फेसबूक, व्हॉट्सप, मायबोली आणि सारेच सोशलमिडीया बंद झाले तर.. काय कराल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2021 - 18:02

काल संध्याकाळपासून व्हॉटसप सर्वर डाऊन आहे. गूगल केले तर समजतेय बहुधा ग्लोबली सर्वर डाऊन आहे. तुमच्याकडे आहे की नाही कल्पना नाही. पण काल संध्याकाळी टीव्हीवर आयपीएलची मॅच बघता बघता मोबाईलवर व्हॉटसप ग्रूपमधील मित्रांशी क्रिकेटची चर्चा करत असताना अचानक माझे मेसेज जायचे बंद झाले. लोकांचे यायचे बंद झाले. मला वाटले आपला इंटरनेट इश्यू असावा. नेट बंद केला. चालू केला. मोबाईल रिस्टार्ट केला. प्रॉब्लेम जैसे थे च!

धोनी विरुद्ध पंत! मस्त मॅच चालू होती. चेन्नई अडचणीत होती. धोनीने काही विशेष केले नव्हते. पंतचा चाहता म्हणून धोनीभक्तांची मस्त खेचत होतो. आणि अचानक रुकावट के लिये खेद है. मॅच चालूच होती. पण चर्चा थांबली होती. मॅच बघण्यातली मजा झटक्यात १० टक्क्यांवर आली होती. कोणाशी चर्चाच करायची नसेल तर एकटे क्रिकेट बघणे किती बोअरींग असते याचा अनुभव घेत होतो.

लहानपणी असे नव्हते. क्रिकेटची मॅच म्हटले तर आमच्या घरातच स्टेडीयम भरायचे. सर्वांकडे टिव्ही होता. पण आमच्या घरचे वातावरण 'आओ जाओ घर तुम्हारा' असल्याने सर्व पोरं मॅच आपापल्या घरी न बघता आमच्या घरी जमायचे. स्पेशली शेवटच्या काही षटकांत एकत्र मॅच बघून माहौल करण्यात वेगळीच मजा असायची. क्रिकेट बघण्याच्या बालपणीच्या सर्वच आठवणी चाळीतल्या मित्रांसोबतच जोडल्या गेलेल्या आहेत.

आता काळ बदलला. चाळसंस्कृती मागे सरली. फ्लॅटसंस्कृती आली. नाही म्हणायला माझी पोरं सतत बाहेरच पडीक असतात. मी सुद्धा त्यांना फ्लॅटच्या चार भिंतीत अडवत नाही. पण माझा स्वभाव पाहता मी मात्र माझ्या पर्सनल टाईमला घरातच टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप घेऊन ऑनलाईन कट्ट्यावरच खुश असतो. आज व्हॉटसप सर्वर डाऊन होताच तो कट्टाच उखडल्याच्या वेदना झाल्या. आणि बस्स या निमित्ताने मनात विचार आला.....

जर व्हॉटसप फेसबूकच नाही तर ट्विटर मेसेंजर मेल मेसेज झूम मिटींग्ज अगदी आपले मायबोली सुद्धा अचानक ठप्प झाले तर... सोशल मिडीया नावाचा प्रकार नाहीसाच होत पुन्हा नव्वदीच्या दशकासारखी स्थिती झाली तर..

अर्थात तेव्हा आपण त्यात खुशच होतो. जास्तच खुश होतो. हे कबूल. पण आता आपल्या भोवतालचे सारे जग, आपले वैयक्तिक विश्व, आपला मित्रपरीवार, नातेवाईक, ओळखीचे पाळखीचे वा अनोळखीसुद्धा, सारे या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालेले आहेत. आपण रोज काय खातो पितो, कुठे जातो, काय करतो हे रोजच्या रोज कोणाकोणाला सांगत असू, काही ठराविक लोकांशी फोटो शेअर करत असू, आपले वर्तमानच नाही तर भूतकाळातील अनुभवही शेअर करत असू, कित्येक जणांशी फ्रीक्वेंटली गप्पा मारत असू, क्रिकेट-चित्रपट-राजकारण-मालिका-पाककृती अश्या कैक विषयांवर चर्चा करत असू, व्हॉटसप स्टेटस ठेवत असू, लोकांचे बघत असू.. हे सारेच बंद होईल. मग आपले आयुष्य कसे होईल?

