अताशा वाढत नाही

Submitted by निशिकांत on 5 September, 2021 - 11:15

शब्दानेही शब्द अताशा वाढत नाही
मोबाइलची करणी! कोणी बोलत नाही

हजार येती, हजार जाती फॉरवर्ड पण
संदेशांना कुणी कधीही वाचत नाही

ओळीवरती कविता लिहिणे आम जाहले
ओळ दिल्याविन काव्य लिहाया हिंम्मत नाही

आभासी विश्वात जाहले मित्र हजारो
शेजार्‍याशी पण बोलावे वाटत नाही

वेड लागले काँप्यूटरचे आज एवढे!
पस्तीशीतच पाठ दुखू दे, हरकत नाही

भेट न झाली कधी परंतू मधाळ गप्पा
ती आहे की तो आहे ती, समजत नाही

खेळ संपले मैदानी अन् मिळणे जुळणे
संगणकाशी नाते कोणी तोडत नाही

चोविस तासांचाच दिवस का असतो यारों!
जगात आभासी, वेळेला बरकत नाही

"वेगवान "निशिकांत" जाहले विश्व तरीही
मावळतीला वेळ तुझा का सरकत नाही?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला (मात्रा वृत्त)
मात्रा ८+८+८+२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users