माझ्या आठवणीतील मायबोली- वावे

Submitted by वावे on 12 September, 2021 - 03:59

मायबोलीवर यायला लागल्यापासून मला काय बदल जाणवले-

तांत्रिक बदल सोडले तर फारसे काही नाही. नवेनवे आयडी आले, काही जुने आयडी आता लिहीत नाहीत, काही लिहितात, काही उडाले. पण एकंदरीत वातावरणात खूप असा बदल नाही जाणवत. मी स्वतः आधी फारसे प्रतिसाद द्यायचे नाही. पहिली सात-आठ वर्षं काहीच लेखनही केलं नव्हतं. आता प्रतिसादही देते, थोडंफार लेखनही करते. हा बदल माझ्यात नक्कीच झालाय. गप्पांच्या मात्र कुठल्याच पानावर मी फारसं कधी लिहिलं नाही. प्रत्यक्ष आयुष्यातही मी ’गप्पा’ अशा खूप कमी जणांशी मारते.

इथली कुठली सोय मला एकदम आवडली-

हव्या त्याच ग्रुपचं सदस्यत्व घेता येतं, नको त्या ग्रुपमधून बाहेर पडता येतं ही सोय खूप आवडते. संपर्कातून ईमेल करता येते हीसुद्धा खूप चांगली सोय आहे.

कुठली सोय मला कित्येक दिवस माहितच नव्हती-

असं काही आठवत नाही. सुरुवाती-सुरुवातीला आयडीवर क्लिक केलं की त्या आयडीचं बाकीचं लेखनही वाचता येतं, ही सोय लक्षात आल्यावर मोठाच आनंद झाला होता. ’वाहतं पान’ हा प्रकारही आधी कळला नव्हता.

गेल्या २५ वर्षात मायबोलीनं मला काय दिलं-

वाचनाचा आनंद तर खूप दिलाच. कौतुक शिरोडकर, बेफिकीर, दाद, अर्निका, अरिष्टनेमी आणि अशा किती तरी जणांचं दर्जेदार लेखन मायबोलीवर वाचायला मिळालं. इथे चालणार्‍या चर्चा आणि वादविवादांमध्ये मी फारसा कधी भाग घेतला नसला, तरी ते वाचून कधी मनोरंजन, कधी प्रबोधन, कधी मतपरिवर्तन झालं.
इथल्या किती तरी पाककृती आणि पाककृतींबद्दलचे बाकीचे धागे (माझं काय चुकलं, युक्ती सुचवा वगैरे) अत्यंत उपयोगी आहेत.
मी लिहायला लागल्यावर मिळणार्‍या प्रतिसादांमुळे अजून लिहिण्याचा आत्मविश्वास मिळाला, प्रोत्साहन मिळालं. लेखनावर चांगले प्रतिसाद आले की ’मन में लड्डू फूटें’ प्रकारचा आनंद होतो Wink मायबोलीच्या मुखपृष्ठावर आपला लेख बघूनही असाच आनंद होतो. पुलंवरचा लेख लिहिताना मनात धाकधूक होती, जमेल की नाही अशी. पण त्या लेखावर जेव्हा चांगले प्रतिसाद यायला लागले तेव्हा जीव भांड्यात पडला.

इथे लेख लिहिल्यामुळे (आणि ललिता-प्रीतिने ते वाचल्यामुळे) मला पासवर्ड दिवाळी अंक आणि ’अनुभव’ या अंकामध्ये लिहिण्याची संधी मिळाली. ’वायर’ च्या मराठी साईटवरही अलीकडेच पक्षीनिरीक्षणावर लिहायला मिळालं, ते इथल्या पक्षीनिरीक्षणाबद्दलच्या लेखांमुळेच. एकंदरीत शाळेत लिहिलेल्या निबंधांनंतर थेट इतक्या वर्षांनी काहीतरी लिहायची सवय/आवड लागली. याच्यामागे मायबोलीसारख्या साईटवर कुणालाही लिहिता येतं, वाचकांचे थेट प्रतिसाद आजमावता येतात, ही सोयच कारणीभूत आहे.

मभादि संयोजनात भाग घेतला, तेव्हा एक नवीनच अनुभव मिळाला, मजा आली.

तुम्ही मायबोलीला काय दिलं-

काही ’दिलं’ असं नाही म्हणता येणार.

तुमचं कुठलं लेखन गाजलं-

कंपोस्टिंगवरचा लेख बर्‍याच जणांना आवडला, तो वाचून काहींनी घरी कंपोस्टिंग सुरू केले. सूत्रांतर, कुंडल या कथा, पुलंवरचा लेख, दोन चंद्र, नायिका महाभारताच्या हेही लेख खूप जणांना आवडले. होस्टेलमधल्या गमतीजमतींवरच्या धाग्याला मात्र बरेच प्रतिसाद येतील असं वाटलं होतं. माझे किस्से आवडले म्हणून नाही, तर लोक आपापले किस्से लिहितील म्हणून. Happy पण तसे नाही आले.

कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं-

बहुतेक असं काही नसावं. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गं वावे.कंपोस्ट चा लेख, तुझे पक्षीनिरीक्षण विषयक लेख सर्व खूप आवडले.
तू कंपोस्ट चा कमर्शियल वापर, विक्री कशी करतेस(म्हणजे पॅकेजिंग,डिस्ट्रिब्युशन वगैरे) याबद्दलही सविस्तर वाचायला आवडेल.)

छान लिहिलं आहेस.
तुझे पक्षी निरीक्षण आणि इतर लेख आवडतात, पण हत्तीची कथा कधी विसरणार नाही इतकी मनावर परिणाम करून गेली.

