मूर्ती लहान पण ( बालकथा )

Submitted by बिपिनसांगळे on 14 September, 2021 - 13:53

मूर्ती लहान पण
--------------------
ते एक भेटवस्तूंचं भलंमोठं दुकान होतं .
आरव त्या दुकानाबाहेर उभा राहून शोकेसमधल्या वस्तू पहात होता . डोळ्यांवर येणारे केस मागे करत . लॉकडाउनच्या काळात केस फारच वाढले होते बिचाऱ्याचे . सारखे सारखे कापायला आईला वेळ तर असायला हवा ना !
बापरे ! किती वस्तू होत्या तिथे . तऱ्हेतऱ्हेच्या चिनी, फेंगशुईच्या वस्तू . छोट्या बांबूंच्या कुंड्या ,तोरणं- माळा . अनेक छोटी, खोटी फुलझाडं. शिवाजी महाराज , बुद्ध , कृष्ण आणि अनेक देवमंडळी . त्यामध्ये काही विदेशी मंडळीही होती बरं का . जुन्या युरोपिअन थाटाचे कपडे घातलेले देखणे तरुण - तरुणी .
त्याला गुलाबांच्या कुंड्या हव्या होत्या , त्या काही तिथे त्याला दिसल्या नाहीत .
एका माणसाने त्याला विचारलं .” काय पाहिजे ? “
त्यावर तो बघतो म्हणाला .
दुकान मोठंच होतं . त्याच्या पुढच्या भागातच काय ती गर्दी होती . तो फिरत फिरत दुकानाच्या मागच्या भागात पोचला . अनेक रॅक्सच्या रांगा तिथे होत्या . त्यात ठेवलेल्या अनेक वस्तू . या भागात कोणी नव्हतं . प्रकाशही कमी होता. कुबट वास येत होता .
तिथे त्याला एक मूर्ती दिसली .एक लहान मुलगी . खाली बसलेली . पाय जवळ घेऊन, गुडघ्यावर हात ठेवून, हनुवटीला बोट लावून . गोरी ,युरोपिअन . छानसा पांढरा फ्रील्सचा फ्रॉक . त्यावर लाल रंगाचं जॅकेट . डोक्यावर काळी हॅट. त्यातून बाहेर आलेले रेशमी केस . ती गोड पोरगी कसल्या विचारात गढलेली असावी ? ...
त्याला ती फार आवडली. त्याने ती उचलली .जवळून पाहिली . परत जागेवर ठेवताना - ती खालीच पडली !
त्यासरशी त्या मूर्तीला खालून लावलेल्या प्लॅस्टरचा तुकडा तुटून पडला. त्यातून काहीतरी खाली पडलं.
ते पाहून तर त्याचे डोळेच विस्फारले .
काय असावं ते ? ...
------
गणपती जवळ आले होते . श्रावण संपायला आला होता .
आरवचे आई- बाबा दोघेही आयटी कंपनीत काम करणारे. त्या दोघांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. घरी असले तरी त्यांना वेळ मात्र नव्हता . सतत काम न काम .
गणपतीच्या तयारीच्या विचाराने आईचा जीव खालीवर होत होता . घराची स्वच्छता अन सजावट ?...
त्यावर आरवने स्वच्छतेचं काम हाती घेतलं . अन केलं ते काम . आईची मदत घेऊन . एकदोन वस्तू पाडून . एकदोन वस्तू फोडून.
मग तो आईला म्हणाला , “ बघ आई, झालं की नाही एक काम .”
“ हो तर - एकाची दोन कामं झाली की , “ आई हसत म्हणाली .
मग तो म्हणाला , “ आता सजावटीचंही मी बघतो “.
त्याच्या डोक्यात असं होतं की गणपतीच्या आजूबाजूला गुलाबाच्या फुलांच्या कुंड्या ठेवाव्यात . डच गुलाबांच्या . अर्थात खोटी फुलं , सजावटीची .
त्याच्या बोलण्यावर आईने त्याला प्रेमाने जवळ घेतलं . त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली , “ राजा , कित्ती चांगला मुलगा आहेस रे तू ! “
त्याची छाती फुगली अन लगेच कमीही झाली . कारण आई पुढे म्हणाली , “ पण नीट करशील ना ? नाहीतर माझंच काम दुप्पट करून ठेवशील ! पसारा करून .”
कारण आरव म्हणजे उद्योगी पोरगा होता . अंगाने किडकिडा असला तरी . तुमच्यासारखा चांगला पोरगा असला तरी .
आणि त्या दुकानात त्याने उद्योग करून ठेवलाच होता ! ...
------
आरवने आजूबाजूला पाहिलं. नशीब ! मूर्ती खाली पडल्याचा , ती तुटल्याचा प्रकार कोणी पहिला नव्हता. त्याने ती पडलेली गोष्ट परत त्या मूर्तीच्या आत ठेवली. कोणाची चाहूल नव्हती . शेजारी बॉक्सची भिंत झालेली होती. एक बॉक्स थोडा फाटला होता. त्यामधून तीच मुलगी डोकावत होती. त्याने अंदाज घेतला अन चपळाईने आणखी एक -दोन बॉक्स उचकले .
तो काही न घेता त्या दुकानातून बाहेर पडला. थेट विऱ्याकडे. विऱ्या त्याचा खास मित्र. त्याने विऱ्याला ती गंमत सांगताच त्याचेही डोळे विस्फारले गेले.
विऱ्याने त्याच्या बाबांना फोन केला. इन्स्पेक्टर महेश यांना . थोड्याच वेळात ते घरी आले.
आरवने इन्स्पेक्टरकाकांना सगळं सांगितलं ,” आणि काका, तिथे बरेच बॉक्स आहेत. सगळ्यात तीच मुलगी आहे. आपल्या पोटात रहस्य लपवून बसलेली.”
मग पोलिसांनी त्या दुकानावर धाड घातली.
त्या सगळ्या मुलींच्या मुर्त्यांमध्ये छोटेसे बॉक्स होते. त्यामध्ये कोविडची लस होती. एका भारतीय कंपनीने तयार केलेली – नवीन, प्रभावी लस . जिला खूप मागणी होती . कारण तिची एकच मात्रा पुरेशी ठरणार होती .
त्या मुर्त्या परदेशात पाठवल्या जाणार होत्या. अर्थात चोरीछिपे !
काळ्या बाजारात त्या लशींची विक्री होणार होती. आधी तो बेरकी दुकानदार नाहीच म्हणाला. पण पोलिसांनी त्या दुकानदाराला रंगेहात पकडलं, मुद्देमालासकट.
त्यावेळी आरवला वाटलं की ती गोड पोरगी हनुवटीला बोट लावून हाच विचार करत असेल - का बरं माझा असा वाईट कामासाठी उपयोग केला जातोय ? ...
पण आता ती औषधं भारतातच राहणार होती. आपल्याच देशातील लोकांसाठी.
आरवचं सगळीकडे कौतुक झालं.
त्याच्या गल्लीतल्या गणेशमंडळाने त्याला बक्षीस दिलं. प्रशस्तिपत्रक आणि दहा हजार रुपये रोख !
मंडळाचे अध्यक्ष म्हणाले,” आरव म्हणजे - मूर्ती लहान पण कीर्ती महान !”
आरव मनात म्हणाला ,’ तेच तर ना . त्या मुलीची मूर्तीपण अशीच लहान होती - पण ....’
या सगळ्यात घरातल्या गणपतीची सजावट ? ती तर राहिलीच होती. अन वेळही नव्हता हाताशी .
आई म्हणाली, “ राजा , खूप मोठं काम केलंस रे तू ! आम्हाला अभिमान आहे. पण माझ्या कामाचं काय ?”
“ आई, तू काही काळजी करू नकोस.” आरव म्हणाला .
मग त्याने बक्षीस मिळालेल्या पैशांमधून बाप्पासाठी एक मंदिर विकत आणलं . पर्यावरणपूरक साहित्याचं आणि आसन म्हणून एक खास चौरंग.
गणपती बाप्पा आला. त्या चौरंगावर विराजमान झाला. त्याचे बाबा कौतुकाने त्याच्याकडे आणि गणपतीकडे पहात होते .
आरवने बाप्पाकडे पाहिलं. त्याला नमस्कार केला. बाकीच्यांचं माहिती नाही. पण त्याला स्वतःला मात्र गणपतीच्या डोळ्यांमध्ये त्याच्याविषयी कौतुकाचे भाव दिसले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त कथा...
कथेतल्या आरवची हुशारी कौतुकास्पद आहे..