गणित कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 19 August, 2021 - 00:21

गणित

शेवटची घंटा झाली. उपाध्ये सरांनी आपल्या हातातल्या घड्याळाकडे बघितले. संध्याकाळचे पाच वाजले होते. आज कोणत्याही परिस्थितीत त्यांना शाळेतून वेळेत बाहेर पडायचे होते. अर्थात कारणही तसेच होते. आज सकाळी आलेला अनिरुद्धचा फोन. फोन आल्यापासून कधी एकदा अनिरुद्धला भेटतो असे झाले होते. खर तर त्यांना आज रजा काढायची होती. पण जवळ आलेली परीक्षा आणि ते शिकवीत असणारा गणितासारखा महत्वाचा विषय यामुळे त्यांना शाळेत येण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. आजचा दिवस त्यांनी कसाबसा पार पाडला.

संध्याकाळी सहा वाजता अनिरुद्धला भेटायचे ठरलं होत. “आता अर्ध्या पाउण तासात आपण त्याच्या घरी नक्की पोहचू”. आपली पुस्तके कपाटात ठेवता ठेवता सरांनी मनाशी विचार केला. खर म्हणजे तसा तो काही लांब राहत नव्हता. पण शहरातली वाहनांची वाढती गर्दी आणि वयोमानानुसार दुचाकी गाडी सुद्धा चालवण्याचा त्यांचा मंदावलेला वेग गृहीत धरले तर तेवढा वेळ लागणारच. आता अवघ्या दोन वर्षात सर सेवानिवृत्त होणार होते. विचार करत सर स्टाफ रूम मधून बाहेर पडू लागले. इतक्यात शाळेचा शिपाई त्यांच्या समोर आला. बरोबर कुणी सफेद कपडे घातलेली व्यक्ती त्याच्या बरोबर आलेली होती. बहुदा कुणी पालक असावा असे सरांना वाटले.
“ सर, तुम्हाला भेटायला कुणी आले आहे” शिपाई म्हणाला.
“ अरे बाबा. आज जरा लवकर जातो की. एक मह्वाचे काम आहे” उपाध्ये सरांनी त्रागा व्यक्त केला.
“ आपणच उपाध्ये सर ना? “ सफेद कपड्यातल्या त्या व्यक्तीने विचारले.
“ होय. पण तुम्ही .. “
“ सर, मी अनिरुद्ध सरांचा ड्रायव्हर आहे. तुम्हाला नेण्यासाठी सरांनी गाडी पाठवली आहे. आपण माझ्याबरोबर चला” सर मनातून आनंदले. आपली टू व्हीलर शिपायाला लावायला सांगून ते अनिरुद्धच्या गाडीकडे जाउ लागले. विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून ड्रायव्हरने सफाईदारपणे गाडी बाहेर काढली आणि मूळ रस्त्यावर आणली.

अनिरुद्ध शाळेचा १९७५- ७६ सालापर्यतचा विद्यर्थी. सर्वच विषयात हुषार पण गणितात विशेष प्राविण्य. शेवटपर्यत शंभर मार्कस कधी सोडले नाहीत. आणि त्याचमुळे सरांचा विशेष लाडका विद्यार्थी. दहावीच्या परीक्षेत तर तो बोर्डात आला होता. सायन्स साईड घेतली. इंजिनिअर झाला. आणि देशातल्या एका अग्रगण्य कंपनीत नोकरीला लागला. आज त्याच कंपनीत मोठ्या हुद्यावर आहे. जगभर हिंडत असतो. कोणत्या कोणत्या देशाची नावे सांगतो, जी आपण कधी ऐकलीही नाहीत. कुठेही असला तरी आपल्याला फोन मात्र करतो. त्याच्या व्यापामुळे प्रत्यक्ष भेट होऊन अनेक वर्षे झाली होती आणि आज तो योग येत होता. अनिरुद्धला भेटायला सर अगदी आतुर झाले होते.

अनिरुद्धच्या flat ची सरांनी बेल दाबली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. दारात एक पन्नाशी ओलांडलेली स्थूल व्यक्ती. डोक्याला पडलेले टक्कल. आपण कुणातरी दुसऱ्याच flat ची बेल दाबली नाही न म्हणून सरांनी flat वरची नावाची पाटी पुन्हा एकदा बघितली. अनिरुद्धचाच flat होता. मग हा माणूस कोण? सरांच्या मनातील विचार त्या व्यक्तीने ओळखले असावेत.
“ सर, नमस्कार. मी अनिरुद्धच आहे” त्याने हसून म्हटले,
“ अरे तू अनिरुद्ध !! किती बदलला आहेस.”
“ सर, आपण पंचवीस वर्षांनी भेटतो आहोत. मी आता पन्नाशी ओलांडली आहे. तेवढा बदल होणारच ना?” अनिरुद्ध आत जाता जाता बोलला. त्याच्या बरोबर सरहि आत गेले.
“ बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो.” पाणी आणण्यासाठी अनिरुद आत निघून गेला आणि स्वाभाविकपणे अनिरुद्धच्या flat वरून सरांनी एक नजर फिरवली. flat प्रशस्त होता. पण किती अव्यवस्थित.!! flat च्या कोपऱ्यात वर्तमान पत्राची रद्दी अव्यवस्थित पणे विखुरलेली होती. टी व्ही वर साचलेली धूळ, भिंतीवर असलेले कॅलेंडर आणि एखादा वॉलपीस तसाच खाली लोंबकळत पडला होता. कितीतरी दिवसात खिडक्यांचे पडदे धुतले सुद्धा नसावेत. इतका मोठा अधिकारी.! दोन नोकर कामाला लावून सगळ कसे छान ठेऊ शकत नाही.? पण सरांनी तिकडे दुर्लक्ष केले.
“ सर, पाणी घ्या” अनिरुद्धने ग्लास पुढे केला. त्या ओशट ग्लासातले पाणी सरांना प्यावेसे वाटले नाही. पण तरीही कसाबसा त्यानी एक घोट घेतला. बऱ्याच वर्षानंतर दोघे प्रत्यक्ष भेटत होते. आणि त्यामुळे बोलायला सुरवात कशी करायची हा प्रश्न होता. काही क्षण शांततेत गेले. मग अनिरुद्धनेच बोलायला सुरवात केली.
“ सर, काय म्हणते शाळा? जुने विद्यार्थी भेटतात का कुणी? “
“ शाळा ठीक आहे रे. पण खर सांगू , पूर्वीची मजा आता राहिली नाही. ना तुमच्यासारखे विद्यार्थी, ना पालक आणि शिक्षक सुद्धा.” सरांनी निराशेचा दीर्घ सुस्कारा सोडला.
“ पण या काळातही हुशार आणि सिन्सिअर विद्यार्थी असतीलच ना? “
“ आहेत. पण आता सगळेच हुशार झालेत. बघेल त्या विद्यर्थ्याला ऐंशीच्या पुढे मार्क्स पडलेले असतातच. खाजगी ट्युशन्स लावून मार्क्स मिळवतात त्यामुळे शाळा आणि शाळेतले शिक्षक यांच्याबद्दल आस्था कमी. पण या उलट आज इतक्या वर्षानेही तुझ्या सारखे जुने विद्यार्थी भेटतात. दोन शब्द शाळेबद्दल, शिक्षकांच्या बद्दल चांगले बोलतात. तेवढेच बर वाटत. एका शिक्षकाला अजुनी काय पाहिजे असते?”
“ खर आहे सर. आम्ही शाळेतले जुने मित्र कधी जर भेटलो तर शाळेच्या आठवणी काढतोच तुमची तर हमखास आठवण निघते. परवाच उन्मेष भेटला होता. तुमची आवर्जून आठवण काढत होता. “
“ कोण उन्मेष?”
“ उन्मेष देशमुख. आठवत नाही”?”
“ हो हो. चांगलाच. तू शंभर आणि तो नव्याण्णव. शेवटपर्यत तुमच्या दोघांच्यातली स्पर्धा चालूच होती” सरांनी हसून शाळेतल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला.”
“ परवा अमेरिकेत एका पार्टीच्या वेळी त्याची भेट झाली. एका मोठ्या कंपनीत सी.ई.ओ. आहे उन्मेष. तुमची आठवण काढत होता. सरांच्या मुळे गणिताची खरी गोडी लागली म्हणत होता”.
“ अरे मी केवळ एक निमीत्त होतो. खर तर तुम्ही मुलेच हुशार आणि कष्टाळू.” सर म्हणाले. पण खर तर आतून ते कुठेतरी सुखावले होते. कुणीतरी त्याच्या आयुष्यातील प्रगतीला आपल्याला श्रेय देत आहे याचा त्यांना मनोमन आनद वाटत होता.
दोघ्रेही भरभरून बोलत होते. जुने शिक्षक, जुने विध्यार्थी यांच्या आठवणीना उजाळा देत होते. बोलण्याच्या ओघात सात केव्हा वाजले ते कळले नाही. अनिरुद्ध काहीसा चुळबुळ करीत होता.
“ तुला कुठे जायचे आहे का? बिझी असलास तर मी निघतो” सरांनी त्याची अस्वस्थता ओळखली.
“ नाही नाही. मी फ्री आहे आता, सर, एक विचारू का? गैर समज नको. तुमची हरकत नसेल तर मी एखादा पेग घेऊ का? “ अनिरुद्धने विचारले. क्षणभर सरांना आश्चर्य वाटले. पण दुसऱ्याच क्षणी ते म्हणाले.
“ त्यात हरकत कसली ? अवश्य घे”
“ तुम्ही घ्याल?”
“ नाही. नाही मी घेत नाही. तुझे चालू दे”
अनिरुद्धने उंची मद्याचा ग्लास भरला आणि सरांच्या देखत ओठाला लावला. क्षणभर सरांच्या पुढे अनिरुद्धची शाळेतली लहान मूर्ती तरळून गेली. बोलणे चालू ठेवण्यासाठी सरांनी अनिरुद्धला विचारले,
“ तुझी family कुठे असते? “ प्रश्न विचारल्यावर तो उगीच विचारला असे सरांना वाटूने गेले.
“ माझे लग्न झाले होते. पण लग्न झाल्यावर दोनच वर्षात माझा घटस्फोट झाला” अनिरुद्धने एक लार्ज सिप घेत सांगितले. यावर काय बोलावे ते सरांना सुचले नाही.
“ ओ, सॉरी”
“ there is nothing to be sorry about. it happens. part of life” अनिरुद्धने निर्ढावलेल्या मनाने सांगितले.
“ पण का? असे काय झाले? खर तर हा प्रश्न विचारणे योग्य नव्हते असे सरांना वाटले पण इतक्या कर्तबगार माणसाच्या आयुष्यात हि घटना का घडावी हे कुतूहल त्यांच्या मनात होतेच.
“ झाले असे काहीच नाही सर. कॉर्पोरेट जगाचे काही नियम असतात. इथे नितीमत्ता, आदर्श या गोष्टीना फारसा वाव नसतो. त्या नियमांच्या चौकटीत ती बसली नाही. मी फार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझी बायको सुशिक्षित होती पण बाह्य जगाकडे तिचा बघण्याचा दृष्टीकोन संकुचित होता”. बोलता बोलता अनिरुद्धने सिगारेट पेटवली. खर तर नितीमत्ता, आदर्श या गोष्टी ज्या अलीकडच्या जगात दुर्मिळ होत चालल्या आहेत त्या त्याच्या बायकोकडे होत्या. त्याला हा संकुचित का म्हणत होता हे काही कळत नव्हते.
“ सर, जीवन एक शर्यत आहे.. आणि ती जिंकण्यासाठी बऱ्याचदा नैतिक असो वा अनैतिक असो तडजोडी कराव्या लागतातच. एक दिवस आमच्यात होणारे छोटेमोठे खटके विकोपाला गेले आणि दोघांच्याही सहन शक्तीचा अंत झाला आणि आम्ही वेगळे झालो. ज्यावेळी आम्ही वेगळे झालो तेव्हा मला एक वर्षाचा मुलगा हि होता. कोर्टाने त्याची कस्टडी अर्थातच तिच्याकडे दिली आणि ते बरेही झाले. येथे नसती कटकट कुणाला पाहिजे आहे? “ बोलता बोलता अनिरुद्धने उंची सिगारेट पेटवली.
“ पण अनिरुद्ध आता हे एकाकी आयुष्य .. !!”
“ एकाकी कसे ? ज्या देशात मी जातो तिथे माझे भरपूर मित्र आहेत”पुढे आवाज खाजगी करत अनिरुद्ध म्हणाला “ आणि भरपूर मैत्रिणी सुद्धा आहेत” आणि तो मोठ्यांदा हसला.सिगारेटच्या धुरात त्याचा चेहरा अस्पष्ट होत गेला.
बराच वेळ सर अनिरुद्धशी बोलत होते आणि अजुनी बोलूही शकले असते. पण सिगारेटचा धूर आणि मद्याचा वास यापेक्षाही अनिरुद्धचे हास्य त्यांना अस्वस्थ करत होते. काही वेळातच अनिरुद्धचा निरोप घेऊन सर तेथून बाहेर पडले.

अस्वस्थ मनस्थितीतच सर खाली येऊन रिक्षा शोधू लागले. आणि इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. “ अरे उपाध्ये तू कुठे आहेस? कर्णिक सिरीयस आहे. मी पत्ता तुला पाठवला आहे. लगेच ये. त्याला भेटू आज” देशपांडेचा फोन होता. देशपांडे हा आमच्या शाळेतला क्लार्क. पण जगनमित्र. सामाजिक कार्याची आवड. दांडगा जनसंपर्क. आणि माझा जवळचा मित्र. वाद घालायला दोघेही सराईत. हुशार विद्यार्थी जर तुमच्यामुळे आयुष्यात घडला तर ज्या मुलांची आयुष्यात प्रगतीघडली नाही याला जबाबदार कोण? एखाद्या सुमार मुलाला चांगले घडवून दाखवा मग त्याचे श्रेय घ्या. हा त्याचा आवडीचा विषय. उपाध्ये, कर्णिक आणि देशपांडे हे त्रिकुट शाळेत प्रसिद्ध होते. खर तर उपाध्ये सरांच्या उलट कर्णिक सरांचा स्वभाव. मृदू शांत. इंग्लिश विषय शिकवत असताना विद्यर्थी तल्लीन होऊन ऐकत असत. पण अशा सज्जन व्यक्तीलाच परमेश्वर का त्रास देतो हे एक न उलगडणारे कोडे आहे. शाळेतील ती घटना ....कुणा एका विद्यार्थ्याला .. विद्यार्थी कसला गुंडच तो शिवाजी जगताप ! एरवी कधी न बोलणारा कर्णिक त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक शिवाजी जगतापला रागावला. आणि शिवाजीने वर्गाचे दार बंद करून कर्णिकला बेदम मारले. एक गुंड शाळेत वावरत होता. कर्णिकने त्या घटने नन्तर स्वेच्छा निवृत्ती घेतली. खाजगी शिकवण्या घेऊन घर चालवू लागला. मुलांची शिक्षणे केली. पण अचानक एक दोन वर्षात त्याची बायको गेली. मुले नोकरीला लागून परदेशात शिकायला गेली. आणि कर्णिकची सोय वृधाश्र्मात केली. बिचारा एकटाच असतो. अधून मधून सर वृद्धाश्रमात भेटायला जायचे पण कर्णिककडे त्यांना बघवायचे नाही. बिचाऱ्याला सुख लागले नाही आणि आता तो सिरीयस आहे.
रिक्षा देशपांडेनि सांगितलेल्या पत्यावर थांबली. देशपांडे सरांची वाट बघत उभेच होते एका अरुंद रस्त्यातून दोघे एका चाळीत गेले. एक छोटेसे घर. घराचा दरवाजा उघडाच होता . तरीही देशपांडेने दाराची कडी वाजवली. आतून एक स्त्री बाहेर आली.साधी पण तरीही चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव.
“ कर्णिक इथेच आहेत ना?”
“ होय. बाबा येथेच आहेत” त्या स्त्रीने स्मित करीत सांगितले.
“ आम्ही त्याचे शाळेतले मित्र. त्याला भेटायला आलो आहे”
“ या ना. बसा.. मी आलेच दोन मिनटात. “ स्त्री आत निघून गेली. घराची बैठकीची खोली. छोटी होती पण प्रसन्न. एका कोपऱ्यात एक छोटेसे टेबल. त्यावर ठेवलेली मुलांची अभ्यासाची पुस्तके. समोरच गणपतीची मूर्ती. आणि तेवत असणारे शांत निरंजन. उदबत्तीचा दरवळणारा सुगंध. वातवरणात एक प्रसन्नता भरून होती.
“ आत चला. बाबांना भेटायचे आहे ना? “ आम्ही आतल्या खोलीत गेलो. एका कॉटवर कर्णिक पडला होता. आम्हाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो काही बोलण्याचा प्रयत्न करीत होता. खुणेनेच आम्ही त्याला बोलू नको असे सांगितले. काही वेळाची शांतता. देशपांडे ने आपल्याला कुठे आणले, ती बाई कोण त्यांना काहीच कळत नव्हते. कर्णिकची शोकांतिका तर त्यांना माहिती होती. मग हि बाई का कर्णिकला बाबा म्हणत आहे हे त्यांना उलगडत नव्हते.
इतक्यात एक गृहस्थ आत आला. उंचापुरा. पन्नाशीचा असावा तो. आल्या आल्या कर्णिक जवळ बसला. बाबा म्हणून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. मधूनच सरांच्याकडे बघून स्मित करत होता. त्याला कुठे तरी पाहिले आहे असे त्यांना वाटत होते पण त्यांच्या लक्षात येत नव्हते. सर स्मरण शक्तीला जास्तीच ताण देऊ लागले . याला कुठे पाहिले आहे बर... .. ! आणि अचानक त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला अरे हा तर शिवाजी जगताप. कर्णिक या गुंडाच्या घरात काय करतो आहे ?
अचानक शिवाजीला फोन वाजला. कर्णिकला त्रास नको म्हणून त्याने बाहेर जाऊन फोन घेतला आणि काही सेकंदात तो आत येऊन म्हणाला.
“ सर, बाबांचे एक औषध मिळत नव्हते. आता एका केमिस्टचा फोन आला होता. मी ते घेऊन येतो. आपण बसा प्लीज. “ जाताना त्याने आम्हाला वाकून नमस्कार केला.
कर्णिकची अवस्था सरांना बघवत नव्हती. तसे ते टणक होते. पण वाढत्या वयाने त्यांचे मन हळवे झाले होते. त्यांनी देशपांडेना खुण केली आणि ते दोघेही तेथून उठले. कर्णिकच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. शिवाजीच्या बायकोला त्यांनी “ काळजी घ्या” म्हणून सांगितले आणि ते तेथून बाहेर पडले.

सरांना अजुनी लक्षात येत नव्हते, वृद्धाआश्रमात असणारा कर्णिक शिवाजी जगतापच्या घरी कसा ? शिवाजी जगताप एक गुंड मुलगा ज्याने कर्णिकचे आयुष्य उद्वस्त केले .. त्याच्या घरी? आणि तो आणि त्याची बायको बाबा का म्हणत होते कर्णिकला?
सरांच्या मनात अनेक प्रश्न होते आणि ते देशपांडेनि ओळखले होते.
“ तू ओळखले असशीलच तो शिवाजी जगताप होता. आपल्या शाळेतला उनाड नव्हे गुंड विद्यार्थी. ज्याने कर्णिकला मारले. शाळेत असताना अनेक उद्योग केले. पण नंतरच्या आयुष्यात त्याला पश्चाताप झाला. शिक्षण पूर्ण करू शकला नाही. पण रिक्षा चालवून त्याने आपले पोट भरणे चालू ठेवले. एका वृधाश्र्मात पार्ट टाईम नोकरीही करत होता. त्याच वृधाश्र्मात त्याने कर्णिकला बघितले. कर्णिकची मुले तर तुला माहीतच आहेत. पण याने मुला सारखी त्याची सेवा केली. जेव्हा त्याला बरे नसायचे तेव्हा तो स्वत: डॉक्टर कडे घेऊन जायचा. पण कधी अंतर दिले नाही. जेव्हा आठ दिवसापूर्वी कर्णिक सिरीयस झाला तेव्हा सरळ त्याला आपल्या घरी घेऊन आला”
“ पण हे सर्व तुला कसे कळले?”
“ कर्णिक वृद्धाश्रमात आहे हे आपल्याला माहिती होतेच. मी जेव्हा त्याला एक दिवस भेटायला गेलो तेव्हा तो सिरीयस आहे आणि शिवाजी जगताप नावाच्या माणसाने त्याला घरी नेले असे मला मनेजर ने सांगितले. शिवाजी जगताप म्हणेज तोच शाळेतला हे मनेजर कडूनच कळले. कदाचित मनेजरचे आणि त्याचे बोलणे होत असावे. खर तर मलाही आश्चर्यच वाटले. पण तिथल्या manager ने शिवाजीचा उल्लेख देवमाणूस म्हणून केला. कर्णिकची त्याने किती सेवा केली हे सारे त्याच्या कडून कळले.”
उपाध्ये सरांनी सर्व ऐकले आणि ते निशब्द झाले. आज त्यांची दोन विद्यार्थ्यांची भेट झाली होती. अनिरुद्ध हुशार कर्तबगार. पण नीतीमत्तेचे नियम सैल करीत आयुष्याची शर्यत जिंकू पाहणारा. आणि शिवाजी शाळेतला गुंड विद्यार्थी भावी आयुष्यात नीतीने प्रगती करणारा. त्यांच्या डोळ्या समोर एकीकडे सिगरेटचा धूर आणि मद्याचा वास होता आणि दुसरीकडे उद्बातीचा सुगंध आणि शांत तेवणारी निरांजनातली ज्योत होती.
देशपांडे ने सरांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “ एक सांगू गणित या विषयात तुझा हातखंडा असेल. अनेक हुशार विद्यर्थी तू तयार केले असशील. पण नियतीने घातलेली गणिते सोडवणे इतके सोपे नाही.”
रस्त्यावर चोहोबाजूला अंधार होता. पण आकाशातील चंद्राचा आणि चांदण्याचा प्रकाश चोहोबाजूला विखुरला होता. त्या प्रकाशात आम्ही दोघे कितीतरी वेळ न बोलता चालत होतो.

Group content visibility: 
Use group defaults

देशपांडे ने सरांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “ एक सांगू गणित या विषयात तुझा हातखंडा असेल. अनेक हुशार विद्यर्थी तू तयार केले असशील. पण नियतीने घातलेली गणिते सोडवणे इतके सोपे नाही.”>>>>>> सही !! फार आवडली गोष्ट. आयुष्यात कुठले वळण केव्हा येईल ते सांगता येत नाही.

छान आवडली कथा
शाळेतले विद्यार्थी आणि त्यांचे आयुष्य कसे पुढे बदलू शकते हे नुकतेच अनुभवले आहे. त्यामुळे जरी चांगल्याचा वाईट आणि वाईटाचा चांगला झाला हे कथेतील वळण टिपिकल असले तरी रिलेटही झाले.

कथा ठीक आहे, पण दोन वर्षात निवृत्त होणारे शिक्षक आणि त्यांचा पन्नाशी उलटलेला विद्यार्थी. गणित कथेतील वयाचं गणित चुकलेलं वाटतंय जरा.