सर्व्हे नंबर २५ - भाग ४

Submitted by सुर्या--- on 26 August, 2021 - 05:08

सर्व्हे नंबर २५

भाग ४

"बरं, नाही माहित तर जाऊ दे, जा लाकडं फोड आणि जेवणासाठी सामान सांगतो ते आणून दे" मी हाल्याला सांगितले.

हाल्या तेथून निघून गेला. मी सुद्धा अंघोळीसाठी आत गेलो. फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा हाल्या हालीला काहीतरी सांगत असल्याचं दिसलं. हाली आ वासून, डोळे विस्फारून, तोंडावर हात ठेऊन हाल्याच्या बोलण्याला व्यक्त होत होती. त्यांच्या वैयक्तिक बाबतीत आपण पडू नये म्हणून मी दुर्लक्षित करून झाडांचे निरीक्षण करू लागलो. एका एका झाडाजवळ जाऊन त्यांना पाहू लागलो. वातावरण खूपच विलोभनीय होत.

सकाळचा चहा नाश्ता मग दुपारचं जेवण उरकुन दुपारी थोडी विश्रांती घेतली.

संध्याकाळी पुन्हा परतीची तयारी केली. परत येताना हाल्या आणि हाली गाडीजवळ आले होते. हाली मितभाषी होती. सीमंतिनीला तीच काम, वागणं बोलणं आवडलं होत. हाली सारखी सारखी सीमंतिनी कडे पाहत होती. तिला काहीतरी सांगायचं आहे, पणं ती बोलण्याचं धाडस करत नाही अशी मला शंका येऊ लागली.

मी सीमंतिनीला हळू आवाजातच सांगितलं,"बघ बाहेर जाऊन, विचारून घे". सीमंतिनी गाडीतून उतरून काहीतरी बहाना करत घरात गेली. हालीला आवाज देऊन तिला आत बोलावलं. "हाली, काय झालं गं? काही सांगायचंय का?"

"नाही म्हणजे, अम्म्म .... काल कोणी आलं व्हतं का इकडं ?" हालीने विचारलं.

"नाही, कोणी नाही आलं, का गं? कोण येणार होत का? सीमंतिनीने प्रतिप्रश्न केला.

"नाही...कोणी येणार नव्हतं, पणं ....." हाली तुटक तुटक, अडखळतच बोलत होती.

शेवटी एकदाची मनाची तयारी करून ती मोकळी झालीच, "मालकीण इकडे एक म्हातारा आणि म्हातारी सारखे फिरत असतात. मला त्यांची भीती वाटते. मी त्यांना पाहिलंय, आमच्या ह्यांना कितीदा दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानला काय दिसला न्हाय".

"अगं मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे? गावा ठिकाणी रात्री अपरात्री माणसं फिरतच असतात. जनावरं शोधायला आले असतील नायतर कामावरून घरी जात असतील. तू नको मनात भीती ठेउ" सीमंतिनीने तिला धीर दिला.

"न्हाय मालकीण, पण पाड्यावर सगळे बोलतात, इकडे ...." हाली गप्प झाली.

"इकडे काय?" सीमंतिनीने विचारलं.

"इकडे भुत" हाली थांबुन थांबुन बोलत होती.

सीमंतिनी हसली, "अग्ग तस असत तर आम्हाला रात्रभरात काही त्रास नसता का दिला, जाऊदे त्यांना पण आमचं राहणं आवडलं असेल" सीमंतिनीने हसण्यावर घालवल.

हालीसुद्धा सीमंतिनीच्या बोलण्यावर हसली.

"काळजी घे, घाबरू नकोस. तू समजतेस तस काही नसतं" निघता निघता सीमंतिनीने पुन्हा हालीला समजावले.

सीमंतिनी आणि मी परतीच्या मार्गाला लागलो.

गाडी चालवता चालवता मी सहजच विचारलं, "काय बोलत होती ती?"

"म्हणते इकडे एक म्हातारा आणि म्हातारी फिरत असतात आणि त्यांच्या पाड्यावरचे लोक म्हणतात इकडे भुत आहेत". सीमंतिनी सांगू लागली.

माझ्या मनात धडकी भरली. रात्री पाहिलेले ते दोघेजण हालीने सुद्धा पाहिलेत. आता तिच्याकडूनच माहिती काढावी लागेल असा मनात विचार करून मी पुन्हा फार्म हाऊस वर यायचा बेत आखला.

आठवड्याचं कामाचं Routine चालू झालं असल तरीही मनातून फार्म हाऊस चे विचार जातच नव्हते. सिम्बा सुद्धा तिकडून आल्यापासून चिडचिड करत होता. त्याला काही सांगायचे होते कदाचित पण आम्हाला त्याच्याशी संवाद साधायला जमत नव्हता.

शेवटी सीमंतिनी स्वतःच म्हणाली,"सिम्बा तिकडून जाऊन आल्यापासून वेगळाच वागतोय, तिकडे त्याला मोकळं खेळायला भेटतं म्हणून हट्ट करत असेल. आपण सुट्टी घेऊन जाऊ थोडे दिवस".

मला सुट्टी घ्यायची नव्हती पण सर्व प्रकरणाची चौकशी तर करायची होतीच शिवाय सीमंतिनीला नकार सुद्धा देता येत नव्हता. बुधवारी संध्याकाळी जायचा बेत आखला. कामावरून घरी आलो तेव्हा सीमंतिनी आणि सिम्बा तयारीतच होते. माझे कपडे बॅगेत भरले होते, त्यामुळे कामावरून आल्यावर तसाच आम्ही निघालो पुन्हा फार्म हाऊस कडे.

जाताना मुळगावचा प्रसिद्ध वडापाव पार्सल घेतला. थोडा पुढे जाऊन लव्हाळीच्या अलीकडे जंगलातील झाडांच्या सान्निध्यात एका रस्त्यालगतच्या मोरीवर बसून वडापाव खाल्ले. काळोख पसरू लागला होता. थोड्याच वेळात फार्म हाऊस वर पोहोचलो. गाडीचा आवाज ऐकून हाल्या धावतच आला.

"काय रे, आज एकटाच दिसतोस?" मी प्रश्न केला.

"साहेब, ती आजारी पडले, म्हून मी एकटाच आलोय" हाल्या उत्तरला.

"काय होतंय?" सीमंतिनीने विचारलं.

"काय न्हाय, उगाचच घाबरल्यागत करते" हाल्याने सांगितले.

मला शंका आली. कदाचित पुन्हा त्या म्हाताऱ्या जोडप्याला पाहिलं असेल.

"तू जा लवकर, तिला एकटीला कश्याला सोडतोस मगं?" मी म्हणालो.

"घरी आहेत बाकी लोकं, एकटी न्हाय ती", हाल्या बोलला आणि सामान आत ठेऊन निघून गेला.

आदिवासी पाडा जवळच होता. मी सीमंतिनीला म्हणालो, "चल जाऊन यायचं का" पाहून झालं असतं?"

सीमंतिनीने मान डोलावली. गेट बंद करून आम्ही पाड्याकडे निघालो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults