इंग्रजी माय माफ कर

Submitted by मित्रहो on 10 August, 2021 - 01:23

माझे दहावीपर्यंतेच शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झाले, म्हणजे अगदी विज्ञान सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो. न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करण्यापेक्षा Newton’s law of motion पाठ करणे सोपे आहे हे अकरावाव्या वर्गात समजले. बऱ्याचदा असे वाटते स्वादुपिंड, यकृत, आतडे, जठर यात अडकून जर गोंधळ झाला नसता तर मी आज इंजीनियर होण्याऐवजी डॉक्टर झालो असतो. आता जरतरला काही अर्थ नाही. माझा इंग्रजी माध्यमाचा पहिला तास आजही आठवतो. अकरावीचा गणिताचा तास होता. सर Logarithm शिकवत होते. सरांनी फळ्यावर a^n असे लिहिले आणि याची फोड करुन सांगा असे विचारले. मी आपला आधी मराठी भाषेत विचार केला
“a चा घात n बरोबर a गुणिले a गुणिले a … असे n वेळा.” मग त्याचे इंग्रजीत भाषांतर केले
“a’s exponent n is equal to a multiplied by a multiplied by a ….. n times.” वाह आले. हाय काय नाय काय. लगेच हात वर केला. सरांनी माझ्यासारख्या दुर्लिक्षत कराव्या अशा काळतोंड्या बारक्या मुलाकडे पूर्ण दुर्लक्ष करुन अकरावीला असून सुद्धा फक्त वर्गातच लक्ष असनाऱ्या मुलीला विचारले. ती कॉन्व्हंटची मुलगी तिने स्टेनगन मधून फायरींग सोडल्यासारखे उत्तर दिले.
“a to the power n equal to a into a into a into a..... n times.”
तिची स्टेनगन ज्या वेगात फायरींग करीत होती त्यावरुन माझ्यासारख्या गाढवाला काही बोध होणे शक्यच नव्हते पण माझा आत्मविश्वास उगाच बोलून गेला हीचे चुकले. आता आपली संधी म्हणून सचिन तेंडुलकरच्या आत्मविश्वासाने मी माझा हात अजून उंच केला. परंतु सरांनी तिला Excellent असे म्हणता क्षणी माझा आत्मविश्वास सचिन तेंडुलकरवरुन यजुवेंद्र चहालवर घसरला. चहालला जर का ताजतवान्या शोएबचा पहिला बॉल खेळायला सांगितले तर त्याचा जो आत्मविश्वास असेल त्या स्तरावर माझा आत्मविश्वास घसरला होता. त्यानंतर सरांनी जे शिकवले ते मी विचार करीत होतो तसेच होते तरी मघाच्या उत्तराचा काही उलगडा होत नव्हता. भाषेवरुन गणिताच्या तासाला गोंधळ होण्याचे ते कदाचित पहिलेच प्रकरण असावे. पुढे जाऊन या साऱ्याचे अर्थ लागले, गणितिय इंग्रजी भाषेत multiplied ऐवजी into वापरतात आणि exponent ऐवजी to the power वापरतात. परंतु तेंव्हापासून बोलायची, वापरायची, उच्चारायची इंग्रजी भाषा आणि लिहायची, पुस्तकातील इंग्रजी भाषा यातल्या फरकाचा मोठा धसका घेतला. मला तर इंग्रजी शब्दांचे लांबलचक स्पेलिंग पाठ करणे ते शब्द उच्चारण्यापेक्षा सोपे वाटत होते.

