लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण - {शर्मिला रणदिवे / SharmilaR}

Submitted by SharmilaR on 10 September, 2021 - 02:13

"लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण - {शर्मिला रणदिवे / SharmilaR}"

“मला एक मे पासून सुट्ट्या आहेत. म्हणजे मी 30 एप्रिलची फ्लाईट बुक करू शकेन. म्हणजे मला दहा ते पंधरा एप्रिल मध्ये दुसरी लस घ्यायला हवी. म्हणजे मग त्याच्या एक महिना आधी, म्हणजे दहा ते पंधरा मार्च मध्ये मला पहिली लस घ्यायला हवी.” मी माझ्या मैत्रिणींना सांगत होते.
फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा सगळ्या प्लॅनिंग करता मी जगप्रसिद्ध आहे. (माझं घर, माझं ऑफिस आणि माझ्या आठ दहा मैत्रिणी हेच माझं जग आहे.)
आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या एका मैत्रिणीच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला भेटलो होतो. कोविडचे सगळे नियम पाळून. म्हणजे तसे आत्तापर्यंत पाळत होतो, अगदी लांब लांब पण बसलो होतो, पण इतक्यातच फोटो काढायला आम्ही एकत्र आलो आणि जरा मास्क खाली घेतले होते. आणि आता थोडावेळ खाली घेतले, तर मग खालीच ठेवले आणि गप्पा मारायला लागलो.
तर काय झालं, मला नं, मुलाकडे जायचं होतं अमेरिकेला. एक मे ला जायच होतं, कारण मग महिनाभर सुट्टी असते मला. पण लसीकरण झाल्याशिवाय जाणं शक्य नाही, म्हणून आधी ती घ्यायची होती. बाकी सगळ्या मैत्रिणींना पण असंच कुठं-कुठं जायचं होतं, किंवा कुणाकडे जवळचं लग्न वगैरे तरी होतं.
एक मार्चपासून लस मिळायला लागली, पण ती फक्त सिक्सटी प्लस करता. मग मला कळतच नव्हतं की आता काय करायचं? मग कुणीतरी म्हणालं कि सिक्स्टी प्लस नसलं, तरी सहव्याधी असणाऱ्यांना पण लस मिळते. किंवा कुठेतरी खासगी हॉस्पिटल मध्ये तर सिक्स्टी मायनस ला पण देतात म्हणे. पण कुठे देतात हे कुणालाच माहिती नव्हतं. मग आमची त्यावरच चर्चा सुरू होती.
मला माझी एक मैत्रीण म्हणाली की मग तू पण काहीतरी सहव्याधी दाखव. मला वाटलं, नको. एक तर खोटं कशाला बोलायचं? आणि शिवाय आता सहव्याधी दाखवलीच, तर पुढे इन्शुरन्सला नाही का प्रॉब्लेम येणार? आणि तसंही उगाच नकोच फसवा-फसवी करायला. त्यापेक्षा तशीच जर कुठे मिळत असेल खासगी मध्ये वगैरे तर घेऊन टाकूया.
मग बाकी सगळ्यांनी ठरवलं की पुढचे दोन दिवस कुठं-कुठं जाऊन बघायचं, कुठे मिळतेय ते. कारण सगळ्यांनाच ताबडतोब लस घ्यायची होती. लस नं घेतल्यामुळे सगळ्यांचंच बाहेरगावी जाणं वगैरे खोळंबून होतं. मग मी त्यांना सांगून ठेवलं की, तुम्हाला कुणालाही कुठे पण लस मिळते असं कळलं, की ताबडतोब मला फोन करा. कारण मी तर ऑफिसमध्ये असणार होते आणि मग रोज रोज असं उगाच जाऊन बघण मला शक्य नव्हतं.
