पॅशन फ्रूट - एक अनुभव

Submitted by DJ....... on 7 September, 2021 - 02:06

आम्ही नवीनच घर बांधलं होतं. घराला तारेचं कंपाऊंड. घराभोवती इकडून-तिकडून जमवलेली अन जिवापाड प्रेम करून वाढवलेली विविध फुलांची रोपटी. कॉलनीतील एखाद्या बंगल्याच्या आवारात एखाद्या कोपर्‍यात इतरांना काढता येणार नाहीत पण फक्त बघता मात्र येतील अशा पद्धतीने पॅशन फ्रुटचा वेल लावलेला असे. त्यावर फुलं अन पॅशन फ्रूटं लटकलेली असायची. त्याकाळी सुशिक्षित अडाणी जे की त्यांच्या कडे हा वेल नव्हता ते या फ्रुटांस 'फॅशन फ्रुट' म्हणायचे तर सुशिक्षित शिकलेले ज्यांच्या घरी तो वेल आहे किंवा होता असे त्या फ्रुटाचा वेल मिळवु पहाणार्‍या अडाण्यांना 'पॅ-श-न-फ्रु-ट' असं म्हणायला लावायचे. बघणार्‍याला या फ्रूटांबद्दल ऐकुन माहिती असायचं पण ती फ्रुटं मागायची कशी हाच मोठा प्रश्न असे. बंगलीतलं पब्लिक हे असं मागितलं तर कोणालाही पॅशन फ्रूटं देतील की नाही कोणास ठाऊक असं प्रत्येकालाच वाटायचं. कारण हे असं अनोळखी घरात जाऊन फ्रुटं मागणं जसा आपल्या स्टेटसचा प्रश्न आहे तसा तो त्यांच्याही स्टेटसचा प्रश्न असेल असं तेव्हा वाटायचं... आम्ही पॅशन फ्रूटाचं सरबत पितो अन तुम्ही लिंबाचं असा सरळ सरळ सामना Proud . मग कधीतरी कोणाकडुन ती फ्रूटं घरी पोचायची अन कालांतराने त्या बंगलीतला वेलही नाहीसा व्हायचा.. तो का व कसा हे वेल लावल्यावरच कळालं . जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असं म्हणतात ते काही उगाच नव्हे...! Wink .

जेव्हा पहिल्यांदा पॅशन फ्रूट आमच्या घरी पोचलं ते माझ्या चुलत आत्याच्या सुनेच्या माहेरातल्या मैत्रीणीच्या वडिलांच्या ऑफिसच्या मित्राकडून. कसे का होईना अप्रुप असलेल्या पॅशन फ्रूटचं एकदाचं घरी आगमन झालं तेव्हा मला फार आनंद झाला. वरून पिवळं-हिरवट रंगाचं, चमकदार-तुकतुकीत सालीचं ते फ्रूट बघितल्यावर मन अगदी शहारून गेलं. आजवर लिंबाचं सरबत पिणार्‍या आमच्या घरात आता पॅशन फ्रुटाचं सरबत मिळणार म्हणुन इतका आनंद झाला की त्याकाळी घराघरात असलेल्या लँडलाईन फोनवरून ही बातमी मी माझ्या मित्र अन चुलत-मावस भावंडांना सांगितली. शेवटी सरबताच्या ओढीने मी आईच्या मागे भुणभुण लावत ते पॅशन फ्रूट तिच्याकडून चाकुने कर्रर्रर्रर्रर्रर्र्कन कापुन घेतलं.. त्याचे दोन भाग झाले अन त्याकडे बघत "हे क्काय...???" असा प्रश्न पडला. फ्रूटाच्या आतला चमचा-दोन-चमचा पिवळट नारिंगी रंगाचा गिळगिळीत गर अन त्यात गुरफटलेल्या बिया बघितल्यावर आता याचं सरबत कसं करायचं असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. फ्रुटात गच्च रस भरला असावा असं आधी वाटल्याने आता तो एवढास्सा गर बघुन घोर निराशा झाली. आईने तो चमचा-दोन-चमचा असलेला गर गाळणीतून नीट गाळुन घेतला. बिया वेगळ्या काढल्या अन गरात पाणी+साखर टाकुन सरबत केलं. एवढासा गर असलेल्या या फळाचं सरबत ३-४ लिंबांना थोबाडीत मारेल इतकं आंबट होतं. मग अजुन पाणी+साखर घालून ते कसंबसं संपवलं. चव बरी होती. फ्रुटांना बघितल्यावर फंटा, मिरिंडाची चव असेल असं वाटलं होतं पण ती तशी आजिबातच नव्हती.... घ्यायला गेलो गणपती अन मिळाला मारुती तसा प्रकार झाला.

