इन्शाअल्लाह लेखक श्री अभिराम भडकमकर यांच्या कादंबरीचे परीक्षण

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 8 September, 2021 - 02:57

इन्शाअल्लाह

“संध्याकाळची वेळ. घराबाहेर अंगणातच घातलेला छोटासा मांडव. शेजारीच असणार्या पंखातून येणारा सुगंध.. फुलांनी, दिव्यांनी सजवलेल्या भिंती. ठेवणीतल्या साड्या, शेरवान्या , टोप्यानि घरातली सगळी मरगळ झटकून टाकलेली होती. एरवी बकाल वाटणार नजमाच फिकट हिरव्या रंगान सजवलेल घर आणि ७८६ चा रंगवलेला शुभ आकडा. सगळीकडे असणाऱ्या प्रफुल्लीत वातावरणात नजमाचा निकाह लागतो. पण थोड्याच वेळात तिथले वातावरण अचानक तणावपूर्ण होते. लोक आपापसात कुजबुजू लागतात. आणि काहीच वेळात तिथे एक पोलीस गाडी येते आणि दोन मुलांना घेऊन जाते. पण पोलिसांना अजुनी एका मुलाचा शोध आहे. जुनैद.!! जुनैद मोहल्ल्यात राहणारया जमिलाचा मुलगा आहे. पोलीस त्याला आजूबाजूला शोधू लागतात. पण जुनैद फरार झाला आहे. नेमके काय चालले आहे कुणालाच कळत नाही. कुणीतरी पोलिसांना कारण विचारत आणि पोलीस सांगतात “ रेल्वे स्टेशन उडाने का प्लन था इनका .. आरडीएक्स मिला”
लेखक श्री. अभिराम भडकमकर यांच्या इन्शाअल्लाह या कादंबरीची हि सुरवात. केवळ रेल्वे स्टेशन उडवणाऱ्या, दहशतवादाकडे झुकलेल्या मुलांची हि कथा नाही किंवा जुनैदचा शोध इतपर्यत मर्यादित या कादंबरीच कथानक नाही, तर मुस्लीम धर्मातील सत्य-असत्य , धर्म -अधर्म , निष्ठा , अंधश्रद्धा, रूढी , अत्याचार, राजकारण याची चिकित्सा करत त्यावर कठोर भाष्य हि कादंबरी करते.या कादंबरीत आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, त्यांचे विचार मत आपल्याला समजतात आणि स्वत:च्या नकळत त्या विचारांशी आपलाही संघर्ष सुरु होतो.
या कादंबरीतील महत्वाची व्यक्तिरेखा जमिला .. जुनैदची आई. रेल्वे स्टेशन उडवण्याच्या कटात सामील असणार्या मुलांना सोडवण्याची जबाबदारी मोमीन नावाच्या निष्णात वकिलांना देतात. मोमीन वकिलांचा हेतू फक्त एकच आहे मुलांना सोडवणे त्यासाठी खोट्याच खर करण्याची त्याची तयारी आहे. मोह्ल्यातील इतर लोकांची सुद्धा काहीही करण्याची तयारी आहे. पण जमिलाची नाही. कारण तिचा विश्वास आहे तिचा मुलगा निर्दोष आहे. त्याने जर काही केलच नाही तर कोर्टात खोट का बोलायचं? इतर लोक तिला समजून सांगतात कोर्टात खोटच सांगायचं असत तर जमिला म्हणते “ अस खोट अल्लाला कस चालेल?”
जमिलाच्या निष्ठा भाबड्या आणि प्रामाणिक आहेत. स्वत:चा मुलगा घरातून फरार झाला , तो आपल्याला लवकर मिळावा हि तिची इच्छा आहे पण असे असले तरीसुद्धा तिला खोट बोलण मान्य नाही..वास्तविक, जमिला शिकलेली नाही तरीही मुस्लीम धर्म काय आहे हे तिच्या वागणुकीतून सहज व्यक्त होत असते. चांगल वागण्यासाठी धार्मिक ग्रंथाच वाचन करायला पाहिजेच अस नाही. माणसाकडे उपजत चांगुलपणा असतो. त्या उपजत चांगुलपणाला स्मरून जमिला वागत असते. हा चांगुलपणा कादंबरीत नंतर बरेच ठिकाणी व्यक्त होत जातो.
जुनैदची केस शेवटी मोमीन वकील घेत नाहीत तर नीना गोखले नावाची वकील घेते. इथे जुनैदची केस घेण हे महत्वाच नाही तर तिची केस नीना गोखले हि हिंदू वकील घेते हे महवाच आहे. सगळीकडे एकच वादंग माजत, नीना वरच राजकीय दडपण वाढत जात. अखेर केस सोडण्याचा विचार नीना करते. पण जमिलाला ती आपला निर्णय सांगण्यासाठी जाते तेव्हा तिच्यात मतपरिवर्तन होते आणि नीना पुन्हा केस लढवण्याचे ठरवते. इतक राजकीय दडपण असतानाही नीना केस का लढते? पैशासाठी ? करिअर साठी?नक्कीच नाही. तिला जमिलाचा प्रामाणिकपणा भावलेला असतो. मोमिनला मुलांना सोडवायचे आहे. पण जमिलाला तिचा मुलगा सुटण महत्वाच नाही. तिला सत्य जाणून सत्याच्या मागे उभ राहायचं आहे. नीना तिच्यावर असलेल दडपण झुगारून देते आणि केस लढायचं ठरवते.
