माझ्या आठवणीतील मायबोली -- वर्षा

Submitted by वर्षा on 18 September, 2021 - 13:46

या विषयाच्या निमित्ताने सदस्यत्त्व जाऊन बघितले तर माझ्या मायबोली वयाचे सोळावे वरीस नजिकच्या भविष्यकाळात लागणार असल्याचे दिसले. काळाचा वेग खरोखर अचंबित करणारा आहे!. अगदी काल परवा तर मी जपानमध्ये होते. २००५ साल. परदेशात मराठीची भूक अधिक जाणवतेच. त्यामुळे केलेल्या आंतरजालीय शोधाशोधीत मनोगत डॉट कॉमचा शोध मला आधी लागला होता. व नंतर मायबोलीचा (बहुतेक)
मनोगतावर सायुरी (माझे आवडते जपानी नाव) या नावाने काही लेखन केले होते.
मायबोली आयडी मात्र खर्‍या नावानेच घेतला. मनोगतावर मराठीत टाईप करणे जमले होते व त्याचसुमारास बरहामुळेही मराठी टायपिंगची सवय झाली होती त्यामुळे चुकतमाकत का होईना मायबोलीवरही मराठीत लिहिणे एका फटक्यात जमू लागले. (मला आठवतंय त्यानुसार मी मनसोक्त नावाचा एक मराठी ब्लॉगही केला होता व मराठी ब्लॉगविश्वाला जोडलाही होता. तो ब्लॉग नंतर समहाऊ गायबच झाला. मला मी आपणहोऊन डिलीट केल्याचे आठवत तरी नाही. त्यासोबत काही लेख जे मी मनोगतावर किंवा मायबोलीवरही प्रकाशित केले नव्हते तेही गेले)
मनोगतावरुन हळूहळू मायबोलीवर मन रमायला लागले. हितगुजवरचे बहुतेक बीबी (बुलेटीन बोर्ड) वाचले जायचे. ''मी अनुभवलेले' मधले मराठी लोकांचे हिंदी, क्रशेस, वेंधळेपणा, इब्लिसपणा इ. बीबी न आवडण्याचा प्रश्नच नव्हता. स्वयंपाकाबाबतीत रुचिरा ऐवजी मायबोली स्थानापन्न झाली होती. इथे बहुतेक पाकशंकाचे समाधान होत असे. Happy सत्यनारायणाचा शिरा ही जयवि यांची रेसिपी व नीधपची दाक्षिणात्य लेमन राईसची रेसिपी मस्त जमल्याहोत्या. तसेच साबुदाण्याची खिचडी मऊ व मोकळी होण्यासाठी साबुदाणा भिजवण्याची ट्रीक एका आयडीने सांगितली होती तीसुद्धा खूप उपयोगी पडली होती.

- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं ?
एखाद्या गोष्टीकडे/घटनेकडे/परिस्थितीकडे/व्यक्तीकडे/अनुभवाकडे बघायचे वेगवेगळे दृष्टीकोन! मायबोली आयुष्यात येण्यापूर्वी माझ्याकडून खूप एकांगी विचार होत असे हे नक्की जाणवले आहे. इथे खूप वेगवेगळ्या पार्श्वभूमी, गुण, उत्तम लाइफस्कील्स असलेले अनुभवसमृद्ध लोक आहेत. त्यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या बरेच शिकायला मिळाले आहे. स्फूर्ती मिळाली आहे.
ऑन लायटर नोट मायबोलीने बहाल केलेले शॉर्टफॉर्म्स मला जाम आवडतात. आजही बोलताना मी अमुक एक पिक्चर अ आणि अ आहे असं बोलतेच! (सामो, यू नो बेटर Happy )
अ आणि अ =अचाट आणि अतर्क्य
हाकानाका = हाय काय नाय काय
हेमाशेपो = हे माझे शेवटचे पोस्ट
रच्याकने = रस्त्याच्या कडेने अर्थात बायदवे
कुकाकुका = कुणाचं काय तर कुणाच काय
खखोदेजा = खरं खोटं देव जाणे
योजाटा = योग्य जागी टाका
हहपुवा = हसून हसून पुरेवाट
टीपापा = टी पार्टी पार्ले
अजून पण असतील. सर्व संकलित करुन एक माबो कोश बनवायला हवा. अमेरिकेला उसगाव म्हणतात हेही इथेच कळले. स्मायल्यांपैकी फिदीफिदी हसणारी स्मायली विशेष आवडते.
मायबोलीवरील केलेल्या थोड्याफार लेखनामुळे लेखनाचा हुरुप नक्की वाढला. लोकसत्ता, लोकप्रभा, साप्ताहीक सकाळ, माहेर (थँक्स टू चिनूक्स), मायमावशी, पासवर्ड (थॅंक्स टू ललिता) इ. ठिकाणी थोडे लिहू शकले.
मायबोलीवरच्या या आयडींचे लेखन मनापसून एन्जॉय केले:
फारेन्ड, अमा, मामी, ललिता-प्रिती, दिनेशदा, जागू, स्वाती२, डॉ कुमार, सामो, साधना, चिनूक्स
मिनोती, मनुस्विनी, सुलेखाच्या पाकृ, कंसराज, यशस्विनीची चित्रे
काही नावे राहिली असू शकतील.

-तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले ?
हा प्रश्न नीट कळला नाही. कुणात बदल जाणवले? मायबोलीत की स्वतःमध्ये? मायबोलीबाबतीत डु आयडीची वाढलेली संख्या हा जाणवलेला बदल. स्वतःबाबतीतला बदल असेल तर पहिल्या उत्तरात कवर झाले आहे.

-इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
नवीन मायबोलीत आपल्या चॉइसनुसार लेखन वाचायला मिळते आहे त्यामुळे ज्यात इंटरेस्ट नाही असे लेखन नजरेस पडत नाही. तसंच थेट 'नवीन प्रतिसादा'वर उडी मारण्याची सोय. ही फार मस्त आहे.

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
- खास असं काही आठवत नाही

तुम्ही मायबोलीला काय दिलं
- विशेष असं काहीही नाही.

तुमचं कुठलं लेखन गाजलं ?
- लेखनापेक्षा माझ्या कलर्ड पेन्सिल चित्रांचे माबोकरांनी भरभरुन कौतुक केले त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.
तसंच डोळ्यांचे वेगवेगळे रंग असणार्‍या मांजराचे फोटोफिचर बर्‍याच जणांना आवडल्याचे कळले. माझेही ते पर्सनल फेवरीट आहे.

मायबोलीवर फेरी मारली नाही तर चुकल्याचुकल्यासारखे वाटते इतकी सवय झालीय. मायबोलीइतके इतर कुठलेही संकतेस्थळ "आपले" वाटत नाही. या सम हेच संकेतस्थळ दिल्याबद्दल मायबोली प्रशासकांचे अनेक आभार!

Group content visibility: 
Use group defaults

मस्त Happy

मनोगतावर सायुरी (माझे आवडते जपानी नाव) या नावाने काही लेखन केले होते. >>>> मायबोलीच्या एका जुन्या दिवाळी अंकात बहुतेक ह्याच आयडीने लिहिलेला जपानामधल्या खादाडी बद्दलचा लेख लिहिला होता, तो तुझाच होता का ? त्यात मी त्या सोबा आणि उदोन ह्या दोन नुडल्स प्रकाराबद्दल पहिल्यांदा ऐकलं होतं.

पराग येस! हो तो माझा लेख होता. बरोबर. मग बहुतेक मी माबोवर पण सायुरी नावाने आले असेन. पण माबोचे नूतनीकरण झाले तेव्हा वर्षा हा आयडी घेतला.

मस्त ग
तुझी चित्र फार म्हणजे फारच आवडायची। कलर्ड पेन्सिलकडे बघण्याची दृष्टीच तू बदलून टाकलीस माझी, थांकु Happy

मस्त लिहिलंय
सायुरी आयडी चे लिखाण वाचल्याचे आठवतेय.

मस्त लिहीलयस

मला तू एकदम शांत सभ्य कमी दंगा करणारी मुलगी म्हणून आठवत्येस

तुझे पेन्सिल स्केचेस तर अफाट सुंदर, 'ये हात मुझे दे दे वर्षा' अस म्हणावस वाटण्याइतके सुंदर

सायुरी ! येस्स!
इंटरनेटी गप्पांमध्ये अगदी सुरुवातीला ज्यांच्याशी मी बोलायला लागले त्यात सायुरी होती. (बहुधा मनोगतमुळे आपण बोलायला लागलो का? मला नक्की आठवत नाही.)

तुझी चित्र फार म्हणजे फारच आवडायची। कलर्ड पेन्सिलकडे बघण्याची दृष्टीच तू बदलून टाकलीस माझी, थांकु Happy>>>>>हो मी पेन्सिली विकत घेतल्या तुझी स्केचेस बघून. छान लिहीलय हेवेसान. Happy

थँक्यू अवलताई. Happy
कविन, हाहा थँक्स!
ललिता होय होय. ललिता-प्रिती प्रथम मनोगतावर भेटली असं एक वाक्य मी लिहिलंही होतं पण तुला आठवेल की नाही असं वाटून मग खोडलं Proud
मंजूताई, धन्यवाद. तुमचा तिथला आयडी 'मंजू' असा होता का?
धनुडी, छान वाटलं वाचून, धन्यवाद. Happy