माझ्या आठवणीतली मायबोली - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2021 - 20:38

ऋन्मेऽऽष -
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी - 7 वर्ष 2 months
खर्रंच..
काही गडबड झालीय का? हे २ वर्षे ७ महिने असे हवेय का?
कारण मलातरी धक्का बसला हे चेक केले तेव्हा. अजूनही मला स्वतःला ईथल्या जुन्याजाणत्या दिग्गज सभासदांमध्ये एखादे नवीन वासरू असल्यासारखेच वाटतेय Happy
पण प्रत्यक्षात माझ्या वर्जिनल आयडीला, म्हणजे "तुमचा अभिषेक" याला ९ वर्षे ६ महिने झाली आहेत. त्यामुळे मायबोलीच्या २५ पैकी साडेनऊ म्हणजेच ३८ टक्के (>३५ टक्के) कालखंडाची मायबोली मी पाहिली असल्याने या ऊपक्रमात लिहीण्यास उत्तीर्ण झालो आहे असे म्हणू शकतो Happy

अर्थात जेव्हा मी तुमच्या अभिषेक या आयडीमधून लिहायचो तेव्हा मी मायबोलीवर माझ्या कथा टाकण्यापुरते यायचो. ईतरांच्याही फक्त कथाच वाचायचो. ना ईथल्या चर्चात कधी सामील व्हायचो ना चर्चा घडवणारे धागे काढायचो. गंमत म्हणजे तेव्हा मी मायबोलीच्या एका वविलाही जाऊन आलो होतो. माणसांत चटकन मिसळायला आवडत नसल्याने तिथे जसा बोअर झालेलो तशीच बोअर कारकिर्द माबोवर चालू होती. पण त्याचवेळी ऑर्कुट समूहांवर मात्र माझे दिवसाला दोन धागे काढणे, वेगवेगळे आयडी काढून धमाल ऊडवणे चालूच होते. थोडक्यात जे ऋन्मेष म्हणून मी ईथे गेले सात वर्षे केलेय तेच तिथे करत होतो. आणि मग एके दिवशी ऑर्कुट बंद होतेय अशी खबर आली... Google announced that Orkut would be shutting down completely on September 30, 2014. म्हणजे सात वर्षे झाली बरोबर यालाही Happy

तर आता पुढे काय हा प्रश्न पडला. माझ्यातल्या किड्यांना आता मी कुठे न्याय देणार होतो, तर पहिलेच नाव मायबोलीचे मनात आले. पण ईथे तर आपली ईमेज बोअर आय मीन सरळमार्गी संसारी माणसाची होती. जे किडे ऑर्कुटवर करायचो ते अचानक अभिषेक आयडीतून सुरू केले असते तर अभिषेकला ओळखणार्‍यांना तो धक्का पचवणे अवघड गेले असते. नाही म्हणायला थोडे वेगळेपण म्हणून अंड्या नावाचा एक आयडी मार्केटमध्ये आणलेला. पण तो देखील ओळखीच्या पाळखीच्या लोकांना माझाच म्हणून सांगून झालेले. आणि त्यामुळे मग ऋन्मेषला जन्म द्यावा लागला Happy

आता म्हटले तर ऋन्मेष हा माझा डु आयडी होता. म्हटले तर तो मीच होतो. कारण त्यात दिलेले सारे डिटेल्स माझेच होते. त्यातून व्यक्त होणारा माझा मीच होतो. त्यातून आयडीमागच्या व्यक्तीची जी काही चांगली वाईट ईमेज कोणाच्या डोक्यात तयार होणार होती ती प्रामाणिकपणे माझ्याच व्यक्तीमत्वाची होती. हो, अगदी शाहरूखप्रेमही माझेच होते. माझे स्वतःच्या प्रेमात असणेही अगदी खर्रेखुरे होते.

चला आता प्रश्नांतूनच पुढचे बोलूया, आणि त्यांनाच मोठमोठाली ऊत्तरे देऊया ..

- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले

कथालेखनाचा दर्जा
मी मायबोलीवर आलो तेव्हा ईथले जुने सभासद म्हणायचे मायबोलीचा सुवर्णकाळ गेला आता.. असे म्हणताना लोकं विशाल कुलकर्णी, कवठीचाफा, धुंद रवी ईत्यादी नावे घ्यायचे. अर्थात ही सुवर्णकाळ गेल्याची रड मी ऑर्कुट समूहांवरही ऐकायचो. हे सगळीकडेच सगळ्याच कालखंडातील सभासदांना वाटत असावे. हे असे वाटणे क्रिकेटप्रेमींनाही वाटते, चित्रपटप्रेमी आणि संगीतप्रेमींनाही वाटते. पण तरीही तेव्हा मायबोलीवर दाद, नंदिनी यांसारखे कथालेखक होते. मी कुठल्याही सोशलसाईटवर पाहिलेले माझ्यामते सर्वोत्तम लेखक बेफिकीर तेव्हाही दणादण कथा लिहीत होतेच. पण हळूहळू हे सर्व लिहायचे बंद झाले. यानंतरही नवीन कित्येक लिहिणारे आले आणि गेले. गेल्या काही वर्षात तर जे गेले ते त्यांच्या धाग्यांवर वाद होऊन गेले. याची थोडीफार खंतही आहे.

पण सध्या मायबोली बाहेरचे जगही झपाट्याने बदलत आहे. नवनवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहेत. कदाचित या कथालेखकांना दुसरे व्यासपीठ मिळाले असावे जे एकेकाळी शक्य नव्हते. त्यामुळे मला वाटते कथा कादंबर्‍यांबाबत आता पुन्हा तो काळ कधी येणार नाही. तरीही या लोकांनी मायबोलीवर आजवर ईतके साहित्य प्रकाशित करून ठेवले आहे की ईथे येणार्‍या नवीन सभासदांना कथा वाचायची आवड असल्यास त्यांना ते काही वर्षे पुरेल.

पण अर्थात हे केवळ कथा कादंबर्‍या लिखाणाबाबत झाले. ते सोडता आजही मायबोलीवर कित्येक दिग्गज विचारवंत आणि प्रतिसादातून वैचारीक आणि अभ्यासू पोस्टी लिहिणारे आहेतच. आजही मायबोलीवर चर्चा झडतात, आजही ईथे धमाल धागे निघतात. नवीन सभासद आपला नवीन जायका घेऊन येत आहेत आणि तोचतोचपणा, साचलेपण टाळत आहेत. आजही मायबोलीवर दिवसभर पडीक आहोत आणि बोअर झालो असे मला तरी होत नाही. या गणेशोत्सवाचे तर विचारूच नका. ईतके काही वाचण्यासारखे आले आहे की ते अजून पंधरा दिवस वाचून संपणार नाही आणि ते वाचताना कुठेही कंटाळा येत नाहीये. धागेच नाहीत तर प्रतिसादांचाही ईतका धडाका आहे की एखाद्या धाग्यावर चार तास पोस्ट नाही पडली तर तो वेगाने चार पाने मागे जात आहे. माझे दहा धागे रफबूकमध्ये लिहून तयार आहेत, पण या गणेशोत्सवाच्या दंगलीत ते हरवून जातील या भितीने अजून दहा दिवस प्रकाशित न होता पडून राहणार आहेत Happy

पण तरीही मी ते जेव्हा प्रकाशित करेन तेव्हा त्यातले चार शतकी नक्की होणार आहेत. कारण बदल हे होतच राहणार पण मायबोलीला मरण नाही. अजून पंचवीस वर्षांनी ऋन्मेष हा आयडी ३२ वर्षे जुना झाला असेल आणि तेव्हाही मला वाटत असेल की अरेच्चा, दोनचार वर्षांपूर्वीच तर मी मायबोलीवर आल्यासारखे वाटतेय Happy

- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली

१) धागे काढणे
२) डु आयडी काढणे

या दोन्हीबाबतचे धोरण मला फार आवडते.

१) धागा काढताना तो थेट आपल्याला प्रकाशित करता येतो. उगाच प्रकाशित व्हायच्या आधीच मॉडरेशन ही भानगड नाही. मला हे नवोदीत लेखकांसाठी, धागाकर्त्यांसाठी एक प्रकारचे प्रोत्साहन वाटते. या, बिनधास्त व्यक्त व्हा. आपले स्वागत आहे.

२) डु आयडी घेताना ईथे कसलाही त्रास झाला नाही. तसेच आज मी तुमचा अभिषेक - अंड्या - ऋन्मेष - अर्चना - भास्कर हे सर्व एकच आहे असे डिक्लेअर करूनही उगाच कोणावर कुर्‍हाड पडली नाही. नियम पाळत असाल, कोणाला वैयक्तिक त्रास देत नसाल, तर प्रशासनही तुम्हाला त्रास देत नाही.

माझे आजवर दोन तीन धागे प्रशासनाला अयोग्य वाटल्याने उडाले. काही प्रतिसादही कधी उडतात. त्यातले काही निर्णय मला पटले नाहीत असेही झाले. पण तरीही मी कधी कोणाला जाब विचारायला गेलो नाही. कारण मतमतांतरे होऊ शकतात. पण वरील दोन धोरणांमुळे प्रशासनाच्या हेतूबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे.

- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती

जेव्हा मी तुमचा अभिषेक मधून लिहायचो तेव्हा माझ्यासाठी गुलमोहर हा एकच विभाग अस्तित्वात होता. जिथे मी माझे कथा ललित टाकायचो आणि ईतरांचे वाचायचो. पण ईथे जगातले जवळपास सर्वच विषय चघळले जातात आणि आपण त्यातल्या नव्वद टक्के विषयात प्रतिसादांपुरताच सहभाग नोंदवणे नाही तर धागेही काढू शकतो हे जेव्हा मी ऋन्मेष म्हणून अवतरलो तेव्हा कळत गेले. थोडक्यात, सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळायला यायचा तेव्हा पहिली चार पाच वर्षे त्याचे एकही शतक नव्हते. त्यानंतर मग ओपनिंगला सुरुवात केली आणि...... सचिन आणि ऋन्मेष दोघांचाही ईतिहास तुम्हाला ठाऊक आहेच Happy

- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं

यावर स्वतंत्र लेख टाकू का? Happy

जोक्स द अपार्ट,
आई मीन, अ‍ॅक्चुअली .. काय नाही दिले मायबोलीने?
माझ्यातील लिखाणाच्या किड्याला मुक्तपणे वळवळू दिले. वाचनाचा किडा फार नव्हता पण त्यालाही खाद्य पुरवले. प्रत्यक्ष आयुष्यात मी कमी बोलतो कारण मला फक्त वाद घालतच बोलता येते. त्यामुळे मी बाहेरच्यांशी कमी बोलतो आणि घरी माझे तोंड धरून `आता पुरे' म्हणावे ईतकी बडबड चालू असते. बस्स, मायबोली याचसाठी मला माझे दुसरे घर वाटते. ईथेही मी `आता पुरेss' असे म्हणायची वेळ येईपर्यंत बेछूट सुटतो. आजवर कुठलाही प्रतिसाद वा धागा वा वैयक्तिक किस्सा ईथे पोस्ट करताना वा एखाद्या वैयक्तिक विषयावर सल्ला मागताना हे करावे की नाही असा विचारही मनात आला नाही. हे माझ्यासाठी मायबोलीचे सर्वात मोठे देणे आहे.