जमिला या व्यक्तिरेखेनंतर अनेक व्यक्ती आपल्याला कादंबरीत भेटत जातात. मुलांना सोडवण्याची जबाबदारी किंवा सत्य असत्य करण्याची जबादारी मोमीन किंवा नीना गोखले या वकिलांनी घेतली, पण सत्य असत्य यांचा निवडा करणाऱ्या वकिलांच्या बरोबरच रफिक भाई सारखे काही समाज सुधारक सुद्धा आपल्याला भेटतात. रफिकना मुले एका गुन्ह्यात अडकली याचे दु:ख नाही. मुलाचं कायदा बघून घेईल असे ते म्हणतात. मुल गुन्हेगार असतील तर त्यांना कायदा फाशी देईल. पण रफिकना काळजी आहे या सगळ्याच्या मुळाशी काय आहे ? मुले गुन्हे करायला का प्रवृत्त झाली? आपल्या समजात असणारा अशिक्षितपणा, अज्ञान? आजूबाजूची परिस्थिती? रफिकपुढे एका सुंदर आणि सर्वांच्यासाठी असणार्या जगाची कल्पना आहे. जिथ सगळ्यांना समान संधी असेल. रफिकजींचे विचार वाचत असताना रशियन लेखक फायडोर डोसटोव्हस्की यांच्या “ I know that people can be beautiful and happy without losing their ability to dwell on this earth. I can not or will not believe evil is not the man’s natural state” या वाक्याची आठवण येते
रफिक जेष्ठ आहेत पण त्यांच्या विचारात प्रभावित झालेला झुल्फी नावाचा तरुण सुद्धा या कादंबरीत आपलाल्या भेटतो. झुल्फी आधुनिक काळातील आहे. आपल्या समाजातील अडाणीपणा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्याला झटायचे आहे. नमाज हा केवळ “ मरने के बाद जन्नत मिलती है” या साठी पढायचा नसतो तर तो अल्लाह आणि आपल्यातला संवाद आहे. नमाज पढल्यावर आपण अल्लाच्या सानिद्यात आहे असे वाटू लागते या पवित्र भावनेसाठी नमाज असतो. धर्मग्रंथात लिहिलेल्या जुन्या गोष्टींच्या कडे भावनिक हेतूने न बघता, त्यांच्या आहारी न जाता, विज्ञाने सुकर केलेलं आयुष्य, शिक्षण, कुटुंब नियोजन या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत असे झुल्फिला वाटत असते.
झुल्फीचे विचार समजून घेत असताना लेखक आपल्याला हिंदू धर्मातही विचाराने पुरोगामी असणार्या श्री, अनंत या व्यक्तिरेखांची ओळख आपल्याला करून देतात. श्री आणि अनंत यांचे विचार झुल्फी सारखेच सुधारणावादी आहेत. धर्म अधर्म या गोष्टींच्यापेक्षा मानवता धर्म अधिक महत्वाचा आहे आणि त्याचमुळे जेव्हा जमिलाला हार्ट attack येतो तेव्हा तिच्या मागे हे दोघे खंबीर पणे उभे राहतात. समविचारी असल्यानेच जुल्फी, श्री आणि अनंत चांगले मित्र होतात.
सणवाराचे महत्व काय किंवा केवळ रूढी, परंपरा म्हणून सण करायचे का हा विषय सुद्धा या कादंबरीत चांगल्या रीतीने हाताळला आहे. झुल्फिला वाटत असत जर सणावाराला सामाजिक आशय दिला तर त्याच स्वरूप खूपच मोकळ आणि व्यापक होऊ शकत. सणाच्या धार्मिकतेला इथे विरोध नाही. तर समजाला एकत्र आणून त्याच्यावर सामाजिकतेचा संस्कार कसा करता येईल यासाठी झुल्फी प्रयत्नशील होता. या विचाराने तो प्रेरित होऊन तो ईदच्या दिवशी “ रक्तदान शिबीर” घेतो. या शिबिरात स्त्री पुरुष सगळ्यांनी सामील व्हावे असे त्याला वाटत असते. पण येथेही त्याला विरोध होतोच. ज्या स्त्रीला बुरखा घालूनच वावरायचं असे धर्माने सांगितले आहे ती स्त्री रक्तदानाच्या निमितान सर्व पुरुषांच्या समोर झोपणार? शब्बीर सारख्या कर्मठ माणसाला हे मान्य नाही. पण झुल्फी सुधारणा वादी आहे. स्त्रिया सकाळी उघड्याने संडासला बसतात किंवा त्यांना व्यवस्थित अंघोळीसाठी न्हाणीघर नाही याविरुद्ध आपण आवाज उठवायला पाहिजे. रक्तदान हे पवित्र कार्य आहे त्यासाठी पाठींबा दिला पाहिजे. झुल्फी सगळ्यांचा विरोध मोडून काढतो.
