निवडणूक – (कुट्टीची गोष्ट – 4)
परीक्षेचा शेवटचा दिवस आटपून कुट्टी शाळेतून जवळपास धावतच घरी आली. जेमतेम हातपाय धुऊन होतायत तोवर, "मला आत्ता वरची बॅग काढून द्या." चा लकडा तिनं सुरु केला. आधी थोडं दुर्लक्ष, मग जरा वेळकाढूपणा, मग चिडवणं असे नेहमीचे सोपस्कार होऊन शेवटी तिला दुपारी तिची लाडकी बॅग माळ्यावरून काढून मिळाली. नेहमीप्रमाणे धुळकटलेलीच होती. घाईघाईने कसंबसं फडकं मारून तिने बॅगेची चेन उघडली आणि अगदी डोळे भरून तिच्या लाडक्या खजिन्याकडे बघितलं.
ती तिची लाडकी गोष्टीच्या पुस्तकांची बॅग होती. शाळेच्या सुट्ट्या संपल्यावर बॅग माळ्यावर जायची अन सुट्ट्या सुरु झाल्यावर आणि मुख्य म्हणजे कुट्टी खूप मागे लागल्यावरच खाली यायची. शंभरेक तरी पुस्तकं असतील त्यात. त्यातली जवळपास सगळीच अगदी छोटी-छोटी अन पाच सात जर्राशी मोठी होती. तिला ती सगळीच पुस्तकं खूप आवडायची. दादा लहान असतांना घेतलेली. सगळ्याच पुस्तकांची आत्तापर्यंत कितीतरी वेळा पारायणं झाली असतील. बॅगेत नवीन गोष्टीच्या पुस्तकांची भर कधी पडलीच नाही. पण तीच - तीच असली तरी त्यांच-त्यांच गोष्टी परत - परत वाचायला सुद्धा कुट्टीला खूप आवडायचं.
वाचायला तर कुट्टी खूपच लवकर शिकली होती. म्हणजे केव्हा शिकली, ते पण तिला आठवत नव्हतं. आठवतं तेव्हापासून दिसेल ते वाचायचं तिला वेडच होतं. अगदी रस्त्याने चालतांना दुकानांच्या पाट्या सुद्धा. रस्त्याने कुणी हात धरणारं नसलं तर ती धडपडायची सुद्धा कित्येकदा. तिच्या या वेडामुळेच पुस्तकांची बॅग नेहमी माळ्यावर असायची अन वर्षातून दोनदा मोठ्या सुट्ट्यांच्या वेळीच खाली काढली जायची. एकदा वाचायला लागली कि तिचं कश्शा-कश्शात लक्ष नसायचं मग.
बॅगेतली पुस्तकं तरी कित्ती छान-छान होती. 'इसापनीती', 'जादूची अंगठी', 'उडता गालिचा', 'राक्षस आणि सोनपरी ' 'घागरीतलं भूत', 'अल्लाउद्दीन चा दिवा'........ आणि कित्तीतरी. कुट्टीच्या दृष्टीनं तर तो अलिबाबाचा खजिनाच होता. सगळं परत परत वाचतांना ती अगदी पहिल्यांदाच वाचत असल्यासारखी रमून जायची. अन पुस्तक हातात नसेल तेव्हा दिवास्वप्नात रमायची. 'घागरीतलं भूत' वाचल्यावर तर तिनं स्वयंपाक घरातल्या कळशीला हात लावणंच सोडलं. केव्हाही त्यातून भूत बाहेर येईल अशी भीतीच वाटायची तिला. जादूची सगळी पुस्तक वाचल्यावर घरातही असे जादूचे डब्बे असावेसे वाटायचे. त्यातला खाऊ कद्धी संपूच नयेसं वाटायंच. लाडू, पेढे, बर्फी, अनारसे अन काय..काय! सगळ्या आवडत्या पदार्थांनी डब्बे भरलेले हवे नेहमी. जादूच्या अंगठीची तर कित्ती मज्जा! अंगठी घातली की माणूस गायब! अश्शी अंगठी हवी. शाळेत जायची वेळ झाली कि घालायची. शोधा म्हणावं मग मला .......पुस्तकातले सगळे प्राणी पण कित्ती छान होते....सगळं - सगळं ऐकायचे.
रात्रीची जेवणं झाली की आई आणि शेजारच्या काकू मागच्या अंगणात गप्पा मारत बसायच्या. बाबा आणि शेजारचे काका पुढच्या पायऱ्यांवर असायचे. जेमतेम दोन खोल्यांचं घर. मोठ्यांच्या मध्ये येऊन बसू नये ची शिस्त असली तरी, दोन्हीकडच्या गप्पा मुलांच्या कानावर पडायच्याच. पेंगुळलेल्या डोळ्यांनी गादीवर पडल्या पडल्या सगळं ऐकू यायचं.
"तुम्ही कशाला काळजी करता, विजूताई? आम्ही आहोत ना काही लागलं तर मदतीला......"
"ते तर आहेच हो...पण बघा नं , एकदा त्या निवडणूक ड्युटी वर गेले नं , की आठ - आठ दिवस घराची काही खबरबात नसते. तुम्ही बघताय नं अरुची तब्बेत............ त्यांनाही काळजी वाटतच रहाते......या वेळी तर म्हणे त्या आदिवासी पाड्यावर ड्युटी आहे....."
"त्यांचाही इलाज नसतो हो... आलं काम करायलाच लागत...होईल सगळं ठीक.....या वेळी यांची ड्युटी इथेच आहे.....हाताशी जीप पण आहे म्हणे. तशीच वेळ आली तर हे नेतील दवाखान्यात. नाहीतर मुलं आहेतच डॉक्टरांना बोलवायला ......."
"तुम्हाला सांगतो भाऊसाहेब, लोकसभा....विधानसभा.......अन कधी झेडपी.......आपल्याला आपलं दर दोन तीन वर्षांनी आहेच......"
"खरं आहे तुमचं . पण सरकारी नौकर म्हंटलं की हे आलंच ......"
"अहो, तुम्हाला सांगतो, गेल्या वेळी तर पेट्या डोक्यावर घेऊन पायी जायला लागलं होत...... तिथपर्यंत गाडी जातंच नव्हती...."
"कुणीही निवडून आलं तरी महागाई काही कमी होत नाही.....या निवडणुकांनाच काही पर्याय पाहिजे बॉ....."
"हो ना.....करोडोंचा चुराडा होतो तो तरी वाचेल......"
"पक्ष कोणताही असो.... अन निवडून कोणीही येवो......गोंधळ तेवढाच घालतात......."
"राज्य कुणाचंही असो....अन राजा कुणीही होवो...आपण आपले हुकमाचे ताबेदार..."
झोपाळलेल्या कुट्टीला कळलं काहीच नाही , पण राजा अन राज्य मात्र लक्षात राहिलं.
महिन्याचा शेवटचा दिवस असल्यानं आज शाळा लवकर सुटली होती. शेवटच्या दिवशी हजेरीबुक पूर्ण करायला लागतात बाईंना. कुट्टी मैत्रिणींबरोबर रमत - गमत घराकडे निघाली.
"आज मैदानाकडून जाऊया ?" उमा म्हणाली. सगळ्याच तयार झाल्या.
मैदानाकडचा रस्ता लांबचा होता. पण घरी जायची तशी कुणालाच घाई नसायची. शिवाय त्या रस्त्यानं जातांना खूप गंमत दिसायची. कपड्यांची छान - छान दुकानं .....रंगीबेरंगी खेळण्यांची दुकानं .....नुसतं बघायलाही मज्जा वाटायची. शिवाय मैदानावर पण काहीतरी खेळ चालू असायचे. कधी - कधी एकाद्या कोपऱ्यात गारुड्याचा नाहीतर डोंबाऱ्याचा खेळ चालू असायचा. एवढ्याशा गोलातून ती डोंबारीण बाई पूर्ण जायची. सर्कस लागलेली असली तिथे, तर सकाळच्या निवांत वेळी प्राणी पण दिसायचे.
आज मैदानाच्या रस्त्यावर नेहमीपेक्षा खूप जास्त गर्दी दिसत होती. सगळी मोठी माणसं तिकडे जातांना दिसत होती. पायी...सायकलीवर.....सगळीकडे गर्दीच गर्दी.......काय आहे बरं आज? लाऊडस्पिकर वर आवाज येत होता पण नीट काही कळत नव्हतं. सगळ्या मुली गर्दीचा भाग झाल्या. जरा ढकला- ढकलीच चालू होती. गणपती बघायला चाललेल्या गर्दीसारखी. आज दुकानांकडे पण लक्ष नाही गेलं कुणाचं.