पुढचे एक-दोन दिवस सगळ्यांचेच लसीच्या शोधात गेले. कधी नाही ते, आपली साठी का नाही झाली, याचं वाईट वाटायला लागलं. आत्तापर्यंत वाटायचं की आपण जरा चाळीस पन्नास वर्ष आधीच जन्माला आलो. या नवीन पिढी कडे बघून खूप हेवा वाटायचा. आणि आता वाटायला लागलं, आपण अजून थोडा आधी जन्माला यायला हवं होतं. म्हणजे मग पटकन मिळाली तरी असती लस.
मार्चमध्ये निर्बंध जरा कडक झाले होते. माझ्या घराजवळच आठवड्यातून चार दिवस माझा गाण्याचा क्लास असायचा. मी माझ्या गाण्याच्या बाईंना विचारलं की, आता कोविडचा नंबर खूपच वाढतोय, तर सुट्टी असणार का क्लासला?
तर त्या म्हणाल्या, “काहीतरीच काय? मला बघ. दोन दिवस अंग कसकसतंय. पण मी करते आहे क्रोसिन घेऊन काम. इथे कुणाला काही होत नाहीये. तुला आपली उगाच भीती वाटते. हे असं काही मनात सुद्धा आणायचं नसतं.”
आणि त्यादिवशी त्यांनी मला अगदी जवळ बसवून गाणं शिकवलं.
दुसऱ्या दिवशी गाण्याच्या व्हाट्सअप ग्रुप वर बाईंचा मेसेज आला, “जरा जास्तच ताप असल्यामुळे या आठवड्यात क्लासला सुट्टी.”
अनायसे क्लासला सुट्टी मिळाली म्हणून मग मी भाचीच्या बाळाशी खेळायला तिच्याकडे गेले.
पुढे चार दिवसांनी माझं अंग कसकसायला लागलं. जरा ताप पण आला थंडी वाजून. मला वाटलं हल्ली डास फार झालेत, बहुतेक मलेरिया किंवा डेंगू असेल. (कारण मनात काही आणायचं नव्हतं नं? कोविडच्या काळात डेंगू, मलेरिया कमी वाईट.) मग डेंगू मलेरिया च्या टेस्ट करून झाल्या.
तेव्हाच नेमका मैत्रिणीचा फोन आला, “अगं, एका ठिकाणी मिळतेय लस. वय साठ नसलं तरी. ते एक रिसर्च सेंटर आहे, त्यामुळे ते देतात कमी वयाच्या लोकांना पण लस.”
पण मला तर ताप होता. त्यामुळे मी तिला म्हटलं, “अगं, आज तर नाही शक्य. तुम्ही जाऊन या. मी दोन दिवसांनी घेईन लस.”
दुसऱ्या दिवशी हातावर पुरळ उठलं. मला वाटलं हा नक्की गोवर आहे. कारण दोन दिवस आधीच भाचीच्या लहान बाळाला मी खेळवत होते आणि तिला नुकतीच गोवरची लस दिली होती. आणि ती जरा तापलेलीच होती.
मी आपला माझ्या हाताचा फोटो डॉक्टरांना पाठवला आणि त्यांना माझी शंका बोलून दाखवली. (बघा, मा‍झ्या गाण्याच्या बाईच्या शिकवणीनुसार मी अजूनही मनात वाईट विचार आणत नव्हते. आता माझ्याकरिता गोवर बहुतेक कमी वाईट होता.)
डॉक्टर म्हणाल्या, “नाही, नाही. गोवर वगैरे नाही. आणि आता तर मलेरिया, डेंग्यू टेस्ट पण निगेटिव आल्यात. अनायसे तुमचे ब्लड सॅम्पल लॅब मध्ये आहेत, तर तुम्ही rt-pcr करून घ्या.”
