लेखनस्पर्धा - माझे कोविड लसीकरण - रुपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 17 September, 2021 - 00:04

माझे कोविड लसीकरण..!

द्वापार युगात कालिया नामक सर्पाने यमुनेच्या डोहाला विळखा घालून अवघ्या गोकुळास वेठीस धरले होते, तश्याच प्रकारे आजच्या कलीयुगात गेल्या वर्षापासून करोना नामक सर्पाने समस्त मानव जातीला विळखा घालून वेठीस धरून ठेवले आहे. करोना महारोगाने गेल्या सालापासून संपूर्ण दुनियेची घडी जी काही विस्कटवून टाकली आहे ती, अथक प्रयत्नांती ही अजून नीट बसलेली नाही.

जानेवारी २०२० ला करोनाच्या विषाणूने भारतात शिरकाव केला आणि मार्च अखेरीस करोनाला रोखण्याचा शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लावले.

__ आणि क्षणार्धात अवघा देश ठप्प झाला.

करोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. करोनाच्या राक्षसाने अवघ्या पृथ्वीतलावर दहशत माजवली. असंख्य निष्पाप जीवांची ह्या महामारीत आहुती पडली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अनेक निष्पाप बालकांच्या पदरी अनाथपण आले. बऱ्याच लोकांनी रोजगार गमावले. धरतीवरच्या मनुष्य नामक प्राण्याला 'न भूतो न भविष्यती' अश्या परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली.

अनेक नैसर्गिक आपत्तींना धीरोदत्तपणे तोंड देणारा मानव ह्या महामारी पुढे हतबल झाला. समोर आलेल्या अकल्पित आणि अनपेक्षित संकटाने भयकंपित झाला.

दिवसेंदिवस करोनाचा राक्षस मोठ्या दिमाखात पावले टाकत शहरी तसेच ग्रामीण भाग पादक्रांत करत पुढे - पुढे निघालेला... !!

ह्या करोनाच्या राक्षसाला रोखणं गरजेचं होतं; पण रोखणार तरी कसं ..? त्यात भर म्हणजे करोनाच्या विषाणू बद्दल रोज नव-नवीन माहिती समोर येत होती. ह्या महामारीवर औषधाची मात्रा शोधण्यासाठी जगभरातले वैद्यकीय तज्ञ अहोरात्र मेहनत घेत होते.

__ शेवटी डिसेंबर २०२० ला , जी बातमी ऐकण्यासाठी अवघ्या जगाचे कान आसुसले होते, ती बातमी समोर आली. करोनाला रोखू शकेल अशी लस भारतात आणि इतर देशात बनविली गेली. ह्या बातमीने खरं तर वर्षभर मनावर साचलेले अनामिक दडपण काही प्रमाणात कमी झाले.

जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. सरकारने प्रथमतः करोना योद्धा आणि आरोग्य कर्मचारी ह्यांना लस देण्याचे ठरविले. त्यासाठी सरकारी यंत्रणेचे अभिनंदन करायला हवे. करोना काळात आरोग्य कर्मचारी, करोना योद्धा ह्यांनी करोना कालीन अवघड परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली त्यासाठी त्यांना त्रिवार अभिवादन....!

करोना योद्वांच्या लसीकरणानंतर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण देशात सुरू केले गेले, त्यावेळी वाटलं की, अजून वर्षभर तरी आपल्याला कोविडची लस काही टोचली जाणार नाही. पुन्हा त्यात करोना लसींबद्दल अनेक तर्क-वितर्क , अफवा पसरवल्या जात होत्या. काही जणांना लस घेतल्यावर , काही प्रमाणात त्रास झाला होता आणि ते ऐकून मनात एक अनामिक भीती ठाण मांडून बसली होती.

त्याच दरम्यान मायबोलीवर कुमार सरांच्या धाग्यावर मायबोलीवरील वैद्यकीय तज्ञ ; करोना आणि लसीकरण यावर चांगल्या प्रकारे माहितीपूर्ण चर्चा घडवून, उपयुक्त माहिती पुरवत होते, त्यामुळे मनात भिरभिरणाऱ्या अनेक शंका- कुशंका, समज- गैरसमज दूर होण्यास मदत होत होती.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात माझे पती जिथे नोकरी करतात त्या खात्याने त्यांच्या नोकरदार वर्गासाठी कोविड लसीकरण ठेवले आणि त्यानंतर पुढच्याच आठवड्यात नोकरदारांच्या पत्नीसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले गेले. लस घेण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक होते. माझ्या पतींनी माझ्या नावाची लसीकरणासाठी नोंदणी केली ; तोपर्यंत लसीकरणाची तारीख मला माहित नव्हती.

__आणि त्याच दरम्यान नेमके कुठल्यातरी कारणावरून पतिराजांनी माझ्याशी अबोला धरला. ( स्वानुभावरून मला वाटते , जगातल्या पती-पत्नींना एकमेकांवर रागवायला , एकमेकांशी अबोला धरायला काही ठोस कारण लागत नसावं बरं..!)

तर आमची स्वारी अबोला धरुन बसलेली... त्याच संध्याकाळी लेक हातात पेपर घेऊन माझ्याकडे आला.

" आई, हे बघ ... बाबांनी पेपर दिलेत ..!"

त्याने असे म्हटल्यावर मी थरथरत्या हातांनी पेपर त्याच्या हातून घेतले.

कसले पेपर असतील बरं..?? मनात अनेक शंका-कुशंका फेर धरून नाचू लागल्या.

आजच वृत्तपत्रात एका पती महाशयांनी , पत्नी सारखी मोबाईल वर गेम खेळते म्हणून घटस्फोट घेतला... अशी बातमी वाचली असल्याने छातीत उगीच धडकी भरली... काय घ्या ... असेच काही पेपर असले तर..??

' मन जे चिंती ते वैरी न चिंती..' !! हेच खरं....!

__- तर मनात उठलेल्या वादळाला शांत करत मी शांतपणे पेपर उघडले आणि कोविड लसीकरण नोंदणीचे पेपर पाहून माझा जीव भांड्यात पडला.

पण हे काय...?? पेपरावरची तारीख पाहून मनात अनेक भाव तरंग उठले.

२४ जून...अरे देवा...!! त्यादिवशी नेमकी वटपौर्णिमा होती आणि त्यानिमित्ताने माझा उपास सुद्धा..!! नेमका हाच दिवस मिळाला का लस टोचून घ्यायला..??

तेवढ्यात पतीराजांची स्वारी समोरून येताना दिसली. मी अगदी भरल्या डोळ्यांनी त्यांचावर कटाक्ष टाकला.. पण पुरुष हृदय कित्ती कठीण बाई ते ... अश्याने थोडेच विरघळणार..??

अचानक मस्तकात गाणं वाजू लागलं....
" का रे अबोला... का रे दुरावा...??
अपराध माझा असा काय झाला ..??

माझा काय अपराध घडला की, नेमका हाच दिवस मला लस टोचून घ्यायला मिळावा..?? पतीराजांना ओरडून प्रश्न विचारण्यासाठी ओठावर आलेले शब्द मी चटकन् गिळून टाकले.

वटपौर्णिमेला पतीराजांकडून मला असे 'सरप्राईज गिफ्ट' मिळाले. खरं तर लसीचा तुटवडा असल्याने लस मिळणे म्हणजे अलभ्य लाभ होता. त्यामुळे काहीही झाले तरी लसीकरण टाळायचे नाही हे मी ठरवले.

__ आणि दुसऱ्या दिवशी लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जायचे ठरविले.

कोविड लसीकरण केंद्र आम्ही रहात असलेल्या वसाहती मध्येच होते. वसाहत मोठी असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होईल म्हणून मी लवकरच लसीकरण केंद्रावर पोहोचले. तिथे पाहते तर काय ... बरेच स्त्री-पुरुष लसीकरण केंद्रासमोर उभे...!! मनात म्हटलं, फक्त स्त्रियांसाठी लसीकरण शिबिर आहे ना... मग एवढे पुरुष का बरं हजर असावेत इथे..?? नंतर माझ्या लक्षात आले की, ते सर्व आपापल्या पत्नीसोबत आले होते.

तेवढ्यात पतीराजांचे एक सहकारी मित्र सपत्नीक समोर अवतरले.

