शाप पूर्वापार आहे

Submitted by निशिकांत on 26 September, 2021 - 09:55

अंतरीच्या पोकळीचा शाप पूर्वापार आहे
भोवताली घोळका, पण एकलेपण फार आहे

नांदतो एकत्र आम्ही दावणीला बांधल्यागत
गुंतणे त्याला न जमले, ही खरी तक्रार आहे

तो करी कर्तव्यपूर्ती वागताना मजसवे पण
प्रेम मिळण्याची अपेक्षा, पूर्ण का होणार आहे?

जन्मदिन लक्षात ठेउन साजरे केले मुलांचे
"जन्मली मीही असावी" हा विषय बेकार आहे

मी हवी माझ्या घराला फ्रीज अन् पंख्याप्रमाणे
संपली उपयोगिता की, वाटते भंगार आहे

बंडखोरी मी कराया लागता समजून आले
चौकटीला तोडणारी आत माझ्या नार आहे

प्रेम पहिले अंकुराया लागण्या आधीच सुकले
आजही तो जीवनाचा काळ हिरवागार आहे

लागला आहे लळा मज रोजच्या अवहेलनेचा
बंडखोरी जीवनाशी नेहमी करणार आहे

वापरू कुबड्या कुणाच्या का सुखामागे पळाया?
हासते मी, वेदनांचा वाटतो आधार आहे

जर तुला "निशिकांत" माया लाभली असती कदाचित
वर्णिले असतेस जीवन "अमृताची धार आहे"

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--व्योमगंगा
लगावली--गालगागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users