चिखल-माती – कुट्टीची गोष्ट - 3

Submitted by SharmilaR on 13 September, 2021 - 00:56

चिखल-माती – कुट्टीची गोष्ट - 3

कुट्टी नुकतीच शाळेत जायला लागली होती. पावसाळ्याची सुरवात होती. चिखल अन ओलं - ओलं तर तिला कधी आवडत नव्हतंच. अशीच एक पवसाळ्यातली रविवारची निवांत दुपार होती. सकाळपासून भरपूर पाऊस पडून दुपारच्या सुमारास उघडीप पडली होती. छानसं ऊन पडलं म्हणून कुट्टी सोडून घरातली सगळी मुलं खेळायला बाहेर गेली होती. तासाभराने अचानक परत आभाळ भरून आलं अन विजांच्या कडकडाटात धुवांधार पावसाला सुरवात झाली. सगळीकडे अंधारून आलं होतं. अगदी तासभर धो - धो पाऊस कोसळत होता. बाहेर गेलेली मुलं बाहेरच होती. घरात आई अगदी काळजीत होती. पाऊस थांबून लख्ख ऊन पडलं तसं आईचं आत - बाहेर करणं सुरु झालं. बराच वेळ झाला तरी मुलं येईनात तसं आईनं कुट्टीला सांगितलं,

"जा गं , सगळ्यांना शोधून आण बरं. "

खरंतर कुट्टीला बाहेर चिखलात जायची अज्जीबात इच्छा नव्हती, पण चिडलेल्या आईला कोण तोंड देणार? त्यापेक्षा गेलेलं बरं .

मधली दोन घरं सोडून तिनं देशमुखांच्या घराचा अंदाज घेतला. घरातले खेळ खेळायचे असतील तेव्हा आळीतली सगळी मुलं हमखास तिथं सापडायची. देशमुख काकू पण मुलांमध्ये खेळायच्या. त्यांच्याकडे खूप मजा यायची. पण आज तिथे शांतता होती. बहुतेक सगळी मुलं टेकडीकडे गेली असणार, कुट्टीनं अंदाज केला.

कुट्टीचं घर जवळपास रस्त्याच्या टोकालाच होतं. त्याच रस्त्यानं आणखी थोडं पुढे गेलं कि, एक छोट्टीशी टेकडी लागायची. त्या टेकडीच्या मध्यावर एक छोटं झोपडीसारखं घर होतं. पण तिकडे कुणी फारसं फिरकत नव्हतं. त्या झोपडीतल्या माणसाचा खूप पूर्वी खून झाला होता म्हणे. त्यामुळे त्या बाजूला एकटंदुकटं फारसं कुणी जायचं नाही. कुणाचं लक्ष नसलं तर मुलं मात्र हमखास तिकडं टोळकं करून जायची. रस्त्यावरची डबकी चुकवत जरा घाबरतच कुट्टी टेकडीच्या दिशेनं निघाली.

आकाश निरभ्र झालं होतं. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात पाणी छान चमकत होतं. सगळी घरं झाडं कशी स्वच्छ स्वच्छ दिसत होती. सगळं जगच हसरं हसरं दिसत होतं. कुट्टीला एकदम उत्साही वाटायला लागलं. लांबूनच दिसलं, टेकडीच्या पायथ्याला , रस्त्याच्या खालचं दिशेनं सगळी मुलं एका मोठ्या खड्ड्यात , चिखलात खेळात होती. कुट्टी कडेच्या एका मोठ्ठ्या दगडावर उभी राहिली अन तिनं तिथूनच आवाज द्यायला सुरवात केली,
"ताई....ताई....दादा......लवकर घरी चला , आई बोलावतेय ."
"आत्ता नाही....तूच इथे ये. खूप मजा येतेय. " ताईनं तिथूनच ओरडून सांगितलं. बाकीच्यांनी तर तिच्याकडे लक्षच दिलं नाही.

