माझ्या बकेट लिस्ट चा प्रवास -- मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 13 September, 2021 - 10:57

सामान्य माणसांची स्वप्न ही सामान्यच असतात. " लाखाची गोष्ट " सिनेमा सारखं एकदम लाखभर रुपये मिळाले तर खर्च करणे ही कठीण अशी आमची स्वप्न. तर माझ्या अनेक छोट्या छोट्या स्वप्नांपैकी हे एक ...

बँकेत जॉब करणाऱ्या प्रत्येकाची caiib ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मनोमन इच्छा असतेच. ही परीक्षा फार सोपी नसते कारण ती पास होणाऱ्याला बँकेकडून काहीतरी आर्थिक फायदा मिळणार असतो पण एवढी कठीण ही नसते की लोकं त्या बाजूला फिरकणार नाहीत आणि परीक्षा घेणाऱ्या institute चा परीक्षा फी हा मुख्य प्राप्ती स्रोत कमी होईल. ही परीक्षा indian institute of bankers ही स्वायत्त संस्था घेत असते. ह्या संस्थेचे caiib आणि इतर ही अनेक सर्टिफाईड कोर्स आहेत. असो.

रिजर्व बँकेत नोकरीला लागल्यावर इतरेजनांप्रमाणे माझं ही caiib पास होणं हे स्वप्न होतं. उत्साहाच्या भरात मी ही परीक्षा फॉर्म भरला , तीन विषयात पास ही झाले पण अकाउंटन्सी ह्या विषयावर गाडी अडली. मी आर्टस् ची विद्यार्थिनी असल्याने कॉलेज मध्ये हा विषय अजिबातच शिकलेला नव्हता. क्लास लावला तर जरा मार्गदर्शन मिळेल म्हणून त्यासाठी रुईया कॉलेज मध्ये रविवारचा असणारा स्पेशल क्लास ही लावला. दोन रविवार उत्साहाने गेले ही पण विषय फारच डोक्यावरून गेला. बेसिक डेबिट क्रेडिट च शिकवत होते पण मला जेव्हा एखादी entry डेबिट entry वाटे तेव्हा ती असे क्रेडिट enrty. माझा बेसिक्स मध्येच झोल होता खूप. त्यामुळे सहाजिकच इंटरेस्ट गेला आणि caiib ही काही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही म्हणून तेव्हा तो नाद सोडून दिला.

मध्ये अनेक वर्षे गेली. मुलंबाळं ,त्यांची आजारपणं, मग पुढे त्यांच्या शाळा अभ्यास, क्लास इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या ह्यात caiib पार विसरून गेले. यथावकाश मुलं मोठी झाली, मुलीच लग्न झालं, मुलगा शिक्षणासाठी परगावी गेला. घरी आलं की थोडी सवड मिळू लागली. माझ्या मैत्रिणीची ही हीच परिस्थिती होती. तिने एक दिवस caiib चा विचार माझ्या मनात पुन्हा रुजवला. पहिल्यांदा आता रिटायर व्हायची वेळ आली , आता कुठे ह्या अभ्यासाच्या फंदात पडायचं असच वाटलं पण पुढचे काही दिवस लंच टाईम मध्ये आमच्यात ह्याच चर्चा रंगत गेल्या आणि ती माझी मैत्रीण माझं मत परिवर्तन करण्यात यशस्वी झाली. फॉर्म भरला , पुस्तक आणली ... वरवरची सगळी तयारी झाली. आता मुख्य अभ्यास बाकी होता.

ह्या नवीन फॉरमॅट मध्ये तीनच पेपर होते आणि परीक्षेचं स्वरूप mcq होतं. उरलेल्या दोन विषयात पास झालो तर accountancy च बघू अस ठरवलं होत आम्ही दोघीनी. पहिला पेपर बँकिंगचा होता. सरस्वती मराठी मिडीयम शाळेत आमचा नंबर आला होता. ह्या निमित्ताने मला एवढी प्रसिद्ध शाळा बघायला मिळाली म्हणून caiib चे मनोमन आभार मानले मी. आम्ही वर्गात जाऊन बसलो, टेन्शन आलं होतं ही आणि नव्हतं ही. प्रश्नपत्रिका वाटण्यात आली. उत्तरं ही त्यावरच लिहायची होती. एकेक प्रश्न कसा बसा सोडवत पुढे जात होते. पेपर अजिबातच सोपा वाटत नव्हता.पर्यायी उत्तर सगळीच बरोबर वाटत होती. पण केलेला थोडा अभ्यास ,थोडा कॉमन सेन्स ह्यावर तारून नेत होते. शेवट वेळ संपत आली, शेवटचे काही प्रश्न तर न वाचताच कशावर तरी टिक मारून कसे तरी सोडवले .

पहिला डाव देवालाच द्यावा लागणार आहे , आता दुसऱ्यावर तरी नीट लक्ष देऊ या म्हणून पुढच्या पेपरसाठी सरळ आठवड्याची रजा घेतली. अभ्यास नको वाटत होता म्हणून घरकामात फारच रस आला होता त्या आठवड्यात. वेळ फुकट जातोय हे कळत असून ही घरकाम संपवतच नव्हते मी. रोज नवा पदार्थ ,साफ सफाई, टीव्ही ह्यातच जास्त करून सुट्टी घालवली. अभ्यास फार थोडाच झाला. दुसरा पेपर ही कठीणच गेला. ह्यातून पार पडणं कठीण हा विचार पक्का होऊन caiib चा नाद परत एकदा जवळ जवळ सोडून दिला.

