आमचे शिनिमाचे गाव - 2

Submitted by shabdamitra on 22 October, 2021 - 01:47

माझ्या आवाजाच्या गावात अजून एक आवाज आहे.

तो माझ्या गावाचा खरा 'आतला' आवाज. या आवाजाची सुरुवात, हलगीच्या किंवा बॅंडच्या आवाजाच्या साथीने 'शिनिमा'च्या जाहिरातीच्या ढकलगाडीपासून होऊ लागते. इतर कुठल्याही कागदांकडे ढुंकुनही न पाहणारे आमच्या गावातले लोक सिनेमाची जाहिरात मात्र, मन लावून वाचतच नसत तर वाचून झाल्यावर जणू नोटच आहे अशी घडी घालून किंवा मुदतठेवीची पावती आहे इतकी काळजीपूर्वक जपून ठेवत!

आमच्या गावात ज्या कुणाकडे घड्याळे होती ती घड्याळे फक्त सिनेमाच्या वेळाच दाखवत. त्या त्या खेळाची वेळ झाली की लोकांची पावले शिनिमाच्या थेटराकडे वळू लागतात. नदीच्या गावातील सर्व रस्ते जसे उताराने नदीकडे नेतात तसे आमच्या गावाचे सर्व रस्ते सिनेमाच्या थिएटरकडे जातात. रस्त्यांच्या बाबतीत रोमनंतर, आमच्या गावातील सिनेमा टॅाकीजचाच असा उल्लेख होतो!

गाव उणेपुरे तीन लाखाचे असेल नसेल पण सिनेमाची टॅाकीज मात्र पंधरा सोळा. त्यातली सात आठ तर एका चौका भोवती वसलेली! त्यातलीही चार एकाच प्रांगणात! आणि त्या चारातील दोन तर एकावर एक अशी उभी! सिने व्यवसायाच्या जगातला चमत्कार वाटावा अशी ही टॅाकीज, सिनेमा थेटरे आमच्या गावचे भूषणच नव्हे तर अभिमान आहे!

आमच्या गावचा सिनेमाचा प्रेक्षक, गावाप्रमाणेच, सामान्य माणूस होता. त्यात गिरणीतले व इतर कामगार, हमाली, कष्टाची कामे करणारे, कारकुन मंडळी, शाळेपासून कॅालेजपर्यंतचे विद्यार्थी आणि इतरेजनही असत. तिकीटाच्या खिडकीपाशी गर्दी ही रोजच असे. तिच्या रांगेत हमरीतुमरीही रोजच व्हायची. पण घामेघुम होऊन हातातले तिकीट नाचवत कुणी आला की रांगेतल्या इतरांनाही त्या माणसाला तिकीट मिळाल्याचा आनंद होत असे. थेटरात लोक आले की सगळे फक्त सिनेरसिक होत. सिनेमा थिएटरमध्ये कोणी अनोळखी नसे! एकदम सगळेजण दोस्त होत.

अगदी सुमार सिनेमाचेही पहिल्या दोन आठवड्यात तिकीट मिळवणे आमच्या गावात येरा गबाळ्याचे काम नसे.तिकीटाला रांग लागायची. त्यासाठी प्रभातच्या तिकीटाच्या खिडकीकडे चक्रव्युहात जावे तशा भिंतींमधून जावे लागे.गाजणारा सिनेमा असला तर पाच सहा आठवडे ह्या चक्रव्युहातून जावे लागे. त्यातही भिंतीवर चढून रांगेत उड्या मारून घुसणारी दणकट कंपनी असेच. आमच्या सारख्यांना दोन तीन वेळेला तरी खिडकी जवळ पोहचे पर्यंत खिडकी बंद झाल्याचेच पाहावे लागे. एक दोन वेळा मी आणि माझ्या दोस्तांनी भिंतीवरून उड्या मारून घुसण्याचा प्रयत्न केला. पण रांगेतल्या लोकांनी व्हॅालीबॅाल सारखे उडवून बाहेर फेकले. बरं झाले बाहेर रांगेतल्या लोकांवर पडलो!

चित्रमंदिरच्या चारी थिएटरच्या रांगा उघड्यावरच लागत. तिथे भिंतीचा अडथळा नसे. पण थिएटरची माणसे मध्येच घुसणाऱ्यांना दणका देऊन हुसकावून लावत.मागे रांगेत पाठवत. पण एक बरे होते. तिथेच चार थेटरे असल्यामुळे हा नाही तर तो सिनेमा पाह्यला मिळायचाच.चार थेटराच्या आवारात जाऊन तिकिट मिळाले नाही म्हणून सांगत आला तर तो रडतराऊ आमच्या गावात राहण्याच्या लायकीचा नाही असेच मानले जायचे!

तिकीट मिळाल्याचा आनंद हातातली तिकीटे नाचवत दोस्तांना आरोळ्या देत साजरा होई. पण लगेच थेटरात मागच्या रांगेत जागा मिळावी म्हणून दरवाज्यापाशी रांगेत उभे राहाण्यासाठीही पळावे लागे!

