रीत आहे

Submitted by निशिकांत on 19 August, 2021 - 09:03

ही भुतांची रीत आहे
पोंचती, जर शीत आहे

उत्तरांसाठीच धडपड
प्रश्न वादातीत आहे

रोज काळोखात गातो
कवडशाचे गीत आहे

मी कलंदर एवढा की
दु:खही सजवीत आहे

वृध्द होता, बैठकीतुन
आज मी पडवीत आहे

चेहरा हसरा तरीही
वेदना लपवीत आहे

तू नको देवूस देवा!
मी मला घडवीत आहे

माजलेले पाप दिसते
पुण्य का भयभीत आहे?

वाटते का वादळांना?
नाश करणे जीत आहे

या पुजार्‍यांनो लुटाया
देव तुम्हा भीत आहे

तू जरा "निशिकांत" घुसळण
कर जिथे नवनीत आहे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मनोरमा
लगावली--गालगागा गालगागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users