बर्लिन एअर लिफ्ट

Submitted by अदित्य श्रीपद on 8 August, 2021 - 09:57
#बर्लिन_एअरलिफ्ट

gail halverson.JPGbal_1.JPGbal2.JPG

दुसरे महायुद्ध संपले. जर्मनी आणि अक्ष राष्ट्रांचा पराभव झाला जर्मनीचा तर विध्वंसच झाला आणि दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचा ताबा घेतला. पूर्व जर्मनी सोविएट रशियाच्या अधिपत्याखाली होतं तर पश्चिम जर्मनी इंग्लंड फ्रांस आणि अमेरिकन. राजधानी बर्लिनचे देखिल चार भाग झाले होते जवळपास निम्मा म्हणजे पूर्वेकडचा भाग सोविएट रशियाकडे तर उरलेल्या अर्ध्या म्हणजे पश्चिम बर्लिनचे तीन भाग करून तेथे जर्मनी इंग्लंड फ्रांस आणि अमेरिकन फौजा तैनात होत्या. पुढे काय करायचे ह्या बाबत अमेरिका आणि इंग्लंड फ्रांस ह्यांचे नक्की ठरत नव्हते पण सोविएट रशियाच्या म्हणजे स्टालिनच्या मते जर्मनी हा राष्ट्र म्हणून पुन्हा उभा राहणे धोक्याचे होते म्हणून त्याचे तुकडे करून इतर देशात विलीन करावेत किंवा दोन तीन भागात फाळणी करून कायमच दुबळा राहील असां जर्मनी शिल्लक ठेवणे हे भविष्यातील शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे होते. शेवटी गेल्या ३०-३५ वर्षात ताकदवान जर्मनीने दोनवेळा रशियावर हल्ला करून रशियाचे अतोनात नुकसान केलेले होते एकदा तर पराभव केला होता. दुसर्या महायुद्धात रशियाने २ कोटी लोक गमावले होते शेती उद्योग आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेची जबर हानी सोसली होती. नॉर्मंडी सागर तटावर हल्ला करून दुसरी आघाडी उघडे पर्यंत रशिया एकटा त्याच्या भूमीवर जर्मनीशी दोन हात करत होता (युद्धाच्या आधी रशियाने जर्मनीशी अनाक्रमाणाचा करार केल्यावर त्याने पोलंडचे लचके तोडले आणि फिनलंडच्या नरडीचा घोट घेतला होता तेव्हा जर्मनीशी इंग्लंड एकटे लढत होते हा तपशील तो विसरला.. असो) ह्या उलट अमेरिकेचे फक्त ४ लाख सैनिक ह्या युद्धात कमी आले उद्योग धंदे युद्ध सामग्रीच्या वाढत्या मागणी मुळे भरभराटीला आले बेकारी नाहीशी झाली सकळ राष्ट्रीय उत्पन्न दुपटीने वाढले थोडक्यात हे युद्ध अमेरिकन तब्बेतीला चांगलेच मानवले आणि अमेरिकन अर्थव्यवस्था छान बाळसेदार गुटगुटीत झाली.त्यामुळे रशियाला भविष्यात जर्मनी कडून कधी हि धोका उत्पन्न होणार नाही ह्याची खातरजमा करायचे होती.

