मी खळखळते..( मुसलसल गझल )

Submitted by निशिकांत on 23 September, 2021 - 09:55

पानगळीचा मोसम असुनी वेड्यासम मी खळखळ हसते
वसंतातल्या मधुगंधाची चाहुल येता मन मोहरते

शैषव सरता, स्वप्नामध्ये राजपुत्र वावरू लागला
आटपाट नगराच्या गोष्टी अता एक थोतांड भासते

अखंड उत्सव जीवन झाले ग्रिष्म असो की श्रावणधारा
चैत्रामधल्या पर्णफुटीला आरशात मी सदैव बघते.

छंद लागला तुझा सख्या अन् एकाकीपण हरवुन गेले
तू नसताना आठवणींची मनात माझ्या वर्दळ असते

बंधनात मी कधीच नसते असून दारी लाख पहारे
भेट जरी स्वप्नात जाहली, दोघांचीही रात्र उजळते

प्रवास ओला भल्या पहाटे, धुक्यात जर मी हरवुन गेले
किरणे घेवुन तू शोधाया, लगेच यावे मला वाटते

भाव मनी एवढे दाटले, शब्द एकही कसा फुटेना?
सर्व सांगण्या, कलमेमधुनी एक लाजरी गजल उतरते

यमुनेच्या डोहात वाकुनी शोध घेतसे वेडी राधा
अपुले विसरुन श्रीकृष्णाचे, तन्मयतेने बिंब पाहते

"निशिकांता"ला कशी कळावी अधीर भाषा बिनशब्दांची
नजरेला नजरा भिडण्याने थरथरणारी कळी उमलते

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users