चींधी : ४

Submitted by सोहनी सोहनी on 3 October, 2021 - 06:25

चिंधी : ४

जटा झालेली अक्राळ विक्राळ केस, जागो जागी फाटलेलं लुगडं, रंग जणु निव्वळ सुकलेलं रक्त, शरीरभर चावल्या सारखे, ओरबडल्याच्याच खुणा, चेहरा समजण्या पलीकडेच गेला होता पण ते डोळे आग ओकत होते,
आणि एकटक मी लपलेल्या झाडावर रोखलेले..
मी बसल्या जागी थरथरत होते, हृदयातील कळ वाढतच चालली होती, जर मी तिच्या हाती सापडली तर काय करेल ती माझं???
मी तर तीच्या विषारी नजरेने जवळ जवळ मेलीच होते.

एका स्त्रीचं इतकं भयावह रूप असू शकतं???
ते अण्णांच्या देहाचं काय केलं तीने असं?? कसं केलं?? माणूस आहे, जनावर आहे की अजुन काही?? नक्की आहे कोण ती???

क्षणात तिची नजर बदलली, ती आग बरसणारी तिची नजर करुण वाटतं होती, मी लपलेल्या झाडावरून तिने नजर पाण्यात वळवली, एकटक तिथेच पाहत होती, मी ही पाण्यात पाहिलं, तर तिथे एक सुंदर प्रतिबिंब उमटलं होतं, नितळ गोरीपान काया, मोहक चेहरा, मादक नजर, पेहराव सारखाच फक्त छोटी छोटी फुलं असलेलं पांढरेशुभ्र लुगडं, खूप सुंदर प्रतिबिंब होतं ते.
बराच वेळ ती पाण्यात पाहण्यात गुंग होती, ते प्रतिबिंब होतं खरेच खूप सुंदर पण मी किती सुंदर आहे हा अभिमान, ते गर्वाकडे वळणारे सुख हलकेच हलणाऱ्या पाण्यात देखील लपत नव्हतं,
क्षणात त्या प्रतिबिंबित बदल व्हायला लागले, ते लुगडं हळू हळू लाल होऊ लागलं रक्ताने, ते जागो जागी फाटलं गेलं, अंगावर एक एक करत तसेच चावल्याचे, ओरबाडल्याचे, लचका ओढल्या सारखे व्रण उठायला लागले, इतका सुंदर चेहरा काहीच क्षणात विद्रूप, भयावह झाला,
झऱ्याच्या त्या काठावर उभी असलेली ती आणि पाण्यात आता दिसणारी ती सारखीच दिसत होती.

म्हणजे ते आधीचं प्रतिबिंब देखील तिचं होतं??
असं कसं दिसलं ते मला??? असं कसं दिसू शकतं?? मला का दिसलं??
म्हणजे ती आधी अशी होती?? ती कोण आहे नक्की???
पाहता पाहता पाण्यातलं प्रतिबिंब नाहीसं झालं आणि ती सुद्धा..

जे घडलं ते मेंदूला पटण्या पलीकडे होतं, जे काही घडलं ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यामूळे विश्वास कसा नको ठेऊ?? पण जे घडलं ते घडणं अशक्य आहे, असं कोण डोळ्यासमोरून कसं गायब होऊ शकतं??
पण तो भास अजीबात नव्हता, असं वाटायला लागलं की तीच्या मागे जावं, ती काय आहे ते पाहावं, तिला जाणून घ्यावं, तीच्या विषयी एक सहानुभूती एक ओढ निर्माण झाली, माझ्याही नकळत मी झाडाच्या मागून सरळ पुढे आले आणि मी पुन्हा ओढ्याच्या जवळ येऊन थांबले,
ती बाजू मला बोलावत होती, मला फक्त ओढा पार करायचा होता, मी भारावल्या सारखी एक एक पाऊल पाण्यात उतरले, एक एक पाऊल टाकत मी पाण्यातून पुढे चालले होते, तो काठ हातभर अंतरावर होता, मी जवळ जवळ कमरे पर्यंत भिजले होते,
मी काहीच पाहत नव्हते मला फक्त तिकडे जायचं होतं, मी संमोहन शक्तित असल्या सारखी एकटक त्या झाडीकडे पाहत होते, मी हातांवर जोर देऊन त्या काठावर चढले, मी तीच्या बाजूला पोहोचले होते.
मी त्या झाडीतून आत घुसले, आणि काहितरी विचित्र जाणवायला लागलं, वेगळ्याच वातावरणात आल्या सारखं, झाडं, पान, माती, हवा हे सगळं जणू बांधून आहेत, सगळं स्तब्ध आता पुढे काय होईल याची वाट पाहत असल्या सारखं.
कुणी तरी दबा धरून बसलय असं वाटतं होतं.

