आठवण

Submitted by SharmilaR on 3 September, 2021 - 06:02

आठवण

आपली पहिली भेट झाल्याला आता अठरा वर्षे झालीत. (आणि शेवटचं भेटल्यालाही आज अकरा वर्ष झालीत.) सुरवातीची दोन वर्ष तर आपण दोघी दिवस - रात्र एकमेकींच्या सहवासात होतो. नंतर बरेच दिवस आपण एकमेकींना जाडजूड पात्र पाठवायचो. कधी निसटत्या भेटी तर कधी निरोपा-निरोपी. सगळं बंद झाल्यावरही बराच काळ लोटला. तरी मधली एवढी वर्ष मला काय वाटायच माहितेय? आपण जवळच तर आहोत. मध्ये फक्त सहा-सातशे किलोमीटरच अंतर. हे अंतर काय, केव्हाही मनात आणलं तर पार करता येईल. बाकी मी माझ्या काठावरच दिवस संभाळतेय आणि तुही तुझ्या संसारात गुंतलीस.
खरं सांग वंदा, एवढ्या लांबच्या प्रवासाला जातांना तुला एकदाही मला हाक करावीशी नाही वाटली? अगं, एकेकाळी प्रत्येक गोष्ट मला सांगितल्याशिवाय तुला चैन पडायची नाही. "my guide! " तू मजेत म्हणायचीस. बरेचदा तर एखादी अगदीच शुल्लक गोष्ट सांगायलाही तू अर्धा - अर्धा तास माझ्या क्लास बाहेर उभी असायचीस. कधी नाही ते वर्गात सरांच्या शिकवण्याकडे माझं लक्ष असलच तर खिडकी बाहेरून हळूच शिट्ट्या मार, नाहीतर शुक - शुक कर, असं काहीतरी करत तू उभी असायचीस. क्लास संपवून मी बाहेर आल्या आल्या "ए चल, आता बाकीच्या lectures ना मार दांडी. आपण रूम वर जाऊन मस्त चहा घेऊ" असं म्हणून मला रूम वर घेऊन यायचीस. तर कधी - कधी तिथेच झाडाखाली बसून मला काय - काय ऐकवायचीस. बरं, बाहेर एवढ्या गप्पा मारूनही परत रूमवर आपण दोघीच राहायचो.
खरंच वंदू, जेव्हा तू तुझ्या लग्नाचं निमंत्रणही पाठवलं नाहीस नं, तेव्हा तरी काही बिनसल्याच माझ्या लक्षात यायला हवं होतं गं ! एवढं कसं दुर्लक्ष केलं मी ?
एकदा अचानक तुझ्या गावात यायचा योग आला न मला कोण आनंद झाला. माहित होत, अचानक आल्यावर तू तुझ्या आई - बाबांच्या घरी सापडणार नक्कीच नाहीस पण निदान तुझा ठावठिकाणा तर कळेल. शिवाय ते घर मलाही काही परकं नव्हतच. कॉलेज लागून चार दिवस सुट्ट्या आल्यावर कित्येकदा हॉस्टेल वरून आपण दोघी तुझ्याच घरी राहायला जायचो. चला, आता निदान तुझी ख्याली - खुशाली तर कळेल.
तुझ्या घराच्या कोपऱ्यावर आल्यावर मात्र अडखळल्यासारख झालं. शेजारचा विजू त्याच्या बंगल्याच्या फाटकाशीच उभा होता. तू आता कुठे असशील? तुझ्या घरी....ह्याच्या घरी....कि आणखी कुठे .....? मधल्या काळात आपली काहीच पत्रोपत्री न झाल्याचं तेव्हा आणखीच तीव्रतेनं जाणवलं. त्याच्याकडे बघून हात हलवला. जेमतेम हसून त्यानं विचारलं,
"कशी आहेस ?"
त्याच्या आवाजावरूनच तटकन लक्षात आलं, तू त्याची नक्कीच झाली नाहीस. (वंदू, तुला हे हि सांगावस नाही वाटलं?) आणि तुझं माझ्यापासून लांब जाणं मला आणखीच जाणवलं. तुला कुठल्याच आठवणी नको होत्या का ?
त्यानं हि मला त्याच्या घरात ये वैगेरे काही म्हंटल नाही. माझी काय ओळख करून देणार होता तो घरात? मधला दुवा तर तू होतीस नं ?
दार उघडायला काकू आल्या. मला वाटलं होत मधल्या काळात विसरल्या असतील. पण आधी आस्चर्याने त्या माझ्याकडे बघत राहिल्या आणि आत बघत जोरान त्यांनी हाक मारली, "वंदे, बघ कोण आलंय !"
आता आनंद अन आस्चर्य वाटण्याची पाळी माझी होती. "तू" एवढ्याशा बाळाला थोपटत बाहेर आलीस. अरेच्चा ! तू चक्क इथेच आहेस अन बरोबर जेमतेम सव्वा महिन्याचं बाळही.
आपण कितीतरी वेळ तशाच उभ्या होतो.