बऱ्याच वेळाने सगळ्या मैदानाजवळ पोचल्या. सगळे लोकं गोलाकार गर्दी करून उभे होते. पांढऱ्या चुन्यानं जाड गोलच आखला होता. जवळपास सगळी मोठी माणसाचं होती. सगळ्याजणी गर्दीत छोट्या छोट्या फटी शोधत पुढे घुसल्या आणि दफ्तरं सावरत दाटीवाटीने उभ्या राहिल्या. सगळीकडे गोंधळ...मोठ्या मोठ्या आवाजात बोलणं सुरु होतं. मैदानात मध्यभागी एक हत्ती उभा होता. तिथे जवळच एका उंच टेबल सारखं स्टेज उभारलं होतं . त्यावरून एक माणूस माईकवर बोलत होता. आणखी दोनतीन माणसं हातात रजिस्टर, फुलांचा हार घेऊन उभी होती. भोवती बरेचसे पोलीस पण होते.
"आता ठीक बारा वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. सगळ्यांनी शांतता राखा. सगळ्या सूचना नीट ऐकून घ्या. सगळ्यांनी आहे तिथेच उभं राहायचं आहे. गोलाच्या आत कुणी आलं तर त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढणं येईल. ठीक बारा वाजता हत्तीच्या सोंडेत माळ दिल्या जाईल. माहूत हत्तीवर बसून पूर्ण मैदान फिरेल. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला विजयी घोषित करण्यात येईल. विजयी व्यक्तीने स्टेज जवळ येऊन आपलं नाव पत्ता सांगायचं आहे. मग त्या माणसाला हत्तीवर बसवून मिरवणूक निघेल."
एकदम सगळीकडे शांतता पसरली. लोकं अगदी श्वास रोखून बघायला लागले. कुट्टीला तर भीती पण वाटली. केवढा अगडबंब हत्ती आहे....अंगावर आला तर? तिनं मैत्रिणीचा हात घट्ट पकडला.
हत्तीच्या सोंडेत माळ दिल्या गेली. हत्तीने हळूहळू मैदानाभोवती फिरायला सुरवात केली. सावकाश हत्तीची एक चक्कर पूर्ण झाली. कुणाच्याच गळ्यात माळ पडली नाही. हत्तीची दुसरी चक्कर सुरु झाली. सगळे लोकं परत डोळ्यात प्राण आणून उभे राहिले. हत्ती एका ठिकाणी थबकला. कुट्टीला धक्काच बसला. तिथे बाबा उभे होते. तिच्या तर अगदी कंठाशी प्राण आले. ती दगडासारखी निश्चल झाली. बाबांच्या गळ्यात माळ पडली. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. मैत्रिणीचा हात झटकून अति आनंदाने कुट्टी स्टेजकडे पळत सुटली.
"बाबा....बाबा......" आता बाबांच लक्ष कुट्टीकडे गेलं. ते रजिस्टरमध्ये नाव लिहीत होते. त्यांनी कुट्टीचा हात धरला. दोघेही हत्तीवर बसले. मिरवणुकीसाठी.
"तुम्ही राजा झालात?" कुट्टीनं विचारलं.
"नाही. आत्ता राजा नाही झालो. राजाच्या दरबारात जाणार. मग परत सगळ्या दरबारी लोकांतून अशीच निवडणूक करतील." आपल्या गळ्यातला हार बाबांनी तिच्या गळ्यात घातला. चेहऱ्यवर फुलांचं पाणी पडलं.
"कुट्टी.....कुट्टी.....उठ आता. सुट्ट्या आहेत म्हणून किती लोळायचं......" दादा पाणी शिंपडत होता.
कुट्टीला जाग आली. ती हत्तीवर नाही. बिछान्यातच होती.
*********
हीदेखील कथा गोड आहे.
हीदेखील कथा गोड आहे.
निवडणुकीची कुट्टीची कल्पना छान आहे.
काढल्या जायची. - काढली जायची.
तो अल्लाउद्दीनचा खजिनाच होता - अलिबाबाचा?
टिंबं टिंबं दिली आहेत त्यात काही ठिकाणी उद्गारचिन्ह हवं
प्रतिसादाबद्दल आणि
प्रतिसादाबद्दल आणि सुचनांबद्दल धन्यवाद भरत.
मस्त आहे हीपण गोष्ट!
मस्त आहे हीपण गोष्ट!
गोड गोष्ट
गोड गोष्ट
मस्तच ... आवडली ही पण....
मस्तच ... आवडली ही पण....
धन्यवाद वावे, धनुडी, धनवंती.
धन्यवाद वावे, धनुडी, धनवंती.