फिन्द्री - मुलीच्या नकुशीपणाची गोष्ट लेखिका सुनिता बोर्डे परिचय आणि परीक्षण

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 26 September, 2021 - 00:58

फिन्द्री - मुलीच्या नकुशीपणाची गोष्ट.

“फिन्द्री” लेखिका सुनिता बोर्डे यांनी लिहिलेली कादंबरी. कादंबरीतल्या संदर्भावरून १९७६ ते २००२ या काळात हि कथा घडत जाते. यातील प्रसंग जरी कौटुंबिक स्वरूपाचे असले तरी फिन्द्री ही सामाजिक कादंबरी आहे. कादंबरी वाचत असताना दलित समजातील विषमता, दारिद्र्य, जातपात, धर्म, पुरुषसत्ता संस्कृती, शिक्षणाचा अभाव या साऱ्या समस्या आपल्यासमोर व्यक्त होत जातात.

मिरु दलित समजातील स्त्री. एक खडतर आयुष्य तिच्या वाटणीला आले आहे. दिवसभर कष्ट करून आपले आणि कुटुंबाचे पोट भरणे आणि सहनशीलतेने आपल्या वाटणीचे आयुष्य जगणे हा तिचा दिनक्रम. पण तिचे आयुष्य अधिक खडतर झाले आहे ते तिच्या दारुड्या नवऱ्यामुळे- दिनकर मुळे. रोज दारू पिऊन घरी येणे आणि आपल्या बायकोला आणि मुलांना मारणे हा त्याचा दिनक्रम आहे.

या कथेची नायिका आहे संगीता.. मिरुची मुलगी. संगीताचे आयुष्य मिरु प्रमाणेच खडतर आहे. मिरु जेव्हा गरोदर होती तेव्हा तिच्या बापाला दिनकरला मुलगी नको होती.पण तरीही मिरूला मुलगी झाली म्हणून दिनकर दारूच्या नशेत कमालीचा संतापतो आणि संगीताला रागाने दूर फेकून देतो . संगीता मेली म्हणून तिला लोक पुरायला जातात. मिरु संगीताला जवळ घेऊन आक्रोश करते अचानक संगीताचे हातपाय हलू लागतात.संगीता जिवंत असते. संगीताचा जन्मापासून चालू असलेला हा संघर्ष शेवटपर्यत चालू राहतो .

मिरु, संगीता आणि दिनकर या तीन प्रमुख व्यक्तिरेखांच्या भोवती हि कथा गुंफली आहे. मिरु आणि संगीता यांचा संघर्ष प्रामुख्याने शिक्षणासाठी आहे. मिरु जरी अडाणी असली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिचे श्रद्धास्थान आहे. संगीताने सुद्धा बाबासाहेबांच्या सारखे खूप शिकावे हि तिची इच्छा असते. पण दिनकरचा शिक्षणासाठी विरोध आहे.आपल्या मुलीसाठी, तिच्या शिक्षणासाठी मिरु दिनकरचा विरोध मोडून काढते. एक दलित आणि अडाणी घराण्यातील मुलगी ते एमे पर्यंतचे शिक्षण घेऊन प्राध्यापिका कशी होते हे कथासूत्र.

संगीताच्या लहानपणापासून ती मोठे होईपर्यतचा प्रवास लेखिकेन चांगल्या पद्धतीने साकार केला आहे. संगीताचे लहान असताना शाळा नकोशी वाटणे, बोर्डिंग मध्ये जाण्याच्या आधी आणि बोर्डिंग मध्ये गेल्यावर तिची असणारी मानसिकता, झाडावरच्या कैऱ्या चोरून खाल्याबद्दल आईचा खालेल्ला मार, थोडे मोठे झाल्यावर नाक टोचून घ्यावेसे वाटणे किंवा चांदीच्या चैनपट्या घालाव्याशा वाटणे किंवा वयात आल्यावर शेजारचा मुलगा आवडणे अशा अनेक प्रसंगातून संगीताचे व्यक्तिमत्व आपल्या समोर येते.

यातील काही प्रसंग हृद्य झाले आहेत हे लेखिकेचे श्रेय म्हणावे लागेल. दारुड्या बापाचा शिक्षणाला असलेला विरोध टाळण्यासाठी मिरु संगीताला आज्जी कडे शिकायला ठेवते. एक दिवस आईची आठवण आली म्हणून आपल्या आजीला न सांगता ती आईला भेटायला येते. पण संगीतला गावात बघित्ल्यानंतर दिनकर तिला व तिच्या आईला बेदम मारतो .किंवा संगीताचा बारावीचा पेपर असतो तेव्हा ती परीक्षेला बसू नये म्हणून तिची सर्व पुस्तके विहिरीत टाकून देतो. जेव्हा ती कॉलेज मध्ये पहिली येते तेव्हा सर्वजण तिचे कौतुक करतात पण दिनकर मात्र थोबाडात मारतो. संगीता जेव्हा एका मैत्रिणीकडे चहा साठी गेली असते तेव्हा तिची जात कळल्यावर संगीताला वेगळी वागणूक देणे. सर्वच प्रसंग वाचनीय आहेत.

