सर्व्हे नंबर २५ - भाग ९

Submitted by सुर्या--- on 11 September, 2021 - 05:42

सर्व्हे नंबर २५ - भाग ९

देवभुबाबांनी आमच्याकडे शांतभावाने पहिले. डोळे बंद करून अंगठा आणि अनामिका जोडून छातीशी धरले. काही क्षण ते त्याच अवस्थेत उभे होते. ओठांतल्या ओठांत काही मंत्र अथवा नामजप चालूच होता. आम्हीसुद्धा हात जोडून नतमस्तक होऊन विनम्र भावाने त्यांच्यासमोर उभे होतो. थोड्या वेळाने देवभुबाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. विचारांचा काहूर त्या स्पर्शाने क्षणातच थांबला. मनातील घालमेळ शांत झाली. ते पुढे चालू लागले. आम्ही त्यांच्या मागोमाग मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. भिंतीला पाठ टेकवून शंकराच्या पिंडीला फुल अर्पण करून स्मितहास्य करत ते माझ्याकडे पाहू लागले. मंदिरातील तेवत्या पणतीच्या मंद उजेडात जळणाऱ्या वातीचा सुगंध आणि अगरबत्ती धूप यांच्या सुवासाने मन प्रसन्न झाले होते. देवभुबाबांचे शब्द ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो.

"बसा दोघेही पुढे" देवभुबाबांचे स्वर त्या गाभाऱ्यात घुमले.

अतिशय नम्रतेने, एकमेकांकडे पाहत मी आणि सीमंतिनी खाली बसलो.

"घराची वास्तुशांती अजून झाली नाही ना?, समाधी हलवताना काही विधी केली नव्हती ना?, कोणाला विचारून समाधी हलवली?"

एकामागून एक अनपेक्षित प्रश्नांचा भडीमार चालू झाला आणि आम्ही बुचकळ्यात पडलो.

या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या नव्हत्या, तरीही त्यांना कश्या कळाल्या असतील? पणं त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास आपोआपच वाढला होता.

"बाबा, यापैकी काहीच केलं नाही", सीमंतिनी म्हणाली.

"का? का, नाही केलंत?, तुमच्या घरातून तुम्हालाच कोणी तुमच्या संमतीशिवाय बाहेर काढलं तर चालेल का तुम्हाला? तुमच्या मर्जीशिवाय, तुमची विचारणा केल्याशिवाय, दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला राहायला पाठवलं तर जाणार का तुम्ही?"

आम्ही दोघेही अनुत्तरित होतो.

"मृत्यू कोणाचा होतो?, मृत कोणाला मानावे?, शरीर सोडून जाणाऱ्याला कि शब्द, जबाबदारी आणि मन सोडून जाणाऱ्याला?"

आम्ही पुन्हां अनुत्तरित झालो. पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नातच उत्तरेसुद्धा मिळत होती. अजाणतेपणी चुका आमच्याकडून झाल्या होत्या आणि त्यांची जाणीव आम्हाला नव्हती. देवभुबाबांच्या प्रश्नार्थक उत्तरांनी ना केवळ आमच्या चुका कळाल्या परंतु, आयुष्य जगताना काही गोष्टी आपल्यासाठी क्षुल्लक किंवा आनंददायी असल्या तरीही इतरांसाठी त्याचे किती दूरगामी परिणाम घडणारे असतात याची जणू प्रचिती आणून दिली.

चुकांची दुरुस्ती कशी करता येईल, कोणकोणते पर्याय आहेत हे जाणून घेण्याची ओढ होती.

"एखादी व्यक्ती मनातून दुखावते तेव्हा त्याची समजूत काढणे खूपच कठीण असते. तुम्ही मृत शरीराची विटंबना केली आहे. ती मृतात्मा, समजूत काढून शांत होईल का?, तुम्ही तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्याच्या कर्तव्यावर हि धावा बोलले" देवभुबाबांचे एक एक शब्द डोळ्यांत अंजन घालत होते.

"बाबा, याला काही पर्याय आहेत?, आम्ही याच प्रायश्चित करू" मी विनवले.

"मध्यस्थी करणारा दोघांच्या वादामध्ये तोडगा काढण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो, मानने ना मानने ज्याच्या त्याच्या मर्जीवर" देवभुबाबांनी संकेत दिले.

"बाबा, तुम्ही प्रयत्न करा" आम्ही विनवले.

"ते तेवढं सोपं नाही, यात कुणाचा हकनाक जीवही जाऊ शकतो, आहे तयारी?" देवभुबाबांनी कठोर शब्दांत सांगितले.

"म्हणजे?" सीमंतिनीने घाबरूनच विचारले.

"म्हणजे, क्रोध एखाद्याचा जीवही घेऊ शकतो. शत्रूवर दया दाखवेल तो भुत कसा? कारण जर तो तेवढा दयाळू असेल तर तो देवदूत ठरला असता". एक एक शंका नवनवीन पेच निर्माण करून परिस्थितीच गांभीर्य वाढवत होते.

त्यांचं म्हणणंही पटत होत. भुत आणि दया या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी.

"पणं मग करायचं तरी काय? प्रायश्चित करायला जावं तरीही जीवाला धोका, नाही केलं तरीही धोका?" सीमंतिनीने विचारलं.

"तुम्हाला त्याच्याशी बोलावं लागेल". देवभुबाबा म्हणाले.

सगळीकडे शांतता पसरली. माझ्या छातीत धडकी भरली. सीमंतिनीही घाबरून माझ्याकडे पाहू लागली.

भुताशी आम्ही बोलायचं? ते हि जीवावर उदार होऊन? बोललं तरीही धोका, नाही बोललं तरीही धोका. आम्ही पेचात पडलो. बोलायला शब्द उरले नव्हते. एकाग्र नि शांत झालेले मन पुन्हा बिथरले. भीतीने डोक्यामध्ये पुन्हा विचारांचे वावटळ उठले. हातपाय थरथरू लागले.

देवभुबाबांनी त्यांच्या जटेतून केस उपटले. हाताच्या मुठीमध्ये बंद केले. शंकराच्या पिंडीसमोर हात धरून डोळे बंद केले. ओठांतल्या ओठांत काही मंत्रोच्चार केला. आमच्या दोघांच्याही हातात ती उपटलेली जटा देत म्हणाले, "जोपर्यंत या जटा तुमच्या हातात राहतील तोपर्यंत माझ्यातील शक्ती तुमचं रक्षण करेल. चुकूनही हातातून ते खाली ठेवलं, पडलं अथवा सुटलं, तर तुम्ही माझ्या सुरक्षाकवचातून बाहेर पडाल".

आम्ही दोघेही देवभुबाबांचा निरोप घेऊन निघालो. अनेक प्रश्न मनात दाटले होते. भीतीची चाहूल पावलोपावली वाटत होती. सीमंतिनीसुद्धा द्विधा मनस्थितीत अडकली. देवभुबाबांनी सांगितलेल्या गोष्टींवर तिचा विश्वास बसत नव्हता.
"नाही...नाही..हे काहीतरी भलतंच सांगून आपल्याला घाबरवत आहेत", सीमंतिनी बडबडत होती.
मी मात्र चालता चालता एकटा पडलो होतो. मला देवभुबाबांचे म्हणणे पटले होते. मी काहीच प्रतिसाद दिला नाही. घरी सिम्बा एकटाच होता. हाल्या त्याच्या कामात अअसल्यावर सिम्बाकडे तेवढा लक्ष देणारही नव्हता. पाय पटापट उचलत आम्ही गाडीपर्यंत आलो आणि विचारांत हरवूनच गाडी फार्म हाऊस च्या दिशेने चालवू लागलो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचतेय. .
लिहित रहा. .
टीप - बाकी सर्व जण लिहिण्यात busy आहेत.. त्यामुळे प्रतिसाद कमी असतिल Happy