"हे माझे मिस्टर." तू तुझ्यामागून आलेल्या तरुणाशी ओळख करून दिलीस. त्याला एकटं, वेगळं बघितलं असत तर कदाचित तो आवडलाही असता. पण तुझ्याशेजारी तो.... छे! काहीतरी खटकत राहिलं.
आपण उगाच काहीतरी इकडच - तिकडंच बोललो. बाळाची नॅपी बदलायला तू आत गेल्यावर मीही तुझ्यामागोमाग आले.
" कशी आहेस वंदे?" आपल्या आजूबाजूला कुणीच नव्हतं .
" आहे हेच ठीक आहे गं. मी मागचं सगळं विसरले आता." माझ्या प्रश्नाचा रोख ओळखुन तू ऊत्तर दिलंस .
" पण का? नक्की काय झालं? तू घरात काही बोलली नाहीस ? विजूच्या घरचे काही म्हणाले?"
"नाही गं. काहीच जमण्यासारखं नव्हतं. सगळं आधीच लक्षात यायला हवं होतं."
तितक्यात बाहेर चहाकरता कुणीतरी बोलावलं आणि आपलं बोलणं तिथेच थांबलं. पण चला! निदान तू भेटलीस. होईल सगळं ठीक. नवरा सुस्वभावी वाटत होता, हातात तान्ह बाळ होतं अन तुला लवकरच मिळणार असलेल्या कॉलेज च्या नौकरी बद्दल तो काहीतरी बोलत होता. चारचौघींसारखा संसार चालायला काही हरकत नव्हती.
मध्ये परत दोन तीन वर्ष अशीच गेलीत. अधूनमधून आठवण तर यायचीच. पण आता पत्र लिहावं असं वाटत नव्हतं अन तुझं यावं असही खरंच वाटत नव्हतं. कारण खरंच अगं, बरेचदा काय होत, जे मनात असतं ते कागदावर नाही उतरवता येत. मग उगाच खोटा - खोटा फापटपसारा लिहिण्यात काय अर्थ! आभाळ भरून आलं, की तुझी आठवण तर हमखास यायचीच. मेघदूतातले मोठे - मोठे उतारे तू मला कितीदा तरी वाचून दाखवले होतेस. तुझ्या संस्कृतच्या अभ्यासामुळे मलाही संस्कृतच्या नायिका कळायला लागल्या होत्या. त्या नायिकांबद्दल बोलता - बोलता तू केव्हा तुझ्या प्रेमात शिरायचीस ते कधी कळायचंच नाही. संस्कृत, अन तुम्हा दोघांची जोडी, हे नातं मनात घट्ट रुतलं होतं. बोलता - बोलता मधेच थांबायचीस." आम्ही राहू ना गं नेहमीच एकमेकांबरोबर?" तू विचारायचीस.
किती गंमत होती नं गं वंदे, तुमच्या दोघांची घरं अगदी शेजारी - शेजारी होती पण घरी एकमेकांना अजिब्बात ओळख द्यायची नाही अन तुला भेटायला त्याला एवढे चार - सहा तास खर्चून होस्टेलला यायला लागायचं.
" माझं शिक्षण होऊ दे, त्याला स्थिरस्थावर होऊ दे. मग घरी सांगू." तू नेहमी म्हणायचीस.
तुझी भेट झाल्यावर तुम्हा दोघांचे रस्ते बदलले एवढंच फक्त कळलं. पण तू कुठेतरी आहेस हा दिलासा तरी होता ना गं !
आणि अचानक......अचानक तू या जगात कुठेच नाही हे कळावं? तेही तू गेल्यानंतर बऱ्याच काळानंतर कुणातरी तिऱ्हाईताकडून? नाही गं वंदू.......अजूनही हा धक्का नाही पचवता येत. तुझ्यासारख्या नाजूक मुलीचा अंत असा व्हावा? अगं परीक्षांच्या काळात सदतीस अंशावर टेम्परेचर गेलं तर खोलीभर ओल्या चादरी घालून फुल स्पीड वर पंखा लावायचीस, ती तू आगीच्या भक्षस्थानी पडावीस? मी रूम वर स्टोव्ह पेटवून कधीतरी आपल्याकरता काही खायला करायला घ्यायचे तेव्हा तुझ्या हजार सूचना असायच्या. त्या तुझ्याकडून गॅस चालूच रहावा? नाही पटत गं!
वंदू, जायच्या आधी फक्त एक आवाज द्यायचास गं .... फक्त एकदाच पूर्वीसारखं "शुक-शुक" करायचंस.
मी इथेच होते, पूर्वीसारखीच......तुझं सगळं ऐकून घ्यायला !
-----------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नि:शब्द झाले. खुपच छान लिहीली आहे गोष्ट. पण छान तरी कसं म्हणणार. चर्र झालं शेवट वाचून.
मला तुमची लिहीण्याची शैली आवडली खुप.