एखादा कठीण शब्द आहे तो उच्चारायला त्रास होत आहे तर ते ठीक आहे पण बऱ्याचदा तर लहान असल्यापासून जे आंग्ल शब्दोच्चार संस्कार झाले त्यावरच घाला घातला जातो . मग माझे डोक भडकते आमचे शिक्षण वाया गेले की काय अशी भिती वाटायला लागते. मी ते नाटॅठोम आणि कटाप बद्दल बोलत नाही. कुणी खेळायचा नियम तोडला तर त्याला किती आत्मविश्वासाने सांगायचो तू खेळातून कटाप. कधी साधा विचार सुद्धा आला नाही कि ते कटाप नाही Cut Off आहे आणि ते नाटॅठोम Not at home आहे. आजही कुणाला खेळातून कटाप करण्यात जी मजा आहे ना ती Cut Off करण्यात येत नाही. O हे अक्षर असेल तर त्याचा उच्चार तोंड फाडून ऑ असा करायचा उदा. ऑस्ट्रीच, ऑकरा पण नाही आता सांगतात की त्याचा उच्चार ओस्ट्रीच ओकरा असा करा. बाकी त्या भेंडीला कुणी ओकरा ऐवजी लेडीज फिंगर म्हटले तर भारत सोडून सारेच कोण हा मनुष्य भक्षक प्राणी आला म्हणून बघतील. जगात भेंडीला लेडीज फिंगर म्हणत नाही.

इंग्रजी भाषेची मुळातच गोची आहे असे वाटते. आपण ज्याप्रकारे शब्द प्रोनॉउंस करतो त्याला प्रोनॉउंसियेशन असे म्हणत नाही तर प्रनंसियेशन म्हणतात. आपले असे नाही आपण शब्दाचा उच्चार ज्याप्रकारे करतो त्याला उच्चार असेच म्हणतो उगाच उच्चर किंवा उच्चीर म्हणत नाही. जिथे मुळातच इतका गोंधळ आहे तिथे पुढे गोंधळ असनारच. इंग्रजी शब्दोच्चारातील चुका काढण्यात कॉन्व्हंट (याला सुद्धा खूप दिवस मी कॉनमेंट म्हणत होतो) शिक्षित मित्रमैत्रीणी नेहमी पुढे असतात. माझी मुंबईची मैत्रीण होती तिला माझ्या साऱ्याच उच्चारात चुका दिसायच्या त्याला भाषेची अट नव्हती. मराठीसाठी माझ्याकडे सरळ उत्तर होते. तू असशील दादर हिंदू कॉलनीतली मी विदर्भातील वऱ्हाडी आहे मी असाच बोलनार. इंग्रजीबाबत हा नियम लागत नाही काही झाले तरी ती जागतिक भाषा आहे. एक दिवस सकाळी मी सहज म्हटले
“चल ब्रेकफास्ट करुन येऊ” त्यावर तिचे लगेच उत्तर होते
“गाढवा ब्रेकफास्ट नाही ब्रेकफस्ट असते ते”
“काही काय मग तुम्ही फास्टींगला फस्टींग का नाही म्हणत?”
“ह्या आला मोठा शहाणा” आला मोठा शहाणा हे मुलीने मुलांना गप्प करायचे ब्रम्हास्त्र वापरुन तिने मला गप्पा केले असले तरी माझे लॉजिक चुकीचे नव्हते. त्यानंतर जीभ कधी ब्रेकफास्टकडे वळली तर कधी ब्रेकफस्टकडे वळली. नाव काही घ्या हो शेवटी खायचे इडलीदोसा किंवा पोहेच ना. ब्रेकफास्टला ब्रेकफस्ट म्हटले म्हणून आपण दोशाएवजी पॅनकेक खातो का? एकदा आम्ही जेवायला गेलो असताना मी विचारले.
“डेझर्टमधे काय आहे?” लगेच एक मित्र म्हणाला
“सँड, वाळू” सारी मुलं हसायला लागले
“हे बघ जर का तुला डिझर्टमधे आईसक्रिम खायचे नसेल ना तर वुई विल डिझर्ट यू इन डेझर्ट” डेझर्टमधे वितळनाऱ्या आईसक्रिमसारखा मी रागाने वितळत होतो माझ्या त्या मित्रमैत्रीणींना त्याचे काही नव्हते.