कादंबरीत अजुनी एक महत्वाचा विषय कुटुंब नियोजन. केवळ धर्मामध्ये “साफ दिया है बच्चे पैदा होनेसे रोकानेवाले कोई साधन इस्तेमाल करना हराम है” म्हणून पैदाइश चालू ठेवायची हि गोष्ट त्याला मान्य नव्हती. झुल्फी कयूम नावाच्या आपल्या मित्राला बायको ऑपरेशन करून घेत नसेल तर तू नसबंदी करून घे म्हणून सांगतो. कयूम त्याच्या बांधवांच्याकडून झालेला विरोध मोडून काढतो पण जेव्हा त्याला “ मशीद बंद करू” असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा तो घाबरतो. आणि तो नसबंदी करून घेत नाही. वर्षानुवर्षे जे संस्कार मनावर बिंबलेले असतात ते इतक्या सहजासहजी पुसून जाण शक्य होईल ? पण झुल्फिला समाधान याचे असते एक विचार आपण कयूमच्या मनात रुजवला. सुधारणा हळूहळू का होईना पण ती होणार आहे हा विश्वास त्याला वाटत असतो.
मुस्लीम समाजातील तलाक पद्धत असो किंवा खतना पद्धत असो यातील प्रत्येक गोष्टीवर लेखकाने अभ्यासपूर्ण लिहिले आहे. केवळ धर्मात सांगितले म्हणून खतना करायचा किंवा तसे केलेच तरच मुस्लीम म्हणून ओळख मिळेल अन्यथा नाही असा असलेला गैरसमज...! झुल्फी समजून सांगतो अल्लाने सांगितल्याप्रमाणे सत्याच्या मार्गाने जातो तो खरा मुस्लीम. तलाक, तलाक असे तीनदा म्हटल्याने घटस्फोट होणे हे कितपत योग्य आहे, याविषयी धर्म नेमके काय म्हणतो किंवा समान नागरी कायद्याचे महत्व काय या सर्वाविषयी विस्तृत चर्चा या कादंबरीत केली आहे. हजारो वर्षापूर्वी केवळ धर्मामध्ये सांगितले आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊन नये तर ते स्वीकारताना डोळसपणे स्वीकारले पाहिजे हि गोष्ट लेखकाने अधोरेखित केली आहे.
एक सुंदर कादंबरी लिहिल्याबद्दल श्री. भडकमकर यांचे अभिनंदन. लेखकाचे बालपण कोल्हापुरातील टाकाळा परिसरात गेले. येथे बोलली जाणारी बागवानी भाषा हि त्यांची दुसरी मातृभाषा झाली. त्याचमुळे कादंबरीतील बागवानी वाचत असताना लेखकाने किती बारकाईने हि भाषा केली आहे याचा प्रत्यय येतो.
हि कादंबरी आपली उत्कंठा वाढवते. कोणताही नवीन प्रसंग जेव्हा कादंबरीत येतो तेव्हा त्या प्रसंगाबद्दल कुतूहल आपल्या मनात लेखक निर्माण करतात. मग सुरवातीला आलेला रेल्वे स्टेशन उधळण्याचा डाव असो किंवा रफिकचा मृत्यू असो. त्यामुळे कादंबरी म्हणजे एक वैचारिक चित्रपट आहे असे वाटत राहते. लेखक प्रक्यात पटकथा संवाद लेखक असल्याने त्यांना ते सहज शक्य झाले आहे असे वाटते.
हि कादंबरी मुस्लीम धर्म त्यातील समज गैरसमज याबाबत जरी कठोर भाष्य करत असली तरी सुद्धा त्यातील श्रद्धेला ती कुठही धक्का लावत नाही. त्याचमुळे लेखकाची भाषा समतोल आहे असे प्रामाणिकपणे वाटते.
शेवटी कादंबरी संपत असताना एक प्रश्न मनात राहतोच. जुनैदचे काय झाले? जुनैदचा पत्ता लागतो का ? खर तर सुरवातील येणारा जुनैद फरार झाला हा उल्लेख गोष्ट कादंबरी वाचत असताना आपण विसरून जातो. मला वाटते हेच या कादंबरीचे यश आहे. त्याचा पत्ता लागतो का किंवा लावणे हा या कादंबरीचा हेतू नाहीच. या निमित्ताने अनेक विषयांची चिकित्सा करणे हा या कादंबरीचा हेतू आहे. शेवटी नीनाला तिचे सिनिअर वकील सांगतात “ जुनैद हा ठेवणीतला पत्ता आहे जेव्हा पाहिजे तेव्हा वापरायचा” त्या केसचा निकाल केव्हाही लागेल. दहा बारा वर्षे कदाचित त्याही पेक्षा जास्त.
पण शेवटी केसचे काहीही झाले तरीही समाजातील मग धर्म कुठलाही असो त्यांच्या मानसिकतेत बदल झाला का? समज गैरसमज प्रत्येक धर्मात आहेत. आणि लोक त्याचे बळी आहेत. जेव्हा जेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा समाज सुधारकांना फार मोठी किंमत द्यावी लागली. मग प्रश्न असा पडतो हे असेच चालणार का ? शेवटी लेखकाने सुरवातीला लिहिल्याप्रमाणे “ वाटेत येणारे अडथळे जसे वास्तवाचे असतात तसेच ते जुनाट समजुतीचे असतात ..... या अशा बंदिस्तपणाचे अडथळे भेदून मोकळ्या आकाशाकडे झेपावण्याची किंमतही जबरदस्त असते.” कादंबरी संपते, आपण सुन्न होतो आणि त्याचवेळी कविवर्य सुरेश भटांची एक कविता सहज आपल्या ओठी येते “ होतील वादळे, खेटेल तुफान तरी मी चालतो, अडथ ळ्याना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही”

