल सांगितले आणि माझे पूर्ण समाधान केले आणि मला मानावे लागले की फाइनमन नास्तिक होता.
भारताबद्दल मी त्यांना सांगत असे, त्यात त्यांना फार रस होता. त्यामुळे त्यांना भारत बघण्याची फार इच्छा होती, विशेषतः अरबिंदो आश्रम आणि रविंद्रनाथ टागोर यांचे शांतिनिकेतन. ‘गीतांजली’बद्दल त्यांना सखोल माहिती होती. त्यामुळे त्यांना या पवित्र भूमीचे दर्शन घ्यायची इच्छा होती. पण तो योग येण्यापूर्वीच त्यांच्याभोवती हायग्रेड कॅन्सरने आपले जाळे पक्के केले होते. तशी त्यांना त्या आजाराची आधीच कल्पना असावी. पण त्या कधी झुरत बसल्या दिसल्या नाहीत उलट एखाद्या मधमाशीच्या उत्साहाने जीवनातील आनंदाचे मधाचे थेंब गोळा करून आपले आणि इतरांचे जीवन समृद्ध केले.
अलीकडे त्यांना वारंवार पोटाचा फार त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये जावे लागे. औषधे चालू झाली. त्याही स्थितीत त्या व्हीलचेअर वापरून स्वतःची कामे स्वतः करत. मधून मधून नर्सही दिवसरात्र सोबत असे. थोडं बरं वाटलं की कामाला लागत. पुन्हा मला आठवते, त्या दिवसासाठी त्यांनी माझ्यासाठी चॉकलेट केक बनवला होता आणि खाऊ घातला होता. त्यावेळचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता, असो. तर मग मी स्वेच्छेने माझी कामे बाजूला ठेवून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे - आणणे, त्यांची बाग मेंटेन करणे अशी बरीचशी कामे न विचारता करू लागलो. त्यावेळी त्यांच्या आजाराचे उग्र स्वरूप माझ्या लक्षांत आले. मी त्यांना म्हटलेही आता मेडिकल सायन्स फार प्रगत झालेय, कदाचित ऑपरेशन करून टाकले तर दुखणे जाईल किंवा किमान सुसह्य होईल. पण त्या म्हणाल्या की, तसे केले तर फार लांब आतडे कापावे लागेल आणि मग कमरेला युरिनसाठी, स्टूलसाठी बॅग्ज बांधाव्या लागतील. पुन्हा पॅरेलिसिसचा धोका होताच, एव्हढे वय झाले म्हणून. म्हणजे पुन्हा परस्वाधिनाता येणार त्यापेक्षा जसे होईल तसे जगायचे. जन्मभर स्वतंत्र विचाराने स्वतंत्र कृतीने जगल्यावर वृद्धपकाळात तरी परावलंबित्व नको, असे त्यांना वाटणे साहजिकच होते.
तसा मी माझ्या कामांसाठी शहराबाहेर बऱ्याच वेळा जात होतो. त्यावेळी अचानक असेच काहीतरी महत्वाचं काम निघालं. मी मार्गारेट आईंना न सांगताच निघालो. शहरापासून बरेच तास प्रवासाच्या तरावर माझे फिल्डवर्कचे काम रेंगाळले. मार्गारेटशी मी नेहमी फोनवर बोलत असे. परंतु यावेळेस ज्या भागात गेलो तेथे नीट रेंज नव्हती. नेटवर्क नीट काम करीत नव्हते अगदी रिमोट प्लेस! परतीच्या प्रवासात बाहेर ५० डिग्रीचे भयंकर ऊन तापले होते आणि गाडी फार जास्त गरम होऊन मधून मधून बंद पडत होती. एका झाडाखाली मी गाडी थांबवली आणि बॉनेट उघडे केले. एअर कंडीशन्ड गाडीतून बाहेर येताच भट्टीत उतरल्यासारखे वाटले. मी फोन तपासला, रिसेप्शन सिग्नलचा एक बार दाखवीत होता. मी समोर दिसणाऱ्या रेतीच्या टेकडीवर चढू लागलो आणि रिसेप्शन चे दोन बार प्रज्वलित झाले. आणि आणखीन वर चढताच फोनची घंटी वाजली. मार्गारेटचे चार मिस कॉल आले होते आणि दुसऱ्या अनोळखी नंबर वरून ही दोन मिसकॉल होते. मी मेसेज बँक तपासला. पहिला रेकॉर्डेड मेसेज सुरु झाला: “डेविड, मी वॉर्ड ३४ मध्ये ऍडमिट झाली आहे. मला लवकर फोन कर.” माझ्या मनात कल्लोळ एकाएकी नागासारखा फणा काढून ताठ उभा झाला. दुसरा मेसेज: “डेविड, मी तात्पुरते मॉर्फीन घेणे बंद केलेले आहे आणि माझ्या वकिलाला बोलवले आहे, तो येताच फोन करते.” थोडावेळ माझी मती गुंग झाली. मी तिसरा मेसेज तपासला आणि क्षीणपणे “डेविड, मी वकिलाला सर्व सांगितले आहे,” एवढेच ऐकू आले. पुढचा मेसेज मी टेकडी खाली उतरतांना ऐकला: “माझे नाव फ्रेडरिक स्मिथ आहे. मी लॉ फर्मचा पार्टनर आहे. कृपया मला मार्गारेट पोपच्या विलच्या एक्सिक्युशन संबंधी मला अर्जंटली फोन करा.” मी शेवटचा सेव्हढ मेसेज ऐकला तेव्हा सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली होती. सूर्याचे सोनेरी किरण सर्वत्र पसरले होते. “डेविड”, मार्गरेटचा क्षीण आवाज ऐकू आला. मी स्पिकरफोनवर ऐकू लागलो, “डेविड, मला तुझ्याशी शेवटचे एकदा बोलून निरोप घ्यावा असे वाटते आहे. तू सरळ माझ्या वॉर्ड मध्ये येऊन भेट.” ते ऐकताच मी टेकडी धावत उतरलो आणि बॉनेट बंद करून गाडी जास्त वेगाने चालवत मी दवाखान्या भोवतीच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली तेव्हा साडे सात वाजले होते.
मी धावत वॉर्ड ३४ ला जाणाऱ्या लिफ्टचे बटन दाबले. मी थोडा वेळ वाट पाहिली आणि मग एकदाची लिफ्ट आले. एकेक क्षण मला एक लांब पळासारखा वाटत होता. मी समोरच्या नर्सला मार्गारेटच्या खोलीबद्धल विचारले. ती रूम नऊमध्ये ऍडमिट आहे आणि तिची प्रकृती फार सिरीयस आहे हे कळले. मी रूम नऊ मध्ये शिरलो. मार्गारेटच्या नाकात, तोंडात, हातात वेगवेगळ्या नळ्या पाहून मी हबकून गेलो. त्यांचा उजवा हात मोकळा होता आणि मी खुर्ची त्या बाजूला लावून बसलो. मार्गारेटचा हात हातात घेतला. त्याचे स्किन अतिशय नाजूक लहान मुलासारखे नाजूक वाटले.
त्यांच्यात प्राण होता हे मला त्यांच्या उष्ण हातातून कळले आणि मी मोठ्ठा उसासा सोडला. हात चोळत बसलो असताना नर्स आली आणि तिने मला दोन दिवसांपूर्वी झालेल्या वकिलाच्या भेटीबद्दल सांगितले. “परवा वकील आले तेव्हा मार्गारेटला फार वेदना होत होत्या. दुखण्याची अखेरची वेदना! त्यांना खूप मॉर्फीन द्यावे लागले होते. तरी त्यांच्या वेदनांना अंत नव्हता काही वेळ थोड्या गुंगीत राहायच्या त्या शेवटी त्यांनी डॉक्टरांना सांगितले की आता मॉर्फीनचे इंजेक्शन देऊ नये कारण त्यांना वकीलाबरोबर बोलायचे होते. काम होईतो त्या वेदना सहन करणार होत्या. मोठ्या कष्टाने त्या वकिलांशी थोड्या बोलल्या होत्या पण वकीलांनी दिलेल्या कागदांवर त्यांच्या सह्या घेऊ शकले नव्हते. पण अंगठ्याचे ठप्पे घेतले होते. वकीलसाहेब सकाळी येणार होते. आणि साक्षीदार म्हणून तेथील डॉक्टरांनी सह्या घेणार होते. आणि माझ्या नावावर पॉवर ऑफ ऍटर्नी बनलेली होती.