"काय वहिनी, तुमचे पतीदेव कुठे आहेत..?? एकट्याच आलात लस घ्यायला...?? " माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्यांनी यथासांग पार पाडले.

" आज वटपौर्णिमा आहे आणि हिचे कोविड लसीकरण सुद्धा ; तर असे दोन दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे मी हिच्यासाठी आज हाफ डे घेतला बरं..!"

पाडा ठिणग्या, लावा आग ... आणि अजून आगीत पेट्रोल ओता तुम्ही ... !! असे अर्थातच मनात म्हणत मी हसत- हसत त्यांना म्हणाले,

" वा.. छान भाऊ, कित्ती काळजी करता तुम्ही वहिनींची...!"

__ आणि वहिनीसाहेब सुद्धा मोठ्या कौतुकाने आपल्या पतींचे बोलणे ऐकत ओठातल्या ओठात हसू खेळवत होत्या.

ह्याच वहिनीसाहेब चार दिवसापूर्वी बाजारात भेटल्या होत्या , तेव्हा आपल्या पतीराजांना आपली कशी काळजी नाही ते रंगवून रंगवून मला सांगत होत्या. लब्बाड कुठल्या..!!

मी मनात म्हटलं, 'ज्याचं त्याला नी गाढव फक्त ओझ्याला ...!'( मंडळी , म्हणीचा शब्दशः अर्थ घेऊ नका बरं...! .)

_ तर पतीराजांच्या मित्राने पाडलेल्या ठिणगीचा आता माझ्या मस्तकात वणवा भडकला होता. त्यातून एक फोन करून साधी चौकशी करण्याची तसदीही आमच्या स्वारीने घेतली नव्हती. महाशयांना आपली काही काळजीच नाही, असे माथा भडकाऊ विचार माझ्या मस्तकात भ्रमण करू लागले... आणि पुन्हा एकदा त्या वणवा पेटवणाऱ्या विचारांना दूर सारून मी लसीकरण केंद्रावरच्या रांगेत जाऊन बसले.

माझा नंबर तसा लवकर लागला. लस घेण्याआधी हॉस्पिटलचे कर्मचारी पोटभर नाश्ता केलाय का हा प्रश्न विचारत होते. खरं तर मी त्या दिवशी पोटभर नाश्ता केला नव्हता फक्त फलाहार केला होता... ( पोटभर नाश्ता न करता जाणं खूप चुकीचंच होते आणि माझ्या हातून ती चूक घडली होती; याची जाणीव मला आहे आणि पुन्हा ही चूक कधीही होऊ नये म्हणून निश्चितच काळजी घेईन..)

_ शेवटी लस टोचली जात होती त्या हॉलमध्ये एकदाचा मला प्रवेश मिळाला.

लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना लसीकरण संदर्भात जी माहिती हवी होती ती मी त्यांना दिली.

__ आणि एकदाचे मी लस घेण्यासाठी खूर्चीवर विराजमान झाले..

जेवढा आनंद ' कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाच्या हॉट सीटवर , अमिताभ बच्चन समोर बसताना स्पर्धकांना होत असेल तेवढाच कदाचित त्यापेक्षा किंचित जास्त आनंद मला त्या कोविड लसीकरण केंद्रातल्या खुर्चीवर बसल्यावर झाला.

__आणि मस्तिष्कात अचानक गाणं वाजू लागलं ...

"जिसका मुझे था इंतजार...
जिसके लिए दिल था बेकरार...
वो घडी आ गयी... आ गई...!!

इंनेक्शनची सुई टोचून घेणं हे काही कुणासाठी नवीन नाही ... याआधी ही प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात इंजेक्शन टोचून घेतले असणारच ; तरिही माझ्या मनावर एक अनामिक दडपण आले होते. कदाचित जन-मानसांत करोनाची दहशत असल्यामुळे असे दडपण येणे स्वाभाविक होते असं मला वाटते.

__तर जशी जशी पारिचारीका माझ्या दंडावर सुई टोचण्यासाठी पुढे सरसावू लागली.. तसं तसं त्या इंजेक्शन च्या टोकदार सुईकडे पाहताना जेवढे माझ्या छातीत लग्नात अंतरपाट दूर होत असताना, ' आली लग्नघटीका समीप... " हे भटजींचे शेवटचे मंगलाष्टक ऐकताना धडधडले नसेल त्यापेक्षा जास्त धडधडू लागले.