कुट्टी तशीच दगडावर उभी राहिली. सगळी मुलं मातीचे गोळे - गोळे खेळत होती. खड्ड्यात तर ती अज्जीबात उतरणार नव्हती. ती तिथेच गंमत बघत उभी राहिली. रस्त्याच्या बाजूला उतार असल्यानं सगळं पाणी ओघळून गेलं होतं अन काळीशार माती कशी छान तुकतूकीत दिसत होती. त्या सपाट मातीवर पापडावर असतात तश्या लाटण्यानं पाडल्यासारख्या रेघा - रेघा दिसत होत्या. कुट्टीला हळूच त्या मातीला हात लावावासा वाटला. तिनं चपला दगडावर काढून ठेवल्या. एक पाऊल अलगदपणे मातीवर ठेवलं. खूप छान गारगार वाटलं. मग दुसरही पाऊल पुढे घेतलं. इतकं छान गारगार वाटत होतं की आता तर तिला तिथे गाल पण टेकवावेसे वाटले. फ्रॉक जरासा आवरत कुट्टी दगडावर बसली. मग हाताचे पंजे हळूहळू ओल्या मातीवर टेकवले. तेच हात अलगदपणे गालावर लावले. ओल्या मातीचा ताजा रंग - गंध तिच्या शरीरात भिनत गेला.....

भानावर येऊन कुट्टीनं आजूबाजूला बघितलं. अंधार गुडूप झाला होता. चिखल मातीत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. खड्ड्यातली सगळी मुलं केव्हा घरी गेली ते तिला समजलंच नव्हतं. खालच्या रस्त्यानंच सगळी परस्पर घरी गेली असावीत. या चढवाकडे कुणी बघितलंच नसेल. पटकन उठून चिखलामध्ये माखलेली पावलं तिने चपलांमध्ये कोंबली अन घराच्या दिशेने पळत सुटली.

अंगणातूनच तिनं बघितलं, बाहेरच्या खोलीत सगळे अभ्यासाला बसले होते. वातावरण गंभीर दिसत होतं. बहुतेक सगळ्यांना मार पडलेला दिसतोय. अशा चिखलाने माखलेल्या अवस्थेत आत तर जाताच येणार नव्हतं. काही न सुचून ती तशीच उभी राहिली.

"आई, कुट्टी आली गं ......." ताईनं ओरडून सांगितलं, तरी तिचा आवाज बारिकच झाला होता.

चिडलेली आई स्वयंपाक घरातून बाहेर आली.

"हि घरी यायची वेळ आहे? कशाला पाठवलं होतं मी तुला? सगळ्यांना बोलवायला की चिखलात खेळायला? आता रहा तशीच बाहेर उभी......काही घरात यायची गरज नाही. सगळे आपले दिवसभर बाहेर....एक हि तरी शहाणी निघाली असं वाटलं होतं ....तर ही आपली त्यांच्याहूनही वरताण निघाली...." आईचं बोलणं सुरूच होतं.

वर निरभ्र आकाश होतं अन कुट्टीच्या मनात मात्र ढग दाटून आले होते.......

*****************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माबुदो म्हणजे माझ्या बुद्धीचा दोष >>>
नाही. नाही. दोष माझ्या लिखाणाचा. ही कुट्टी तेवढी नीट जमली नसावी.

धुळवडीचं काय झालं पुढे?>>
धूळवड कुट्टी ने तिच्या मानप्रमाणे केली गच्ची वर. गोष्टीत मी पोचलेच नाही तिथे।

आधीच्या कुट्टी कथा इतक्या सुंदर होत्या की आता आम्हा वाचकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत Happy
ही कथा पूर्ण झाल्यासारखी वाटली नाही. . धुळवड आणि दुसरा प्रसंग नीट जोडले आणि त्याचा साजेसा शेवट केला तर ही पण एक मस्त कुट्टी कथा होईल. .
हे आधीच लिहिणार होते पण वेळेअभावी शक्य नाही झाले..

लिहीत रहा. .

आधीच्या कुट्टी कथा इतक्या सुंदर होत्या की आता आम्हा वाचकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत Happy
ही कथा पूर्ण झाल्यासारखी वाटली नाही. . धुळवड आणि दुसरा प्रसंग नीट जोडले आणि त्याचा साजेसा शेवट केला तर ही पण एक मस्त कुट्टी कथा होईल. .
हे आधीच लिहिणार होते पण वेळेअभावी शक्य नाही झाले..

लिहीत रहा. .>>>

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
असं लिखाणातील अधिक उण कळलं की नक्कीच छान वाटत.