माझ्या आजोळी माझी मावशी रोज नियमितपणे सकाळी सडा घालून रांगोळ्या घालत असे, अजूनही घालते. निमिषार्धात ती उकिडवं बसून अगदी सहज सोप्पं काहीतरी रेखाटून जाते. कधी पानं फुलं, कधी अशीच कुठं बघितलेली नक्षी आणि त्यालाच साजेशी उंबरठ्यावर रांगोळी. त्या रांगोळीत मग रंग भरायचं काम माझ्याकडे असायचं. ती चटकन रेखाटून जायची आणि मी पुढं तासनतास रंगकाम करत बसायचे. तिची रांगोळी आणि माझे रंग हा आमच्यातला एक अनोखा दुवा. आज अनेक वर्षांनंतरही माझ्या साखरझोपेत हे स्वप्नं असतं.
लहानपणीचे सुखाचे दिवस, गावाकडली सकाळ, सडा घातल्यावर येणारा मातीचा वास, घरोघरी पेटलेल्या बंबांचा वास, बागेत परडी हातात घेऊन पूजेसाठी फुलं खुडणारी आज्जी आणि अंगणात उतरलेली कोवळी उन्हं अंगावर घेत उकीडवं बसून रांगोळीत रंग भरणारी मी, निर्व्याज सुखाचे दिवस.
माझ्या मावशीने आता सत्तरी ओलांडलीये तरी तिच्या या नित्यक्रमात खंड नाही. रोज सकाळी अंगणात काहीतरी उमटतंच. शुभ्र पांढरी रांगोळी आणि त्यावर हळद कुंकू पडतं. हा नियम किती वर्षं चालू आहे ते मावशीच जाणे. पण तिची ही उर्मी बघून मला स्तिमित व्हायला होतं.
मामाच्या बंगल्याच्या आत काढलेली ही रांगोळी जाता येता कुणी बघेल असंही नाही, ना कुणी कधी तिचे फोटो काढून कुठं अपलोड बिपलोड केले. पण निरपेक्ष भावनेने वर्षानुवर्ष हे तिचं करत राहणं मला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. कुणाला दाखवायचा अट्टाहास नाही, काही सिध्द बिध्द करण्याचा सोस नाही, केवळ एक नित्यक्रम एवढंच! रानात उगवलेल्या एखाद्या गवतफुलासारखं.... वसंतातल्या कोवळ्या उन्हात एखादं हसरं गवतफुल बघणं किती सुखावह असतं. पण त्या फुलाला कुणी आपल्याकडे बघावं ही आस नाही. कुणासाठी म्हणून ते उमललेलं नाही. ते आपलं आपल्याच मस्तीत उमललंय. ज्यांनी बघितलं ते सुखावतील नाही बघितलं तो त्यांचा तोटा. फूल आपल्याच आनंदात डोलतंय. तशी मावशीची रांगोळी. रोज सकाळी अंगणात उमलते. माझ्याकडे बघा हा आग्रह नाही. मात्र जे बघतील ते सुखावतील हे नक्की.
निरपेक्ष भावनेने करत राहणं हा माझ्या मावशीचा स्थायी भावच आहे. गेली साठेक वर्षं तरी नक्कीच तिचा हा रांगोळीचा नेम चालू आहे. पण अंगणातली रांगोळी हा तिच्या व्यक्तीमत्त्वातला एक नखभर भाग झाला. तिचं सगळंच करणं कुसरीचं, नेटकं, निगुतीचं. तिच्या हातचा स्वयंपाक तर उत्तम असतोच पण तिच्या ठायी असलेल्या असंख्य कला मला थक्क करून जातात. भरतकाम, विणकाम, शिवणकाम हेही रांगोळीइतकंच नेहमीचं! तिनं शिवलेले फ्रॉक आणि परकरपोलके घालून मी मोठी झालीये. पण सत्तरी ओलांडल्यावरही शिवणाचं मशिन अजून थांबलं नाही. माझ्या लेकींसाठीही ते मशिन फिरतं आणि त्यांच्यासाठीही मावशी परकर पोलके शिवते. तिनं केलेली glass paintings, fabric paintings, तिनं केलेली भेटकार्ड या कलाकुसरीला सीमा नाही. हे सगळंच आजवर ती स्वांतसुखाय करत आलीये. ती करुन मोकळी होते. पण तिचा हाच सहजपणा मला मात्र खूप काही शिकवून जातो.
तिच्या रांगोळ्यांचा ठेवा कुठतरी संग्रही असावा म्हणून काही फोटो काढून ठेवलेत ते इथं शेअर करतेय. साध्या – सोप्या असल्या तरी त्यातला साधेपणाच तुम्हाला स्पर्षून जाईल याची मला खात्री आहे.