याऊपर मनोरंजन होते, माहितीत भर पडते, विचारांचे शुद्धीकरण होते, मित्र मिळतात, वगैरे वगैरे जे आपल्या सर्वांनाच मायबोलीने दिले आहे ते आहेच. पण स्पेशली ईथल्या स्त्रीपुरुष समानतेच्या चर्चा वाचून आज समाजातल्या साधारण आपल्याच स्तरातील स्त्रिया काय विचार करतात हे कळते. त्यानुसार आपल्या केसमध्ये आदर्श आणि प्रॅक्टीकल वागणे काय असेल आणि आपण कसे वागतो याचे वेळोवेळी आत्मपरीक्षण करता येते.

अरे हो, आणखी एक राहिले.
ईथे जे सर्वांशी ईतके वाद घालूनही ऋन्मेष कधी कोणाला वैयक्तिक बोलत नाही. चर्चेत वा वादात चिडत नाही, वैयक्तिक टिकेने तोल ढळू देत नाही वगैरे स्वभावाचे कौतुक होते ते तसे सोशलसाईटवर वागणे तुलनेत सोपे असले तरी वैयक्तिक आयुष्यात वागणे तितकेच कठीण. त्यात माझा मूळ स्वभाव वडिलांवर गेल्याने शीघ्रकोपी आहे. होते काय की ईथे चिडलो वा मूड खराब झाला तरी आपण पुढची पोस्ट करण्याआधी थोडा वेळ जाऊ द्यावा हे तत्व पाळता येते. जे प्रत्यक्ष आयुष्यात आपण लगेच रिअ‍ॅक्ट करतो. पण तरीही ईथे जे जमते ते प्रत्यक्ष आयुष्यातही जमवायचा प्रयत्न मायबोलीवर आल्यानंतरच सुरू केला आहे. चिडलो की वेळ जाऊ देतो. थोड्यावेळाने नॉर्मल होईल सारे हे मनाला बजावत स्वतःला त्या व्यक्तीपासून वा सिच्युएशनपासून दूर नेतो. यात बरेपैकी यशस्वीही झालो आहे. आणि मला प्रामाणिकपणे हे मायबोलीचेच एक देणे वाटते. कारण तिथे जमते तर ईथे का नाही असा विचार नेहमी करतो.

याचप्रमाणे कोण आपल्याबद्दल काय विचार करतेय याचा आपण विचार न करता जगायचेही मायबोलीवरच्या वावरानेच शिकवले आहे. तिथे जमते तर ईथे का नाही. जगाची पर्वा करू नये हे बोलायला सोपे असले तरी आचरणात आणायला कठीण. ती पर्वा कमी अधिक प्रमाणात केली जातेच. जी मी सध्या अगदी नगण्य करू लागलो आहे.

थोडक्यात मायबोलीने व्यक्तीमत्वाचा विकास घडवला असे म्हणू शकतो.

अरे हा, अजून एक आठवले...
मायबोलीवर डु आयडी काढायला काहीतरी हटके आणि कॅची म्हणून मी काही अर्थ वगैरे नसलेला ऋन्मेष हा शब्द निर्माण केला.
पण नंतर हे नाव मला ईतके आवडले की मी मुलाचेही नाव ऋन्मेषच ठेवले. यालाही एकप्रकारे मायबोलीचे देणेच म्हणू शकतो Happy

- तुम्ही मायबोलीला काय दिलं

ऋन्मेष या आयडीतून जवळपास १३५ शतकी धागे दिले Happy
(खास मोजले याचे ऊत्तर द्यायला)
जोक्स द अपार्ट, आपण कधीही एखाद्या समूहाला देतो थोडे आणि घेतो जास्त. मायबोलीने ईथे आपल्याला चर्चा करायला, माहितीची आणि विचारांची देवाणघेवाण करायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पण ते व्यासपीठ वापरून चर्चा घडवायला आधी कोणीतरी धागा काढणे गरजेचे असते. मी ते काम माझ्यापरीने ईमानईतबारे करतो Happy

- तुमचं कुठलं लेखन गाजलं
यापेक्षा कुठले गाजले नाही याची लिस्ट काढणे सोपे पडेल Happy

- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
यापेक्षाही कुठल्या लेखांनी गांजले नाही याची लिस्ट काढणे सोपे पडेल Happy
(छे! पण ती मी स्वतः काढणार नाही. ज्यांना आपण गांजलो असे वाटते त्यांनी खुशाल काढावी. स्वतंत्र धागा काढायचा नसल्यास ईथेच प्रतिसादात काढा Happy )

जोक्स द अपार्ट,
वरील दोन्ही ऊत्तरे प्रामाणिक आहेत.

