बहुरूपी

Submitted by अनन्त्_यात्री on 11 October, 2021 - 01:27

बोबडी अंगाईकविता
कोवळीशी बालकविता
अस्फुटाची मुग्धकविता
हुरहुरीची प्रेमकविता
मायपाखर स्निग्धकविता
सातमजली हास्यकविता
नवरसांच्या विभ्रमांनी
विनटलेली भावकविता
विफलतेची दग्धकविता
शृंखलांना तोडणारी
अग्निगर्भी क्रांतिकविता
गृहितकांना छेदणारी
इंद्रजाली गूढकविता

पैलतीरावरून रात्री
अथक हाका मारणारी,
क्लांत जीवी श्रांत गात्री
प्राणफुंकर घालणारी,
सर्वव्यापी,सर्वसाक्षी
शब्दविरहित.....
....आदिकविता

Group content visibility: 
Use group defaults