आषाढी वारीत पांडुरंगाचे दर्शन मिळणे जितके अवघड त्यापेक्षाही आमच्या थिएटरच्या आत जाणे हे दुरापास्त होत असे. दोन्ही बाजूनी सरकणाऱ्या लोखंडी दरवाजात लोखंडी सळीचा आकडा अडकवून इतकी थोडी फट ठेवली जाई की कितीही धक्काबुक्की केली तरी त्या फटीतून अर्धा माणूसच जाऊ शकत असे. झुंबड उडायची. सगळेजण त्या फाटकाला धडका मारून एकमेकाला बाजूला ढकलत आत जाण्याची शर्थ करीत. आणि जे विजेते आत जात ते आपल्या सोबत्यांसाठी खुर्च्या धरून ठेवत. ह्यालाच आमच्या शिनिमाच्या गावात रिझर्व्हेशन,ॲडव्हान्स बुकींग म्हणत. थोडा वेळ गुरगुर,कुरबुर व्हायची. सगळे लोक आपापल्या जागेवर बसतांना थेटरात मोठा कोलाहल चालू असे. “अबे ही रांग बे” ‘तिकडे कुठे कडमडातो बे? तुझ्या समोर तर हाहे मी!” “ ती बिडी नंतर पेटवा की मिश्टर! पुढं जाऊ दे आम्हाला.” “ ओ शिग्रेटवाले सायेब पाय खाली घ्या ना! सिनेमा चालू नाही तर हे पाय ताणून बसले साहेबराव!” “ ये तुझ्या... कुणाला म्हंतो बे तू? आं? दाताड फोडीन ; जा पुढं जा गप.” “ ए कानिट्या तू आला का आत? मग इकडं इकडं ये, हां! आणिआपला बाग्या कुठाय? “ “तो अजून रेटारेटीतच आहे ! येईल, कुणाच्याही दोन पायातून घुसून येईल!”व्हय बे त्या दीड फुट बांबूला काय ! तो रांगतही येईल! “अरे पट्या नाही दिसत?” “तो दुसऱ्या सिनेमाला गेलाय! असे संवाद मोठ्या आवाजात चालू असत.

थिएटर भरते न भरते तोच अंधार होऊन ‘मुन्शी बिडी,लिप्टन टी, 501 साबण, चपटी बिडी पन्नालालची ह्या किरकोळ आणि डालडाची जणू सिनेमा चालू झालाय वाटावी अशी आजच्यासारखी व्हिडीओ जाहिरात चालू व्हायची. अंधार फिकट झाला तरी येणाऱे आपल्या माणसाला खणखणीत हाक मारून कुठे बसला वगैरे विचारत येत. कधी डोअर कीपर आपल्या मोठ्या बॅटरीचे झोत फिरवत कुठे जागा असेल ती दाखवत. पण डोअरकीपर आणि त्यांच्या मोठ्या बॅटऱ्या प्रेक्षकांपेक्षा त्यांच्याच मदतीला येत. त्याचाही अनुभव सिनेमाच्या पहिल्या काही ‘हाऊसफुल्ल आठवड्यांत’ चार आणेवाल्या बाकावरच्या आणि मधले हात नसलेल्या आम्हा पाच आणे खुर्चीवाल्यांनाही येई. “सरक, हां बसा, सरका, सरका, हां बसा, सरक की बे! पार्कात भेळ खायला बसल्यासारखं बसलेत बहाद्दर! अजून चारजण बसतील की.” “सरका सरका, बसा इथं बसा” असे बॅटऱ्या घुसवुन घुसवुन इंच इंच जागा शोधून प्रेक्षकांना कोंबून बसवत ! त्यामुळे ‘गर्दी म्हणजे? “बॅटऱ्या घुसवून घुसवुन” बशिवले बे आम्हाला!” प्रत्येकाच्या मांडीवर दोघं दोघं बशिवले!”हा संवाद हाच सिनेमा पहिल्या तीन चार आठवड्यात पाहून परत पुन्हा पाहणारे आमच्या गावातील हाडाचे सिनेरसिक ऐकवत.

पुन्हा पुन्हा पाहणाऱ्यांचा उल्लेख केल्यावरून आठवले. गावची परंपराच अशी की सहसा कुणी सिनेमा एकदा पाहात नसे. सरासरी काढली तर लोक एकच सिनेमा किमान दोन तीन वेळा पाहात असत. त्याही पुढे तो किती वेळा पाहावा हे ज्याची त्याची सिनेमाची आवडती नायिका,(आणि हे सर्वात महत्वाचे कारण),मग नायक, संगीतकार, गाणी ह्यावर अवलंबून असे. गावातल्या सर्व लोकांचा तो सिनेमा चार पाच वेळा पाहून झाल्याशिवाय थिएटरच्या मालकाला तो सिनेमा बदलता येत नसे! ह्या दराऱ्यालाच गावात ‘लोकसत्ता,लोकराज्य, लोकशक्ति ‘ म्हटले जात असे.

