सर्व्हे नंबर २५ - भाग १

Submitted by सुर्या--- on 21 August, 2021 - 07:03

सर्व्हे नंबर २५

"मॅडम , आज यायला जमेल का?, सोनावळ्याच्या पुढे एक प्लॉट आहे" एजन्ट गुप्ता ने सकाळीच फोन करून विचारले.

"मी सांगते थोड्या वेळात" असं बोलून सीमंतिनीने मला फोन लावला, "आज जायला जमेल का?"

"ठीक आहे, मी दुपारी येतो" मी तिला कळवले.

दुपारी २.३० च्या सुमारास मी आणि सीमंतिनी दुचाकीने सोनावळ्याच्या पुढे जागा पाहायला जायच ठरलं. गेले ५ ते ६ महिने आम्ही जागा शोधत होतो. एखाद छोटस फार्म हाऊस असावं, वीकेंडला या रोजनिशीतून थोडं बाहेर शांत जागेत राहता यावं, झाडे लावावीत, आणि मोकळ्या स्वतःच्या जागेत आपल्या लाडक्या सिम्बासोबत मजेत वेळ घालवावा हे आमचे स्वप्न होते.

बदलापूर सोडून काही अंतरावर एरंजाडपर्यंतचा रस्ता पार केल्यावर पावसाने वाहून गेलेला रहाटोलीचा खड्डेमय रस्ता लागला. आचके गचके खात खात रहाटोली पार केली. उजव्या हाताला वळण घेतला आणि मग लागला, कॉंक्रेट ने बनवलेला नवा कोरा गुळगुळीत रस्ता. इथून पुढे प्रवासाचा आनंद घेण्यासारखा होता तो दोन्ही बाजूच्या झाडांनी व्याप्त असलेल्या प्रदेशामुळे. पावसाळा असल्याने सर्वत्र हिरवळ, मध्ये मध्ये भातशेतीची लागवड, पानांनी बहरलेली वृक्ष, हिरवेगार डोंगर आणि हवेतला गारवा. २५ मिनिटांच्या या प्रवासात मनावरचा ताण नाहीसा होऊन मन प्रफुल्लित होत असे.

पावसाची रिमझिम चालू झालेली. त्यामुळे मुळगावच्या अलीकडे एका वळणावर गाडी लावून एजन्ट गुप्ता ला फोन केला.

"साहेब, रहाटोली पर्यंत आलोय, २ मिनिटात पोहोचतो" गुप्ताने फोन ठेवला.

रस्त्याच्या एका बाजूला गाडी हॅन्डल लॉक करून आम्ही दोघे गुप्ताची वाट पाहू लागलो.

पाऊस असल्याने, गुप्ताने आज त्याची WAGON R गाडी आणली होती. सोबत त्याचा एक मित्र होता जो पुढच्या सीटवर बसला होता. मी आणि सीमंतिनी दोघेही गुप्ताच्या गाडीत बसलो. पावसाचा जोर वाढला होता. गाडीची काच वर चढवून आम्ही निघालो जागा बघायला.

"गुप्ताजी रस्त्याला लागून आहे ना प्लॉट?" मी प्रश्न केला.

"साहेब, लव्हाळी मध्ये सर्व्हे नंबर २५ मधला काही भाग आधीच गेलेला आहे, त्याच्या मागेच ३ एकर चा प्लॉट आहे, त्यातून तुम्हाला किती हवी असेल ती घ्या" गुप्ता म्हणाला.

"बरं पण रस्ता?" मी पुन्हा प्रश्न केला.

"२० फुटाचा रस्ता त्या फार्महाउस ला लागूनच आहे" गुप्ताने स्पष्ट केले.

लव्हाळी आली तशी उजव्या हाताला वळण घेऊन एका कच्च्या रस्त्याने आम्ही पोहोचलो रावणशेठ च्या फार्महाउस च्या मागे असलेल्या छोटेखाणी टेकडीवजा माळरानावर.

एका टॉवर पासून पुढे रावणशेठ च्या बंगल्यापर्यंत थोडा उतार होता. मुख्य रस्ता नजरेच्या टप्प्यातच होता. जागा खुली, हवेशीर वाटत होती. गवत वाढलेलं असल्यामुळे थोडं अंतर चालतच पाहुन घेतलं. सीमंतिनीला जागा पसंत पडली. मी सुद्धा मनातल्या मनात जागा पक्की केलीच होती.

"साहेब जागा पसंत असेल तर सांगा, आपण कागदपत्रे मागवून घेऊ" गुप्ताने पुढे तगादा चालू केला.

"किती पर्यंत सोडेल फायनल?" मी विचारले.

"बघा आता पार्टी १५ लाख एकरी मागते, बाकी तुम्ही समोरासमोर बसून ठरवा" गुप्ताने स्पष्टच सांगितले.

"ठीक आहे आज संध्याकाळी ७/१२ पाठवा व्हाट्सअँप वर, दोन दिवसात मीटिंग करू" मी जागेत इंटरेस्ट दाखवला.

गाडीत बसून गुप्ताने काचा वर चढवल्या. मी आणि सीमंतिनी खुश होतो. बऱ्याच दिवसांनी दोघांनाही जागा आवडली होती. आणि बजेट मध्ये पण होती. काचेतून पुन्हा ती जागा न्याहाळत होतो. गुप्ताने गाडी रिव्हर्स घेतली. आणि टर्न मारणार तोच माझं लक्ष गवतातून डोकावणाऱ्या छोट्या मंदिरासदृश वास्तूकडे गेलं. "अरे हे काय मध्येच" तोंडातल्या तोंडात शब्द पुटपुटतोय तोच बाजूला तशीच दुसरी वास्तू.

"गुप्ताजी, ते गवतामध्ये काय दिसतंय? बघा जरा" मी गुप्ताला सांगितले.

गुप्ताने गाडीचा ब्रेक दाबला. काच खाली घेत सर्वच त्या दिशेने पाहू लागलो. माझी माझ्या नजरेवर खात्री होती, तसाच मनोमनी अंदाजसुद्धा लागला होता. गुप्ता अजूनही नजरेत काही आलच नाही या अंदाजात बाहेर पाहत होता. मी सीमंतिनीला बोटाने इशारा करून ती वास्तू दाखवली. प्रथमदर्शनी तिला वाटले छोटे मंदिर असावे.

मी गुप्ताला थेट प्रश्नच केला. "गुप्ताजी मसणवट आहे का?"

गुप्ता तोतरू लागला. "नाही साहेब, इथे आजूबाजूला आदिवासी वस्ती आहे. पूर्वी त्यांच्या ताब्यात ही जागा होती. तेव्हा आजो-पणजोबांची समाधी बांधली असेल कोणी, आता ती जागा मालकाच्या ताब्यात आहे, हवं तर ते काढता येईल".

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults