वेटलॉस तमाशा

Submitted by Kavita Datar on 25 August, 2021 - 10:19
'यात XL साईज असेल का ? आत जाऊन विचारावं का ?' मी विचारात पडले.

वेटलॉस तमाशा

(माझ्या जवळच्या मैत्रिणीची वेटलॉस स्टोरी तिच्या संमती ने शब्दबद्ध करत आहे. आशा आहे वाचकांना नक्कीच आवडेल. आपल्या अभिप्रायांच्या प्रतिक्षेत...)

मॉलमधल्या त्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानासमोर माझी पावलं थबकली. हँगर ला टांगून ठेवलेल्या, बाहेरच्या भागातील शोकेस मध्ये लावून ठेवलेल्या ऊंची कपड्यांची आकर्षक मांडणी मनाला भूरळ पाडत होती. शोकेसमधल्या लाल काळ्या रंगाच्या, सुंदर डिझाईन च्या एका वनपीस वर माझी नजर रेंगाळली.

'यात XL साईज असेल का ? आत जाऊन विचारावं का ?'
मी विचारात पडले.
'हा रंग मला नक्कीच खुलून दिसेल. पण...'
नकळत सुटलेल्या पोटाचं, गेल्या काही वर्षांत किलोकिलोने वाढलेल्या वजनाचं भान आलं. मनातल्या मनात खट्टू होत मी दुकानात शिरण्याचा विचार रद्द करून पुढे निघाले.

खरं तर वाढलेल्या वजनामुळे हल्ली मला जास्त चालल्यावर धाप लागते, उठताना बसताना गुढगे दुखायला लागलेयत. वजन कमी करण्यासाठी बरेच उपाय करुन झालेत. दिवेकर डाएट, दीक्षित डाएट, क्रॅश डाएट वगैरे वगैरे. जीम देखील लावून झाले. पण कुठलाही उपाय फारसा फळला नाही. या सगळ्यात माझे वजन कमी होण्याऐवजी माझ्या पर्सचे मात्र वजन बरेच कमी झाले. दिवेकर डाएट मध्ये दोन दोन तासांनी खायला सांगितल्यामुळे आणि दर दोन तासांनी लो कॅलरी खाणं कुठून आणणार ? म्हणून दिसेल ते खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी उलट वाढलेच. त्यात सुचवलेला व्यायाम काहीना काही कारणाने आठवड्यातले पाच दिवस तरी चुकायचा. जे दोन दिवस व्यायाम व्हायचा, त्यातही 'आज दहा मिनिटे केला, उद्या पंधरा मिनिटे करू या.. हळूहळू वाढवूया.' असा विचार करून व्यायाम काही जमायचा नाही.

याच्या उलट तऱ्हा दीक्षित डायट ची... दोनच वेळा जेवायचंय मग घरातलं सगळं चांगलं चुंगलं खाणं जसं कचोरी, वडा, पेढा वगैरे वगैरे, जेवणासाठी राखून ठेवायला लागले. त्यामुळे नेहमीपेक्षा जेवण जरा जास्तच व्हायला लागलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि वजन वाढले. दोन तीन दिवस क्रॅश डायट झाल्यावर भुकेने गलितगात्र झालेल्या माझा थकलेला चेहरा पाहून नवऱ्याने हात जोडले, म्हणाला,

'भले तर एका वेळेस भरपूर जेऊन घे, पण असा सुतकी चेहरा घेऊन फिरू नकोस.'
झालं... पडत्या फळाची आज्ञा मानून त्या दिवशी जवळच्या प्रसिद्ध स्वीट मार्ट मधून रसमलाई आणून मी पोटभर जेवून घेतलं.

मैत्रिणीच्या सल्ल्याने मी जवळच्याच एका जीममध्ये चौकशीसाठी गेले. काऊंटर वर बसलेल्या स्मार्ट, गोजिऱ्या तरुणीने तिचं मार्केटिंग स्किल वापरून, वेगवेगळ्या योजना सांगून फक्त वीस हजार रुपयांत वर्षभराची मेम्बरशीप माझ्या गळ्यात मारली.