आपण आपल्या वैयक्तिक छंदांना जास्त वेळ देऊ. हे बोलायला ऐकायला छान आहे. पण आज कित्येक वैयक्तिक छंदही आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोपासले आहेत, वा आपल्यासारखीच आवड असणारे मित्र जोडले आहेत. त्यांचा सहजसंपर्कही यात तुटून जाईल.

जसे मी स्वतःपुरता हा विचार केला तेव्हा जाणवले की आधीच मी प्रत्यक्ष आयुष्यात जराही सोशल नाही. त्यामुळे कुटुंबाला द्यायला माझ्याकडे प्रचंड वेळ असतो. पण तो देऊन जो शिल्लक वेळ ऊरतो तो सोशल मिडीयावरच घालवतो. कुटुंबासोबत वा स्वतःच्या ईतर छंदांवर घालवलेल्या वेळात जे किस्से घडतात, अनुभव मिळतात ते ईथेच शेअर करतो. कारण सोशल मिडीयाला कितीही आभासी जग म्हटले तरी आपण एखाद्या रोबोटशी नाही तर माणसांशीच बोलतोय, व्यक्तीशीच विचारांची देवाणघेवाण करतोय हे आपल्याला ठाऊक असते. त्यामुळे या माध्यमातूनही आपल्याला गरजेचा असा भावनिक मानवी टच हा मिळतोच. तो अचानक नाहीसा होणे परवडेल तुम्हाला?

जर झालाच सर्व सोशलमिडीयाचा सर्वर यकायक डाऊन तर वेळ घालवायला काय कराल तुम्ही? तुमच्या भावनिक गरजा कश्या पुर्ण होतील? कसे बदलेल तुमचे आयुष्य? एकूणच जग कसे अ‍ॅडजस्ट करेल या बदलाला? किती काळ लागेल यातून निर्माण होणार्‍या नवीन जीवनपद्धतीशी जुळवून घ्यायला? म्हातारपणाच्या प्लानिंगमध्ये कोणी सोबत असो वा नसो, मोबाईल विथ हायस्पीड वायफाय कनेक्शनने जग आपल्याशी जोडले गेलेले असेल असा विचार आपण आता करत असू. तर अचानक तो विचार अश्या पद्धतीने बोंबलल्यास आपण कसा तो धक्का सहन करू?

छे! असे रात्रीचे तीन चार वाजेपर्यंत कॉफीचा एकेक घोट घेत, आणि भेळीचा एकेक बकाणा भरत मायबोलीवर धागे काढायचे जे सुख आहे ते कायमचे नाहीसे होण्याचे अभद्र विचार कल्पनेतही नकोसे वाटतात.. मला तरी नाही जमणार.. तुम्ही बघा विचार करून

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या कशात आनंद शोधेन!
सोमि न्हवतं तेव्हाही आनंदात होतो, सोमि असताना ही आनंद आहेच. ते परत गेलं तर दुसरं काहीतरी सापडेलच.
हे असं काळं आणि पांढरं... हे असलं तर किंवा ते नसलं तर फक्त शाळेच्या निबंधांपुरतं ठीक आहे. प्रत्यक्ष आयुष्यात माणूस आहे त्या परिस्थितीत जुळवुन घेतोच. रुळ बदलताना थोडा खडखडाट होईल, पण तो खडखडाट पण नंतर चेरिश करेन.
आजी फारपुर्वी कसं धान्य मिळायचं नाही, आणि रेशनवर कुठला लाल का काळा गहू मिळायचा अशा गोष्टी सांगत असे. बाबा आणि कुठल्या गोष्टी सांगतात. आपण करोना होता तेव्हा.... असल्या काही कथा सांगू. आणि कुठली पिढी फेसबुक गायब झाल्यावर.. अशा कथा सांगेल. इतिहासात नोंद करायला एक गोष्ट मिळेल. बाकी मागील पानावरुन पुढे चालू!

आम्ही ह्या शिवाय मेजर लाइफ जगलो आहोत व ते मजेत गेले. आताही इन्स्टा नाहीच. फेसबुक कामापुरते. दोन सपोर्ट ग्रूप आहेत. व्हॉट्सेप पण कामा पुरतेच . खरी मजा तर ट्विटर वर असते. व आमची मोबाइल गेम मर्ज ड्रॅगन्स. सो लाइफ गोज ऑन.

अमितव +1

अजूनही कोण सिग्नल ऍप वापरतंय ते काल समजलं Happy
मग काही जुन्या पण आता ओसाड पडलेल्या सिग्नल गृप वर आम्ही थोडी टिंगल टवाळी केली.

20211004_222206.jpg

आयुष्यात आपल्याकडे ठराविक प्रमाणातच वेळ असतो, हे एकदा कळले की सोशल मीडियावर वाया जाणारा वेळ आपोआप कमी होतो. फरक इतकाच की काहींना ते लवकर लक्षात येते आणि काहींना उशीरा. विशेषतः पुरेसा पैसा मिळाला की वेळ महत्त्वाचा आहे, ते उमजून येते आणि विचार येतो, What would you do if you didn't need the money nor the attention?

आयुष्यात माणूस आहे त्या परिस्थितीत जुळवुन घेतोच. रुळ बदलताना थोडा खडखडाट होईल, पण तो खडखडाट पण नंतर चेरिश करेन......+१.

मायबोली तेवढी नक्की मिस करेन.कदाचित त्याचीही सवय होईल.

मी काय करेन ते नंतर लिहिते विचार करून पण माझी बहिण आणि तिचा ग्रुप हे सगळं बंद पडलं म्हणून गूगल पे वर ग्रुप बनवून गप्पा मारत होत्या हे बघून मी डोक्याला हात लावला.

काही विशेष फरक पडणार नाही.
कार बदलली आणि मग इंडीकेटर्स द्यायचा रॉड डावी कडचा उजवीकडे आला की सवयीने इंडिकेटर ऐवजी वायपर सुरू होतो, लक्षात येते, मग इंडिकेटर बरोबर देतो, पण नंतर पुन्हा तीच चूक होते, असे काही दिवस चालते. मग शेवटी पूर्ण सवय होते.
तसे काहीसे होईल, सोमी वरून रिअल लाईफ पर्यायांकडे वळताना एवढेच.
म्हणजे चुकून मोबाईलवर WA उघडायला गेलो, लॅपटॉपवर माबो उघडायला गेलो, मग आठवले अरे हे तर बंद असे.
तेव्हा हे बंद आहे हे स्वीकारून दुसरीकडे वळणे.
"अर्रे हे तर बंद, श्या!! मी काय करु आता? का बरं केलं असं?" असे करत बसले तर त्रास होईल.

रिया +१.. इथेही लोक लगेच telegram or ईतर possible app कडे वळले.. सो आयुष्य तसं काही थांबत नाही.. ..
Ohh yes.. मानव.. सो आधीचाच एडिट करते reply.. बंद पडेल असं वाटत नाही कालच्या situation वरून.. एक बंद पडलं की दुसरं option होतंच ओपन काही ना काही.. झालंच बंद in case तर old is gold म्हणत पत्र ओर actual चावड्या परत सुरू... हा का ना का..

पुढच्या दशकात Wink
https://www.livescience.com/solar-storm-internet-apocalypse

आपल्यासारखे रिकामटेकडे लोक काहीतरी उपयुक्त काम करायला लागतील Wink
वाती वळणे, धान्य निवडणे, रामाचे नाव घेणे अशी सध्या करता अनयुजवल कामंही करता येतील..

मजा येईल असे वाटते.

लाईट असतील तर मस्त नाव गाव फळ फुल खेळता येईल.किंवा म्हातारीचे घर.

ओले वाल सोलायची किंवा गवार निवडायची स्पर्धा ठेवता येईल.ठराविक वेळेत कोण नीट शिरा काढलेले,व्यवस्थित लांबीचे गवार सेगमेंट करतो.लोकांना भेंडीत चिरा पाडून मसाला भरायला बसवता येईल.खिडकीचे एक एक तावादान देऊन कोण चांगले स्वच्छ पुसतो बघता येईल.(#दीदीसेहतकेलियेतूतोहानीकारकहै)

<< फेसबूक, व्हॉट्सप, मायबोली आणि सारेच सोशलमिडीया बंद झाले तर.. काय कराल? >>
काहिही फरक पडणार नाही. व्हॉट्सप गरजेसाठी वापरत असून दिखाव्यासाठी वापरत नाही.मायबोली वाचनमात्र.बाकी सोमी वापरतच नाही. त्यामुळे जसं आहे तसंच आयुष्य चालणार आहे.