कारण आज मायबोलीवर चाहते म्हणून सुविधा आहे त्यात माझ्या नावाखाली तब्बल १७९ चा आकडा दाखवत आहे. तसे हल्ली काही डु आयडी सुद्धा माझ्या चाहते व्हा वर क्लिक करतात, का ते त्यांनाच माहीत. आणि ते उडाले की चाहत्यांची संख्या कमीही होते. तर ते एक असो, पण ते वगळताही हा आकडा फार मोठा आहे. म्हणजे निव्वळ लिखाणाच्या दर्जाचा विचार करता माझ्यापेक्षाही पटींनी चांगले लिहिणार्‍या कैक लोकांचे ईतके नाहीयेत.
याचा अर्थ भले लिखाणाने का नसेना तरी त्या लेखाच्या विषयाने वा त्यावर आलेल्या प्रतिसादांनी तरी ते धागे गाजतातच. त्यामुळे ते ट्रॅक करायला चाहत्यांची संख्या वाढते.
पण त्याचवेळी कैक लोकांना माझे लिखाणच नजरेस पडू नये म्हणून आयडी इग्नोर करायचीही सुविधा हवी असते. याचा अर्थ (त्यांच्यामते) माझे गांजवणारे धागेही थोडेथोडके नाहीत तर बरेच असणार.

थोडक्यात काय गाजले आणि कश्याने गांजले हे वाचकांनीच ठरवावे. मी कश्याला माझी रात्रीची झोप खराब करून कौतुकाने गाजलेले आणि विनयाने गांजलेले धागे शोधत बसू Happy

चला रात्रीची काय पहाटेची वेळ झाली. सहा वाजले ईथे नव्या मुंबईत. म्हणून थांबतो आता. नाहीतर हा विषय असा आहे की लिहिणार्‍याने लिहीत जावे.. आणि वाचणार्‍याने न वाचताच वाह वा छान छान करत राहावे Happy

शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज...
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलं आहेस.
हल्ली तू इतरांच्या धाग्यांवर विषयाला धरून आणि नेहमीसारखे फाटे न फोडता लिहितोस हे नोटीस केलंय. ते ही चालू ठेव जमलं तर.

मस्त लिहिलंय.
अजून ह्यावर ऋन्मेषने कसं लिहिलं नाही, असा प्रश्न पडला होता. Proud
पण खरंच, मी माबोवर आले ते बेफिकीर यांच्या कथा - कादंबऱ्या वाचण्यासाठी. पण इकडे तिकडे बागडताना ऋन्मेष आयडी बऱ्याच ठिकाणी नजरेत भरायचा. आणि प्रतिसाद देतानाचा तुमचा संयम तेव्हापासूनच आवडतो. शिवाय, आपल्या स्वभावातही बरंचसं साम्य असेल, असं नेहमी वाटत राहतं. ( विशेषत: चारचौघात गेलं की, शांत राहणं. Bw )
त्यामुळे मायबोली आठवली की, ऋन्मेष आठवतोच.

छान लिहिलं आहेस. बेफिकीर यांच्या कथा-कादंबऱ्या आणि त्याहीपेक्षा व्यक्तिचित्रणं खरंच खूप उच्च दर्जाची असायची.
तुमचा अभिषेकचे धागे आवडायचे. ऋन्मेषचे प्रतिसाद आवडतात.
(अर्चना सरकार हा तुझाच डुआयडी आहे हे तू ऑफिशियली मान्य केलं आहेस हे मला आत्ताच कळलं)

मस्त लिहिलंय. मी पण आधी मायबोलीवर यायचे ती बेफिकीर यांच लिखाण वाचण्यासाठी. पण नंतर खूप काही सापडत गेलं.