मी rt-pcr केली. ती पण निगेटिव आली. पण ताप काही उतरेना. मग संध्याकाळी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट केली. कारण rt-pcr टेस्ट सुरवातीच्या काळात तेवढी खात्रीची नसते म्हणे. दुसर्‍या दिवशी रीपोर्ट आला. मी मनात नाही आणलं तरी तो पॉझिटिव्ह आला. तो पर्यंत गाण्याच्या व्हाट्सअप ग्रुपवर बाईंना “लवकर बऱ्या व्हा” चे संदेश दिसायला लागले होते. त्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होत्या. (मी टेस्ट नसती केली तरी चाललं असतं. व्हाट्सअप ग्रुप वर मला माझ्या तापाचं निदान झालंच असतं). मग पुढे माझं हॉस्पिटल मध्ये दाखल होणं, रेमडेसीविर, ऑक्सीजन वगैरे सोपस्कार पार पडले.
हॉस्पिटल मधून परत आल्यानंतर पंधरा दिवस घरात विलंगीकरण. मग मी ठरवून टाकलं आता पंधरा दिवस होऊन गेले की, सोळाव्या दिवशी नाव रजिस्टर करायचं आणि सतराव्या दिवशी लस घेऊन टाकायची. आहे काय नी नाही काय! कारण आता एक एप्रिल पासून पंचेचाळीसच्या पुढच्या लोकांसाठी लसीकरण चालू झालं होतं.
मधल्या काळात पूर्ण लॉकडाउन जाहीर झाला होता. त्यामुळे विलगीकरणात असतांना माझं ऑफिसचं काम घरूनच सुरू होतं.
माझे विलगीकरणाचे पंधरा दिवस संपल्यानंतर मी सहज म्हणून आमच्या फॅमिली डॉक्टरना फोन केला आणि त्यांना सांगितलं मी उद्या नाव रजिस्टर करणार आहे लसी करता. म्हणजे माझं लसीकरण होऊन जाईल. तर त्या एकदम ओरडल्याच. “असं नसतं. असं नसतं. आत्ता तुम्हाला कोवीड होऊन गेलाय ना, मग आता तीन महिने अजिबात लस घ्यायची नाही. नाहीतर प्रचंड जास्त साईड-इफेक्टस होतील.”
मी त्यांना सांगितलं, “अहो, इतक्यातच मी रेडिओवर एक मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की तुमचं विलगीकरण संपलं, की लगेच तुम्ही लस घेऊ शकता.”
“कुणाची मुलाखत होती?”
“आरोग्य राज्यमंत्र्यांची.”
“त्या मंत्र्यांना वगैरे काही कळतं का? जर काही साईड इफेक्टस झाले तर, ते आम्हा डॉक्टरांना हँडल करावे लागतात. अजिबात घ्यायची नाही लस इतक्यात.”
“बरं.”
नेमका तेव्हाच ऑफिसमधून मेल आला, “ऑफिस जॉईन करण्याआधी सगळ्या पंचेचाळीशीच्या पुढच्या लोकांनी एक लस तरी घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना ऑफिस जॉईन करता येणार नाही, आणि पुढच्या सुट्ट्या विदाऊट पे धरल्या जातील.”
मला कळेच ना आता लस घ्यावी की नाही? मग त्यावर तोडगा म्हणून मी ठरवलं, ना मंत्र्यांचं, ना डॉक्टरांचं. म्हणजे ताबडतोब पण नको आणि तीन महीने पण नकोत. आपण आपलं दीड महिन्यांनी लस घेऊ या.