मस्त रांगोळ्या आणि त्याहून
मस्त रांगोळ्या आणि त्याहून सुंदर मावशींच व्यक्तिमत्व. लिहिलं ही छानच आहे.
फार सुंदर लिहीले आहे.
फार सुंदर लिहीले आहे. रांगोळ्या सुरेख.
छान..
छान..
रांगोळी आणि हस्ताक्षर दोन्ही
रांगोळी आणि हस्ताक्षर दोन्ही सुरेख.
छान लिहिलंयस.
किती सुबक कलाकृती आहेत! आणि
किती सुबक कलाकृती आहेत! आणि अक्षरे तर खूप सुंदर
किती सुंदर आहेत रांगोळ्या ...
किती सुंदर आहेत रांगोळ्या .... बरे झाले रंग नाही भरले....
सुंदर रांगोळी , रेष सुद्धा
सुंदर रांगोळी , रेष सुद्धा किती बारीक आणि रेखीव आहे . हस्ताक्षर सुद्धा मस्त !! हल्ली इतके सुंदर हस्ताक्षर बघायला मिळत नाही . नक्कीच कलाकाराचे हात आहेत तुमच्या मावशीचे !!!
सुंदर लेख आणि रांगोळ्या
सुंदर लेख आणि रांगोळ्या
सुरेख रांगोळ्या आणि मावशीचे
सुरेख रांगोळ्या आणि मावशीचे व्यक्तीचित्र ही छान रेखाटले आहे. अशी माणसं विरळीच.
सुंदर रांगोळ्या आणि लेखही छान
सुंदर रांगोळ्या आणि लेखही छान..!!
किती सुंदर सुबक आहेत या
किती सुंदर सुबक आहेत या रांगोळ्या... रांगोळीची रेघ अगदी बारीक छान उमटलीये सगळीकडे.
खूप आभार सगळ्यांचेच...
खूप आभार सगळ्यांचेच... मावशीच्या वतीनेही!
छानच!
छानच!
खुप छान लेख आणि सुंदर
खुप छान लेख आणि सुंदर रांगोळ्या. कधी कधी अशा साध्याशा रांगोळ्या भरगच्च डिझाइन्स आणि भरभरून रंग यापेक्षा जास्त सुंदर वाटतात.
लेख वाचुनच मावशी अतिशय आवडल्या.
देखणे ते हात ज्यांना
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे सोहळे
____/\____
लेख वाचुनच मावशी अतिशय आवडल्या. >>>> +९९९९
सुंदर रेखीव रांगोळ्या आहेत
सुंदर रेखीव रांगोळ्या आहेत अगदी, लेखही छान.
तुझं लिखाण आणि रांगोळ्या
तुझं लिखाण आणि रांगोळ्या यातून मावशीचा चेहरा दिसला, तुला किती पोटतिडकीनं मावशीविषयी अजून सांगायचं आहे असं वाटलं. रांगोळ्या तर खूपच भावल्या!
प्रजासत्ताक, जाणता राजा,
प्रजासत्ताक, जाणता राजा, श्रीराम, हीरक महोत्सव, नूतन वर्षाभिनंदन. कल्पक रांगोळी विषय. मावशीचे उत्साही व्यक्तीमत्व सुंदर लिहिले आहे. आजोळ गावाचे नाव कळूद्यावे.
छान
छान
छान
छान
मस्त रांगोळ्या आणि
मस्त रांगोळ्या आणि व्यक्तिमत्व.
लिखाण आवडले
खूप छान.
खूप छान.
किती सुरेख, रेखीव, सुबक
किती सुरेख, रेखीव, सुबक रांगोळ्या
हस्ताक्षर तेही रांगोळीने किती घडिव
पुन्हा कसले अवडंबर नाही; उगाच नक्षीकाम नाही
मुद्दाहून काही दाखवतेय हा भाव नाही
निखळ व्यक्त होणं
____/|\____
मावशींचं व्यक्तित्व अगदी व्यक्त होतय सगळ्यातून
तुमचं लेखनही मावशींचाच वसा चालवणारं
तुम्हालाही ___/|\___
पूर्ण लेखभर एक साधेपणा, नितळपणा आहे
पहाटेचा अनुभव तर वाचताना वाचणाराही अनुभवेल इतका खरा उतरलाय
खूप धन्यवाद आणि मावशींना नमस्कार तुम्हाला शुभेच्छा!
किती सुंदर रांगोळ्या आणि
किती सुंदर रांगोळ्या आणि लिखाणही