त्या रात्री मी मार्गारेटच्या उजव्या बाजूला बसून त्यांचे हात चोळीत बसलो. मधे मधे त्या माझा हात आवळून घेत आणि काहीतरी अस्पष्ट बोलत आणि त्यातले ‘डेविड’ मात्र मला समजायचे. काही वेळा डोळे अर्धवट उघडायचे आणि मला पाहून त्या थोड्या हसल्या असे वाटत होते. सकाळ होता होता त्यांना थोडी शुद्ध आल्यासारखी वाटली. नर्सला बोलाविले आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे आता मार्फिन हळूहळू उतरत होते. सकाळी नऊ वाजता वकील साहेब आले. त्यांनी मला काही कागदपत्रे दिली आणि माझ्या सह्या घेतल्या. मार्गारेटनी मला पॉवर ऑफ ऍटर्नी चे अधिकार सोपविले होते त्याचे डॉक्युमेंट मी सही करून लिफाफ्यात ठेवून दिले. त्यांचा एकपानी विलची एक कॉपी मला दिली गेली आणि त्याला सुद्धा मी न वाचता लिफाफ्यात ठेवले. मन शोकाकुल झाले होते आणि वकील काय सांगतो आहे यापेक्षा जास्त लक्ष मार्गारेटच्या हलत्या ओठांवर केंद्रित होते. मग वकील थोडावेळ चूप बसला. मार्गारेटचे डोळे उघडे होते आणि तिने मला पाहताच माझा हात हातात घेतला. “किती वाट पाहिली तुझी. शेवटी तू आला फार बरे झाले.” मार्गारेट थोडे कण्हत हसल्या आणि त्याची धाप लागली. मला मार्गारेटच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून मोठे कौतुक वाटले. वकील साहेबांनी झटकन ब्रिफकेसमधून कागदपत्रे काढली आणि मार्गारेटच्या सह्या घेतल्या गेल्या. आणि त्यांनी मलाही सर्व कागद पत्रे बाहेर काढायला लावले आणि सह्या घेतल्या. त्यांनी मला विलमधले सर्व पॉईंट्स समजावून सांगितले आणि वकीलांनी ब्रीफकेस बंद करून मला त्यांचे कार्ड दिले. “वुई विल बी इन टच," म्हणत त्यांनी मार्गरेटला बेस्ट विशेस दिली आणि ते निघून गेले. मग मी आणि मार्गारेट उरलो. नर्सने विचारले, “मार्गारेट मी तुला मॉर्फीन देऊ काय?". मार्गारेट एकदम हसल्या, “आता मला मॉर्फीन नको ग, आता माझा मुलगा आला आहे आणि त्या सुखातच माझे दुःख वितळणार आहे.” नर्सला पूर्णपणे समजले नसावे असे दिसले आणि आम्ही दोघे एकत्र हसलो.
“काय म्हणता अम्मा?” मी आनंदाने हसून म्हणालो. “डेविड, मला हॉस्पिटलचे खाणे बिलकुल नकोसे झाले आहे. तू माझे घर उघडून माझी कवळी आणि भात आणि आलू गोबीची भाजी आणतो का?”
“हो आणतो की पण नर्सला विचारून घेतो.”
“अरे नर्सला काय विचारतोस? तूच माझा डॉक्टर आहेस. तुझ्या हातचे काही तरी चमचमीत खाल्याशिवाय मी वर जाणार नाही.” आणि मला अम्माचे फार कौतुक वाटले आणि मी तडक निघालो.
“आलू गोबी आणि पनीरचे लहान तुकडे मिळवून भाजी बनवली आणि भात आणि दहीसुद्धा घेतले. मार्गारेटची कवळी घेऊन मी परतलो.
मला पाहताच मार्गारेट उठू लागल्या आणि मी त्यांना थांबवले. नळ्याचे जंगल एका बाजूला सरकवले. त्यांचे पोट सुजले होते, त्यावर हलकेच हात फिरवला आणि हसून म्हणालो, “अम्मा, तुम्ही सात आठ महिने प्रेग्नन्ट दिसत आहात.” मार्गारेट पुन्हा अगदी मनापासून हसल्या. “हो डेविड, तूच माझ्या पोटात बसला आहेस ना?” त्यांना हसताना पाहून फार बरे वाटले. मी दही भात कालवला आणि बाजूला भाजी ठेवली. इतक्यात नर्स आत आली आणि तिला भरपूर गरम मसाला टाकलेलय भाजीचा वास आला असावा आणि तिला वाटलेले नवल तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसले.