दीड महिना होता होता मी कोविन वर अपॉइंटमेंट शोधायला सुरुवात केली लसीकरणसाठी. नोंदणी करतांना इतक्या जास्त अडचणी येत होत्या, कधी आधार कार्ड नंबर टाकल्यावर पुढे काहीच व्हायचं नाही तर कधी नुसतच कधी नोंदणी पुर्ण झालीच तर “लस उपलब्ध नाही.” असा संदेश यायचा.
त्या काळात लसिंचा तुटवडा निर्माण झाला होता. सगळीकडे अगदी कमी लसी उपलब्ध असायच्या. त्यामुळे सगळ्यांचीच धावपळ सुरू होती. लोक पहाटे पाच वाजल्यापासून आरोग्य केंद्रासमोर रांगा लावायचे. मी ठरवलं, “आपण नाही बाबा रांगेत उभा राहणार. सरळ खासगी हॉस्पिटल मध्ये जाऊ आणि काय असतील ते पैसे भरू घेऊन टाकू लस.”
मग मी खासगी हॉस्पिटल ना फोन करायला सुरुवात केली. कारण कोविन वर खासगी हॉस्पिटलची नावं येणं बंद झालं होतं. प्रत्येक वेळी फोन वरचा ठरलेला संवाद,-
“हॅलो, मी लसीच्या अपॉइंटमेंट करता फोन केला आहे.”
“मॅडम, आपलं नाव काय?”
मग मी माझं नाव सांगायचे.
“मॅडम, आपला फोन नंबर?”
मी फोन नंबर सांगणार.
“मॅडम, आमच्या बद्दल आपल्याला कुठून माहिती मिळाली?”
मग मी ती सांगणार.
“ओके. मॅडम सध्या लस उपलब्ध नाही. तुम्ही उद्या फोन करा.”
दोन-तीन दिवस सतत हीच फोनाफोनी झाल्यावर मी वैतागले. पुढच्या वेळेस मी त्यांना फोन केला आणि मी नेहमीचं पहिलं वाक्य टाकलं,
“हॅलो, मी लसी च्या अपॉइंटमेंट करता फोन केला आहे.”
“हॅलो मॅडम, आपलं नाव सांगता का?”
“तुम्हाला काय फरक पडतोय माझं नाव काहीही असलं तरी? माझं नाव, फोननंबर, पत्ता, सगळी कुंडली विचारून तुम्ही मला हेच सांगणार आहात नं, कि उद्या फोन करा? त्यापेक्षा सरळ आधीच सांगा नं लस मिळणार की नाही?”
“त्याचं काय मॅडम, आम्हाला हे सगळं रेकॉर्ड ठेवायला लागतं. म्हणून आम्ही विचारतो.”
“नसेल, तर सरळ आत्ताच नाही म्हणून सांगा.”
“मॅडम खरं सांगू का, खासगी हॉस्पिटलला इतक्यात तरी लसी यायची शक्यता नाही. तुम्ही आपल्या सरकारी केंद्रात जाऊन घेऊन टाका ना.”
मग काय, मी आणि माझ्या सारखीच अजून लसीच्या शोधात असलेली माझी एक मैत्रीण, आम्ही परत सरकारी केंद्राचा शोध घ्यायला सुरुवात केली, कोविन वर. आता आमची नोंदणी आधार कार्ड च्या पुढे जात होती. सरकारी केंद्रांची यादी दिसायला लागली होती. पण तिथे क्लिक केलं अजूनही “उपलब्ध नाही” चा संदेश आमची पाठ सोडत नव्हता. दोघींचीही अवस्था तीच होती.
मग कुणीतरी सांगितलं, रात्री आठ वाजता प्रयत्न करायचे. नाहीतर मग दहा मिनिटात अपॉइंटमेंट संपून जातात. मग माझी मैत्रीण आणि मी, दोघीही आपापल्या मोबाईलवर अक्षरश: आठला एक मिनिट कमी असेपर्यंत बाकीची सगळी माहिती भरून फक्त त्या अपार्टमेंटच्या मेनू वर जाऊन आठ वाजायची वाट पाहत राहिलो. पण कसलं काय.. ...... आठ वाजता सुद्धा “उपलब्ध नाही”.