इंगजीवरुन इंग्रजांपेक्षाही भयंकर षडयंत्र ही इंग्रजी माध्यमातील शिक्षित मित्रमैत्रीणी करीत असतात. षडयंत्राचा इंग्रजी शब्द कू(Coup) तो सु्द्धा एका षडयंत्रापेक्षा कमी नाही. लहान असल्यापासून शिकलो होते की काही शब्दांच्या सुरवातीलाच जर का P असेल तर त्याचा उच्चार मूक असतो. उदा. Psychology, Pneumonia अगदी चुपके चुपके चित्रपटात सुद्धा त्याचा खूप चेष्टा करुन झाली होती. शब्दांच्या शेवटी P असेल तर त्याचा उच्चार सुद्धा मूक असू शकतो हे नवलच होते. या नियमाने मॅप म्हणजे मॅSS टॅप टॅSS असे होईल परंतु इंग्रजीत एक नियम सर्वत्र लागू होत नाही. मूक उच्चार हे एखाद्या सिक्रेट कोड सारखे आहे, कोणत्या अक्षराचा उच्चार मूक आहे हे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला कळले की झाले त्यासाठी काही नियम असा नाही. Castle मधला T किल्ल्यात बंदिस्त असतो म्हणून उच्चारायचा नाही तर Whistle मधला T हवेत उडून जातो. मॉरगेज (Mortgage) T गहाण असतो तर लॉज (Lodge) मधला D झोपला असतो. लहानपणी वारंवार मार खाऊन मी ऑफ्टन चा उच्चार ऑफन असा करायला शिकलो तर मोठे झाल्यावर बघितले माझा गोरा मित्र ऑफ्टन म्हणत होता. त्याने मला सांगितले की त्यांच्या इंग्रजी भाषेत तसा उच्चार चालतो. रिसीप्ट की रीसीट असा गोंधळ उडाला की मराठीतली रशीद सोपी वाटते. क्लॉदेस नाही तर क्लोद्स E सायलेंट, कपबोर्ड नाही तर कबोर्ड P सायलेंट. मी लहानपणापासून प्लम्बर असाच उच्चार करीत आलो आहे आता तुम्ही म्हणाल ते प्लम्बर नाही प्लमर असते तर मग प्लंम्बर मधल्या B ला संडासात फ्लश करायचे का? शक्य नाही हो ते आता. पार्किंग च्या ठिकाणी मला नेहमी वाटायचे सारेच कसे स्पेलिंगमधे चुका करु शकतात. Wallet Parking असे लिहण्याऐवजी Valet Parking असे कसे लिहिले असते. नंतर कळले की W वाले Wallet आणि V वाले Valet वेगळे असते इतकेच नव्हे तर त्याचा उच्चार सुद्धा वॅले असा आहे त्यातला T बॅले डांसमधल्या T सारखा कुणीतरी पळवून नेला आहे. तसाच आणखीन एक गोड गैरसमज होता आपण लग्नात फुकटात उभ्या उभ्या जे जेवतो तो बुफे आणि हॉटेलात पैसे देऊन खातो तो बफेट लंच. कितीतरी दिवस मी बुफे हा मराठी शब्द आहे असेच समजत होतो. आता कळले तो मराठी नाहीतर इंग्रजी शब्द आहे दोन्हीचा अर्थ एकच आहे. दोन्ही कडे तो T जेवणासोबत गिळायचा असतो. कुणीतरी आता बुफेला स्वहस्त भोजन पंगत वगैरे असा भारदस्त मराठी शब्द शोधायला हवा. फॉरेन मधला G मूक असतो. रेइन (Reign) म्हणजे राज्य करने पण त्या राज्यात G ला स्थान नाही. Tough, Island, doubt असे कितीतरी शब्द आहेत ज्यात कुणाचा तरी गळा दाबला गेला आहे. यातील काही लहान असतानाच माहित होते तर काही नंतर समजले. इंग्रजी भाषेत A to Z साऱ्या अक्षरांचा मनाला वाटेल तेंव्हा गळा दाबला जातो. तो गळा दाबायला कसलाही नियम नाही. इंग्रजी भाषेत जेवढे नियम आहेत ना तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त त्या नियमांचे अपवाद आहेत. नियम कोणता आणि अपवाद कोणता हे कळायलाच मार्ग नाही असे असताना नियम बनवताच कशाला देव जाणे.