“काही खायला द्यायला काही हरकत नाही ना?" मी नर्सकडे पाहून विचारले. “हो, त्यांना जे आवड्ते ते द्यायला हरकत नाही. पण जास्त खाऊ नये एवढेच.” नर्सने नाकावर लावलेली ट्यूब काढून टाकली आणि मागे दोन तक्या लावून बसते केले आणि ती निघून गेली.
मग मार्गारेटने हळूहळू सर्व जेवण फस्त केले आणि मग मोठ्ठी ढेकर देऊन त्या सॉरी म्हणाल्या. “डेविड, या रुचकर जेवणासाठी माझा तुला पापा आणि हात ओढून त्यांनी माझ्या गालावर हलकेच ओठ ठेवले आणि मी त्यांच्या बाहुपाशात थोडा वेळ तसेच रमलो. कधी नाही ते मला माझी अम्मा पुन्हा भेटली याचा फार आनंद झाला. पण हे सुख जास्त दिवस मिळणार नाही याची फार खंतही वाटत होती पण निर्घृण, उलट्या काळजाच्या दैवापुढे कोण काय करणार? अशा वेळी आपल्या हातात काही नसते हे पूर्णपणे कळते.
आनंद सिनेमाचा शेवटचा अंश जो मला आणि अम्मांना फार आवडायचा. “टेप वाजत आहे ज्यात त्याने आनंदचा आवाज रेकॉर्ड केला आहे: 'बाबू मोशाय,’ जीवन आणि मृत्यू हे वर बसलेल्या जहानपनाच्या हातात आहेत, ज्याला तुम्ही बदलू शकत नाही आणि मी सुद्धा नाही, आम्ही सर्व कळसूत्री कठपुतळी सारखे आहोत, कोण केव्हा जाईल हे कधीच ठरवून दिलेले नसते. 'आनंद मेला नाही' असा संदेश देऊन या चित्रपटाचा अंत होतो. आनंद मरत नाही त्याचप्रमाणे माझी ऑस्ट्रेलियन अम्मा कधीही पूर्णपणे मरणार नाही. कारण तिच्या वात्सल्याचे काही अंश तरी का होईना, माझ्या रक्तात सामील होऊन घुळमिळले आहेत, ते कधी विसरता न येणारे एक दारुण सत्य होते.
खरोखर आई ही एक अशी व्यक्ती प्रत्येकाजवळ असते, जी इतर सर्वांची जागा घेऊ शकते परंतु तिचे स्थान मात्र इतर कोणीही घेऊ शकत नाही. मला माझ्या सख्या आईची दररोजची पूजा आठवते आणि तिच्या प्रेमाने मला आयुष्यभर जखडून ठेवले आहे ते नेहमीकरता. आणि तसेच माझी ऑस्ट्रेलियन आई जिचे स्थान कोणी घेऊ शकत नाही.
दोन दिवस निघून गेले आणि मार्गारेटची स्थिती खराब होऊ लागली आणि तिसऱ्या दिवशी रात्री तिने प्राण सोडला तेव्हा मी तिच्या बाजूलाच तिचा हात हातात घेऊन बसलो होतो. रितीप्रमाणे चर्चच्या लोकांनी अंत्यविधी आणि बेरीयल प्रोसेस वगैरे केले. त्यावेळी त्यांच्या आत्म्याला प्रार्थना म्हटल्या गेल्या तसेच त्याच्याबद्दल चार शब्द बोलले गेले. त्यांच्या दानशूरतेचा गौरव केला गेला. मी तर अगदी नि:शब्द झालो होतो. मातृवियोगाचे दुःख दुसऱ्यांदा भोगत होतो. त्या आता या जगात नाहीत, हे सत्य माहीत असूनही मन मात्र त्या अजूनही भेटणार आहेत असे लहान मुलासारखे फिलिंग येत होते. एकीकडे त्या पुन्हा कधीही दिसणार नाहीत, या प्रखर वास्तवाने माझे मन पुन्हा पुन्हा भरून येत होते. डोळे अखंड वाहत होते.