दोन दिवस हे प्रकरण करून झालं. मग शेवटी ठरवलं, आपणही पहाटे पाच-साडेपाचला जाऊन रांगेत उभं राहूया. शेवटी एकदाचं पहाटे साडेपाच वाजता आम्ही निघालो. त्या दिवशी बुद्धजयंती होती. सकाळी रस्ते अगदी सुनसान होते. दोघींनाही आनंद झाला-
“अरे वा! आपलाच नंबर पहिला दुसरा. आज आपण लस घेऊनच घरी जाणार.”
त्या आरोग्य केंद्रावर पोचलो तर काय! गेटवर कुलूप. दहा मिनिट वाट पाहिल्यावर आतला रखवालदार दिसला.
“हे केव्हा उघडणार हो, दादा?”
“काय काम आहे?”
“लस घ्यायची आहे.”
“आज सुट्टी. आज बुद्धपौर्णिमा आहे.”
आमचे पडलेले चेहरे पाहून तो म्हणाला,
“आसं करा, उद्या बरोबर सकाळी सा वाजता या. पण आज रात्री आट वाजता फोन करा. नंबर लिऊन घ्या बोर्डवरचा. लस आलेली असल तर उद्या सकाळी बरोबर सा वाजता या नंबर लावायला.”
“पण फोन उचलेल का कुणी?”
“हा, मग? उचलल ना. आमच्यापैकीच कुनी आसतं फोन उचलायला. सांगतो आम्ही बराबर.”
नंबर घेऊन दोघीही आपापल्या घरी परत गेलो. रात्री फोन केले. आठ, साडे आठ, नऊ वाजता. फोन कुणी उचलला नाही. मग आम्ही ठरवलं, आपण आपलं सरळ सरळ परत जाऊन धडकायचं.
दुसऱ्या दिवशी परत आपलं साडेपाचला निघालो घरून. सहाच्या थोडं आधीच पोचलो तिथे. गेटसमोर चार बायका उभ्या होत्या. दोन-चार माणसं जवळपास झाडाखाली आणि स्कूटरवर बसली होती. आम्ही रांगेत उभं रहायला लागल्यावर त्यांनी तिथूनच आवाज दिले,
“आमचे नंबर आहेत बर का, तुमच्या पुढे.”
मग आम्ही आपला कुणाचा नंबर कोणता याचा अंदाज घेतला. मग आम्हाला कळलं, निळा शर्ट वाल्याच्या मागे आमचा नंबर आहे.
साडेसहा वाजता जाळीच लोखंडी गेट उघडलं. हातात पेन घेऊन माणूस आला, आम्हाला नंबर द्यायला. फ्रंटलाईन कर्मचारी असल्यामुळे त्याचं लसीकरण झालेलं असणार आधीच. सोशल डिस्टंसिंग वर त्याचा विश्वास नव्हता आणि केंद्रावरच्या आतल्या लोकांना बाहेर काय चालतंय ह्याच्याशी देणं-घेणं नव्हत. त्याने सरळ रांगेतल्या एकेकाचे हात हातात घेतले आणि आपल्या पेनाने तो हातांवर नंबर लिहायला लागला मोठ्या मोठ्या अक्षरात. आम्हालाही तसाच हातावर नंबर मिळाला. मला तोच हात कपाळावर मारायचा होता, पण म्हटलं नको. चेहऱ्याकडे हात नाही न्यायचा. त्याने आम्हाला परत साडेअकरा वाजता यायला सांगितलं. बाप रे! म्हणजे पाच तासांनी! मग तोपर्यंत काय करणार? आणि हे असं हातावर नंबरच लिहून घ्यायचा आहे, हे जर आधीच कळलं असतं तर आपापल्या पेंनने आम्ही घरीच हातावर नंबर टाकून घेतला असता एखादा. त्यांच्याकडे काय हस्ताक्षर तज्ञ होते का आमच्या हातावरचं अक्षर चेक करायला? अगदी चिडचिड होत होती. लस घ्यायच्या आधी भरपूर खायचं असतं हे कळल्यामुळे आम्ही भरपूर केक बिस्कीट..... आणि काय काय खायचं घेऊन गेलो होतो तिथे.
आता पाच तास इथे काय करायचं? त्यातल्या त्यात माझं घर जवळ होतं. मग आम्ही दोघीही माझ्या घरी आलो. ताजं खायला केलं. भरपूर गप्पा मारल्या. बराच टाईमपास केला आणि साडेअकरा वाजता परत गेलो लस घ्यायला.
आता हातावरचे नंबर बघून कूपन मिळत होती. लसींच्या पेट्या अजून यायच्या होत्या म्हणून परत तिथे ताटकळत उभ राहिलो. एकदाच्या साडेबारा वाजता पेट्या आल्या. सावकाशीने आमचाही नंबर आला. हुश्श! पहिली लस घेतली. अर्धा तास तिथेच थांबायला सांगितलं.
