सुरुवात होत आहे

Submitted by निशिकांत on 17 October, 2021 - 10:21

ओली कपार हृदयी विरहात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे

माझे, तुझे न कांही, सारे असून अपुले
आता हिशोब कसला प्रेमात होत आहे

झालो वयस्क, व्हिस्की देते मला इशारा
बेहोष फक्त एका ग्लासात होत आहे

लाऊन चेहर्‍यांना बनतात सभ्य, बघुनी
मी लपविण्यात मजला निष्णात होत आहे

कामांध ग्राहकांना नाचून रिझवताना
रडताच बाळ हृदयी, आघात होत आहे

वाचून दिग्गजांच्या गझला, कुठे अताशा
माझी गझल जराशी वृत्तात होत आहे

दाऊन वाकुल्या मी सार्‍या जगास जगलो
का दु:ख शेवटीच्या सत्रात होत आहे?

चर्चा जिथे घडावी, त्या संसदेत हल्ली
मुद्दा रुपांतरित का गुद्द्यात होत आहे

"निशिकांत"कलियुगी का घडते विचित्र सारे?
स्वपनात जे न व्हावे, सत्त्यात होत आहे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--आनंदकंद
लगावली--गागाल गाल गागा X २

Group content visibility: 
Public - accessible to all site users