आभाळाच्या फळ्यावर

Submitted by अनन्त्_यात्री on 20 October, 2021 - 06:31

धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर

चांदण्यांच्या ठिपक्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी

रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती नवी वाट

झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी

भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची

लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल

Group content visibility: 
Use group defaults

भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची

खूप सुंदर...
चांदण्यांच्या ठिणग्यांची ऐवजी चांदण्यांच्या ठिपक्यांची कसे वाटेल...
चांदणं रेशमी म‌ऊमु‌‌लायम, रोमॅंटिक त्यात ठिणगी...

प्रतिसाद देणार्‍या सर्व कवितारसिकांना धन्यवाद!

दत्तात्रयजी, आपल्या समर्पक सूचनेनुसार बदल केलाय. धन्यवाद

Happy
नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची
आठवलं...