मधली अक्षरे गिळण्यात फ्रेंच भाषा इंग्रजीच्या खूप पुढे आहे. Bon Voyage, Bon Appetit, Avant garde यासारख्या सुंदर शब्दांची भाषा ती पण उच्चारात मात्र भयंकर कंजुस आहे. फ्रेंच शब्द म्हणजे म्युजियमची भली मोठी इमारत परंतु आत मात्र एकच चित्र असे प्रकरण आहे. फक्त बघून घाम फुटावा अशी भली मोठी स्पेलिंग पण उच्चार मात्र तोंडातून वाफ निघावी इतकाच असतो. इंग्रजी मधे बऱ्याचदा फ्रेंच शब्द येतात. यायलाच हवे वेगवेगळ्या भाषेतील शब्दांमुळे भाषा अधिक समृद्ध होते. किती वर्षे मी रेंडेजवॉयस विथ सिमी गरेवाल वाचत होतो नंतर कळल की त्याचा उच्चार रंडेव्ह्यू असा करायचा असतो. नेहमीप्माणे रेनॉल्ट कारमधल्या T चा गळा दाबून त्याचे रेनॉ असे केलेले आहे. बुके (Bouquet) हाही तसाच फ्रेंच भाषेतून आलेला शब्द या शब्दाचे स्पेलिंग साधे Booke असे करता आले असते पण नाही त्यात नको तेवढी अक्षरे टाकली त्यापेक्षा आपले पुष्पगुच्छ बरे. ब्युरो, शँपेन, शोफर अशी कितीतरी फ्रेंच शब्द इंग्रजी भाषेत आहेत ज्याचे उच्चार छोटे परंतु स्पेलिंग मात्र मोठे आहेत. शँपेनचे स्पेलिंग Shampen केले असते तर त्याच्या चवीत काही फरक पडला नसता. फेसबुकमुळे एक नवीन शब्द समजला RSVP. जो तो सांगायचा RSVP कर, काही दिवस तर हे LOL किंवा ROFL यातलेच प्रकरण आहे असेच वाटत होते. आंतरजालावर शोध घेतला असता कळले RSVP म्हणजे Répondez s’il vous plaît याचा उच्चार कसा करतात माहित नाही. यापलीकडे जर का कुणी RSVP म्हटले ना तर त्याला सांगनार आहे बाबा रे आधी मूळ फ्रेंच वाक्यप्रचाराचा उच्चार करुन दाखव नंतरच मी तुझ्या आमंत्रणाला उत्तर देतो. एक मात्र खरे इंग्रजीत जर फ्रेंच शब्द नसते तर मजा आली नसती. फ्रेंच भाषेमुळे इंग्रजीला सांस्कृतीक इतिहास आहे असे वाटते. मला राग येतो त्या लांबलचक स्पेलिंगचा. ज्या अक्षरांचा उच्चार करायचा नाही ती अक्षरे स्पेलिंग पाठ करताना मुलांना घाम फुटावा आणि त्यामुळे शिक्षकांना मुलांना कुटुन काढायची संधी मिळावी याच कारणाने दिली असतात असेच वाटते. कधी कधी तर असे वाटते की राजा बोलेल ती दिशा या न्यायाने राजा बोलेल तो शब्द असे प्रकरण आहे . शब्द लिहिला राजाला वाचायला दिला त्याने जसा वाचला तसा त्याचा उच्चार. राजाला लांबलचक स्पेलींगमधे जी अक्षरे वाचायचा कंटाळा आला तर त्यांचे उच्चार मूक. असो मूक अक्षरांचे बोलके पुराण आता खूप झाले.