सरबत करताना बिया बाजुला ठेवलेल्या होत्याच. आता आपल्याही घरामागच्या कंपाऊंडच्या तारेवर पॅशन फ्रुटं लटकलेला वेल दिसेल या कल्पनेने हुरळून जाऊन मी त्या बिया कंपाऊंड शेजारीच छोटा खड्डा काढुन पेरल्या. ७-८ दिवसात जमीनीतून वेलाचे पोपटी-हिरवे धुमारे बाहेर निघाले. ते इतके चपळ होते की थोड्याच दिवसात सळसळत त्यांनी अख्खी कंपाऊंड तार व्यापून टाकली. कंपाऊंड गर्द हिरव्या वेलीने पूर्ण झाकून गेलं. वेलीची ही प्रगति पहाण्याचं वेडंच लागलं. यथावकाश वेलीला कळ्या लागल्या म्हणेपर्यंत कृष्णकमळाची आठवण यावी अशी लव्हेंडर रंगाची फुलंही आली. फुलांचं निरिक्षण करेपर्यंत वेल पॅशन फ्रूटांनी लगडला देखील..! त्याकाळी मोबाईल फोन अन व्हॉट्सप-फेसबुक नव्हतं नाहीतर सेल्फी काढुन जगभर कौतुक केलं असतं. पण शेजार्‍या-पाजार्‍यांना अन मित्रांना ती लगडलेली फ्रुटं दाखवून का होईना वेलाचं कौतुक करून घेतलं. पुढे येऊ घातलेलं आक्रित त्यावेळी जसं आम्हाला कळलं नाही तसंच आमच्या शेजार्‍यांना अन मित्रांनाही..!

पॅशन फ्रूटं पटापट मोठी होऊ लागली. गर्द हिरव्या रंगाची फ्रूटं दिवसागणिक रंग बदलू लागली अन आधी गर्द हिरव्या रंगाची असलेली फ्रुटं नंतर पिवळसर पोपटी मग पिवळी मग पिवळट नारिंगी होऊ लागली. मी पटापटा पिकलेली फ्रूटं तोडून आईकडे सरबतासाठी हट्ट करू लागलो. २-३ वेळा आईने माझा हट्ट पुरवण्यासाठी सरबत करून दिलं खरं परंतु रोज इतकं आंबट आणि पित्तकारक सरबत पिणं केवळ अशक्य आहे याची जाणिव झाली.आल्या-गेल्या पाहुण्या-स्नेह्यांना सरबतं पाजून झाली. शेजार्‍यांनाही खास सरबतासाठी बोलावणं धाडुन निरोप देताना ५-६ टप्पोरी-पिवळट-नारिंगी पॅशन फ्रुटं देऊन त्यांच्याकडुन सुहास्य वदनाने कौतुक करून घेतले.

पहिल्या फटक्यात आलेली फ्रुटं अशाप्रकारे आम्हाला कौतुकात भिजवून गेली परंतु कंपाऊंडवरचा वेल काही केल्या फळे धारण करण्याचं थांबवेना. रोजच्या रोज असंख्य कळ्या-फुले-फ्रूटांनी वेल उतू जाऊ लागला. शिवाय रोजच्या रोज ८-१० फ्रूटं तरी पिकायचीच. झेंडु फुटल्यासारखं पीक येऊ लागलं अन आमची पाचावर धारण बसली. मग आम्ही ती ओळखीच्या माणसांना आग्रहाने देऊ लागलो. मी तर मित्रांना बोलावून त्यांना ती फ्रूटं न्या म्हणु लागलो. तरीही फ्रुटांचा रेटा काही केल्या शमेना. मग आमचे शेजारी, मित्रांचे शेजारी, शेजार्‍यांचे शेजारी असे करत रोजचा ताजा माल खपवू लागलो. शेवटी २-३ वेळा सरबत पिऊन आमच्यासारखे आमच्या फ्रुटांचे वाटेकरीही कंटाळले. आम्ही त्यांना "घ्या हो - घ्या हो" म्हणुन फ्रुटं देऊ केली की ते हात जोडून "नको हो - नको हो" करू लागले. आधी सुहास्य वदनाने कोड कौतुक करणारे आमचे शेजारी आता ओळखच दाखवेनासे झाले.. हाका मारल्या तरीही 'ओ' देईनासे झाले. पॅशन फ्रुटांची अशी दहशत बसल्यावर आपणाला अनोळखी लोकांकडून आपुलकीने फ्रुटं कशी काय बरे मिळाली असतील यामागचं गमक कळालं..!!

शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. फ्रुटांचं कौतुक संपलं अन त्याची जागा वैतागाने घेतली. वेलीवरून पॅशन फ्रुटं काढली जात होती तोवर पित्त प्रकोप हा शारिरीक त्रास सोडला तर इतर काही सामजिक त्रास नव्हता. पण आता फ्रुटांचं कौतुक सरल्याने फ्रुटं वेलीवरच पिकू लागली अन शेवटी गळून खाली टपकू लागली. टपकलेल्या पिकल्या फ्रुटांना भोकं पडून त्यातून आळ्या बाहेर पडू लागल्या. रोज १५-२० फळं खाली पडल्यामुळे कंपाऊंडपाशी आंबूस वास पसरू लागला.. चिलटं अन माशा घोंगावू लागल्या अन त्यामुळे आमच्यासहीत शेजारी-पाजारीही भयंकर त्रस्त होऊ लागले. त्याकाळी ओला-सुका कचरा न्यायला घंटागाडी येत नसे. पिकलेल्या फ्रुटांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आ वासून समोर उभा राहिला. अक्षरशः तोंड दाबून बुक्क्यांचा मार काय असतो याचा अनुभव मिळू लागला. आज मार खाल्ला निदान पुढच्या आठवड्यातील मार तरी चुकवला जावा या हेतूने मग वेलीवरची फुले तोडुन देवपुजेत, फुलदाणीत वापरू लागलो एवढंच काय निर्दयीपणे अगदी वेलीवरच्या कळ्या देखील खुडु लागलो. परंतु जिथं आभाळच फाटलं तिथं ठिगळ तरी कुठं लावणार..!

पॅशन फ्रुटांचा सोस संपला. यातुन कोणीतरी वाचवा असं म्हणण्याची वेळ आली. शेवटी घरच्यांच्या संमतीने वेलच छाटून टाकला. वाटलं आता सुटका झाली. पण कसलं काय अन फाटक्यात पाय..! छाटलेल्या वेलाच्या दणकट खोडातून पुन्हा एकदा जोमाने धुमारे फुटू लागले अन कंपाऊंड काबिज करण्याच्या ध्येयाने सळसळू लागले. ते कमी की काय म्हणुन पिकून खाली पडलेल्या फ्रुटांमधून जमिनीत पडलेल्या बियांनी रुजुन कंपाऊंडवर आक्रमण केले. ही काय आफत आली म्हणुन शक्य तितक्या गतिने नवीन रोपट्यांना मुळापासुन उपटायचा सपाटा सुरु केला. एका बाजुला आधीच्या वेलाचे धुमारे अन दुसर्‍या बाजुला नवीन उगवणार्‍या वेलींचा खांडवा अशा दोन्ही आघाड्यांवर डोळ्यात तेल घालून निपटारा सुरु केला. शेवटी आकाशपाताळ एक करून कसेबसे आमचे कंपाऊंड पॅशन फ्रूटाच्या वेलींपासून मुक्त झाले अन आमच्यासहित आमच्या शेजार्‍यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

आमच्याकडे वानवळा म्हणुन आलेल्या पॅशन फ्रुटांनी आमचं जसं धाबं दणाणवलं तसं आम्ही वानवळा म्हणुन दिलेल्या पॅशन फ्रुटांनी कुणा-कुणाचं धाबं दणाणवलं असेल हा विचार करून अजूनही मनात अपराधीपणाची भावना येते...!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलयं. Lol
काही वर्षापुर्वी माझ्याकडे दोडक्याच आणि दुधीच अमाप पीक आलेलं. तेव्हा असा वैताग आलेला. लोक मला वैतागलेली आणि मी त्या भाज्यांना.

खरंय वैनी. आता मला कधी कुठं कोणी घरी बोलावून पॅशन फ्रूटचं सरबत पाजलं तर मी फक्त गालातल्या गालात हसतो. Bw

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद Bw

मस्त लिहिलंय, आपल्याकडे पण हि वेल लावावी असं मनात होतं, आता विचार बदलला.

'काही वर्षापुर्वी माझ्याकडे दोडक्याच आणि दुधीच अमाप पीक आलेलं. तेव्हा असा वैताग आलेला. लोक मला वैतागलेली आणि मी त्या भाज्यांना.'>> माझ्या घरी द्या पाठवून

आसा. , किट्टु२१ धन्स Bw

@किट्टु२, तुम्ही लावा हो बिन्धास्त. फक्त पहिल्यांदा कुंडीत लावा म्हणजे फार फोफावणार नाही. सरबत आवडलं अन व्यापारी तत्त्वावर उत्पादन घ्यावसं वाटलं तर मग सुपिक जमिनीत लावा Bw

Pages