आनंदण्याची कारणे--( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 31 July, 2021 - 09:01

आनंदण्याची कारणे---( वीक एंड लिखाण )
 
मी बँकेत कार्यरत असताना ट्रेनिंग सेंटरमधे गेस्ट फॅकल्टी म्हणून जात असे. एकदा मला असेच एका ट्रेनिंग बॅचला पाचारण करण्यात आले. विषय होता निवृत्तीनंतरचे जीवन कसे व्यतीत कराल. येत्या एक वर्षात निवृत्त होणारे अ‍ॅसिस्टंट जनरल मॅनेजर्स ट्रेनिंगसाठी बोलावले होते. अजून एक विशेष म्हणजे घरात नवरा किंवा बायको कसे आनंदी जीवन जगायचे हे ठरवू शकत नाही. दोघांनी मिळून हे महाकठीण काम करावे लागते. हे ध्यानात घेऊन बँकेने नोकरी करणारे ऑफिसर्स आणि त्यांची पत्नी किंवा पती यांना ही बोलावले होते. अशी एकूण २५ जोडपी होती. मला सकाळी नऊ ते दीड पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. या सर्वांशी संवाद साधताना मला खूप मजेशीर अनुभव आले जे मी येथे आपणांशी शेअर करणार आहे. या ट्रेनिंगमधे जास्त लोक आंध्र प्रदेशातील होते. मी जोडप्यांना अनेक प्रश्न विचारले त्यातील कांही असे--
१)तुम्ही दोघे मिळून घरी( दिलखुलास गप्पा मारता का?--प्रतिसाद्; नुसतेच एकमेकाकडे ओशाळून बघणे
२) तुम्ही कधी एकमेकांना विनोद सांगून मनमोकळे हसता का?--प्रतिसाद-- जो वर आहे तोच.
२) तुम्ही कधी नदी/सागर किनार्‍यावर किंवा तळ्याकाठी निवांत एकमेकांच्या हातात हात घालून वेळ घालवलाय का?--प्रतिसाद पुन्हा तोच. एकमेकाकडे बघणे.
मग लोकांना थोडे बोलते करण्यासाठी मी जरा विषय बदलला. सर्वांना एक प्रश्न केला की तुम्हाला जीवनात खुशी मिळावी यासाठी कुटुंबात तुम्हाला काय हवे आहे. या प्रश्नाला मात्र भरभरून प्रतिसाद मिळाला. जसे जसे प्रतिसाद मिळत गेले, मी ब्लॅकबोर्डावर लिहीत गेलो. आलेली कांही उत्तरे नमुन्यादाखल खाली देत आहे.
१) माझ्या सुनेने आमच्या दोघांशीही चांगले वागावे.
२) माझी नातवंडे चांगल्या मार्कांनी पास व्हावेत.
३) आम्ही मुलांसाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचे मुलांनी ध्यान ठेवावे.
४) आमची मुलांनी सर्व परीने काळजी घ्यावी जशी आम्ही आमच्या आई बाबांची घेतली.
५) बायकोने नवर्‍याशी किंवा नवर्‍याने बायकोशी हिडिस फिडिस करू नेये. आदराने वागावे.
असे एकूण पन्नास प्रकार बोर्डावर लिहिले गेले.
समारोप करताना मी सर्वांना सहनुभूती दाखवली. या गोष्टी सर्वच कुटुंबात घडतात. आणि माझा मुख्य प्रतिप्रश्न केला. तुम्हाला आनंद मिळण्यासाठी मुलांनी, सुनेने, नातवंडांनी, शेजार्‍यांनी काय काय करायला पाहिजे हे सविस्तर सांगितलेत आपण. मला एक सांगा की तुम्हा लोकांचा आनंद एवढा परावलंबी आहे का? तुम्ही कोणीही सांगितले नाही की तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः काय करणार ते! तुम्ही गणपती बाप्पा नाहीत की सर्व लोकांनी तुम्हाला आनंदाचा नैवेद्य दाखवून  नमस्कार करावा. आणि वर्गात पिनड्रॉप शांतता पसरली. मग त्यांना कौन्सेलिंग केले आणि वर्ग संपला. लंच घेतांना बरेच लोक मोकळेपणाने बोलले. ते काय काय म्हणाले हा लिखाणाचा स्वतंत्र विषय होईल.
माझ्या मनात नेहमी येते की आनंद लुटणे लोकांना का एवढे अवघड जाते? आनंद चोहिकडे विखुरलेला आहे. आपण कसा लुटायचा हे आपणच ठरवायचे असते.  अर्थात मी सात्विक आनंदाबद्दल हे विधान केले. दुसर्‍यांना त्रास देवून मिळवलेला आनंद हा असुरी असतो. तुमची प्रवृत्ती कशी आहे यावर आनंद अवलंबून असतो. मी एके ठिकाणी वाचलय की ज्यांचा स्वभाव मोकळा आणि प्रवाही असतो ते लोकच आनंद लुटू शकतात. साधी विनोदाचीच बाब घ्या. ज्यांचा ओघवता स्वभाव आहे तेच विनोद प्रभावीपणे सांगू शकतात  आणि दुसर्‍यांनी सांगितलेल्या विनोदावर खळखळून हसूही शकतात.
असा हा पसरलेला आनंद आपणच लुटायचा असतो. कुणी देण्याची वाट बघायची नसते. आनंदाची जगात कोठेही बाजारपेठ नाही. एकदा आनंद लुटायचे तंत्र आले की आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था सहज प्राप्त होते. या आनंदाविषयी लिखाणाचा शेवट मी एका विनोदी गझलेने करतोय. अशा विनोदी गझलेला हझल म्हणतात, बघा थोडा आनंद मिळतो का ते वाचून!

कारणे (हझल)

सांग माहेरी सदा तू राहण्याची कारणे
तीच माझ्या वेदना आनंदण्याची कारणे

तीच शेजारीण आहे बोलतो मी, लाघवी
ऐकता चोरून मिळती भांडण्याची कारणे

मेहुणी माझी तुझीही लागते भगिनी तरी
सांग तू दुस्वास मग आरंभण्याची कारणे

वाढता तव घेर बघुनी हर्ष मम्मीला तुझ्या
माय पुसते आज माझ्या वाळण्याची कारणे

मी तरी होहोच म्हणतो खानदानी रीत ही
तुज तरी मिळती कुठूनी वसकण्याची कारणे

धूर्त शेजा-यास कळले आज ती नाही घरी
जाणती ते शांततेच्या नांदण्याची कारणे

ती तुझ्या प्रेमात आहे कैद तुज केले तरी
दूर कर "निशिकांत" मुसक्या बांधण्याची कारणे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.नं. ९८९०७ ९९०२३

 
 

Group content visibility: 
Public - accessible to all site users