वर दिलेला नकाशा पहिला कि युद्धानंतर जर्मनीच्या कोणकोणत्या भूभागाचा ताबा कोणत्या दोस्त राष्ट्रांनी घेतला होता ते समजते. ह्यापैकी जर्मनीची राजधानी असलेली बर्लिन (निळ्या रंगाच्या वर्तुळात दाखवलेली) जरी आजूबाजूच्या भूप्रदेशासकट रशियाकडे असली तरी १९४५च्या पोट्सडाम युद्धबंदी कराराप्रमाणे तिथे चारही सत्तांचे अधिपत्य होते. गुलाबी लाल रंगाचा पूर्वेकडचा भूभाग रशियाकडे तर पश्चिमेकडचा भूभाग इंग्लंड अमेरिका व फ्रांस कडे. पश्चिम जर्मनी ह्या तीनही सत्ताकडे असला आणि बर्लिन च्या आजूबाजूचा प्रदेश रशियाच्या अमलाखाली असला तरी पश्चिम बर्लिन मधील आपल्या भूभागाकडे जाण्यासाठी रस्ते , लोहमार्ग आणि हवाईमार्ग (air corridor)खुले ठेवण्यात आले होते.जरी जर्मनी युद्ध हरला आणि ह्यावेळी जर्मन भूभागावरच दोस्तानी ताबा मिळवला असला तरी पुढे काय करायचे ह्या बाबतीत सर्व दोस्त राष्ट्रांचे एक मत नव्हते. अमेरिका फ्रांस आणि इंग्लंड ह्या तिघांना तरी जर्मनीतून शक्य तितके लवकर बाहेर पडायचे होते. उघड उघड ते जर्मनीचा भूभाग ताब्यात ठेवू शकत नव्हते आणि बेचिराख झालेल्या भूभागातील जनतेला पोसायची जबाबदारी मात्र त्यांच्यावर होती.रशियाचा विचार मात्र वेगळा होता. भविष्यात पुन्हा जर्मनी आपल्यावर उलटू नये म्हणून त्याला त्यांच्या आधिपत्याखालील जर्मनी आपल्याकडेच ठेवायचा होता. त्यातील संसाधने, कारखाने आणि कुशल मनुष्य बळाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करत राहायचे होते.त्याप्रमाणे त्यानी त्यांच्या आधिपत्याखालील जर्मन भूभागाचे दोहन( दोहन कसले? शोषण!)सुरु केले. त्यांना सध्यातरी त्यांच्या अंमलाखालील जर्मनीचा पूर्ण ताबा- बर्लिन सकट हवा होता. अमेरिकेला खरेतर बर्लिन मधून लवकर बाहेरच पडायचे होते. पण इंग्लंड आणि फ्रांस ला मात्र बर्लिन इतक्या सहजासहजी रशियाच्या घशात जाऊ द्यायचा नव्हता. तसे झाले असते तर रशिया- साम्यावादासमोर भांडवल शाहीचा तो मोठाच पराभव ठरला असता. पूर्व युरोपातील अनेक देश आधीच रशियन साम्यवादाच्या हातातले बाहुले बनले होते (त्यांच्या मताप्रमाणे) पूर्वीच्या त्यांच्या ताब्यातील अनेक वसाहती साम्यवादी बनत चालल्या होत्या बर्लिन हाताचे गेलेतर ह्या प्रक्रियेला मोठेच बळ मिळाले असते. १९४८ साली झेकोस्लोवाकिया मध्ये रशियन प्रभावाखालाचे साम्यवादी सरकार अगदी वाजत गाजत स्थापन झाले आणि इंग्लंड फ्रान्सच्या भीतीला ह्यामुळे नैतिक अधिष्ठानच मिळाले. १९४८ सालापर्यंत म्हणजे युद्ध संपून तीन वर्षे होऊन गेली तरी पूर्वजर्मनीची आर्थिक घडी विस्कटलेलीच होती, लोकांना खायला अन्न नव्हते, कामधंदे नव्हते राहायला घर नव्हते महायुद्धात पडझड झालेल्या शहरातील इमारतींच्या आडोशाने ते पश्चिमेच्या दोस्त राष्ट्रांच्या मदतीने कसेबसे जगत होते. तेव्हा जर्मन चलन इतके घसरले होते आणि महागाई इतकी वाढली होती कि ज्याला नोकरी आहे अशा माणसाचा एक महिन्याचा पगार कसाबसा एक वेळचे जेवण खरेदी करण्यात खर्च होईल. अशा काळात काळाबाजार, चोऱ्या, वेश्याव्यवसाय आणि तस्करीला उत आला. ही मोठीच डोकेदुखी होऊ लागली. म्हणून पश्चिम दोस्त राष्ट्रांनी मिळून जर्मन चलनात काही बदल करायचे ठरवले पण ह्याला स्टालिनने हरकत घेतली आणि त्या चलनाचा वापर रशियन आधिपत्याखालील जर्मनी आणि संपूर्ण बर्लिन शहरात करायला साफ नकार दिला. स्तलीनाच्या हरकतीला भिक न घालता किंवा नंतर त्याला चलन लागू करावे लागेल असा होरा ठेवून पश्चिम दोस्त राष्ट्रांनी नवे चलन न्यू डोईश मार्क हे त्यांच्या अंमलाखालील पश्चिम जर्मनी आणि पश्चिम बर्लिन मध्ये लागू केले. पण ह्यामुळे बिथरून जाऊन स्टालिन ने पश्चिम जर्मनीकडून बर्लिनला येणारी सगळी मदत/रसद बंद केली. लोहमार्ग आणि रस्ते बंद केले. म्हणजे पश्चिम बर्लिन मधील जर्मन जनता जी अन्न आणि इंधनासाठी पश्चिम दोस्त राष्ट्रांवर अवलंबून होती ती उपासमारीने मरणार, त्याभागात वीज पुरवठा करणारे पावर स्टेशन जे रशियन अंमलाखालील जर्मनीत होते ते देखिल बंद केले आणि अशा प्रकारे पश्चिम बर्लिनची नाकाबंदी सुरु झाली. तारीख होती २३ जून १९४८.
आता पश्चिम दोस्त राष्ट्रासमोर मोठा पेच उभा राहिला. त्यांचे सैन्य जरी बर्लिन मध्ये असले तरी ते तसे तुटपुंजे होते आणि अन्न आणि इतर सामग्री करता पश्चिम जर्मनीकडून येणाऱ्या रसदीवर अवलंबून होते आणि वस्तूत: ते चारी बाजूने रशियन सैन्याने वेढले गेलेले होते. पोट्सडाम करारान्वये ह्या सैन्याला रसद पुरवण्याकरता वर सांगितलेले हवाई मार्ग आणि हवाई वाहतूक खुले ठेवणे रशियाला भाग होते. पण ते युद्ध सुरु नसेल तर, जर युद्ध सुरु झाले असते तर ह्या सैन्याची काही मिनिटात खान्डोळीच होणार होती.
आता अमेरिका आणि पश्चिम दोस्त राष्ट्रापुढे तीन पर्याय होते ( जरी दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध लढलेले सगळे म्हणजे अमेरिका,इंग्लंड फ्रांस रशिया आदी सगळे दोस्त राष्ट्र म्हणून ओळखले जात असले तरी आता आपण आपल्या सोयीसाठी भांडवलशाही राष्ट्रांना दोस्त राष्ट्र म्हणू आणि कम्युनिस्ट रशियाला ... रशिया, कम्युनिस्ट रशिया किंवा साम्यवादी रशिया म्हणूयात.)
