वाचलास रेsssss वाचलास ! [भाग ६]

Submitted by 'सिद्धि' on 26 August, 2021 - 01:44

{ भाग १ - https://www.maayboli.com/node/79721 }
{ भाग २ - https://www.maayboli.com/node/79743}
{ भाग ३ - https://www.maayboli.com/node/79771 }
{ भाग ४- https://www.maayboli.com/node/79792 }
{ भाग ५- https://www.maayboli.com/node/79801 }

1628930926_016248900_0.jpg
.

' पावरी वस्ती सोडून, डावीकडे जाणाऱ्या छोट्या अरुंद रस्त्याने, टोकाला एका बैठ्या चाळीत दहा-बाय दहाच्या रूममध्ये सलीम आणि त्याची आई राहत होते. सलीम टॉक्सी ड्राइव्हर म्हणून काम करत असल्याने त्याची रूम शोधायला रक्षाच्या लोकांना वेळ लागला नाही. बराच वेळ कोणीही आतून दार उघडले नाही, ती दार ठोकून थेट आत शिरली. आत जाताच क्षणी एक कुबट वास तिच्या नाकाजवळ भनभनला. अंगावर एक भयंकर काटा उभा राहिला. एका लाकडी बाकड्यासारख्या छोट्या पलंगावर सलीम झोपला होता. त्याची अम्मी शेजारी डोकं टेकून बसून होती. सलीमची अवस्था फारच वाईट होती. खोबणीत आत घुसलेले डोळे, अगदी रुक्ष झालेले शरीर, जणू हाडांचा सापळा... मानेवर आणि हातावर नखांचे असंख्य ओरखडे दिसत होते. त्यावर बांधलेले बॅंडेज देखील रक्ताने भिजून गेले होते.
'अभिमन्यूने मला इथे पाठवल आहे, तुम्हाला मदत करायला.' अशी ओळख सांगितल्यानंतर सलीमच्या अम्मीने घडत असलेल्या घटना सांगायला सुरुवात केली.

' त्या घाटातून आल्यापासून तो आजारी होता. त्याच्या अंगावर उठलेल्या जखमांवर कोणतेही औषधं लागू पडत नव्हते. बरेच डॉक्टर करून झाले. गेले काही दिवस रात्री १२ नंतर त्यांच्या दारावर थापा पडतात. बाहेरून विचित्र आवाज येत असतो. अचानक याच्या अंगावर उठलेलया नखांच्या जखमांमधुन रक्त वाहू लागते. जस-जसा त्या जखमेमध्ये शिवाशिव उठतो, तस-तसा तो बिचारा वेड्यासारखा बडबडू, ओरडू लागतो, विव्हळू लागतो. त्याचा आक्रोश पाहवत नाही, ती त्याचे हालहाल करत असते.'

हे सांगत असताना त्याच्या अम्मीच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले. सलीमच्या जीवाची भीक मागत ती माता अल्लाहचा धाव करत एकेक दिवस अक्षरशः ढकलत होती. सलीम तर आता बोलण्या-चालण्याच्या मनस्थितीत राहिलेला नव्हता. त्याने जगण्याची आशाच सोडली... ‘मला मुक्त करा या यातनांतून, सोडवा’ अशी सारखी बडबड करत होता.'

मनाशी काहीतरी निर्धार करून सलीम आणि त्याच्या आईला आश्वासन देऊन रक्षा तिथून निघाली. तिची गाडी थेट त्या जांभूळवाडी स्टेशनच्या दिशेने भरधाव वेगाने धावू लागली.

अभिमन्यूला प्रत्यक्ष असा काही त्रास नसला तरीही त्या स्वप्नाने त्याची देखील पाठ सोडलेली नव्हती. म्हणजे हे दोघेही त्या मायावी शक्तीच्या सावटाखाली आलेले होते. अभिमन्यू सांगत होता, त्यात खरोखर तथ्य आहे, हे आता रक्षाला मनोमन पटले. तरीही ती अजून काही माहिती मिळते का ? ते पाहण्यासाठी या घटनेशी संबंधित धागेदोरे गोळा करू लागली होती.