इतकं काही घडलं पण मला असं कधीच जाणवलं नव्हतं, माझं मन मला सांगत होतं की धोका आहे पुढे जाऊ नकोस,
भारावल्याची अवस्था कधीच उडून गेली होती, मी स्वतःच्या जिवासाठी सजग झाले होते, माझी पाऊले आपोआप मागे वळू लागली, मी मागे वळले आणि झाडीतून बाहेर निघणार तोच 'आरोही' आवाज देत अहिर धावत माझ्या दिशेने येत होता...

तो सुखरूप होता, कपडे केस विस्कटले होते पण त्याला काहीच इजा झालेली दिसत नव्हती,
मला कळलंच नाही मी कधी धावत जाऊन त्याला बिलगली,
इतके धक्के सहन करुन हे जे सुख मिळत होतं त्याला सुखरूप पाहून त्याने सगळं भरून निघालं निघालं,
मी त्याचं अंग चापापून पाहत होते त्याला कुठे काही चावल, ओरबाडलं तर नव्हतं ना?? त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती.

अहिर लवकर निघू इथून, मला इथे भीति वाटतेय खूप, अण्णांच खूप वाईट झालं इथे, आपण निघुयात इथून आताच्या आता,
मी त्याच्या हात धरून त्याला ओढ्याकडे यायला सांगत होते, पण तो म्हणाला ' तिथून नको तिथे ती आहे, मी खूप प्रयत्नांनी सुटलोय तीच्या तावडीतून, इकडे रस्ता आहे, गाडीजवळ जाण्याचा, मी गेलो होतो तिथे पण तू नाही म्हणून पुन्हा शोधत आलो इथे, चल'
त्याने माझा हात जवळ जवळ खेचून मला ओढत घेऊन जाऊ लागला, तो इतका पटपट चालत होता की मला धावायला लागत होतं, बराच आत गेलो, बाहेर जाण्या सारखं काहीच दिसत नव्हतं, आम्ही जास्तच आत आणि घनदाट जंगलात चाललो होतो,
अहिर माझ्या हृदयात कळ येतेय, थांब, मी नाही धावू शकत, अहिर, अहिर???
अहिर माझ्या हृदयात कळ येतेय, मला श्वास घेता येत नाहीये, अहिर, अहिर???
तो काहीच उत्तर देत नव्हता, कुठेतरी पोहोचायची घाई फक्त दिसत होती त्या चेहऱ्यावर, आणि वेगळेच हिंसक भाव, ज्याने माझं मन पुन्हा जागरूक झालं..

ह्या आधी मला थोडा धाप जरी लागली असायची तरीही हा कावरा बावरा व्हायचा, थोडी कळ आली तर डॉक्टर घरी बोलवायचा,
आता ह्या क्षणाला मी केव्हाही अती दुखत आहे म्हणुन खाली कोसळू शकते तरीही हा एक शब्द देखील बोलत नाहीये, मला होणाऱ्या त्रासाची दाखल नाही त्याच्या डोळ्यात,
हा माझा अहिर आहे???? हा प्रश्न पडण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे मला होणारा प्रचंड त्रास, माझं ह्रदय फुटणार होतं इतकंच मला कळत होतं आणि मी दहा वेळा ओरडून सांगून देखील अहिर एकही नजर माझ्याकडे पाहत नाहीये.
मी एका झटक्यात त्याचा हात झटकून दिला, मला श्वास घेता येत नव्हता, तोंडातून शब्द फुटत नव्हता, डोकं फुटेल असं वाटायला लागलं, मी गुढग्यावर हात ठेऊन खाली कोसळले,
डोळ्यांसमोर अंधारी येत होती, मी अहिर कडे पाहिलं,

तो एकटाच खुसखुशत होता, मला काय ते कळून चुकलं होतं . . .
तो वळून मला काय दिसणार ह्याची मला पूर्ण कल्पना झाली,
मी ही एक मोठा श्वास घेतला, आणि ठरवलं अहिरला घेऊन गेल्याशिवाय आता पळणार नाही, समोर जे काही वाढून ठेवलं आहे ते पार करेन,
एकतर अहिर आणि मी सोबत घरी जाऊ नाहीतर अण्णांच जे झालं ते माझंही झालं तरी चालेल. ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults