चिंधी : ३

Submitted by सोहनी सोहनी on 29 September, 2021 - 04:30

चिंधी : ३

जाग आली तर सकाळ झाली होती, डोकं खूप दुखत होतं, हात लावला तर ओलं आणि चिकट काही लागलं, डोळे उघडायला थोडा त्रास होत होता.
प्रयत्न करून डोळे उघडले तर हाताला तीन चार ठिकाणी काचा लागल्यामुळे हात रक्ताने माखलेले दिसले, ते रक्त पाहिलं आणि मला कालचं सगळं आठवलं.

मी रात्र भर एकटीच इथे पडले होते, अण्णा आणि अहिर???
अण्णा तर... मला पुन्हा रडायला आलं, मी समोर पाहिलं तर अण्णांचं मृतदेह तिथे नव्हतं,
माझी स्थिती भिती वाटून वाटून वेड लागल्या सारखी झाली होती,
मृतदेह कुठे गेला??? नव्याने एक एक भिती मन सहन करायला तयार नव्हता, माझ्या हृदयात हळू हळू दुखायला लागलं, हलकी कळ येऊन जात होती, ज्यामुळे मला श्वास घ्यायला त्रास होत होता.

अण्णा तर गेले त्यामुळे त्यांचा मृतदेह शोधण्या पेक्षा जास्त मला अहिर ची काळजी होती, तो इथेच कुठे अडकून पडला असेल तर???

मी जीव खाऊन उठले, अख्खं शरीर दुखत होतं पण मी लक्ष्य न देता अहिरला आवाज देत राहिले पण त्याचा काहीच उत्तर नाही आला,
तो नव्हताच इथे, असता तर काल रात्रीचं नसता का माझ्या जवळ थांबला..
मग कुठे गेला तो??? त्यात इतके तास उलटून गेलेत, काय झालं असेल त्याच्या सोबत??

मी गाडी खाली वाकून पाहिलं, आजूबाजूला पाहिलं पण तो कुठेच नव्हता.
अगतिक होणे म्हणजे काय ते मला त्या क्षणी कळलं,
मला अजून रडूच कोसळलं, मी लहान मुलासारखी हमसून रडू लागले. एक तर अण्णांच असं झालंय आणि अहिर बेपत्ता आहे, माझं पूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं, नको असताना नको ते विचार मनात येत जात होते.

अण्णा सारखं अहिरला काही झालं असेल तर???
नाही तसलं काही होणार नाही, मला माहितेय तो मला सोडून जाणं अशक्य होतं, तो इथेच कुठे असावा.
मी मागच्या पुढच्या दोन्ही रस्त्यावर खूप लांब पर्यंत धावत जाऊन शोधलं, नाही दिसला म्हणून मी हिम्मत करून उजवीकडच्या झाडांच्या आत गेले बरेचं अंतर आत जाऊनही अहिरच्या काहीच खुणा दिसत नाहीत म्हणून मी कशीतरी बाहेर पडून डावी कडच्या झाडांत शिरले, पायाखाली काय येतंय, काय तुडवते आहे काहीच न पाहता मी वेड्या सारखी अहिरला शोधत होते, तो इथेही दिसत नव्हताच, ते जंगल इतकं दाट होतं की दिवसादेखील संध्याकाळ असल्या सारखं, म्हणजे सूर्य किरण आत शिरत नसावेत बहुतेक त्यामुळे अंधार होता आणि झाडं खूप दाट होती, आणि त्यात मजालेलं गवत, चालतात पायांच्या बोटांत गुंतत होतं, माझ्या साठी हे सगळं भयानक होतं, खुप जास्त.

मी वेड्या सारखी चालत असताना अचानक पाण्याच्या वाहण्याच्या आवाजाने माझं लक्ष्य वेधलं, मी त्या दिशेने नकळत वळले, एव्हाना मी गाडी पासून बरीच आत गेले होते, पण मला आता भिती पेक्षा अहिरची काळजी वाटत होती. . .
मी त्या वाहणाऱ्या पाण्याच्या जवळ पोहोचले.

स्वच्छ निर्भेळ पाणी वाहत होतं, अहिरच्या हास्या सारखं, जर त्याला काही झालं ना तर मी ही जगू शकणार नव्हते. त्याच्या शिवाय माझं जगणं म्हणजे निरर्थक, व्यर्थ होतं.
मला पावलो पावली त्याच्या आठवण येत होती, मी त्या स्वच्छ झऱ्याच्या काठावर गुढगे टेकून मातीवर बसले.
जवळ जवळ हरलोय आपण असं वाटतं असताना पुन्हा पाण्याचा आवाज आला, पाण्यात काहीतरी पडतंय असं, म्हणजे १० ते १५ सेकंद च्या अंतराने चपटा लहान दगड आपटवा, किंवा काहीतरी तशीच वस्तू पाण्यात पडतेय असा आवाज स्पष्ट येत होता, पण त्या झऱ्याच्या दुसऱ्या काठावरून, त्या बाजूला ही पूर्ण झाडी होती, पण त्यामागे कुणी असलं तर जाणवेल अशी होती. मी ७ ८ मिनिट तिथेच बसून राहिले, आवाज येतचं होता.

कुणीतरी असावं तिथे, कदाचीत अहिर?? किंवा एखादं जंगली प्राणी.
काय करावं कळत नव्हतं, त्या बाजूला जाऊन पाहणं म्हणजे खूप धोकादायक होतं, आणि जावं पाण्यातून लागणार होतं, म्हणून मी माझ्याच काठावरून आवाजाच्या दिशेने हळू हळू दबक्या पावलांनी सरकले.
कदाचित झाडीतून दिसेल जे काही असेल ते, आता मी आणि झाडीच्या मागे जे होतं ते समोरासमोर होतो, आमच्या मध्ये पाच साडे पाच फूट रुंदी चा झरा आणि ती झाडी..

पुन्हा पाण्यात काहीतरी टाकलं मी ते पाहिलं, मास होतं ते, कोणाचं होतं काय माहित??
मी थोडी जवळ जाऊन निरखून पाहिलं, झाडी पलीकडे काहीतरी बसलं होतं, माणसाच्या आकरा सारखं, ते हलत होतं, म्हणजे बसल्या बसल्या वाकतोय, उठतोय आणि अजुन काहीतरी पडलंय समोर त्याच्या, ते काय ते कळतं नव्हतं, बहुदा मारलेला प्राणी असावा आणि त्याचंच मास असावं ते,
पण अश्या पद्धतीने कोण खातंय?? तेही प्राणी असावा जंगली,
मी माझ्याच विचारत होते तोच त्याने झाडीतून पाण्यात ते फेकलं आणि ते पाहून मी कसं तरी आवाज रोखून उलटी केली.
अण्णांचा मृतदेह, जवळ जवळ पूर्ण शरीर लचके तोडून, चावून, मास ओरबाडून घेतलं होतं, डोळे जागेवर नव्हते, आणि बरंच काही...
माझ्या हृदयात कळ वाढली, किती धक्के सहन करणार होतं ते??
मी एका झाडाला टेकून आधार घेऊन बसले, डोळे निरंतर वाहत होते, पण भावना मेंदू पर्यंत पोहोचत नसाव्यात, त्यामुळे मी ते तरंगणाऱ्या देहा कडे टक लाऊन पाहत राहिले.

आणि एक एक पाऊल झाडीतून बाहेर टाकत ते झाडीमध्ये बसलेलं बाहेर आलं, हृदयातील कळ इतकी वाढली की ह्यालाच हृदयाचा झटका म्हणत असावेत, भितीने माझी नखं झाडात रुतली. . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान सुरूय कथा आणि प्रत्येक भागात जबरदस्त उत्कंठा शिगेला पोचवण्याच्या कसोटी बद्दल विशेष कौतुक.