एक दोन महिन्यांनी result लागला आणि आश्चर्य म्हणजे काठावर का होईना मी दोन्ही विषयात पास झाले होते. त्यामुळे थोडा उत्साह आला आणि accountancy च शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्ही क्लास लावला. तो शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी असायचा. सुट्टीच्या दिवशी दुपारी जेवून खाऊन लोळत पडायचं सोडून क्लास ला जावं लागे तेव्हा जगात सर्वात दुःखी मीच आहे असं फीलिंग येत असे . पण पैसे भरले होते आणि मैत्रिणी कडून मिळणार मोटिवेशन हयामुळे जास्त बुडवले नाहीत क्लास. हळूहळू त्या विषयात रस ही वाटू लागला होता. परीक्षेसाठी एक आठवड्याची रजा घेतली , नीट अभ्यास केला आणि पेपर दिला.

फार खात्री नव्हती वाटत पण झाले पास accountancy मध्ये आणि पार्ट I पास झाल्याचा शिक्का पडला माझ्यावर. ऑफिस मध्ये ही काही तरी मोनेटरी बेनिफिट मिळाला अस अंधूकस आठवतंय. रिटायर होऊन ही अनेक वर्षे झालीयेत आता. असो.

पण ह्या मुळे उत्साही होऊन आम्ही पार्ट II चा फॉर्म भरला. Risk management, bank general msnagement अशी भारी भारी नावं असलेले विषय पाहूनच जीव दडपला. पण देवदयेने दोन्ही विषयात पास झाले. आता एकच accountancy चा पेपर राहिला होता. ह्या वेळेस ही क्लास लावला होता,परिक्षे आधी आठवड्याची रजा ही घेतली होती. त्यावेळेस माझा मुलगा ही mba करत होता आणि त्याला ही management accountancy हाच विषय होता. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. मजा आली. त्यावेळच्या छान आठवणी अजून ही मनाला सुखावतात.

तो पेपर चांगला अभ्यास झाल्याने चांगला गेला, पास होईन अस वाटत होतं. त्याप्रमाणे चांगल्या मार्कानी पास झाले आणि caiib दोन्ही पार्ट उत्तीर्ण झाले मी. खूप मस्त फीलिंग होतं तेव्हा. एवढे दिवस काही यश मिळालं की मी मुलांना बक्षीस देत असे , ह्या वेळी मुलांनी मला गिफ्ट्स दिली.

ह्या परिक्षेमुळे आर्थिक फायदा खूप झाला अस मला वाटत नाही. पण accountancy च बेसिक लॉजिक , बँकिंग बद्दलची मिळालेली नवीन माहिती, रिस्क मॅनेजमेंट ह्या विषयाशी झालेली तोंड ओळख हे सगळं हुरूप वाढवणार नक्कीच होत. या शिवाय घर,ऑफिस संभाळून वयाच्या पंचावन्नव्या वर्षी ही caiib परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकतो ही गोष्ट आत्मविश्वास वाढवणारी नक्कीच होती .

अश्या तऱ्हेने caiib पास होण्याचं अनेक वर्षांचं माझं स्वप्न सत्यात अवतरलं. अर्थात माझ्या मैत्रिणीच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झालं. नाहीतर मी ह्या फंदात पडले नसते. असो.

छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना पण अजून ही माझी बकेट लिस्ट ने भरलेलीच आहे. आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत. ह्या वाक्याकरता तुला जे हवे ते इनाम. +१०१

आधीच वाचला होता पण login करण्याचा कंटाळा म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. प्रेरणादायी.

छान लेख...!
तुमच्या बकेट लिस्टचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे...

एकदम प्रेरक !! आसक्ती-जीवनेच्छा वाक्य आवडलं.
सीमंतिनीचा प्रतिसादही आवडला.

तेव्हा मनात आले होते आता काय करणार आहे हा म्हातारा शिकून. >>>>>> आमचे एक डेप्युटी इंजिनियर,निवृत्तीनंतर(२००४ किंवा २००५) एकदा ऑफिसमधे काही कामासाठी आले असता, त्यांनी एम.एस.सी.आय.टी केल्याचे सांगितले.अजून संगणकाचे कोर्स करणार होते.

तेव्हा मनात आले होते आता काय करणार आहे हा म्हातारा शिकून. >>>>>> आमचे एक डेप्युटी इंजिनियर,निवृत्तीनंतर(२००४ किंवा २००५) एकदा ऑफिसमधे काही कामासाठी आले असता, त्यांनी एम.एस.सी.आय.टी केल्याचे सांगितले.अजून संगणकाचे कोर्स करणार होते.

असे अनुभव वाचल्यावर, वाचणार्‍याचा पण उत्साह वाढतो.

<< आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत. >>
----- छान विचार

Pages