माझ्या आठवणींतली मायबोली - साधना

Submitted by साधना on 10 September, 2021 - 13:49

कधीतरी २००३-२००४ च्या दरम्यान नेट हे नवे अनोखे खेळणे हाती लागले होते तेव्हाच कधीतरी नेटवर मराठीही वाचायला मिळते हा शोध लागलेला. पण मायबोली माहित नव्हती. तेव्हा संदिप खरे खुप प्रसिद्ध होता (आताही असावा, ऊगीच त्याच्या चाहत्यांनी मला कोपच्यात घेऊन मारू नका). एकदा संदिप खरेची ‘सरीवर सर....’ नेटवर टाईप केली आणि हितगुज
समोर आले. क्लिक केले व हाती एकदम घबाड लागल्यासारखे वाटले. तो हितगुजचा कविता विभाग होता हे तेव्हा कळले नाही पण जे मिळाले ते अधाशासारखे वाचून काढले होते इतके आठवतेय. तेव्हा इतर मराठी संकेतस्थळेही जोमात होती. माझा वावर इथल्यापेक्षा तिकडे जास्त होता. पण हळुहळू इथे मन रमत गेले.

हितगुजचा तो जुना फॅार्मॅट मला खुप आवडायचा. जे वाचायचे ते सगळे एकत्र मिळायचे. कथा वाचावीशी वाटली तर सरळ कथा विभाग ऊघडायचा. आता राजकिय व इतर टाईमपास धाग्यांच्या कंबरभर वाढलेल्या तणात काही चांगले धागे गुदमरतात, वर त्यांचे धागाकर्ते प्रतिसाद नाहीत म्हणुन खट्टूही होतात. तेव्हा तसे काही व्हायचा धोकाच नव्हता. आपल्याला हवा तोच विभाग बघा आणि बाकीच्यांना अनूल्लेखाने मारा. धागे मराठी महिन्यांनुसार साठवले जात. तेही मला भारी आवडायचे.

हितगुज व्यतिरीक्त रंगीबेरंगी हा व्यक्तिगत विभागही तेव्हा होता. मी मायबोलीवर आले तेव्हा दिनेशदांनी निसर्गावर लिहायला सुरवात केली होती. त्याआधी देशात/परदेशात ते जिथे राहिले होते त्यावर लिहीत होते.

मला त्यांचे निसर्गविषयक लिखाण आवडायला लागले व वाचनमात्र भुमिकेतुन बाहेर पडून मी प्रतिसाद द्यायला लागले. इथली आमंत्रणे वाचुन एकदोन ट्रेक्सनाही गेले व हळुहळू माझा माबोपरिवार वाढायला लागला. तेव्हा झालेल्या मैत्री आजही तितक्याच घट्ट आहेत.

मायबोलीचा तो जुना फॅार्मट मला खुप आवडायचा. मायबोलीने नंतर दोनदा फॅार्मॅट बदलला. नव्याचे स्वागत करायला हवे म्हणुन तो स्विकारला पण आजही माझी पसंती त्या जुन्यालाच आहे.

- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले ->>>>>>

माझ्यात काय बदल जाणवले हे लिहायचे आहे हे इतरांचे वाचुन कळले. वेल, गेल्या १५-१६ वर्षात वयानुरूप विचारांत बदल झाले, त्यात मायबोलीचाही हात आहेच. माबोमुळे कित्येक विषय पहिल्यांदा कळले, काही जुने विषय नव्याने कळले. परदेशातले देशी जीवन कळले, माबो सोडता ओळखीत कोणीही परदेशस्थ नाही. निसर्गाची आवड होती पण माहिती नव्हती. ती आवड व माहिती इथे वृद्धींगत झाली.

- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली >>>>>

प्रतिसादांच्या आकड्यावर क्लिक केले की थेट
तिथे जाता येते हे जेव्हा कळले तेव्हा फाटकन आवडलेच.

- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,

ही वरची सोय माहितच नव्हती. मुलीने ‘न जाने कहांसे आते है...’ हा लुक तोंडावर आणत ही सोय दाखवली.

- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,>>>>>

चांगले मित्र दिले. बिनधास्त विश्वास ठेवता येतील अशी माणसे इथे भेटली. मुलीच्या शिक्षणाबाबत काही प्रश्न विचारले तेव्हा ज्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर तितकासा किंवा काहीच संपर्क नव्हता त्यानीही आपुलकीने मेल करुन माहिती दिली, फोन नंबर दिले हे कधीही विसरले जाणार नाही.

- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,>>>

कठिण आहे सांगणे. देणारी मायबोली देतेय. कायम घेणाऱ्याने घेत राहावे मोड मध्ये राहिले. देणाऱ्याचे हात कधी मिळतील माहित नाही.

- तुमचं कुठलं लेखन गाजलं,>>>>>>

स्वत: लेखन करायचे डोक्यात कधी आले नाही, मी लेखक वगैरे नाही. तरीही फुटकळ अनुभवलेखन केले आणि ते काहीजणांना आवडलेही. तरी गाजणे बिजणे दूरची गोष्ट.

- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं यावर थोडं लिहा की. >>>>$

माझ्या फुलोंकी घाटी लेखाने लोकांना नक्कीच गांजले असणार. माझी लांबड संपता संपत नव्हती.

तर ही आहे माझ्या आठवणीतली माझी मायबोली. माबोकर्त्यांचे सर्वच गोष्टींसाठी मनापासुन आभार.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या फुलोंकी घाटी लेखाने लोकांना नक्कीच गांजले असणार. >>>> ऑ ??! फुलो की घाटीचं प्रवासवर्णन भारी होतं! मी मध्यंतरी त्या सोलो ट्रॅव्हलरबाईंना "प्रामाणीक" प्रवासवर्णन म्हणून ते वाचा असं सुचवलं होतं.

छान लिहीले आहे.
माझ्या फुलोंकी घाटी लेखाने लोकांना नक्कीच गांजले असणार.>> नाही हो. छान आहे ती लेखमाला.

<<<<- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,>>>

कठिण आहे सांगणे. >>>>
मी सांगते साधनाताई की तुम्ही काय दिलं - तुमचे अतिशय माहितीपूर्ण, संयमित आणि विचारपूर्वक प्रतिसाद. किती तरी भरकटलेले आणि विखारी होत चाललेले धागे तुमच्या प्रतिसादानंतर योग्य मार्गावर आलेत हे मी स्वतः पाहिलेय.

आणि तुमची वूडहाऊस ची भाषांतरे - मूळ कथेइतकीच खुसखुशीत. . ती नंतर इथून काढल्यावर मला वाईट वाटले होते. .

साधनाताई,
वुडहाऊसची भाषांतरे का बरे काढली? प्लीज परत टाका. आम्हा न वाचलेल्याना वाचायला आवडेल.

छान लेख... तुमचे इतर लेखनावरचे प्रतिसादही वाचनीय असतात...!

मुलीने ‘न जाने कहांसे आते है...’ हा लुक तोंडावर आणत ही सोय दाखवली.
>>>>>
हा हा.. मलाही तसेच वाटले.

छान लिहिले आहे.

आवडलं.
मी तुमच्या लेखापेक्षा प्रतिसाद जास्त वाचते.
वुडहाऊस वाचायला आवडेल.

साधना ताई, तुमचे प्रतिसाद अतिशय आवडतात Happy
असं मला का नाही सुचलं असं वाटत राहतं, कारण सर्व मुद्दे व्यवस्थित आणि मला पटणारे असतात
वूड हाऊस आवडते लेखन Happy

Pages