घरी आल्यावर सासूबाईंना सांगितले,
"आई, रविवार सोडून मी रोज दोन तास जीम ला जाणार आहे, शक्यतो सगळी कामं आटपून जाईन. फक्त डबेवाला आला की यांचा डबा त्याला द्यायचा आणि राजू ला शाळेच्या बस पर्यंत सोडायचं... तेवढं तुम्हाला पहावं लागेल"
"जीम ला ? कशासाठी ??"
नेहमीप्रमाणे चष्म्यातून रोखून बघत त्यांनी विचारलं.
"वजन कमी करण्यासाठी.."
'बाहेरच्या खाण्यावर पैसे उधळून आधी वजन वाढवायचं मग जीममध्ये जाऊन वजन कमी करायला पैसे उधळायचे. आम्ही नाही बाई केलीत असली थेरं...'
सासूबाई हळू आवाजात स्वतःशीच बोलल्या. पण माझ्या तीक्ष्ण कानांनी ते ऐकलंच. त्यांच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, उद्यापासून जीम ला जायचंय म्हणून शूज, ट्रॅकसूट वगैरे ची शॉपिंग करायला बाहेर पडले.

दोन दिवस जीम मधल्या ट्रेनरने शिकवल्या प्रमाणे व्यायाम करून अंग चांगलेच दुखू लागले. तिसऱ्या दिवशी अजिबात जावेसे वाटत नव्हते. पण 'वर्षभराचे पैसे भरलेयत...तर गेलंच पाहिजे' असं मनाला समजावून घरुन निघाले.

कंटाळा आल्याने व्यायामाकडे अजिबात लक्ष नव्हते. यातच ट्रेडमील वर चालताना अंदाज चुकला आणि कशी कोण जाणे? मी पाय अडकून वेडीवाकडी पडले. आठवडाभर कम्बर दुखावल्याने अंथरुणावर पडून मी नवरा आणि सासूच्या बोचऱ्या नजरा झेलत होते.
'झाली का हौस पूरी जीम ला जाण्याची ?'
असंच जणू काही ती दोघं मला नजरेने विचारत होती.
अशा तऱ्हेने जीम अध्याय संपला.

त्यांनतर मात्र मी वजन कमी करण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि 'मी अशीsssच खात्यापित्या घरची छान दिसते' अशी स्वतः च्या मनाची समजूत करून घेतली.

आज मात्र तो सुंदर वनपीस ड्रेस पाहून पुन्हा एकदा माझ्यातल्या वेटलॉस च्या किड्याने उचल खाल्ली आणि कानाशी भुणभुण सुरू केली.

यावेळेस मात्र माझे वेटलॉस चे प्रयत्न मी घरच्यांना अजिबात सांगणार नव्हते. घरच्यांसमोर झाला तेवढा वेटलॉस तमाशा पुरे होता.

वेटलॉस वरील सल्ल्यासाठी मी माझ्या जिवलग मैत्रिणीला फोन लावला. तिने तिच्या दोन-तीन मैत्रिणींच्या अनुभवावरून शहरातील एका फिटनेस क्लब चे नाव सुचवले. दुसऱ्याच दिवशी मी त्या फिटनेस क्लब वर जाऊन पोहोचले. तेथील डायटीशियन ने मला कायम फॉलो करता येईल असे डाएट सुचवले. त्याचबरोबर रोज दोन चमचे व्हे प्रोटीन घेण्यास सांगितले. यासोबतच ती डायटीशियन मला जमतील अशा निरनिराळ्या व्यायामांचे व्हिडिओज रोज पाठवणार होती.

दुसऱ्याच दिवसापासून मी हा नवा वेटलॉस प्रोग्राम फॉलो करायला सुरुवात केली. ब्रेड, बिस्किटं, चहा, कॉफी, गोड आणि चमचमीत पदार्थ हृदयावर दगड ठेवून विसरण्याचा मी प्रयत्न करू लागले. माझी पाककुशल शेजारीण सध्या दर तीनचार दिवसांला माझ्या मुलांसाठी (की नवऱ्या साठी?) चमचमीत, चटकदार पदार्थ पाठवत असते. तिने तरी माझ्याशी असा दुष्टपणा का करावा? समजत नाही. ते पदार्थ नवऱ्याला मिटक्या मारत खाताना पाहून माझ्या तोंडाला आणि (डोळ्यांना सुद्धा) पाणी सुटते.

आता मात्र हळूहळू मला जमतील असे व्यायाम मी करायला लागलेय. माझ्या नव्या वेटलॉस च्या प्रयत्नांना यश येतंय. गेल्या सहा महिन्यांत माझे बरेच म्हणजे जवळपास चार किलो वजन कमी झालंय. हा आनंद मी आज साजरा करण्याचं ठरवलंय.....भरपूर आईस्क्रीम खाऊन....

©कविता दातार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलाय प्रवास.
बाकि, ते व्हे प्रोटिन पण एमएलएम चाच प्रकार आहे बरं का. सांभाळून रहा.