***********

रिव्हॉल्वर, कटर, मोबाईल आणि काहीबाही इतर हवे असलेले साहित्य भराभर बॅगमध्ये ठेवून, एक काळे मिट्ट ब्लेझर अंगावर चढवत ती घराबाहेर पडली. आज बाईक नको, आपली मारुतीची नवो कोरी भरधाव वेगाने धावणारी चारचाकी गाडी, वाऱ्याच्या वेगाने उडवत तिने बन्याची टपरी गाठली. आजूबाजूला कोणीही नाही याचा अंदाज घेत ती टपरीकडे वळली, सकाळचा मस्त गारठा जाणवत होता. सुदैवाने टपरीवर कोणीही नव्हते. चहाचा एक कप भरून बन्या तिच्या दिशेने आला.

" पोलिसवाल्या बाई ना? चा आणला होता." कप तिच्या हातात देत, घाबरत घाबरत बन्या समोरच्या लाकडी बाकावर बसला.

" बन्या माझ्या माणसांनी तुला बरोबर शोधून काढलं. मला माहित होत. मला हवी असलेली माहिती तूच देऊ शकतोस. बोल! " कप बाजूला ठेवत रक्षाने आपल्या ब्लेझरच्या खिशातील रिव्हॉल्वर काढून हातात घेतला.

" मेडम, त्याची काय बी गरज नाय. म्या सांगतु सगल." तो चाचरत बोलू लागला.

" हि माझी टपरी म्या गपचूप चालवतू, फकस्त रातीचं, आणि दिस उजडायच्या आत हितन निघून जातो. हे कुणाला बी सांगू नका. '

" तू सगळी खरी माहिती दे. तुला जे माहित आहे, ते-ते सगळं सांग. तुला कोणीही काहीही त्रास देणार नाही. विनापरवाना टपरी चालवतोस म्हणून घाबरतोस ना, पाहिजे तर मी तुला परवाना काढून देते, म्हणजे तुला असं रात्रीच चोरून इथे येण्याची गरज नाही. दिवसा देखील तू इथे येऊ शकशील. "

" उपकार होतील मेडम. "

" बरं, मग मला सांग तुला त्या नदीघाटावरील अघटित घटनांची काय माहिती आहे? आणि तिथे नक्की काय आहे? " फोनचा रेकॉर्डर ऑन करून ती रेकॉर्ड करायला लागली होती. त्या दिवशी अभमन्यू आणि सलीम बराबर घडलेली घटना, तसेच त्याच ठिकाणच्या अजून काही वाईट घटना त्याने तिला सांगितल्या.

एकदंरीत बोलण्यावरून त्या ट्रेन अपघाताचा आणि त्यानंतर चालू झालेल्या या अघटित घटनांचा अगदी जवळचा संबंध आहे, हे तिच्या लक्षात आले. राहून-राहून तो एक गोष्ट रिपीट करत होता. ती म्हणजे, अभिमन्यूचा त्या ट्रेन अपघाताशी काहीतरी संबंध नक्कीच असणार.

बोलता बोलता रक्षाने सलीमची काय अवस्था आहे, याविषयी सांगितले. तेव्हा बन्या चांगलाच घाबरला होता. त्याच्या तोंडातून एवढेच शब्द निघाले. " त्या जखीणीला तो पोरगा पायजे, त्याच रगात तिच्या तोंडाला लागलाय, त्याला ती सोडणार नाय, म्हणून त ती येवडी पिसळलेय. त्याला वाचवा मेडम. "

" मग अभिमन्यूच काय? त्याला त्या स्वप्नाशिवाय तसा काहीच त्रास नाही. तो सुद्धा सलीम बरोबर तिच्या तावडीत सापडला होता ना? "

" सांगतोय काय मेडम, त्या सायबांशी काय तरी उसनवार हाय तीचं, कायतरी बाकी हाय, ते एकदा का वासूल झालं कि मग त्यांची बी बारी. "

" म्हणजे? "

" म्हणजे बगा, सायब मागून गेलं, म्हणून ते सलीमसायब बचावल. नायतर त्यांना ती चेटकीण घेऊन गेली असती. अजून एक, ती त्या दोगांना बी घेऊन जाऊ शकत व्हती, पर तिनं तसं केलं न्हाई, म्हणजेच अभिमनू सायबांशी अजून कायतरी हिशोब बाकी हाय." त्याच्या शब्दासरशी रक्षाच्या अंगावर काटा आला. कोणत्याही परिस्थिती ती अभिमन्यूला काही होऊ देणार नव्हती. हवी असलेली बरीच माहिती मिळाली होती. जांभूळवाडी गावातून मिळालेली माहिती आणि बन्याने सांगितलेल्या घटना यावरून अंदाज लावणे शक्य होते.

' बन्या म्हणाला, हे जे काही विचित्र प्रकार चालू आहेत, ते सात-एक वर्षापासून… तिथे जाऊन जी काही माहिती मिळाली होती त्यानुसार, त्यावेळी ते गाव तसं मागासलेलं होतं, तिथल्या नदी किनाऱ्यावर नुकतच एक पुलाचे काम सुरु झालेले. स्टेशन, गाव आणि तो नदीघाट यांना जोडणारा असा कच्चा रस्ता डांबरीकरण करण्याचे काम मध्यावर आलेले.
आमच्यासाठी सात-एक वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे? अभि आणि मी कॉलेजला असतानाचा काळ. आमच्या प्रेमाची सुरुवात. कॉलेजमधलं फेमस कपल आम्ही होतो. तेव्हा तो नुकताच लिहायला लागला होता. कथांच्या पलीकडे सांगण्यासारखं काही नसायचंच त्याच्याकडे. मला त्याच्या लिखाणात तसा फारसा इंटरेस्ट नव्हता. आणि त्यामुळे तो ही मला नवीन काही सांगायचा नाही. आधी जेवढं मोकळेपणाने बोलायचं, भेटायचं ते सार जवळजवळ संपून गेलेलं. हळूहळू त्याच्या छापील पुस्तकांना देखील चांगलंच मार्केट मिळू लागलं होत. पण हवी तशी प्रसिद्धी एका कादंबरीने मिळवून दिली, फार गाजली ती. ..कारण त्या कादंबरीमुळेच तो लिहितो ते खरं होत, असा ठपका त्याच्यावर पडला आणि मीडिया हात धुवून त्याच्या मागे लागली. त्यामुळे अभि घरापासून दुरावला आणि माझ्यापासूनही… त्याच्या आणि माझ्या आयुष्यात वादळ निर्माण करण्यासाठी मी त्याच्या लिखाणाला जबाबदार ठरवते, आणि मुख्य म्हणजे ती एक कादंबरी, त्या कादंबरीची एक प्रत त्याने मला भेट म्हणून दिली होती, पण मी रागाने ती अद्यापही वाचली नाही. काय असेल ती? एकदा बघावी का? नावसुद्धा आठवत नाही. '

रक्षाच्या हातातील स्टीयरिंग पळत होते, आणि तिच्या-त्याच्या भूतकाळातील आठवणींचे क्षण ही त्यासोबत धावू लागले. त्या जुन्या आठवणींनी भरून वाहणाऱ्या वार्याला लगाम लावणं तिला शक्य नव्हतं. पण त्यासोबत शर्यत करण्याची तिची नेहमीचीच खोड. कधीतरी आपला विजय होईल हे निश्चित... आपण आजही अभिमन्यूवर तितकच प्रेम करतो. हे तिला खूप चांगलं माहित होत. आणि आपल्या त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी होती.

आज खूप वर्षांनी तिने पुन्हा कारखानिसांच्या घराचा रस्ता पकडला...

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी., श्रुति चव्हाण, मनिम्याऊ , आसा. - प्रतिसादासाठी धन्यवाद. पुढील भाग पोस्ट केला आहे.