१.सैन्य काढून माघार घेणे आणि सगळा बर्लिन रशियाच्या घशात जाऊ देणे. पण असे केले तर त्यामुळे प्रचंड नाचक्की होणार होती २. रस्ते आणि लोहमार्गाने बळजबरीने मदत पाठवणे आणि रशियाने आडकाठी केली तर त्याला बळाने उत्तर देणे. पण ह्यात युद्ध सुरु होण्याचा नव्हे तिसरे महायुद्ध सुरु होण्याचा धोका होता आणि इंग्लंड, फ्रांस सारखे देश पुन्हा युद्ध झेलण्याच्या परिस्थितीत नव्हते. परिस्थिती अशीच राहिली असती तर पश्चिम बर्लिन मध्ये उपासमारीने भूकबळी जाऊ लागले असते आणि जनता खवळून तिने उठाव केला असता आणि पहिला खटका गेउडाला असता बंदोबस्तासाठी तैनात दोस्तांच्या सैन्याबरोबर. त्यात होणाऱ्या हिंसेची जबाबदारी आली असती दोस्तांवर. पश्चिम बर्लिन मध्ये गृहयुद्ध झाले असते आणि गोंधळाचा फायदा घेत स्टालीनने सगळं बर्लिन काबीज केले असते.स्टालीनचा हाच डाव होता. पण तिसरा पर्याय असा होता कि सैन्याला रसद पुरवायला जे तीन हवाई मार्ग खुले होते त्यांचा वापर करून बर्लिन मधील जनतेला मदत पुरवता येऊ शकत होती, लष्करी विमानातून मदत पुरवत असल्याने रशिया त्या विमानांवर गोळीबारी करू शकत नव्हता अन्यथा युद्ध सुरु करण्याचा दोष स्टालिनच्या माथी आला असता म्हणजे ती बाजू सुरक्षित होती. पण रोज किती मदत लागणार होती. दुसर्या महायुद्धात सर्व प्रकारच्या टंचाईच्या काळात माणशी कमीत कमी किती अन्न आणि इंधन लागते ह्याची व्यवस्थित जाण आणि त्याबरहुकूम रेशनिंग/नियोजन करण्याचा अनुभव असलेल्या इंग्रज अधिकार्यांनी अंदाज लावला- साधारण चार ते पाच हजार टन दिवसाला. त्यावेळी सगळ्यात मोठे C47 हे अमेरिकन लष्करी मालवाहू विमान एका वेळी साडेतीन टन वजन वाहून नेऊ शकायचे-स्वत:ला लागण्रे इंधन, वमनाचे वजन वगैरे धरून. म्हणजे दिवसाला ह्या विमानांच्या १३००-१४०० फेऱ्या कराव्या लागल्या असत्या.अमेरीकेकडे एवढी क्षमता खचितच होती पण रसद उतरवायला बर्लिनचे टेम्पलहॉफ हे एकच विमानतळ होते तर धावपट्ट्या होत्या चार. म्हणजे दर दिवशी ह्या एका विमानतळावर आणि विमानतळावरून दर दोन मिनिटामागे १ विमान सामान घेऊन उतरले पाहिजे आणि रिकामे होऊन उडाले पाहिजे -२४ तास सतत, विनाविलंब, विनाविश्रांती. हे एक अशक्यप्राय वाटणारे काम होते. पण दोस्तानी सुरुवात केली. सुरुवातीला १००० टन मालच दिवशी उतरू शकला पण रसद तुटपुंजी असली तरी त्याने लोकांचे मनोधैर्य कमालीचे वाढले. जगभरातून माणसे, समान सुमान, इंधन, विमाने आणि इअतर मदतिचा ओघ पश्चिम बर्लींकडे वाहू लागला.पश्चिम बर्लिनच्या जनतेने आपण होऊन ह्या कमी मदत करायला सुरुवात केली काळाबाजार चोरी तस्करी कमालीचे कमी झाले.थोड्या म्हणजे तीन वर्षापूर्वी दोस्तांच्या जीवावर उठलेले जर्मन सैनिक स्वत:हून पडेल ती मदत ह्या कमी करू लागले . अमेरिकेने जनरल विलियम टर्नर नावाच्याआणि ह्या कामाचा जबरदस्त अनुभव असणार्या सेनापतीची ह्या कामी नेमणूक केली. दुसर्या महायुद्धात जपानने पादाक्रांत केलेल्या चीनला हिमालय पर्वत ओलांडून रसद पोहोचवण्याचा अनुभव त्याच्याकडे होता. त्याने सर्व कामाचे वेळापत्रक आखून आणि त्याचे कडेकोट अंमलबजावणी करत केवळ दीड महिन्यात म्हणजे १२ ऑगस्ट १९४८ रोजी प्रथमच एका दिवसात ४५००टन रसद उतरवली गेली. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली होती. ह्याची पुंरावृत्ती सुद्धा होत राहिली अगदी रोज. लवकरच म्हणजे ३१ डिसेंबर ह्या दिवशी ६००० तन रसद उतरवली गेली. सगळे जग स्तिमित झाले.