त्यांचे घर त्यांनी कॅन्सर सोसायटीस दिले होते. त्यांच्या लायब्ररीतील सर्व पुस्तके ऍडलेडच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीला दिली होती. घरातील भांडीकुंडी गरजूंना, कपडे चर्चला, बरीच रक्कम चर्चसाठी चॅरिटी फंडाला पियानो, त्यांची प्रोफेशनल टूल बॉक्स आणि काही अँटिक वस्तू मला, घरातील फर्निचर विकून चर्चला, आणि सोन्याचे वगैरे मौल्यवान चिजा आणि बँकेतील सर्व गुंतवणूक मुलीच्या नावावर ठेवली होती. सर्व काही रीतसर आणि नीटपणे इच्छापत्राप्रमाणे झाल्या. कुठे गडबड नाही, कुठे संदिग्धता नाही. सर्व कायदेशीर झाले होते.
वकिलाने मला एक लहान बंद लिफाफा दिला होता पण मी शोकाकुल अवस्थेत होतो, त्यामुळे तो लिफाफा माझ्या गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये दहा दिवस पडून राहिला. डॅशबोर्ड काही कारणासाठी उघडला तेव्हा ठेवलेला लिफाफा लक्षात आला. त्यात एका सेल्फ स्टोरेज यार्डची ९ नुंबरची टॅग लावलेली किल्ली होती आणि सोबत स्टोरेज कंपनीचे कार्ड होते. मी तडक स्टोरेज यार्डला गेलो. गॅरेज मालक विचार करत म्हणाला, “गेले वर्षभर कोणीच ९ नंबरचे गॅरेज उघडले नाही. पण आम्हाला वेळचेवेळी गॅरेजचे भाडे मिळत होते म्हणून आम्ही लक्ष दिले नाही.”
मालकासोबत त्या किल्लीने गॅरेज उघडले. पाहतो तर काय असंख्य
कोळीष्टकांच्या जाळ्या! हाताने नंतर मोठया ब्रशने कोळ्याची जळमटे दूर करून आत शिरलो. समोर एक ऑडी वॅगन उभी! सिल्व्हर रंगाची. गाडी लॉक केलेली नव्हती. मी ड्रायव्हरच्या बाजूचे दार उघडले. गाडीची किल्ली लोम्बकळत होती. मी डॅशबोर्ड उघडून पाहिला. आत डायरीतला फाडलेला एक कागद होता. त्यावर लिहिले होते: “डेव्हिड, थँक यु फॉर युवर जनरॉसिटी. आय लव्ह यु फॉरेव्हर, मार्गारेट.”
ऑडी गाडी पाहताच मी फार भारावून गेलो. जवळपास एक वर्षांपूर्वी त्यांनी मला सहज विचारले होते, माझी आवडती कार कोणती? हॉस्पिटलमध्ये जाताना गाडी बंद पडली. त्यावेळी त्या म्हणाल्या की नवी गाडी का नाही घेत डेव्हिड? तर मी त्यांना म्हटले की, ही गाडी अजून चांगली आहे. पण त्यांनी मला ऑडी भेट देऊन खूपच मोठ्ठे सरप्राईज दिले, ज्या गोष्टीची मी स्वप्नातही कल्पना केली नसती. त्यांनी त्याच्या मानलेल्या मुलाला कोणताही गाजावाजा न करता किंवा मलाही कधीच न सांगता दिलेली ही भेट फार फार अमूल्य होती. त्यांचे माझ्यावरील नितांत प्रेम, माया अशी लख्खन अनपेक्षितरित्या सामोरी आली.