मी अधून मधून सोशल डिटोक्स म्हणून एक आठवडा ते 15 दिवस असा कालावधी पूर्णपणे सर्व सोशल मिडियामधून बाहेर पडतो
ना व्हाट्सअप्प ना फेसबुक, सगळे अप्प काढूनच टाकतो, मोह व्हायला नको म्हणून
कारण कितीही आवरलं तरी नोटिफिकेशन आल्यावर संयम रहात नाही
त्या कालावधीत फक्त फोन कॉल साठी वापरात असतो
त्यामुळे त्रास होणार नाही, छान वाटलं उलट
पण माझ्या कामाच्या स्वरूपात अनेकदा फेसबुकवर, ट्विटर वर बातम्या मिळतात, त्या बंद होतील एवढीच भीती

मी बहीणीशी बोलायला काल गुगल duo वर टाईमपास मेसेजिंग शोधून काढले Lol . पण सोमी नसले तरी फार काही फरक पडणार नाही आयुष्यात, जुने दिवस जगायला मिळतील आणि तोही एक छान अनुभव असेल माझ्यासाठी. फक्त माबो नसेल तर वाईट वाटेल.

अरे गप्पाच माराय च्या तर सिग्नल टेलिग्राम आहे. ऑल्सो तुम्ही एक जी मेल आयडी पासवर्ड करून त्यात मेसेज लिहून ड्राफ्ट सेव्ह करायचा. तो वाचून दुसरा/ री उत्तर देउ शकते. फक्त सेव्ह करायचा ड्राफ्ट सेंड पण नाही.

मल्टिपल आय्डी रेगुलरली वापरणारे जे असतात त्यांचे मधमाश्यांच्या पोळ्यावरदगड मारल्यावर माश्या इतस्ततः घोंघावतात तश्या त्या आयड्या घोंगावतील व आता मी काय करू काही तरी कामदे ह्या कथेतल्या भुतासारखे काय पोस्टू कुठे पोस्टू करतील भंडावून सोडतील असे व्हिजुअल डोक्यत आले.

मध्यंतरी जैन लोकांचे पर्यु श्ण पर्व चालू होते तेव्हा काही लोकां नी २६ दिवसाचा डिटॉक्स घेतला होता.

<< मध्यंतरी जैन लोकांचे पर्यु श्ण पर्व चालू होते तेव्हा काही लोकां नी २६ दिवसाचा डिटॉक्स घेतला होता. >>

----- पोटाला आराम मिळावा (किंवा नसलेल्या देवाचे आपल्याकडे, आपल्या गर्‍हाण्यांकडे लक्ष जावे ) म्हणून काही लोक मंगळवार, गुरवार, एकादशी, चतुर्थी... असे नाना प्रकारचे उपवासाचे वार धरतात. त्यातही उप प्रकार आहेतच एकवेळा जेवण, कडकडीत उपवास केवळ पाणी / दुध , दोन्ही वेळेला उपवासाचे " मोजके " पदार्थ....

त्याच धर्तीवर मार्च महिन्यात कुठल्या तरी शुक्रवारी National Day of Unplugging पाळतात.... काही लोक विकेंडला no electronics चा कटाक्षाने अंमल करतात. मी माझा सेल फोन आठवड्यातून दोन दिवशी, शनिवार रविवार, झोपण्याअगोदर नेहेमी बंद करतो.

मला वाटते मुळातच सोशल मिडीया आपल्या गरजेपेक्षा जास्त अतिरेक न करता वापरले तर हे मुद्दाम त्यापासून ठरवून दूर जायची गरज भासू नये.

प्रत्यक्ष आयुष्यात माणूस आहे त्या परिस्थितीत जुळवुन घेतोच. रुळ बदलताना थोडा खडखडाट होईल, पण तो खडखडाट पण नंतर चेरिश करेन.>>>+१११ अमितव. बाकी उंच स्टूल धरूनच ठेवलय जणू Wink
हर्पेन Lol अनु मस्त आयडिया.
एकंदरीत एवढा फरक पडणार नाही असंच वाटतंय. फक्त एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली असती काल रात्री तर थोडं पॅनिक वाटलं असतं. पण फोन चालू होते. ते बंद पडले तर प्रॉब्लेम होऊ शकतो.

कायमसाठी बंदबिंद झालं तर आमचा रोज सकाळ चा योगा क्लास बंद पडेल झूम वरचा ते वाईट वाटेल.

Pages