तुम्ही मनापासून लिहिलेलं तुमचं मनोगत आवडलं...
ह्या उपक्रमाद्वारे जुन्या-जाणत्या मायबोलीकरांचे मनोगत वाचायची संधी मिळतेयं..

चिडलो की वेळ जाऊ देतो. थोड्यावेळाने नॉर्मल होईल सारे हे मनाला बजावत स्वतःला त्या व्यक्तीपासून वा सिच्युएशनपासून दूर नेतो. यात बरेपैकी यशस्वीही झालो आहे.>>> अगदी खरं...! हेच जमायला पाहीजे.. यशस्वी होण्याचे सूत्र आहे ते.. तुम्हांला जमतंय ते... त्यासाठी तुमचं अभिनंदन..!

या गणेशोत्सवाचे तर विचारूच नका. ईतके काही वाचण्यासारखे आले आहे की ते अजून पंधरा दिवस वाचून संपणार नाही>>> सहमत ... वेळ कमी पडतोयं वाचायला..

धन्यवाद सर्व प्रतिसादांचे

@ अमितव ओके. असे काही ठरवून नाही केलेय. पण तसे होत असेल चांगलेच आहे. ते आपसूक तसेच राहील.

@ माऊमैय्या
अजून ह्यावर ऋन्मेषने कसं लिहिलं नाही, असा प्रश्न पडला होता. Proud >>>>>>> हो ना, मलाही हाच प्रश्न पडला होता. यावर लिहायची उर्मी आतून का येत नाहीये. पण काल अचानक मध्यरात्री आली. आणि मग रात्र जागवून लिहिले Happy

@ हर्पेन
जरा मोठा झालास ते जाणवतंय >>> अरे देवा... म्हणजे काहीतरी चुकलेय.. पुन्हा लिहायला हवे Proud

@ वावे,
अर्चना सरकार हा तुझाच डुआयडी आहे हे तू ऑफिशियली मान्य केलं आहेस हे मला आत्ताच कळलं
>>>>
हो म्हणजे दोन तीन प्रतिसादांत तसे लिहिलेले. उगाच तेच तेच सगळीकडे डु आय चर्चा होणार त्यापेक्षा डिक्लेअर करून मोकळे झालेले बरे. अर्थात तो वापरणार असतो तर नसते केले डिक्लेअर. काही चर्चेचे धागे काढताना हा एका स्त्री आयडीतून आला तर परीणामकारक होईल असे वाटायचे म्हणून तो आयडी काढलेला. कारण ऑर्कुट समूहांवर माझा असाच मिथिला नामक आयडी तिच्या धाग्यांसाठी आणि रोखठोक प्रतिसादांसाठी फार फेमस होता. तेथील मित्र आजही फेसबूकवर त्याची आठवण काढतात. पण नंतर जाणवले की ईथे मायबोलीवर स्त्रियाच ईतके बिनधास्त लिहिणार्‍या आहेत की ऑर्कुटसारखी परीस्थिती नाहीये. त्यामुळे त्या आयडीचा वापर असा केलाच नाही.

छान लिहिलं आहेस. तस ही मला तुझं लिखाण आवडतच.
त अ चा मी बाप झालो की असाच काहीतरी नाव लक्षात नाही नक्की ,तो खुपच आवडला होता.