धन्यवाद सर्वांना!
अनु, मी कंपोस्ट बहुतेक वेळा सोसायटीतच एकदोन किलोच्या प्रमाणात विकते. एकदम पाच किंवा दहा किलो एकदोन वेळा सोसायटीच्या कॉमन झाडांसाठी विकलं होतं. एकदा बंगळूरच्या पार दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या एकीने बारा किलो नेलं होतं.
एकूण सगळेचजण हाती थेट डिलिव्हरी घेत असल्यामुळे आणि एकदोन किलोच नेत असल्याने मी साध्या पांढऱ्या कागदी पिशव्यांमधे देते. सुपर मार्केटमधून ज्यात भाजी, तांदूळ वगैरे मिळतात तशा पिशव्या.

छान लिहिलंय.
तुझ्या कंपोस्टिंगच्या धाग्यामुळेच मी आता घरी सराईतपणे खत तयार करायला लागले आहे.

आणि सध्या मिवापु धाग्यावर तुझे स्टोरीटेल अपडेट्स वाचायला मजा येते मला.

मी स्वतः आधी फारसे प्रतिसाद द्यायचे नाही. पहिली सात-आठ वर्षं काहीच लेखनही केलं नव्हतं >>> हां... तरीच... तुझा आयडी मला नवा वाटला होता.

साधं सरळ, प्रामाणिक मनोगत आहे. +1 >> +७८६ .. मलाही असे थोडक्यात लिहायला हवे असे वाटले हे वाचून .. किंबहुना प्रत्येकाने लिहावे. सर्वांच्या पोस्ट वाचायला छान वाटत आहेत. एकेक द्रुष्टीकोन कळत आहेत.

छान लेख. कंपोस्टींग करत नाही तरी वाचले होते तुमचे लेख. चंद्र, नायिका इ लेख आवडलेच.
(अरिष्टनेमींचे लेख मी पण वाचते. )

छान लिहीले आहे. विचारलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त थोडे फ्रीफॉर्म मनोगतही आवडले असते वाचायला.

चंद्रावरचा लेख (म्हणजे चंद्राबद्दल लिहीलेला Happy ) अगदी लक्षात आहे. पुलंवरचाही वाचला असेल. चेक करतो.

वावे, मस्त लिहिलंयस. थेट.

हत्तीची कथा कधी विसरणार नाही इतकी मनावर परिणाम करून गेली. >>> +१. माबोवरल्या सर्वोत्कृष्ट कथांपैकी एक आहे ती.

लेख आवडला.
पक्षी निरीक्षण, विज्ञानकथा, आकाश निरिक्षण (तुम्ही धूमकेतूचाही फोटो पोस्टल्याचं आठवतय. चू भू द्या घ्या ) कंपोस्ट तयार करणं..लेखनाचा पट मोठा आहे. एकंदरीतच तुमचं सगळं लेखन विज्ञानवादी दृष्टीकोन असलेलं असतं आणि आवडतं Happy शुभेच्छा !

हत्तीची कथा कधी विसरणार नाही इतकी मनावर परिणाम करून गेली. >>> +१. माबोवरल्या सर्वोत्कृष्ट कथांपैकी एक आहे ती.>>>> नक्कीच
परवा कौबकमध्ये हत्तींची भाषा जाणणारा/कळणारा आनंद शिंदे आला होता तेव्हा मनात हत्तीची गोष्ट सारखी डोकावत होती.
प्रामाणिक लेख !

सर्वांना धन्यवाद Happy

माबोवरल्या सर्वोत्कृष्ट कथांपैकी एक >> बापरे! माझा असा काही समज नाही Happy तुम्हाला आवडली याचा आनंद मात्र आहे _/\_
@चंद्रा, धन्यवाद. हो, धूमकेतूचा फोटो मी च्रप्स यांच्या धाग्यावर पोस्ट केला होता. Happy
@फारएण्ड चंद्रावरचा लेख Happy माझ्या मनात लिहिता लिहिता हेच आलं म्हणून वाक्यरचना बदलली. पुलंवरचा लेख तुम्ही वाचून अभिप्राय दिलात तर मला आवडेल.

अजून लिहिता आलं असतं, लिहिण्यासारखं तसं बरंच आहे. परत कधीतरी.

साधं सरळ, प्रामाणिक मनोगत आहे. +1
अजूनही थोडं लिहायला हवं होतं असं वाटलं..

आणि परत कधीतरी होत नसतं आताच लिहून टाक

सहज सोपं लेखन . छान .
पण खरंच अजून थोडं लिहायला पाहिजे होतं .
समतोल लिहिणारी माणसं कमी असतात .
शुभेच्छा !

छान लिहिलंय.
कंपोस्टिंगचा लेख बुकमार्क करुन ठेवलाय. वेळ मिळेल तेव्हा कंपोस्ट करायला सुरुवात करायचीच आहे.
सूत्रांतर, दोन चंद्र सुद्धा विशेष आवडले होते.

मीसुद्धा बरेचदा प्रतिसाद टंकायचाही कंटाळा करते.

प्रामाणिक लेखन.. आवडलं.
समतोल लिहिणारी माणसं कमी असतात .>> अनुमोदन. मला वावेचं लेखन वाचून नेहमी मनातल्या मनात' ती प्रत्यक्षात किती शांत आणि संतुलित व्यक्ती असणार' असं वाटायचं. मभादि संयोजनाच्या निमित्ताने हे अनुभवताही आलं. Bw

Pages