“मी लस घेतली आहे.” हे असा बोर्ड लावलेल्या एका खोलीत अर्धा तास बसलो. चला. एक प्रकरण आटपलं. जरा हुश्श वाटलं. घरी सावकाश दुपारचं जेवण झालं. संध्याकाळचा टीव्हीवर सिनेमा बघितला. लस मिळाल्यामुळे गड सर केल्याचा आनंद वाटत होता.
मध्यरात्री जाग आली मात्र! अंग अगदी पिळवटून निघत होतं. अक्षरशः शरीरातून कुणीतरी आपल्याला खेचतय असं वाटत होतं. प्रचंड डोकं दुखत होतं. आयुष्यात कधीच दुखले नव्हते, एवढे आता पाय दुखत होते. काहीतरी प्रचंड भयानक होत होतं. बापरे! लसीचा हा परिणाम. पाणी हवं होतं पण जागचं हलवत नव्हतं आणि तोंडातून आवाजही निघत नव्हता. अंगात ताप भरून आला होता.
“बाप रे! एकदा लस घेतली. आता परत नाही दुसऱ्यांदा.”
हे असलं वाक्य मी फक्त माझ्या मुलाच्या जन्माच्या बाळंतकळा देते वेळी म्हटलं होतं. चोवीस तासांनी वाटलं परत बरं.
आता दोन लसीनमाधली मुदत 84 दिवस झालेली होती. त्यामुळे दोन अडीच महिने तरी काळजी नव्हती. वाटलं होतं, 84 दिवसांनी तेच नंबर लावणं, तेच रांगेत उभा राहणं, सगळं परत करावं लागणार. पण नाही.
लसी चे थोडे “अच्छे दिन” आले होते. माझे 84 दिवस पूर्ण होईपर्यंत खाजगी हॉस्पिटल मध्ये लस यायला लागली होती. खासगी हॉस्पिटलला आधी नंबर लावून ठेवायची गरज नव्हती.
आरामात दुपारी दोन वाजता जेऊन खाऊन जायचं होतं. मी दोन वाजता गेले. साडेतीन पर्यंत नुसतीच बसून राहिले बाहेर. कारण दहा लोक झाल्याशिवाय ते सुरुवात करणार नव्हते लस द्यायला. आणि साडेतीन वाजेपर्यंत जेमतेम सहाच लोक आले होते. तिथल्या रखवालदाराने आम्हाला सांगितलं,
“बसा की अजून. चार पर्यंत टायमिंग हाये. येतील लोक चार वाजेपर्यंत.”
म्हणजे दोन वाजता जाणारी मी मूर्ख. ही माझी कुठेही वेळेवर किंवा वेळेच्या आधी पाच मिनिटं पोचण्याची जीत्याची खोड जन्मापासून आहे. मीटिंग असो नाहीतर काही कार्यक्रम. मी वेळेच्या आधी हजर. मग बॉस/वक्ता/संयोजक जो कुणी प्रमुख असेल तो वेळेच्या दहा मिनिटे नंतर येतो, आणि अजूनही नं आलेल्या लोकांबद्दल फाडफाड संताप व्यक्त करतो. आणि त्याचं हे झाप झाप झापणं संपलं की तो/ती ज्यांच्याकरिता हे बोलत होते, ते शांतपणे येऊन बसतात. बोलणाऱ्याच या विषयावर बोलून संपलेलं असतं. ‘रिपीट टेलिकास्ट’ होत नाही. ......असो. चार वाजेपर्यंत झाले दहा लोक एकदाचे. घेतली शेवटी दुसरी लस.
आता लस देणाऱ्यांमध्ये भलताच आत्मविश्वास वैगेरे आला होता. आम्हाला तिथे कोणी अर्धा तास वगैरे बसायला नाही सांगितलं. मीच विचारलं, बसायचं का जरा वेळ म्हणून. तर
“बसा. तुम्हाला बसायचं असेल तर.” च उत्तर आलं.
शेवटी दहा मिनिट देवळात टेकल्या सारखी बसून मी घरी आले. मागच्या अनुभवाने शहाणी होऊन या वेळी मी दोन दिवसांचा स्वयंपाक करून गेले होते. बेडरूम मध्ये प्यायच्या पाण्याचा मोठा तांब्या सुद्धा भरून ठेवला होता. क्रोसिन, विक्स, आयोडेक्स एवढं सगळं हाताशी ठेवलं होतं. जय्यत तयारी केली होती मी होणाऱ्या त्रासाची.
पण यावेळी काही झालंच नाही. यावेळी तापाने माझा पोपट केला. येईल येईल म्हणता म्हणता तो आलाच नाही. दोन दिवसाचा स्वयंपाक तयार होता. करायला काहीच काम मी शिल्लक ठेवलं नव्हतं. मग मी आणि माझा लॅपटॉप. दोन दिवसात भरपूर सिनेमे आणि मायबोलीचं वाचन झालं.

**************************

Group content visibility: 
Use group defaults

छान !

माझी कुठेही वेळेवर किंवा वेळेच्या आधी पाच मिनिटं पोचण्याची जीत्याची खोड जन्मापासून आहे.
>> +१ .
याचा आपल्यालाच त्रास आणि काही वेळेस तर पश्चात्ताप !

सहवेदना हा शब्द जरा चुकीचा वाटतो को-मॉर्बिडिटीसाठी. सहव्याधी किंवा नुसतंच व्याधी चालेल का? सहवेदना हा शब्द यापूर्वी empathy याअर्थी वाचल्यासारखा वाटतोय.

(गाण्याच्या क्लासच्या बाईंचं चुकलंच, अंगात कसकस असताना क्लास चालू ठेवला हे, असं वाटलं. त्यांच्याकडून तुम्हाला तर आलाच, तुमच्याकडून अजूनही कुणाकुणाला होऊ शकला असता कोविड)

वावे,
बरोबर आहे तुमचं. धन्यवाद. शब्द बदलला.

>>>>>>>>>आपली साठी का नाही झाली, याचं वाईट वाटायला लागलं. आत्तापर्यंत वाटायचं की आपण जरा चाळीस पन्नास वर्ष आधीच जन्माला आलो. या नवीन पिढी कडे बघून खूप हेवा वाटायचा. आणि आता वाटायला लागलं, आपण अजून थोडा आधी जन्माला यायला हवं होतं.

हाहाहा मजेशीर Happy
-----------------
>>>>>>>>>>>>पण यावेळी काही झालंच नाही. यावेळी तापाने माझा पोपट केला. येईल येईल म्हणता म्हणता तो आलाच नाही. दोन दिवसाचा स्वयंपाक तयार होता. करायला काहीच काम मी शिल्लक ठेवलं नव्हतं. मग मी आणि माझा लॅपटॉप. दोन दिवसात भरपूर सिनेमे आणि मायबोलीचं वाचन झालं.

वाह!!! सकारात्मक

खूप आवडला लेख.

छान

छान लिहिले आहे.
हा लेख आधीच गणपतीत आलेला. आणि मला वाटलेले मीच या स्पर्धेत उद्घाटनाचा नारळ फोडला Happy

अभिनंदनी शर्मिला...!
तुमचं लेखन आणि लेखनशैली सुंदर आहे..

Pages