ऋन्मे ss ष, पेक्षा ऋन्म्या हाक मारावीशी वाटते तुला. Proud >>> मलाही माझ्या पोराला ही हाक मारावीशी वाटते. पण टाळतो. कारण ऋ आणि रुनम्या अश्या नावाने मलाच मायबोलीवर पुकारले जाते. म्हणून मी त्याला रुनू किंवा रुंट्या हाक मारतो Happy

त अ चा मी बाप झालो की असाच काहीतरी नाव लक्षात नाही नक्की ,तो खुपच आवडला होता.
>>>>
हे ते ममो ताई,
हे लिखाण असे नव्हतेच फक्त तेव्हाच्या भावना होत्या Happy
सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

तसे हल्ली काही डु आयडी सुद्धा माझ्या चाहते व्हा वर क्लिक करतात, का ते त्यांनाच माहीत. आणि ते उडाले की चाहत्यांची संख्या कमीही होते.
>> Lol...

छान लिहिलय.
मी कुठल्याही सोशलसाईटवर पाहिलेले माझ्यामते सर्वोत्तम लेखक बेफिकीर तेव्हाही दणादण कथा लिहीत होतेच. +१

छान लेख. तुम्ही येवढे गंभीर व्यक्तिमत्व आहात असे वाटले नव्हते. Happy

मी शक्यतो तुमच्या धाग्यावर/तुम्हाला प्रतिसाद देत नाही. पण इथे ऑफिशियली आरती असल्याने फार ऊत्तरे लांबली तरी हरकत नाही. Happy

अभिषेकचे लिखाण मला आवडायचे. त्यालाच ८०% टक्के वेळा आणा.

धन्यवाद निलिमा आणि विक्रमसिंह.. मला कोणी गंभीरपणे घ्यावे असे मलाच वाटत नाही. त्यामुळे जरा हवे तसे मनमोकळेपणाने बागडायला सोपे पडते Happy

मस्त रे ऋ. तुझ्यावर वैतागलेल्या लोकांना तू ज्या शांतपणे उत्तरं देतोस ते हटके वाटतं. आवडतं असं नाही म्हणू शकत कारण कधीकधी नुसता पिळतोय असं वाटतं. पण बाकी वेळी मात्र वाटतं, कसं काय जमतं यार!

@ सोनू, धन्यवाद. चांगले असो वा वाईट, आयुष्यात काहीतरी हटके वागावे वा हटके करावे.... पण हे मी तुम्हाला काय सांगतोय, तिथे तुमची बकेट लिस्ट वाचून लोकं धडाधड कोसळताहेत Proud

अभिषेकचे लिखाण मला आवडायचे. त्यालाच ८०% टक्के वेळा आणा. >>> टोटली सहमत. त्या आयडीशी क्रिकेटवर गप्पा मारल्याचे आठवते. ते आवडायचे.

या आयडीचे प्रतिसादही त्या वळणावर जातात अनेकदा, तेवढे वाचतो. बाकी सगळे मी सोडून देतो. कारण मला या आयडीचे प्रतिसाद झेपत नाहीत. उगाच तोंडदेखले छान लिहीले आहे वगैरे म्हणण्यात अर्थ नाही.

काहींना ऋन्मेषचे लिखाण/प्रतिसाद आवडतात तर काहींना अभिषेकचे. अर्थात असे लोकं बोलून दाखवतात ते सांगतोय. मीच नाही ठरवत आहे हे. मी त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा आदर करतो. शेवटी ऋन्मेषही मीच आहे आणि अभिषेकही मीच. तुम्ही या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी खुश ठेऊ शकत नाही हेच खरे. म्हणून कोणी केलेल्य कौतुकाने हुरळून जाऊ नये तर कोणी केलेल्या टिकेने व्यथित होऊ नये हे तत्व मी पाळतो.

टिका करणारा नेहमीच वैरी नसतो. कौतुक करणारा नेहमीच हितचिंतक नसतो. म्हणून एखाद्याच्या माझ्याबद्दलच्या मतावरून मी माझे त्याबद्दलचे मत ठरवत नाही. त्यामुळे सर्व प्रकारची मते वेलकम आहेत. तुमचे प्रतिसाद हिच माझी कमाई Happy

Pages