शाळा-कॅालेजात सिनेमा हा फक्त वर्गमित्रांचाच विषय नसे. तो सगळ्या वर्गाचाच असे- संवाद ऐकला की सिनेमाहात्म्य कळून येईल.’नागिन’ कुणी किती वेळा पाहिला ह्याची गंभीर चर्चा चालली असता आमचा एरिच मात्र अस्वस्थ होता. त्याला विचारल्यावर तो म्हणाला,” नागिन गेला का रे?” “ हो २७आठवडे चालू होता. गेला की.” “का तू किती वेळा पाहिला?” (लक्षात घ्या आमच्या शिनिमाच्या गावात कुणीही कुणाला “हा सिनेमा पाहिला का” असे विचारत नसत. कुणी विचारलेच तर त्यांच्यात पिढीजात वैर उत्पन्न होई. कुणाचा चार चौघात अपमान, पाणउतारा करायचा असेल तरच ‘पाहिला का?’असला प्रश्न विचारला जाई.) एरिच सहज म्हणाला,” फक्त चौदा वेळाच पाहिला रे!” हे सांगतानाही त्याचा चेहरा पार उतरला होता !

तिकीटे काढून आत शिरल्यावर थेटरात कोणीही लगेच बाकांवर किंवा पाच आणेवाले खुर्च्यांवर बसत नसत. माचिस पेटवून ती बाकांच्या, खुर्यांच्या बुडाखालून फिरवत. ढेकणं पटापट मरून खाली पडत. बरेच वेळा खुर्च्याच्या फळ्या खालीवर आपटत. सगळ्या थेटरात गोळीबारापेक्षाही ‘फटफट फटाक्’जोरदार आवाज घुमत असे. सिनेमाचे रोज कमीतकमी तीन खेळ असायचे. आणि अशी खुर्च्यांची आदळ आपट रोज चालत असे.त्यावर उपाय म्हणून मालकाने रांगेतल्या खुर्च्यांच्या तळाशी एक लांबलचक लाकडी फळी बसवली. आता आपटा तुमची खुर्ची! कुणाला आपली खुर्ची उघड झाप करत आपटता येईना ! बरे कोणी सिनेमा पाहताना पाठीमागे रेलू लागला तर इतरांच्या खुर्च्याही मिटू लागत! लगेच दुसरे “ओ आप्पा नीट बसा की!” ची ओरड सुरू करीत. तीन चार तरूण तर सिनेमा चालू असतांना मधेच एकदम बसल्या बसल्या आपल्या खुर्च्या मुद्दाम पाय ताणून मिटवत. त्यामुळे रांगेतील सगळ्या खुर्च्या मिटायला लागत. ‘अरे अरे अबे अबे ’ म्हणत लोक सावरू लागले की हे सगळे हसत!

सिनेमा थेटरमध्ये बिडी सिगरेट पिणे,हिरोच्या किंवा व्हिलनच्या स्टाईलीत धूर सोडणे, पान-तंबाखू खाणे हे सर्वमान्य होते. त्यामुळे डबडा थेटरमध्येच नव्हे इतर थेटरातही धूर भरलेला असे. बहुतेक प्रेक्षक आपले सदरे मागे लोंबत ठेवत नसत. पायजम्याच्या, विजारीचे पायही वर गुंडाळलेले असत! एखादा सभ्य व सुसंस्कृत प्रेक्षक तुमच्या खांद्याला हळूच हात लावून, तोंडाच्या चंबूवर दोन बोटे ठेवून, खुणावून पाय वर घ्यायला सांगे. त्यानंतर वाकून तुमच्या खुर्चीखाली एक पावरफुल पिचकारी मारायचा!

‘पिक्चर’ सुरु होणार हे शेवटच्या ‘शांतता पाळा’ ही ॲापरेटरने तयार केलेली पिवळ्या अक्षरातली स्लाईड झळकली आणि मुद्दाम चालू ठेवलेले दोन दिवे मालवले गेले की समजायचे सिनेमा सुरु होणार. पण मुख्य ‘पिच्चर’ सुरु होण्याआधी१५ मिनिटांची News Review असे. ती संपेपर्यंत काही प्रेक्षक येतच असत. मग ते आमच्या गुडघ्यांना घासत किंवा खुर्च्यांच्या पाठीवरून हात सरकवत जायचे. पण त्यांना नीट जाऊ दिले तर आमचे सिनेमाचे गाव कसले! “ अरे पाय वर घ्या सायेब आलेत!” “ ए मम्हद्या! घाल तंगडी आडवी त्याला. मग येंईल उद्या वेळेला.” पण हे लेट लतीफही त्याच गावचे. “ का बे, मला तू दिसत नाही वाटलाव का आं? इन्ट्रोल मधी बघतो तुला !” असे धमकावत सरकायचे पुढे.

नीट बसा! आता ‘पिच्चर’ चालू होणार!

You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users