हात जोडावी अशी दिसतात कोठे माणसे?
मुखवट्यांच्या आडची कळतात कोठे माणसे?
घेउनी मी शोध थकलो, उलगडा ना जाहला
माणसे ज्यांना म्हणू, वसतात कोठे माणसे?
यंत्रवत जगतात सारे, हरवला संवादही
हास्यक्लब व्यतिरिक्त का हसतात कोठे माणसे?
काय असते चांगले हे सांगती सारेच पण
अंतरी डोकावण्या धजतात कोठे माणसे?
गंध घ्यावा ना फुलांचा ! ईश्वराने जो दिला
वाट, उमलाया कळी, बघतात कोठे माणसे?
नववधू शेजारची जी जाळली, आक्रोशली
काय घडले जाणण्या निघतात कोठे माणसे?
स्वार्थ साधायासही अक्कल जराशी लागते
शाश्वताला सोडुनी पळतात कोठे माणसे?
"दे हरी बाजेवरी"ही आस का धरता मनी?
सोसल्याविन घाव का घडतात कोठे माणसे?
का असा "निशिकांत" पळशी मृगजळामागे उगा?
या जगी बावनकशी नसतात कोठे माणसे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवप्रिया
लगावली--(गालगागा) X३ + गालगा