सर्व्हे नंबर २५ - भाग ८

Submitted by सुर्या--- on 7 September, 2021 - 01:04

सर्व्हे नंबर २५ - भाग ८

मातीने भरलेल्या खड्ड्याच्या एका टोकावर काही चिन्ह काढले होते. काही फुल्लीवजा चिन्हे तर काही नक्षीदार. काही सूचित करायचं होत कि आणखी काही. मी सीमंतिनीला आवाज देऊन बोलावले. सीमंतिनीसुद्धा ती चिन्हांकित माती पाहतच राहिली. तिने थोडाही विलंब न लावता त्याचे फोटो काढून घेतले.

चिन्हांच्या सभोवती दगडे ठेऊन त्यावर एक प्लायवूड आडवे टाकून झाकले. लागोलाग आम्ही देवज्याबांना भेटायला गेलो. पाड्यावर पोहोचलो तेव्हा देवज्याबांच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती. आम्ही आत जाऊ लागलो तशी गर्दीने आम्हाला वाट मोकळी करून दिली. देवाज्याबा अंथरुणाशी खिळले होता आणि शेवटच्या घटका मोजत होते. कदाचित आम्हालाच यायला उशीर झाला होता.

मला पाहताच त्यांनी माझ्याकडे हात करत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हात उचलायलाही त्यांना जमत नव्हते. तोंडातून शब्द निघत नव्हते. पांढरे झालेले डोळे मात्र काहीतरी सांगायला धडपडत होते. थरथरणारे हात अगदीच जीवापोटावर वर करत बोट दाखवत त्यांनी अंगणातील एका दगडाकडे बोट दाखविला. मी काहीच समजू शकलो नाही.

देवाज्याबाच्या मुलाने आम्हाला समजावले. "आमच्या अंगणामध्ये तो दगड आहे, तो 'जिवंत दगड' आहे. ते दाखवत आहेत बाबा."

"'जिवंत दगड' म्हणजे?" मी विचारले.

"जिवंत दगड म्हणजे जे आपोआप आतून वाढत राहतात. वरवर छोटे भासत असले तरीही वर्षानुवर्षे जमिनीत त्यांची संथ गतीने वाढ होत राहते." देवाज्याबाच्या मुलाने स्पष्ट केले.

"दगड सुद्धा जिवंत असतो?" मी मनातल्या मनात म्हणू लागलो. निर्जीव म्हणून ज्याची गणना असते त्यालाही जिवंत दगड म्हणून संबोधने मला आश्चर्याचे वाटले. आणि देवज्याबा त्याकडे का मला खुणावत असतील? काही कळत नव्हते. सीमंतिनी मात्र काहीतरी गोंधळात पडल्यासारखी वाटत होती. मनातल्या मनात ती काहीतरी विचार करत होती. मला तिने हळूच खुणावून बाजूला बोलावले आणि हळुवारपणे बोलू लागली."अरे काल त्या खड्ड्यामध्ये माती खचली होती ना, तिथे काही असं जिवंत दगड वगैरे असेल का?" सीमानितीने विचारांतीच संदर्भ जोडला होता. मलाही तीच म्हणणं पटलं होत. पणं ....

"पुन्हा तिथे खोदायच का?" मी सीमंतिनीलाच प्रश्न केला. दोघांकडेही या प्रश्नाला उत्तर नव्हते.

शेवटी देवज्याबाचा निरोप घेऊन आम्ही फार्म हाऊस वर परतलो. आमच्या मागोमागच हाल्या आणि हाली देखील आले. बुजवलेला खड्डा पाहून त्यानेच आम्हाला विचारणा केली, "मालक, काय झालं? प्लांनिंग बदलली का?"

आम्ही त्या दोघांनाही प्लायवूड ने झाकून ठेवलेली चिन्हे दाखवण्यासाठी सोबत नेले. प्लायवूड बाजूला केले तेव्हा चिन्हे गायब होती. एकामागोमाग एक आश्चर्याचे धक्के सीमंतिनी आणि मला लागत होते. सीमंतिनीने मोबाईल मधले फोटो दोघांनाही दाखवले. हाली फोटो पाहून विचारात पडली.

