पर्व स्वप्नवत बालपणाचे

Submitted by निशिकांत on 24 August, 2021 - 10:27

दिवस संपले ,शाळा सुटली, पाटी फुटली म्हणावयाचे
उगाच मोठा झालो, सरले पर्व स्वप्नवत बालपणाचे

यत्न करोनीही ना जमते मनात नाते रुजवायाचे
अंकुरते ते कसे अन् कधी? अजून आहे समजायाचे

परावलंबी जीवन अपुले जणू बाहुले परमेशाचे!
नसे कल्पना जगावयाचे किती अन् कधी मरावयाचे

नाव कागदी सोडत होतो जिच्या सोबती पावसात मी
तिची आठवण मनी नांदते, तिला विसरलो विसरायाचे

कांही नाती परस्परांना सुखावणारी असती इतकी!
दव पडता पात्यांना असते, डोलत डोलत थरथरायचे

नात्यांमध्ये स्वार्थ नसावा! शेती करतो मोर कधी का?
ढगास बघुनी तरी खुशीने तयास असते नाचायाचे

किती बेरजा अन् वजावटी करता करता शिणून गेलो
बेहिशोब, बेफिकीर जगणे अजून आहे कळावयाचे

प्रसिध्द शायर कसा वाटतो वाचकांस मी इतक्या लवकर?
झालेली सुरुवात असे ही, खूप अजूनी लिहावयाचे

कशास तू "निशिकांत" वाचशी पाढा अपुल्या सुख दु:खांचा?
जे जे लिहिले प्रक्तनात ते तुलाच आहे भोगायाचे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---वनहरिणी मात्रा---८ X ४ = ३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users