सतीश गजानन कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान परिचय. वाचलं पाहिजे पुस्तक.
लेखकाने किती बारकाईने हि भाषा केली आहे याचा प्रत्यय येतो. >> इथे आत्मसात केली आहे असं हवंय ना?

छान केला आहे परिचय.
>>>>>हि कादंबरी मुस्लीम धर्म त्यातील समज गैरसमज याबाबत जरी कठोर भाष्य करत असली तरी सुद्धा त्यातील श्रद्धेला ती कुठही धक्का लावत नाही. त्याचमुळे लेखकाची भाषा समतोल आहे असे प्रामाणिकपणे वाटते.
वाह!!

पुस्तक परिचय आवडला.यावर चांगला चित्रपट होऊ शकतो.पण झुल्फिच्या भूमिकेत विकी कौशल पाहिजे.

पुस्तक परिचय आवडला.यावर चांगला चित्रपट होऊ शकतो.पण झुल्फिच्या भूमिकेत विकी कौशल पाहिजे.
"ॲट एनी कॉस्ट" कशावर आहे?थोडक्यात सांगू शकाल का?नाहीतर पुस्तकंपरिचय ही चालेल.

ॲट एनी कॉस्ट ही टिव्हीवरच्या दैनंदिन मालिका आणि रिऍलिटी शोज यांच्या टीआरपी आणि इतर अंतर्गत घडामोडी यावर आहे. चॅनेलवाले, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार आणि प्रेक्षक या सगळ्यांचे इंटरेस्ट्स कसे पूर्ण होतात हे दाखवणारी कथा आहे. जेव्हा सगळं चूक आणि बरोबरच्या मध्ये असतं तेव्हा कोण कसं वागतं हे छान दाखवलं आहे. Basically shows the underbelly of the TV industry.