कथेची नायिका जरी संगीता असली तरी सुद्धा मिरुची व्यक्तिरेखा तिच्या इतकीच महत्वाची आहे. मिरुची सोशिकता,प्रामाणीकपणा, कोणत्याही शाळेत न शिकता केवळ अनुभवातून घेतलेले ज्ञान आणि तेच संस्कार संगीतावर करत तिच्या शिक्षणासाठी केलेला अट्टाहास.!! मिरु आणि संगीता यांच्या संघर्षाचे प्रसंग वाचत असताना आशा आणि निराशा, दु:ख आणि आनंद यांची गुंफण लेखिकेने चांगली केलेली आहे.संगीताने रेल्वेवर मोलमजुरी करून आईसाठी मिळवलेले पैसे सुखाची चाहूल निर्माण करतात आणि जेव्हा कष्टाच्या कमाईचे पैसे जेव्हा दारूच्या गुत्त्यावर जातात तेव्हा दु:ख प्रकट होते.

लेखिकेची भाषा कल्पक आहे. कादंबरीच्या सुरवातीला संगीता आपल्या पोटातल्या बाळाला तिच्या जन्माची कहाणी सांगते आहे अशी कल्पना केली आहे. पण संगीताने खडतर आयुष्य सहन केल्यावर सुद्धा तिला मुलगीच व्हावी असे वाटत असते हे बदलत्या काळाचे, तसेच प्रगल्भ विचारसरणीचे द्योतक आहे. या कादंबरीची भाषा मराठवाडा बोलीची आहे. काही शब्द वाचत असताना त्याचा अर्थ समजण्यासाठी कादंबरीच्या शेवटी त्या शब्दाचे अर्थ दिले आहेत.
पण यातील काही गोष्टीमात्र आपल्याला खटकतात. कादंबरीच्या सुरवातीला मिरु छोट्या संगीताला घेऊन बाजारात जाते असा प्रसंग आहे. तेव्हा ओझ्याने थकून गेलेल्या आईचे चालणे बघून संगीताच्या मनात विचार येतो “ आईच्या डोक्यावर जर कोणतेच ओझ नसत तर ती किती वेगाने पुढे गेली असती” शाळेतही जी मुलगी अद्याप गेली नाही इतक्या निरागस मुलीच्या मनात असे विचार येणे शक्य नाही असे वाटते.

किंवा संगीता जेव्हा वयात आल्यावर स्वत:चे मोकळे आणि लांब केस बघितल्यावर गाणे गुणगुणते “ मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे” या कादंबरीचा एक बाज आहे. संगीता हे व्यक्तिमत्व आपल्यासमोर एका वेगळ्या पद्धतीने उभे राहते. त्याचमुळे हे गाण तिने गुणगुणे हे काहीसे विसंगत वाटते.
कादंबरीतले काही प्रसंग संदर्भहीन वाटतात, संगीता बोर्डिंग मध्ये असते तेव्हा तिथे गुणमती म्हणून नवीन महिला स्टाफ आहे. गुणमतीला भेटायला दिनकर तिथे नेहमी यायचा आणि गुणमती, संगीता आणि दिनकर बाहेर बाजारात जायचे. गुणमती आणि दिनकर यांचे संबध असतात. गुणमती हि कादंबरीत व्यक्तिरेखा अचानक आली आणि नंतर तिचा कोणताही उल्लेख कादंबरीत नाही. दिनकरला जर बाहेरख्याली दाखवायचाच आहे तर तो अजुनी वेगळ्या पद्धतीने दाखवता आला असता.
मिरुला दिनकर रक्तबंबाळ होईल ईतके मारत असतो.तीही त्याचा राग करत असतेच.तडजोड म्हणून ती आयुष्य ढकलते आहे. अशा नवऱ्याचा बायकोला अभीमान का वाटावा? एका प्रसंगात आपल्या नवर्याचे गुणगान ती संगीतजवळ करत असते. दिनकरला ढोलकी आवडते आणि तो आपल्या धाकट्या मुलाला कॅसीओ घेऊन देतो. पण दुसर्या एका प्रसंगात दिनकर आपल्या मुलांना कुल्फी घेऊन न देता रस्त्यावरच्या मुलांना घेऊन देतो.जो मुलांचा इतका तिटकारा करतो तो त्याच्या धाकट्या मुलाला कॅसीओ कसा घेऊन देतो.?
दिनकर इतका अन्याय करत असतानाही मिरु कधीच पोलिसांच्या कडे का गेली नाही? जी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना श्र्धास्थान मानते तिने पोलिसांच्या कडे जाणे हे स्वाभाविक होते..मिरु कदाचित अडाणी म्हणून जात नसेल पण संगीता शिकत शिकत मोठी होत होती तेव्हा तिने कायद्याचा आधार घ्यायला काहीच हरकत नव्हती. कादंबरी संपता संपता पोलीस पाटीलचा उलेल्ख आहे पण तो पुसटसा
संगीता आणि मिरु दोघीही संघर्षमय आयुष्य जगत असतात. किंबहुना त्या दोघी लढाऊ आहेत. असे असताना संगीता तिच्या शिंदे सरांशी बोलताना तिने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता असे सांगते.यानंतर शिंदे सर तिला वाचनाचे महत्व पटवून देतात.केवळ पुस्तक हे आपले कवचकुंडल आहे हे पटवून देण्यासाठी तिच्या आत्महत्येचा उल्लेखाची आवश्यकता नव्हती असे वाटते.
मिरूच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगत राहतो. हे मिरुने संगीतावर केलेले संस्कार आहेत. पण येथे अलंकारिक भाषेचा कुठेतरी अतिरेक तरी होत नाही ना ? असे मनात येते.
एक वेगळा अनुभव, वेगळे विश्व अनुभवण्याच्या दृष्टीने मात्र हि कादंबरी वाचनीय आहे.

सतीश कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह!!! परिचय खूप आवडला. एक वेगळ्याच , आपल्या नजरेच्या टप्प्याआडच्या, समाजावस्थेचे भान ही कादंबरी देते असे काहीसे वाटले.