त्यांच्या मुलीशी मी फोनवर दुःखद निधनाची बातमी दिली! अखेर त्यांची मुलगी बोलली. “आईचे दुखणे पेनफुल होते आणि मरणही. एक मुलगी म्हणून मलाही वाईट वाटते. पण इथे शेकडो जखमी लोक सोडून केवळ आईसाठी इतक्या लांब येऊ शकत नव्हते. कारण या लोकांना माझी गरज जास्त आहे. शेवटी माणूस जन्माला आल्यावर कधी न कधी वर जाणारच असतो. एव्हढेच आपण सुख मानायचे की ती समृद्ध, दीर्घायुष्य स्वतंत्रपणे जगली, यातच आपण सुख मानायचं. मुख्य म्हणजे तिला अर्धांगवायू न होता, परावलंबी आयुष्य ती जगली नाही. शिवाय इथे मी एका अफगाण डॉक्टरशी विवाह केलाय नि मुस्लिम धर्म स्वीकारलाय, ह्या बातमीने तिला वाईट वाटले असते. यासाठीच मी आले नाही. निदान मी येथे सुखी आहे, या विचाराने तरी ती सुखाने गेली असेल. बाकीच्या गोष्टी तर तिच्या ‘विल’ प्रमाणे झाल्या असतीलच.” मी तिला वकिलांचा फोन नम्बर दिला आणि पैसे आणि दागिने ट्रान्सफर् करायचा सल्ला दिला. शेवटी ती म्हणाली, “डेविड, तू माझ्या आईची एवढी काळजी घेतली या बद्दल मनःपूर्वक थँक यू सो मच.”
शेवटी माणसं एकत्र येतात, ती एक नियती असते. त्यांत काही त्रासदायक असतात तर काही देवमाणसे! मार्गारेट माझ्या दृष्टीने एंजलच होत्या. मला मातेचे वात्सल्य देण्यात, माझे एकटेपण सुसह्य होण्यास, माझे लाडकोड करण्यात आणि मुख्य म्हणजे मी सतासमुद्रापलीकडचा असूनही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतः निर्धास्त राहिल्या. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. तर पुढच्या जन्मी कदाचित मी त्यांचा पुत्र बनून त्यांचे ऋण फेडू शकेन. शेवटी नश्वर देह हा कधीतरी नष्ट होणारच आहे. पण त्यांचा पुनर्जन्मावर फार विश्वास होता. हिंदू तत्त्वज्ञाना प्रमाणे असे जन्मोजन्मीचे अदृश्य धागे अनोळखी माणसांना एकत्र आणतात.
“दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ!
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...”
असे आपले ग.दि. माडगूळकर गीतरामयणात सांगून गेलेत. तसेच आम्ही भेटलो, सात वर्षे एकत्र राहिलो आणि नंतर त्या एकट्याच निघूनही गेल्या दूरच्या प्रवासाला! आज त्या माझ्या शेजारीण म्हणून नाही राहिल्या, पण माझ्या मनांत त्यांचा सदैव वास राहील. पुन्हा पुन्हा त्यांचं नसलेपण मला फार कातरत राहते.
आजही मी ऑडीसमोर उभा राहतो, तेव्हा मी फार भारावून जातो. कारण त्या गाडीला “अम्मा” हा स्पेशल नम्बर प्लेट लावला आहे. आत्तासुद्धा त्या ड्रायव्हरच्या सीटशेजारी सीटवर स्थानापन्न असून माझ्याकडे त्यांच्या निळ्याशार डोळ्यांनी मोठ्या ममतेने पाहत आहेत आणि त्यांच्या ओठांतून ओळखीचे निर्मळ आपुलकीचे हास्य चमकत आहे, जणू त्यांची अन् माझी अगदी पहिली भेट पुन्हा उजळून निघत होती.

Group content visibility: 
Use group defaults

स्वतः च्या आईला एकटं टाकून केलेली रुग्णसेवा काय कामाची? Charity begins at home...आईसाठी मुलांकडं किंचतही वेळ नाही. काय वाटलं असेल त्या माऊलीला...हेच फळ का मम तपाला ? मार्गारेट जरी स्वतःला रमवत होत्या तरी हे शल्य आत कुठेतरी असणार... तरीदेखील शेवटी मुलीसाठी काहीतरी मौल्यवान ठेवावं वाटतं...पुत्राचे सहस्र अपराध माता मानी तयाचा काय खेद....

मार्गारेटला जे मुलीकडून हवं होतं ते तिनं डेव्हिड मध्ये शोधलं. डेव्हिडला जे अम्मा गेल्याचं दुःख होतं ते मार्गारेटनं हलकं केलं.
माणूस जन्मापासून मरेपर्यंत प्रेमाचा आधार शोधतो. तो कोणाकडून मिळतो हे महत्वाचं नसतं.

दोन गुणवान सम स्वभावाची अनोळखी माणसं एकत्र आल्यावर छान रमतात...देव,देश,धर्माच्या सीमारेषा पुसट होत जातात.

लिखाण अगदी मनस्वी झालेय...