"मालक, आपण वेळ घालवाया नको, देवभुबाबांकडे गेलो तर तेच काहीतरी सांगतील" हाल्याने सुचवले.

"देवभुबाबा कोण?" मी विचारले.

"मालक, देवभुबाबा म्हणजे मोठे साधुबुवा, लय चमत्कारी पुरुष, कनची बि समस्या असो, ते सोडवणारच", हाल्याने जोर देऊन सांगितले.

"कुठे भेटतील आपल्याला देवभुबाबा?" मी विचारले.

"अजापर्वतावर भेटतील ते". हाल्याने सांगता सांगता जाण्याचा रस्ताहि सांगितला.

"सीमंतिनी चल, आपण जाऊन येऊ". मी सीमंतिनीला घेऊन लगेचच निघालो.

"कुणाला काही सांगू नकोस आणि कोणालाही फार्म हाऊस मध्ये घेऊ नकोस", असं हाल्याला स्पष्ट बजावलं. आम्ही गाडीत बसलो तशी हाली देखील घरच्या मार्गाला लागली. ती मनातून घाबरली होती. आता हाल्या आणि सिम्बा दोघेच फार्महाउस वर होते.

दोन तासात आम्ही डोळखांबला पोहोचलो. तेथून पुढे पायपीट करत, गवतातून वाट काढत, अबापर्वताच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामध्ये पोहोचलो. जिकडे नजर फिरवावी तिकडे गवत आणि झाडे. पायवाट पकडून आम्ही चालत राहिलो. दोघेही घामाने भिजलो होतो. गवत काट्यांचे व्रण अंगावर लागले होते. तहानेने व्याकुळ झालो होतो. मजल दरमजल करत जंगलाच्या मध्यभागी पोहोचलो. झाडे विरळ झाली. गवत साफ करून जागा मोकळी व स्वच्छ केली होती. एका बाजूला जुने कौलारू छप्पर असलेले पुरातन मंदिर होते. रामायणकालीन नागदेवतेची मूर्ती, पायाचे ठसे असलेल्या मूर्ती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या केल्या होत्या. मंदिरासमोरून एक पायवाट थोडी खाली उतरती दिसत होती. तेथे एक पाण्याचे टाके दिसले. त्यामध्ये तहान भागवून हात पाय स्वच्छ धुवून घेतले. पक्ष्यांच्या किलकिलाटाशिवाय दुसरा कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. मानवी वस्तीपासून बऱ्याच दूर अंतरावर, घनदाट जंगलात आम्ही दोघे देवभुबाबांना शोधायला आलो होतो. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. बाजूच्या एका छोट्याश्या कुटीमध्ये एक वयोवृद्ध म्हातारी काही काम करता करता नामस्मरण करत होती.
तिच्या पायावर माथा टेकवून तिचे आशीर्वाद घेतले आणि मग तिलाच आम्ही देवभुबाबांविषयी विचारणा करू लागलो. अर्थातच एवढ्या दूरवर पाय तुडवत आम्ही आलोय आणि देवभुबाबांची विचारणा करतोय म्हणजे विषय गंभीर असेल याचा अंदाज आजीला आला होताच. आजी तरीही हसतच बोलत होती.
"काही काळजी करू नका. बाबा आहेत, सर्व चांगलच होईल"
आम्ही मात्र देवभुबाबा कुठे भेटतील अशी रट लावूनच होतो. आजी ठामपणे सांगत नव्हती. "थांबा थोडा वेळ, येतील ईतक्यात" असं सांगून ती तिच्या नामजपात गुंतून जायची.
फार्म हाऊस च्या विचाराने आणि परतीच्या ओढीने एक एक क्षण जड जात होता. पण त्यांना भेटण्याशिवाय जाताही येत नव्हते. बराच वेळ झाल्यावर मंदिराच्या एका बाजूला बनवलेल्या ध्यानसाधनेच्या गुफेतून एक तेजस्वी पुरुष बाहेर आले. त्यांच्या पेहरावावरून आणि एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तेच देवभुबाबा आहेत अशी मनोमनी खात्री झाली होती. आजी पुढे होऊन देवभुबाबांच्या पाय पडली. तसा मी आणि सीमंतिनीही त्यांच्या पायावर डोके ठेऊन आमचे गार्हाणे मांडू लागलो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान