पाककृती स्पर्धा क्र. १ - उपवासाची दही पुरी- Sonalisl

Submitted by sonalisl on 22 September, 2021 - 19:10

साहित्य:
१ मध्यम आकाराचा बटाटा
मीठ
१-२ टेबलस्पून फराळी पीठ
तेल
१ काकडी
१ सफरचंद
१ हिरवी मिर्ची
दही
साखर
१ डाळींब
कोथिंबीर

पाककृती:

बटाटा किसून त्यात मीठ मिसळावे. २-४ मिनिटानंतर त्याला पाणी सुटेल तेव्हा ते मुठीत दाबून काढून टाकावे. त्यानंतर त्यात फराळी पीठ मिसळावे. मिसळताना एकावेळेस एक चमचा पीठ घ्यावे व ब.किस एकत्र मिळून येईल इतके पीठ वापरावे. (पीठ जास्त झाल्यास पूरी कुरकुरीत न होता कडक होतात.)
आप्पे पात्रात २-३ थेंब तेल घालून त्यात चमचाभर बटाट्याचा किस घालून बोटाने दाबत त्याची वाटी करावी. मग भाजून घ्यावी. (१ बटाट्यात १० पूऱ्या झाल्या)
67CA1A23-BFFA-49D2-843A-D13CE656BF1B.jpeg

काकडी, सफरचंद सालकाढून बारीक चिरून घ्यावेत. त्यात चवीनुसार मीठ आणि अतिशय बारीक चिरून मिर्ची घालावी.
दह्यात आवडीनुसार साखर घालावी.
7679FED3-803F-4B51-9574-D51CA89D7826.jpeg

पुरीत आधी काकडी-सफरचंद घालून त्यावर दही घालावे. वरून कोथिंबीर आणि डाळींबाची सजावट करावी.
3699284D-B382-4C84-80D5-16CA8F83F06C.jpeg
तळणे नाही आणि बटाट्याचे प्रमाणही कमी आहे म्हणून मला ही पाककृती आरोग्यपूर्ण वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह
जबरदस्त दिसत आहेत
नक्की करुन बघणार

भारी दिसताहेत. चिंच चालते ना उपासाला? चिंच गूळ खजुराची चटणी पण घालता येईल. उपासाची ओपन राज कचोरी नाव दे. होऊदे खर्च. Happy

>>>>>>चिंच गूळ खजुराची चटणी पण घालता येईल. उपासाची ओपन राज कचोरी नाव दे. होऊदे खर्च. Happy
सुपर ड्युपर सुचना. खूप छान लागेल.

छान दिसताहेत!

फराळी पिठ कशाचं बनवतात?
आणि काकडी, सफरचंदची साल नाही काढली तर त्यातल्या त्यात अजून पौष्टिक होईल ना (फायबर + काही जीवनसत्व).

फराळी पिठ कशाचं बनवतात?>>>>> मानवदा, राजगिरा + वरई + साबुदाणा + शिंगाडा हे एकत्र दळुन किंवा वेगवेगळे दळुन वापरता येते.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!

चिंच चालते ना उपासाला? चिंच गूळ खजुराची चटणी पण घालता येईल.>>> चिंच चालते ते माहीत नव्हते. घातली तर मस्तच लागेल.
फराळी पीठ म्हणजे उपासाची भाजणी>> हो.

आतल्या बाजूने कच्चं नाही लागतं? का ओव्हन मध्ये टाकाव्या लागतील?>>> एकदम पातळ पारी आहे पण तरीही कच्चे राहू नये म्हणून जास्त वेळ लागला भाजायला. आप्पे पात्रात आकार येण्यापुरत्या भाजून ओव्हन/एअर फ्रायर मधे लवकर खरपूस भाजल्या जातील.

काकडी, सफरचंदची साल नाही काढली तर त्यातल्या त्यात अजून पौष्टिक होईल ना (फायबर + काही जीवनसत्व).>>> मलाही साले काढायची नव्हती पण गरम पाण्यात धूऊनही त्यावरचे वॅक्स पूर्ण निघाले असे वाटत नव्हते.

बास्केटस कसल्या मस्त झाल्यात बटाटा खीस च्या.आमच्या कडे हा पदार्थ केल्यास बास्केट भाजून त्यात सगळं टाकेपर्यंत बास्केटस चा फन्ना उडू नये म्हणून घरातल्या लोकांना कोंडून ठेवावं लागेल.

Pages