__ आणि तेवढ्यात समोरच उभ्या असलेल्या मैत्रिणीने हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. अंगठा उंचावून पोझ देण्याच्या नादात सुई कधी दंडाला टोचली गेली हे मला जाणवले सुद्धा नाही.

इतरांचे लस टोचून घेतलेले whats App च्या स्टेटस वरचे फोटो पाहून नाक मुरडलेली मी... स्वतः मात्र अगदी नाक उंच करून नाही... नाही... अंगठा उंचावलेले फोटो whats App च्या स्टेटसला टाकण्यास अगदी मोहवश झाले.

__आणि एकदाचा लसीकरणाचा तो फोटो मी whats App च्या स्टेटसला अपलोड करून टाकला.

माझा whats App वरचा स्टेटस पाहून पटकन मैत्रिणीचा व्हाट्सअप वर मेसेज आला.

" चला बाई , एकदाची तू अमर झालीस ...मग येतेस ना वडाची पूजा करायला..??"

मी आपलं उगीचच ' तिला 'hmm' म्हणून तिला reply केला.

लस टोचून घरी आले , तरी पतीराजांनी एक साधा चौकशीचा फोन सुद्धा केला नव्हता... इतका राग आला होता म्हणून सांगू तुम्हाला ..?? माझ्या मस्तकात पेटलेला वणवा आता भडकत चालला होता... शेवटी त्यावर उतारा म्हणून थंडगार पाणी प्यायले तेव्हा कुठे तो वणवा थोडासा विझला...!

__आणि तेवढ्यात अचानक फोन वाजला.. फोनच्या स्क्रीनवर पतीराजांचे नाव पाहून मी घुश्श्यातच फोन उचलला.

" घेतली ना लस..?? काही त्रास होत नाहीये ना..??" ह्या त्यांच्या प्रश्नांवर मी अगदी साखरेसारखी विरघळून गेले... लस टोचलेल्या हातावरच्या वेदना काही प्रमाणात कमी झाल्याचा भास मला झाला.

पण क्षणार्धात माझा क्रोध मूळपदावर आला आणि मी घुश्श्यातचं हुंकार भरला.

" अरे हो, आज तुझा उपास असेल ना.???. मी काय म्हणतो .. आज नको करू उपास... त्रास होईल.... खाऊन घे काहीतरी..!"

मी म्हटले , "असं कसं ..??? तुमच्यासाठी ठेवलायं ना उपास..??"

" नाही मी काय म्हणतो, तू नको करू उपास.. ते सात जन्म म्हणजे अतिच होते नाही का..??" फोनवरचे पतीराजांचे खो-खो हसणे ऐकून मस्तकातला थोडाफार विझलेला वणवा पुन्हा एकदा भडकला.

__ आणि उपास नको करू सांगण्या मागचा पतीराजांचा कावा ओळखून मी फोनवरून त्यांना सरळ धमकी दिली...

" या तुम्ही घरी ... बघतेच तुम्हांला..!"

पण संध्याकाळी येताना माझ्या आवडीची मँगो लस्सी आणि सुगंधित मोगऱ्याचा गजरा प्रेमाने आणणाऱ्या पतीराजांना मी त्यांच्या गुन्ह्यासाठी माफ करून टाकले.

__ आणि कोविड लसीकरणाच्या निमित्ताने आमच्यातला अबोला सुटला बाई एकदाचा..!!

__ तर कोविड लसीकरणाच्या पहिल्या लसीचा हा किस्सा कायमच माझ्या स्मरणात राहिल.

कालच्या गुरुवारी गणेशोत्सवा दरम्यान माझा कोविड लसीकरणाचा दुसरा डोसही पूर्ण झाला. यावेळेस मात्र पतीराज माझ्यासोबत लसीकरण केंद्रावर आले. मला वाटलं, माझ्यासाठी खास सुट्टी घेतली साहेबांनी ... नाही नाही ...गोड गैरसमज झाला माझा..!! .. दुसऱ्याच कामासाठी अर्धा वेळ सुट्टी घेतली होती त्यांनी ..!!

जाऊ द्या... फुल नाही तर नाही... फुलाच्या पाकळीवर मी आनंद मानून घेतला.

कोविड लसीची दुसरी मात्रा टोचून घेतल्यावर लसीकरण केंद्रातून बाहेर पडताना माझ्या डोक्यात मात्र हे गाणं वाजू लागलं...

"हम होंगे कामयाब ...हम होंगे कामयाब.. एक दिन..!
हो.. हो.. मन में है विश्वास... पूरा हे विश्वास..
हम होंगे कामयाब .... एक दिन...!

__आणि हा असाच विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात फुलत असणार असे मला वाटते.

तर लसीकरणाचे माझे दोन्ही डोस हे वटपौर्णिमा आणि गणेशोत्सव ह्या दोन्ही सणांसोबत मी साजरे केले.

__ त्याचा आनंदही मी माझ्या परीने घेतला.. मनात करोनाची कुठलीही भीती न बाळगता..!

आज जरी करोनाच्या विषाणूला पूर्णपणे हरवणं सोप्पं नसलं तरी अशक्य नक्कीच नाही. जगभरातले सगळे देश आणि आरोग्य संस्था आपापल्या परीने आपल्या जनतेची काळजी घेत आहेत. ह्या महारोगा विरोधात जनजागृती करत आहेत. आपले आरोग्य हित जपण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे , आपली काळजी घेणे आवश्यक आहे. शेवटी काय तर ' जान है तो जहान है..!' हे खोटे नाही.

शेवटी जाता - जाता हे म्हणावेसे वाटते की,

चला जपूया अपुल्या आरोग्याचे हित
देऊनी संपूर्ण लसीकरणाला साथ....!
स्व-काळजी घेऊया अपुली आपण
मिळूनी सारे करुया दुष्ट करोनावर मात...!

गणपती बाप्पा मोरया..!

धन्यवाद...!

रूपाली विशे - पाटील

________________ XXX_______________

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रुपाली ,

काय धमाल लेख लिहिला आहे . मस्त च एक नंबर !
इतका रुक्ष विषयही असा लिहिता येतो .

अन लेख लिहितानाच मूळचं लेखकपण लपत नाही . साध्या गोष्टी पण किती छान अलंकारिक होऊन पेश होतात .

भारी !

धन्यवाद बिपिनजी ,
तुमच्या सुंदर प्रतिसादासाठी..!

कदाचित हा लेख लिहिता यावा म्हणून योगा योगाने वटपौर्णिमेलाच माझे कोविडचे लसीकरण झाले असावे .. असं आता वाटते.

छान लिहिले आहे.
प्रथम क्रमांकाबद्दल हार्दिक अभिनंदन.

सामो, तेजो, शर्मिला, धनुडी, किशोरजी, वीरुजी, अमुपरी खूप धन्यवाद...!

धनुडी - धन्यवाद, लस घेताना फोटो काढावा हे मनात हि नव्हते , पण मैत्रीणीने तिच्या मोबाईलमध्ये फोटो घेतला ... पण चांगलं झालं, लेखाच्या निमित्ताने निदान फोटो इकडे चिकटवता तरी आला... त्यासाठी ऋन्मेषना धन्यवाद.. स्पर्धेच्या धाग्यात त्यांनी ( गंमतीत ..??) लिहिले होते की, लेखनासोबत तो लस घेतल्यानंतरचा फोटो जोडणे सुद्धा कंपलसरी लिहा नियमात म्हणून...! लेखात फोटो टाकायची कल्पना त्यांच्या प्रतिसादातून घेतली...

अभिनंदन रुपाली..
आणि कल्पनेचे श्रेय दिल्याबद्दल धन्यवाद Proud पण ती कल्पना मला द्यायचीच होती, कारण मला स्वतःला टाकायचा होता. ईतरांनीही टाकणे गरजेचे, नाहीतर नेहमीसारखे मीच एकटा शायनिंग मारतोय असे वाटले असते Wink

ऋन्मेष - धन्यवाद...! थोडी शायनिंग मी पण मारली बरं फोटो टाकून..!!
मनीमोहोर ताई, सोनाली खूप धन्यवाद..!

Pages