आता आता कुठे मी वोल्क्सवॅगन नाही तर फोक्सवॅगन म्हणायला शिकून माझा आत्मविश्वास काहीसा वाढवला होता पण चुका काढणारे माझ्या आत्मविश्वासावर टपलेलेच असतात. अशांनी माझा आत्मविश्वास जितका कमी करात येईल तितका कमी केला होता. आत्मविश्वासाची ऐशीतैशी करण्यास फक्त बाहेरचेच कारणीभूत असतात असे नाही घरचे सुद्धा तितकेच कारणीभूत असतात. मी म्हणालो
“चला आज हॉटेलात जेवायला जाऊ”
“बाबा हॉटेलात जेवायला नाही राहायला जातात.”
“मग जेवतात कुठे रस्त्यावर”
“रेस्तराँट् मधे.” रेस्टॉरंटं नाही. बाहेरच्या देशात गेल्यावर आपल्यासारख्या Hotel अशा पाट्या न दिसता जिकडे तिकडे फक्त Restaurant अशा पाट्या का दिसतात याचे उत्तर मला पोरं झाल्यावर सापडले होते. अजूनही लॉजिंग आणि बोर्डिंगमधे नक्की फरक काय आहे ते कळत नाही त्यात आता हा हॉटेल आणि रेस्तराँट् मधला फरक लक्षात ठेवा. मीच काय आमच्या अख्खा खानदानात कोणी कधी बाहेरगावी गेला तर राहिला धर्मशाळेत, चहा पिला किंवा खाल्ले हॉटेलात आणि जेवला खाणावळीत. कुणाच्या बापाची कधी रेस्टॉरंटमधे जाऊन जेवायची हिंमत झाली नाही. एक दिवस बायकोने आदेश दिला पोरांचा अभ्यास घे. मी मुलाला म्हणालो
“कोणती टेस्ट आहे?”
“इंग्रजी”
“चल पोयम म्हण”
“पोयम नाही बाबा पोम असत ते” थंडी होते आणि गरमी वाजते असे धेडगुजरी मराठी बोलणारी ही पिढी माझ्या इंग्रजी उच्चारातील चुका काढत होती. मी दरडावून विचारले.
“तुझ्या बापान पायल का बे?” बापानेच बाप काढल्यावर पोरगा काय बोलणार. मी लहान असल्यापासून हातावर छड्या खात ज्या पोयम पाठ केल्या त्या साऱ्या वाया गेल्या का? कोण ठरवत हे शब्दांचे उच्चार त्यांना भर चौकात चाबकाचे फटके देऊन उच्चार करायला सांगायला हवे मग समजेल कोणत्या शब्दांचा काय उच्चार असतो ते. आता मी ठरविले आहे माझा आत्मविश्वास ढासळू देण्याची संधी द्यायची नाही. आपल्याला जे योग्य वाटते ते बोलायचे. होतील चुका तर होतील करु नंतर दुरुस्त. म्हणून म्हणतो हे इंग्रजी माय माफ कर… यापुढे मी मला वाटते तसेच बोलणार. चूक भूल पदरात घे.

(लेखाचा उद्देष कोणत्याही भाषेची खिल्ली उडवावी असा नाही तर आलेले अनुभव गमतीने मांडण्याचा एक प्रयत्न आहे.)

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान खुसखुशीत लेख!
मलाही वोक्स वॅगन आनि फोल्क्स वॅगन वेगवेगळ्या वाटत होत्या आधी! आणि डेसर्ट ला तर मीही डेझर्ट च म्हणते की......!!
Happy

मस्त लिहिलय
अनेक ठिकाणी अगदी अगदी झालं
आमच्या लहानपणी शिकवलेले उच्चार अन आताचे यात जमीन आस्मानचा फरक। तो टी तर लै त्रास देतो Angry
मलाही अजिबात येत नाही अन आवडत नाही इंग्रजी Wink