ह्या बर्लिन एअर लिफ्ट करणाऱ्या वैमानिकापैकी एक गेल हावर्सन हा आपल्या विमानातून धावपट्टी वर उतरताना हातरुमालाची/ कापडाची छोटी पॅराशूट्स करून त्याला चॉकलेट , गोळ्या मिठाई बांधून खाली जमलेल्या लहान मुलांच्या दिशेने टाकत असे. ह्या गोष्टीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. टर्नरने ह्या गोष्टीला अमेरिकेत आणि जगात प्रचंड प्रसिद्धी दिली. गेल ची हि कृती अमेरिकन सैन्याने ऑफिशियली अंगिकारली आणि ऑपरेशन लिटल व्हिटल म्हणजे ऑपरेशन छोटासा खाऊ! ह्या नावाने राबवली. त्याचा परिणाम म्हणून जगातून सर्वप्रकारच्या मदतीचा पाठीम्ब्याचा आणि सहानुभूतीचा प्रचंड ओघ बर्लिनकडे वाहू लागला आणि रशियानांची प्रचंड मानहानी झाली, छी थू झाली.
ह्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने रशियाने जर नवे चलन डोईच मार्क दोस्त राष्ट्र आणि प. जर्मनी तसेच प. बर्लिन मधून काढून घेणार असणार तर नाकाबंदी हटवण्याचा प्रस्ताव ठेवला. पण दोस्तानी आणि प. जर्मनीने नकार दिला. त्याविरीधात सप्टेंबर १९४८ मध्ये रशीयनांच्या हातातली बाहुली असलेल्या पूर्व जर्मनीतील कम्युनिस्ट पार्टीने बर्लिनच्या सिटी कौन्सिल वर मोर्चा काढला.तर याला विरोध करायला आणि मोर्चा अडवायला ३ लाख प. बर्लीन्कार नागरिक रस्त्यावर उतरले.पश्चिम जर्मनी आणि प. बर्लिनची जनता आपल्या बाजूने आहे ह्याची दोस्ताना खात्री पटली आणि त्यांची भूमिका अधिक ताठर झाली.
स्टालीनाची दोस्ताना प.बर्लिन मधून हाकलून लावायची एकूणच योजना निकाली निघाली. सगळे, नव्हे पण अर्धे जग तरी त्यांच्या विरोधात गेले. अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांना एक नैतिक अधिष्ठान मिळाले.अखेर ११ महिन्यानी म्हणजे १२ मी १९४९ राजी रशियाने रेल्वे आणि रस्त्याने माल वाहतूक करायला परवानगी दिली.स्वत:च्या घाणेरड्या राजकारणासाठी प. बर्लिनच्या नागरिकांच्या पोटाला चिमटा आणि नरडीला नख लाऊ पाहणाऱ्या रशिया विरुद्ध सर्व प. युरोपियन राष्ट्र एकत्र आली आणि त्यातून नेटो म्हणजे North Atlantic Treaty Organizationची स्थापना झाली (४ एप्रिल १९४९). रशियाच्या युरोपातील विस्तारधोरणाला खीळ बसली ती कायमचीच. २३ मे १९४९ राजी दोस्तानी प. जर्मनीला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली तर मागाहून म्हणजे ७ ऑक्टोबर १९४९ ला पूर्व जर्मनीला वेगळे राष्ट्र म्हणून रशियाने मान्यता दिली. बरोबर ४१ वर्षानी म्हणजे ३ ऑक्टोबर १९९० रोजी दोन्ही देश एकत्र येऊन पुन्हा जर्मन राष्ट्र एकसंध झाले.
१८७१च्या पहिल्या जर्मन एकीकरणानंतर १२० वर्षानी) २९ ऑगस्ट १९४९ रोजी रशियाने आपल्या पहिल्या वहिल्या अणु बॉम्ब ची यशस्वीच्च्नी केली आणि जग शीत युद्धाच्या गर्तेत जे अडकले ते पुढची ४५ वर्षे सतत आण्विक विनाशाच्या सावटाखालीच राहिले.
ह्याकालात दोस्तानी प. बर्लिनला २४ दशलक्ष टन रसद हवाई मार्गाने पोहोचवली. सर्व विमानांनी मिळून १४ कोटी ८० लाख किमी इतके प्रचंड अंतर सततच्या फेऱ्यामध्ये कापले. हे अंतर जवळ जवळ पृथ्वीपासूनच्या सुर्यापर्यंतच्या अंतरा इतके(१५ कोटी किमी) आहे. जवळपास दर ३० सेकंदाला एक विमान बर्लिनच्या विमानतळावरून वरून उडत असे किंवा उतरत असे (बर्लीनकरांच्या कानाच्या पडद्यांची काय वाताहत झाली असेल.) ह्या महाप्रचंड मोहिमेत हानी देखिल कमी झाली नाही ८० लोक आणि वैमानिक अपघातात मरण पावले ११५ विमाने हवेत नादुरुस्त होऊन, दाट धुक्यात एकमेकांवर आदळून किंवा थकलेले वैमानिक विमान उडवत असताना डुलकी लागून अपघात ग्रस्त झाली.
नंन्तर ४५ वर्षे चाललेल्या शीत युद्धाच्या सुरुवातीला तरी ही अचंबित करणारी त्याच बरोबर माणसे चांगल्या भावनेने एकत्र आली तर काय चमत्कार घडवून आणू शकतात हे दाखवणारी मोठी आशादायक घटना होती ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
-आदित्य
bal_2.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख.
*माणसे चांगल्या भावनेने एकत्र आली तर काय चमत्कार घडवून आणू शकतात हे दाखवणारी मोठी आशादायक घटना होती ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.* खरंय. एक प्रचंड मोठी व तितकीच नाजूक , जिकीरीची मोहीम अशा प्रेरणेशिवाय राबवणं अशक्यच !
या मोहिमेवर आधारित बरीच पुसतकंही लिहीली गेलीः. माझ्या आवडत्या Leon Uris याच्या 'Armegeddon ' कादंबरीत या मोहिमेचे कांहीं आत्यंतिक बारकावे प्रभावीपणे मांडले होते.
( या संपूर्ण मोहिमेला कुणीतरी ' Juggernaut ' - अजस्र वाहन -हा शब्द वापरलयाचंही आठवतं.
अवांतर- Juggernaut हा शब्द ' जगन्नाथाचा रथ ' ् यावरून आल्याची रंजक माहिती त्यामुळे लक्षात राहिली होती. )

>>त्याविरीधात सप्टेंबर १९४८ मध्ये रशीयनांच्या हातातली बाहुली असलेल्या पूर्व जर्मनीतील कम्युनिस्ट पार्टीने बर्लिनच्या सिटी कौन्सिल वर मोर्चा काढला.तर याला विरोध करायला आणि मोर्चा अडवायला ३ लाख प. बर्लीन्कार नागरिक रस्त्यावर उतरले

इथे पूर्व बर्लिनकर असं हवंय का? बाकी लेख आवडला. चांगली माहिती मिळाली. फोटोतली व्यक्ती कोण आहे?

पराग१२२६३, प्लीज थोडं विस्ताराने लिहाल का? म्हणजे आम्हा वाचकांनासुध्दा तुम्हाला ही मांडणी एकांगी का वाटली ते कळेल.